‘लीगल इगल्स्’ – भारतातील अनन्यसाधारण वकिलांच्या कथा

-अ‍ॅड. अभिजीत उदय खोत

 भारताच्या न्यायपालिकेतील अनेक गाजलेल्या खटल्यांचे मागील एक दशकापेक्षा जास्त काळापासून वार्तांकन करणारे पत्रकार इंदू भान यांचे ‘लीगल इगल्स्’ हे पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाले, इंदू भान यांच्या या पुस्तकात, कुलभूषण जाधव यांच्या केसमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडणारे – हरीश साळवे, दिल्लीतील ‘चांदणी चौक’ येथून आपल्या वकिलीची सुरुवात करून पुढे अटर्नी जनरल या वकिली क्षेत्रातील सर्वोच पदापर्यंत पोहोचणारे – मुकुल रोहतगी, भारतीय न्यायव्यवस्थेत आतापर्यंत सर्वात कमी वयात ‘ज्येष्ठ वकील’ (‘सिनिअर लॉयर’) हा दर्जा मिळालेले – डॉ. अभिषेक मनु सिंघवी, उत्कृष्ट कायदेपंडित, ‘कोर्टरूम जिनियस’ यासह कायद्याच्या अनेक पुस्तकांचे लेखक व  ‘मराठा आरक्षण’ केसमध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे – अरविंद पी. दातार, King & Partridge या ब्रिटिशकालीन लॉ-फर्म मधून आपल्या करिअरची सुरुवात करणारे – आर्यमा सुंदरम, ‘आम आदमी पार्टी’ चे सहसंस्थापक, मृदुभाषी व शांत स्वभावाचे – प्रशांत भूषण व शेवटी; सुप्रसिद्ध ज्येष्ठ वकील, फाली नरीमन यांचे सुपुत्र व वकिलीची केवळ पंधरा वर्षांची प्रॅक्टिस असतांना देखील देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त झालेले – न्यायमूर्ती रोहिंग्टन फाली नरीमन, या जेष्ठ वकिलांचा (सिनिअर लॉयर) समावेश आहे. ह्या सर्वांचा प्रवास वाचकांना त्यांच्या काळात घेऊन जातो.

हे पुस्तक म्हणेज कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी, वकिलांसाठी व त्याचप्रमाणे ‘जिज्ञासूंसाठी’ जणू मेजवानीच! ‘लीगल इगल्स्’ या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे, वकिली क्षेत्रात आल्यावर तुमच्याकडून समाजाला असणाऱ्या अपेक्षा, ‘व्यवसायात’ नैतिकता जपण्याचे महत्व, समाजात वकिली क्षेत्राला असलेले महत्वाचे स्थान व सोबतच या सर्व ज्येष्ठ वकिलांच्या ‘संघर्षाचे’ व त्यांच्या इथवरच्या प्रवासाचे शब्दांकन या पुस्तकात केले आहे. यामधील काही घटना खरोखर अवाक् करणाऱ्या असून तितक्याच प्रेरणादायी देखील आहेत.


-हरीश साळवे

१९५६ साली नागपुरात जन्मलेले व माजी केंद्रीय मंत्री व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचे सुपुत्र – हरीश साळवे हे आपल्या सगळ्यांना परिचयाचे असलेले नावं आहे. साळवे यांना इंजिनिअर व्हायचे होते पण सोबतच त्यांना सी. ए. मध्ये देखील रस होता. सुरुवातीला दोनदा सी. ए. च्या परीक्षेत अपयश हाती आल्यावर त्यांना यश मिळाले. त्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेऊन आपल्या वडिलांच्या नामांकित ‘साळवे अँड कंपनी’ या  सी. ए. फर्म मध्ये काम धरले. पुढे भारताच्या वकिली क्षेत्रातील प्रसिद्ध ज्येष्ठ वकील नानी पालखीवाला यांच्या प्रेरणेमुळे साळवेंनी ‘लॉ’ करायचे ठरवले. त्यानंतर दिल्लीला ‘शिफ्ट’ झाल्यावर १९८० साली दिल्ली बार कौन्सिल मध्ये नोंदणी करून वकिलीची सुरुवात केली. सुरवातीला साळवे ‘जे. बी. दादाचंदजी अँड कंपनी’ या फर्म मध्ये इंटर्न म्हणून रुजू झाले होते. याचवेळी त्यांना जेष्ठ वकील नानी पालखीवाला यांना एका केस मध्ये ‘असिस्ट’ करण्याची संधी मिळाली. पुढे पालखीवालांच्या सल्यावरून साळवेंनी प्रसिद्ध जेष्ठ वकील, सोली सोराबजी यांच्यासोबत प्रॅक्टिस सुरु केली.

साळवेंनी आजपर्यंत अनेक ‘हाय प्रोफाईल’ केसेस चालवल्या आहेत. अंबानी, महिंद्रा, टाटाच्या काही कंपन्या व याशिवाय भारतातातील अनेक ‘बडे प्रस्थ’ साळवेंच्या पक्षकारांच्या यादीत येतात, शिवाय रतन टाटा यांची ‘राईट टू प्रायव्हसी’ ची वैयक्तिक केस देखील साळवेंनीच हाताळली होती. त्यांच्या कारकिर्दीतली मैलाचा दगड ठरलेली अजून एक केस म्हणजे, २.५ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी मोठी असलेली प्रख्यात ‘व्होडाफोन’ची केस. हरीश साळवेंना दिल्ली उच्च न्यायालयाने १९९२ साली ‘सीनिअर लॉयर’ म्हणून डेजि़गनेट केले. निसर्गप्रेमी व भ्रमंतीची आवड असणाऱ्या हरीश साळवेंनी जवळपास दोन दशके वेगवेगळ्या केसेस मध्ये ‘कोर्टाचा मित्र’ (Amicus Curiae) म्हणून काम पहिले असून त्यामध्ये पर्यावरण व वनसंरक्षणाच्या केसेस व त्याचप्रमाणे दिल्लीतील वाहनांमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाच्या केसचा देखील समावेश आहे.

पुढे १९९९ ते २००२ या एनडीए सरकारच्या काळात त्यांनी ‘सॉलिसिटर जनरल’ हे वकिली क्षेत्रातले दुसरे सर्वात उच्च पद भूषविले. २०१५ सालच्या गणतंत्र दिवशी त्यांना ‘पद्म भूषण’ हा देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात आहे. अनेकांना हि गोष्ट माहिती नसेल कि, कुलभूषण जाधव यांच्या केस मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडणाऱ्या साळवेंनी त्या केस साठी मात्र एक रुपया इतकीच फी घेतली होती. आलेल्या अपयाशांबद्दल बोलतांना साळवे म्हणतात, “Failure teaches you more in life than success does. Dealing with success is easy; accepting disappointments with equanimity and harnessing the energy of failure to achieve greater heights are the greatest lessons in life.”

 

-मुकुल रोहतगी

मुकुल रोहतगी हे मुळचे दिल्लीचे असले तरी त्यांचा जन्म १९५५ साली त्यांच्या आजोळी मुंबई येथे झाला. लहानपणी सुट्यांमध्ये मुंबईला आजोळी आल्यावर मुकुल व त्यांची बहिण ह्या दोघांचाही कल असायचा तो म्हणजे फिरत्या ग्रंथालयातून पुस्तके घेऊन जास्तीत जास्त पुस्तकांचा ‘फडशा’ पाडण्यात. प्रवासात असतांना फावल्या वेळेत मुकुल वाचन करणे पसंत करतात. मुकुल ह्यांचे वडील देखील वकील होते, सुरुवातीला रोहतगी कुटुंब दिल्लीच्या चांदणी चौक ह्या भागात राहायचे. १९७२ मध्ये त्यांचे वडील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाल्यावर रोहतगी ‘चांदणी चौका’तून बाहेर पडले. मुकुल ह्यांनी वडिलांच्या पाऊलखुणांवर पाय ठेवत वकिली क्षेत्रात येण्याचा निर्णय त्यांनी घेतला, पण मार्क कमी पडल्यामुळे  त्यांना दिल्ली विद्यापीठाच्या कायद्याच्या विद्या शाखेत (faculty of law) प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई येथून त्यांचे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. इथेच त्यांना प्रसिद्ध ‘कारंजवाला अँड कंपनी’चे रायन कारंजवाला व अरुण जेटलींसारखे मित्र मिळाले. त्यांच्या मैत्रीचा अजून एक किस्सा म्हणजे, व्ही. पी. सिंग यांच्या सरकारच्या काळात अरुण जेटली ह्यांची अॅडीशनल सॉलिसिटर जनरल या पदासाठी निवड झाली होती, पण नेमकं त्यावेळेस जेटली हे ‘सिनिअर लॉयर’ व्हायचे होते. त्यावेळी रोहतगी यांनी स्वतः दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना भेटून जेटलींना ‘सिनिअर लॉयर’ म्हणून डेजि़गनेट करण्याचा प्रस्ताव मांडला, या प्रस्तावाला सर्व न्यायमूर्तींनी सहमती देऊन जेटलींना ‘सिनिअर लॉयर’ म्हणून डेजि़गनेट केले.

            मुकुल ह्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने १९९३ साली ‘सिनिअर लॉयर’ म्हणून डेजि़गनेट केले आणि त्यानंतर त्यांची १९९९ साली त्यांची अॅडीशनल सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती झाली ज्यामुळे त्यांचे सर्वोच्च न्यायालयातील प्रॅक्टिसचे ‘नवे पर्व’ सुरु झाले. १९९९ ते २००४ या त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलतांना ते म्हणतात अॅडीशनल सॉलिसिटर जनरल ह्या पदावर रुजू झाल्यावर देशातील ‘नोकरशाही’ कश्या प्रकारे काम करते याचा ‘चांगलाच’ अनुभव त्यांना आला.

            रोहतगींनी आजपर्यंत अनेक ‘मोठ्या’ केसेस हाताळल्या आहेत ज्यामध्ये झारखंड विधानसभेची ‘फ्लोर टेस्ट’ ची केस, अंबानी बंधूंची केस, गांधी परिवारातील वरूण गांधींची केस, तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांची केस यांसह अनेक केसेसचा यामध्ये समावेश आहे. जवळपास दहा वर्षांनंतर २०१४ साली मुकुल ह्यांची अटर्नी जनरल म्हणून नियुक्ती झाली. मुकुल ह्यांचे वैशिष्ट म्हणजे वकिली क्षेत्रात आल्यापासून ते आठवड्याच्या सातही दिवस सुट्टी न घेता काम करतात. लहानपणी त्यांच्या सोबत शाळेत घडलेल्या एका घटनेचा तपशील देऊन, जीवनाबद्दल ते म्हणतात कि, “Life itself is a test. No matter how hard one may prepare for contingencies, life has its own special ways to test each person and their calibre. It is up to individuals to cultivate habits which will help them overcome the unexpected and the unknown.”

 

-डॉ अभिषेक मनू संघवी

            अभिषेक ह्यांचा जन्म १९५९ साली राजस्थान मधील जोधपूर येथे झाला. अभिषेक ह्यांचे वडील डॉ. एल. एम. सिंघवी हे १९६२ साली जोधपुर येथून लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते व विजयी देखील झाले होते. तेव्हा त्यांच्या प्रचारार्थ प्रचार करत असल्यापासून लहानग्या अभिषेक ह्यांच्या मनावर राजकारणाचे धडे गिरवले गेले. लहानपणी अभिषेक हे अतिशय खोडकर असल्याचे ते सांगतात, त्यांच्या घराच्या बाल्कनीतून महागडी भांडी खाली रस्त्यावर फेकण्यात त्यांना मजा यायची.

अभिषेक ह्यांचे प्राथमिक शिक्षण प्रसिद्ध अशा सेंट कोलंबा ह्या शाळेतून झाले. शालेय शिक्षणात ते नेहमीच अग्रेसर असतत्यामुळे अनेकदा त्यांची महत्वाची भाषणे देण्यासाठी, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेसाठी वर्णी लागायची. पुढे अभिषेक ह्यांनी यु. के. मधील केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनीटी कॉलेज मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. वकिलीत जरी ते १९८१ साली आले तरी त्यांची डॉक्टरेट पूर्ण झाल्यावर १९८५-८६ पासून त्यांची खरी प्रॅक्टिस सुरु झाली. त्या नंतर त्यांनी देशातील सुप्रसिद्ध सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केली. ह्याच काळात सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे धनंजय चंद्रचूड, संजय कौल व उच्च न्यायालयांचे अनेक न्यायमूर्ती, देशातील प्रसिद्ध व्यावसायिक, व भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणीयन हे त्यांचे वर्गमित्र होते.

सगळ्याच प्रकारच्या केसेस हाताळणारे अभिषेक वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी देशातील आतापर्यंतचे सर्वात कमी वयाचे ‘सिनिअर लॉयर’ म्हणून डेजि़गनेट झाले. १९९७ साली एच. डी. देवेगौडा सरकारच्या काळात त्यांनी, देशातील सर्वात तरुण ‘अॅडीशनल सॉलिसिटर जनरल’ म्हणून काम पहिले. पुढे ते १९९९ मध्ये ‘सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन’चे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

अभिषेक हे कॉंग्रेस मधील एक मोठे प्रस्थ असून त्यांनी खासदार म्हणून राज्यसभेत राजस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. ते कॉंग्रेसचे प्रवक्ता देखील होते. ते सांगतात कॉंग्रेसचा प्रवक्ता होण्याआधी त्यांना भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून देखील प्रवक्तेपदासाठी विचारणा झाली होती. यात सगळ्यात विशेष बाब म्हणजे अभिषेक कॉंग्रेस चे प्रवक्ता असतांना त्यांचे वडील त्याच वेळेस भारतीय जनता पक्षात होते.

अभिषेक ह्यांना वयाच्या अवघ्या बेचाळीसव्या वर्षी ‘गोल्बल लीडर ऑफ टुमॉरो’ ह्या जगप्रसिद्ध पुरस्काराने ‘वल्ड इकॉनॉमिक फोरम’ तर्फे सन्मानित करण्यात आले. अभिषेक यांना वाचनाची (विशेषतः आत्मचरित्र वाचायची) आवड असून टी. व्ही. पाहण्याची देखील आवड आहे. शेवटी, वकिली क्षेत्रात नवीन असलेल्या ते आवर्जून सांगतात, “When you argue before a judge, what helps is the sequence, the logic behind each point, your readiness for the next query and a general feel of where and in which direction the judge is going.”

 

-अरविंद पी दातार

  अरविंद ह्यांचा जन्म १९५६ साली मुंबई येथे झाला. त्यांचे वडील मर्चंट नेव्हीत होते, नंतर त्यांनी चेन्नई येथे स्वतःचा व्यवसाय सुरु केला व परिवारासोबत तिकडेच ‘शिफ्ट’ होण्याचा निर्णय घेण्यात आला. अरविंद ह्यांचे सुरवातीचे शिक्षण मराठी माध्यम शाळेतून झाले व पुढेचे शिक्षण चेन्नईला. साधारणतः १९६७ च्या काळात दक्षिणेत हिंदी-विरोधी चळवळ जोर धरत होती त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी त्यांची रवानगी पुण्यातील ‘श्री शिवाजी प्रीपरेटोरी मिलिटर स्कूल’ येथे केली. १९७२ साली त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले व त्यावर्षी अरविंद फक्त त्यांच्या शाळेतूनचं नव्हे तर महाराष्ट्रातून पहीले आले होते.

            अरविंद ह्यांना मूळतः सागरी अभियांत्रिकी (मरीन इंजीनीअरिंग) करायचे होते व त्यासाठी त्यांनी आधी भौतिकशास्त्र व गणिताच्या शाखेत बी. एस. सी. (ऑन्स.) साठी मुंबईतील रामनारायण रुईया या महाविद्यालयत प्रवेश घेतला व १९७६ मध्ये त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले, आणि त्यानंतर त्यांनी चेन्नईला वापस यायचा निर्णय घेतला. पण याचवेळेस त्यांच्या तब्बेतीच्या काही कारणांमुळे त्यांना ‘मरीन इंजीनीअरिंग’ला प्रवेश मिळू शकला नाही. याबद्दल बोलतांना ते म्हणतात कि, त्यावेळी पुढे काय करायचे हा त्यांच्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न होता. त्याचवेळी जेष्ठ वकिल नानी पालखीवाला यांची व्याख्याने ऐकून त्यांनी वकिली क्षेत्रात येऊन ‘टॅक्स लॉयर’ होण्याचा येण्याचा निर्णय घेतला व चेन्नई येथील देशातील प्रसिद्ध ‘मद्रास लॉ कॉलेज’ मध्ये प्रवेश घेतला. पण सोबतच त्यांना अकाउंटंन्सी मध्ये देखील अतिरिक्त पदवी हवी होती त्यासाठी त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया तर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘कॉस्ट अकाउंटंन्सी’ या कोर्सला प्रवेश घेतला. ते सांगतात १९७६ साली लॉ कॉलेजला प्रवेश घेतला तेव्हा देशात आणीबाणी लागली होती, पण या परीस्थितीचा देखील त्यांनी अफलातून उपयोग करून घेतला. याच काळात त्यांनी स्वतःचे एक पुस्तक प्रकाशित केले व ‘डेल्टा पब्लिशिंग कंपनी’ हे पब्लिकेशन देखील सुरु केले. वकिलीत आल्यावर त्यांनी हे पब्लिकेशन त्यांच्या आईच्या ‘हवाली’ केले. त्यावेळी त्यांच्याकडे फावला वेळ असल्याकारणाने कॉलेज करून पुस्तक प्रकाशनात लक्ष देणे शक्य झाले. त्यावेळी ते चेन्नई, मुंबई व पुण्याला प्रत्येक पुस्तक विक्रेत्यांकडे जाऊन स्वतःच्या पुस्तकाचे ‘प्रमोशन’ करायचे.

            कॉलेजच्या या काळात त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धांमध्ये व ‘मुट कोर्ट’ स्पर्धांमध्ये भाग घेतला. या बाबतीत एक मजेशीर किस्सा म्हणजे, १९७९ साली अरविंद आणि त्यांचा एक वर्गमित्र ह्या दोघांनी चंडीगडला एका ‘मुट कोर्ट’ स्पर्धेमध्ये भाग घेतला होता व त्या स्पर्धेत त्यांनी तिसरे बक्षीस पटकावले होते. पण चेन्नईला वापस आल्यावर त्यांच्या कॉलेजच्या प्रभारी मुख्याध्यापकांनी त्यांना स्पर्धेसाठी आलेल्या खर्चाचा परतावा देण्यास नकार दिला. पण त्यानंतर अरविंद यांनी वकिल म्हणून नोंदणी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रसिद्ध अश्या ‘मद्रास लॉ कॉलेज’वरच ६४५/- रुपयांसाठी ‘रिकव्हरी’ चा दावा ठोकला. पुढे हा दावा मंजूर झाला व व्याजासह ७००/- रुपये त्यांना परत मिळाले.

            १९८२ साली त्यांचा कॉस्ट अकाउंटंन्सीचा कोर्स पूर्ण झाला त्यावेळेस अरविंद जुनिअर वकिल म्हणून महिन्याला फक्त ३००/- रुपये कमवत होते. अरविंद म्हणतात, पैसा जरी कमी येत होता तरी सुद्धा मी वकिली सोडण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांना सरळ सांगितले होते, “Even if I have to beg, I will do it in the High Court”. फेब्रुवारी, १९८० नंतर त्यांनी आधी मिसेस रमणी नटराजन यांच्या कडे प्रॅक्टिस सुरु केली व चौदा महिन्यांनी ‘मे. सुब्बराया अय्यर, पद्मनाभन अँड राममणी’ ह्या त्यावेळच्या दक्षिण भारतातल्या ‍’टॅ‍‍क्स लॉ’ मध्ये अग्रेअर असलेल्या लॉ-फर्मला ते ‘जॉईन’ झाले. तिथे के. आर. राममणी हे त्यांचे सेनिअर होते. अरविंद सांगतात, त्यांच्या सिनिअरनी त्यांना अगदी पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या केसेस साठी कोर्टात ‘अपिअर’ व्हायची संधी दिली होती. याचवेळी त्यांचा अनेक विख्यात वकिलांशी संबध आला व त्यांना वकिली पेशातील ‘बाळकडू’ मिळत गेले.

            १ मार्च, १९८४ रोजी अरविंद ह्यांनी त्यांच्या बँक खात्यातील ३००/- रुपयांसोबत त्यांची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरु केली. त्यानंतर काही महिने त्यांच्याकडे अगदीच कमी कामं होती. त्यांच्या लॉ-फर्ममधील सिनिअर पार्टनर एस. पद्मनाभन यांनी तेव्हा त्यांना ५,०००/- रुपयांचा चेक व राममणी यांनी, अरविंद फर्म मध्ये असतांनाचा एक ८१ लाखांचा दावा होता ज्यामध्ये सुरवातीपासुनचे जवळपास सर्वच काम अरविंद यांनी केले होते, ती केस अरविंद यांना देऊ केली. त्या केसची अपेक्षित फी होती ४९,२००/-. जी त्यांना तीन वार्षिक किस्तींमध्ये मिळणार होती. त्यामुळे भूतकाळात मागे वळून पाहतांना अरविंद म्हणतात त्याच्या या दोन्हीही सिनिअर्सच्या ‘ह्या’ उदार मदतीविना त्यांचा ‘स्ट्रगल’ जास्त कठीण राहिला असता.

अरविंद ह्यांचा कॉस्ट अकाउंटंन्सीचा कोर्स पूर्ण झाल्यावर त्यांनी १९८४ पर्यंत इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICWAI) मध्ये व त्यानंतर त्यांना १९८१ ते साधारणतः १९९० पर्यंत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI) मध्ये ‘कमर्शियल लॉज‍्’ व ‘टॅक्सेशन लॉज‍्’ वर लेक्चर्स घेतले. त्यांनी तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये देखील पार्ट टाईम लेक्चरर म्हणून काही क्लास घेतलेत. या बाबतीत ते म्हणतात, “Every junior lawyer who is serious about his practice should try and take classes on his chosen subject of specialization.”

            अरविंद ह्यांना मद्रास उच्च न्यायालयाने २००० साली ‘सिनिअर लॉयर’ म्हणून डेजि़गनेट केले. त्यांनी आजवर हाताळलेल्या अनेक मोठ्या केसेसची माहिती व अनुभव आपण या पुस्तकात वाचू शकतो. त्यांची मोठ्या केसेस पैकी एक केस म्हणजे त्यांनी प्रसिद्ध पाश्चिमात्य गायक मायकल ‍जॅक्सनची केस. या केस मुळेच मायकल ‍जॅक्सनची मुंबईतील ऐतिहासिक अशी कॉन्सर्ट शक्य झाली होती. अरविंद यांना संगीताची आवड असून वाचनाची देखील (विशेषतः आत्मचरित्र, मॅनेजमेंट व ‘सेल्फ-हेल्प’ पुस्तकांची) आवड आहे. अरविंद दातार हे प्रख्यात लेखक सुद्धा आहेत व आजपर्यंत त्यांनी कायद्याच्या अनेक विषयांवर पुस्तके प्रकाशित केली असून अनेक पुस्तकांचे ते संपादक देखील आहे. सुप्रसिद्ध अश्या ‘कोर्टरूम जिनियस’ या पुस्तकाचे देखील ते सह-लेखक आहेत. लेखनाच्या बाबतीत ते म्हणतात, “For lawyers, advertising is prohibited, and the only way a lawyer can make himself known is by writing articles and books.” त्यामुळे नवीन वकिलांना ते काहीना काही लिहून पाहण्याचा सल्ला नक्कीच देतात.

 

-आर्यमा सुंदरम

आर्यमा सुंदरम ह्यांचा जन्म १९५७ साली चेन्नई येथील एका पारंपारिक कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा सी. पी. रामास्वामी अय्यर व काका सी. आर. पत्ताभिरमण हे दोघेही त्यावेळचे प्रसिद्ध वकिल होते. त्यांचे काका १९६० साली इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय कायदे मंत्री होते व त्यांचे वडील राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त झाले होते. आर्यमा म्हणतात त्यांना लहानपणापासून त्यांच्या आजोबांसारखं वकिल व्हायचं होतं. व त्यांच्या आजोबांना देखील आपल्या नातवाने देखील वकिल व्हावे व घराण्याची ‘वकिलीची’ परंपरा पुढे न्यावी असे वाटायचे. आर्यमा ह्यांचे प्राथमिक शिक्षण प्रसिद्ध ‘लॉरेन्स स्कूल’ मधून झाले असून १९७६ साली चेन्नई येथील विवेकानंद महाविद्यालयातून त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले.

            सुंदरम म्हणतात, त्यांना कधीही वकिलीशिवाय दुसरे काही करायची इच्छा नव्हती पण नवीन गोष्टी करून पाहण्याची आवड मात्र त्यांना होती. चेन्नईतील प्रसिद्ध ‘मद्रास लॉ कॉलेज’ मधून त्यांचे वकिलीची शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुरवातीला ‘Ogilvy & Mather (O&M)’ या त्याकाळच्या प्रतिष्ठित जाहिरात कंपनीत नोकरी धरली. त्यांनी वकिलीपेक्षा जाहिरात क्षेत्रात करिअर करण्याचा विचार देखील त्यावेळी अनेकदा केला होता. पण शेवटी त्यांनी वकिलीक्षेत्रातचं राहायचा निर्णय घेतला.

            जाहिरात कंपनीतील नोकरी सोडल्यावर सुंदरम यांनी १९८० साली King & Partridge या ब्रिटिशकालीन लॉ-फर्म मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याकाळी या लॉ-फर्मची चेन्नई, बंगलोर, कलकत्ता व नवी दिल्ली येथे कार्यालये होती, त्यामुळे सहाजिकच अनेक प्रकारची कामं त्यांना हाताळायला मिळायची. सुंदरम यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे व हुशारीमुळे लवकरचं फर्म मधील सगळे त्यांना ओळखायला लागले होते व वरिष्ठ पातळीवर त्यांच्या कामाची दखल घेतल्या जात होती. एस. रामासुब्रमनियन हे त्यांचे फर्म मधील सिनिअर होते. सुंदरम आजही आठवणीने सांगतात कि, त्यावेळी एस. रामासुब्रमनियन ह्यांनी दिलेल्या अनेक संधींमुळे मी लवकरच मद्रास उच्च न्यायालासमोर नियमितपणे ‘अपिअर’ व्हायला लागलो. त्यांचे कोर्टातील अनेक अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत.

            सुंदरम यांची अप्रतिम कामगिरी पाहता, चेन्नईतील जेष्ठ वकिल गोविंद स्वामिनाथन यांनी घेतलेल्या पुढाकाराने मद्रास उच्च न्यायालयाने आर्यमांना त्यांच्या वयाच्या अडोतीसाव्या वर्षीच ‘सिनिअर लॉयर’ म्हणून डेजि़गनेट केले. तेव्हा पद्धत अशी होती कि, ‘सिनिअर लॉयर’ होण्यासाठी वयाची पंचेचाळीस वर्षे पूर्ण करावी लागायची. ‘सिनिअर लॉयर’ झाल्यावर कालांतराने सुंदरम दिल्लीला ‘शिफ्ट’ झाले व सर्वोच न्यायालयात नियमित प्रॅक्टिस सुरु केली. आर्यमांनी आतापर्यंत बी.सी.सी.आय. च्या, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अँड इंडस्ट्रीच्या व ‘द च्याटर्जी ग्रुप’ विरुद्ध पश्चिम बंगाल सरकारकडून केसेस लढवल्या आहेत. यांमध्ये आय. पी. एल. च्या कुप्रसिद्ध ‘स्पॉट फिक्सिंग’च्या केस चा देखील समावेश आहे (सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे). सुंदरम यांना संगीताची (विशेषतः ओपेरा संगीताची) आवड असून प्रवासाची व सिनेमा बघण्याची सुद्धा आवड आहे. एक परिपूर्ण वकिल होण्याबद्दल ते म्हणतात, “A perfect lawyer is one who has the ability to think. S/he should have the confidence and the ability to think originally. An ideal lawyer should have the courage to be able to voice and state what s/he believes in, and should possess integrity as a person and a legal professional. And that should make him or her a role model. S/he should have the ability to communicate most effectively in the shortest possible time and the shortest possible way.”

 

 -प्रशांत भूषण

  प्रशांत ह्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील अलाहाबाद येथे १९५६ साली ‘वकिलांच्या’ कुटुंबात झाला. प्रशांत यांचे वडिल हे मोरारजी देसाई सरकारच्या काळात केंद्रीय कायदेमंत्री होते. त्यांचे आजोबा देखील वकिल होते. सेंट. जोसेफ हायस्कूल मधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी आय. आय. टी. मद्रास येथून इंजिनिअरिंग करायचे ठरवले. पण तिकडे प्रवेश घेतल्याच्या एक वर्षाच्या आतच त्यांना जाणवले कि, इंजिनिअरिंग हे काही त्यांचे क्षेत्र नाही, त्यामुळे वर्षभरातचं त्यांनी आय. आय. टी. मद्रासला ‘राम-राम’ ठोकला.

            भारताच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारी केस (स्टेट ऑफ उत्तर प्रदेश वि. राज नारायण), ज्यामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना सहा वर्षे निवडणूक लढवायला अपात्र घोषित केले होते, ती प्रशांत यांचे वडिल शांती भूषण यांनी राज नारायण ह्यांच्या कडून चालवली होती. याच केसच्या वेळी एकोणवीस वर्षाचे प्रशांत कोर्टात बसून त्यांच्या वडिलांसाठी टिपणे काढत. त्यामुळे नकळतपणे त्यांच्यामध्ये सुद्धा त्याचवेळी वकिलीची बीजे रोवली गेली असे प्रशांत म्हणतात. त्यामुळे मद्रासहून वापस आल्यावर त्यांनी वकिली क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. इंदिरा गांधींच्या केसच्या अनेक गोष्ठी प्रशांत यांनी स्वतः अनुभवल्या होत्या, त्यामुळे त्यांनी पुढे यावर स्वतःचे पहिले पुस्तक ‘The Case That Shook India’ हे लिहिले. दरम्यानच्या काळात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर १९७९ मध्ये ते त्यांची ‘डॉक्टरेट’ करण्यासाठी प्रिन्सटन युनिवर्सिटीला गेले व १९८२ मध्ये तिथून परतले.

            १९८३ साली प्रशांत ह्यांनी दिल्ली बार कौन्सिल मध्ये नोंदणी करून, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर, (जे तेव्हा सरकारी वकिल होते), त्याच्यासोबत वकिलीची सुरुवात केली. काही वर्षातच प्रशांत ह्यांना कळून चुकले होते कि त्यांना कश्या प्रकारच्या केसेस चालवायला आवडतात. समाजाच्या अनेक समस्या ‘जनहित याचिके’द्वारे सोडवता येतात त्यामुळे समाजभिमुख असणाऱ्या प्रशांत भूषण ह्यांचा ‘जनहित याचिका’ चालविण्याकडे कल होता. प्रशांत हळूहळू ‘लीगल अॅक्टीवीस्ट’ म्हणून ओळखले जाऊ लागले होते. ते म्हणतात आणीबाणीच्या काळात झालेल्या नागरी हक्कांच्या उलंघांमुळे नागरी स्वातंत्र्याबाबतीतले मुद्दे अधिक प्रकर्षाने जाणवू लागले होते. त्यामुळे या काळात त्यांनी ‘People’s Union of Civil Liberties’ जॉईन करायचे ठरवले. १९९० साली न्यायव्यवस्थेमधील भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी, काही प्रसिद्ध वकिल, माजी न्यायाधीश, व त्यांचे वडील या सर्वांनी ‘Committee on Judicial Accountability’ (CJA) ची स्थापना केली.न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याला हानी न पोहचवता ‘न्यायालीन उत्तरदायकता’ (Judicial Accountability) आणणे हा त्या मागचा हेतू होता.

            प्रशांत ह्यांचे जनहित याचिका चालविण्यात विशेष कौशल्य आहे. २जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोलगेट घोटाळा, कोळसा व लोह खनिज खाण घोटाळा या सगळ्या केसेसनी सरकारमध्ये अनेक बदल घडवून आणले होते, सोबतच कॉर्पोरेट क्षेत्रात अनेकांना ‘त्रास’ देखील झाला होता. त्यांच्याच एका जनहित याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाने २०११ साली ‘केंद्रीय सतर्कता आयोग’ व ‘भ्रष्ट्राचार निर्मुलन समिती’च्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्व ठरवून दिले. आपल्या जनहित याचिकांद्वारे समाजाचे वेगवेगळे प्रश्न सोडवणारे प्रशांत अनेकदा ‘लाईन क्रॉस’ केल्यामुळे देखील चर्चेत आले. त्यांनी २००९ मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, देशाच्या माजी सरन्यायाधीशांबद्दल केलेल्या व्यक्तव्यामुळे त्यांना कोर्टाच्या अवमानना याचिकेला सामोरे जावे लागले होते. त्याचप्रमाणे २०१० मध्ये देखील न्यायाधीशांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांना कोर्टाच्या अजून एका अवमानना याचिकेला सामोरे जावे लागले. १९९० साली प्रशांत ह्यांनी त्यांचे दुसरे पुस्तक, ‘Bofors: The Selling of a Nation’ हे प्रकाशित केले. ज्यामध्ये देशातील बोफोर्स घोटाळ्याचे वर्णन केले होते. बोफोर्स घोटाळ्यामुळे देशाच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले होते.

            साधेपणा, प्रामाणिकपणा व स्वभावातील सहजता हि त्यांची काही वैशिष्टे असून त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे प्रत्येकासाठी सोपे व सहज आहे. जनहित याचिकांसोबतच न्यायाधीशांच्या महाभियोग प्रक्रियेवेळी ठेवल्या जाणारे ‘महाभियोग प्रस्ताव’ तयार करण्यात देखील प्रशांत यांची कुशलता आहे (ह्या बाबतीत अनेक लोक अनभिज्ञ आहेत). देशाच्या राजकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी दिल्लीतील सत्ताधारी पक्ष ‘आम आदमी पार्टी’ ची स्थापना केली होती (ते त्यात सह-संथापक होते), पण कालांतराने काही कारणांमुळे ते त्यांतून बाहेर पडले.

            प्रशांत हे स्वतः शिस्तप्रिय आहेत. त्यांना सर्व प्रकारच्या संगीताची आवड आहे पण त्यातही भारतीय शास्त्रीय संगीत व जगजीत सिंग ह्यांच्या गझल त्यांना आवडतात. त्याचप्रमाणे चालू घडामोडी, अर्थशास्त्र ह्यावरील वाचन करणे त्यांना आवडते. कौशल्यांबद्दल बोलतांना प्रशांत म्हणतात कि, “Skills are important because, normally, people in the country just want to find some job without really trying to understand how this particular job is helping the country, how it is affecting other people, or how it is serving or harming public interest. The idea is that students should become more aware and sensitive to these issues.”

 

-रोहिंग्टन फाली नरीमन

  रोहिंग्टन ह्यांचा जन्म १९५६ साली मुंबईतील पारशी घराण्यात झाला. (रोहिंग्टन ह्यांची २०१४ साली देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. लेखिकेने पुस्तकाबाबतीत त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते वकिली करत होते, त्यामुळे त्यांच्यावरील हा भाग मूलतः त्यांच्या वकिलीसंबंधी लिहिलेला आहे.) रोहिंग्टन ह्यांचे वडिल फाली ‍सॅम नरीमन हे देशातील आता पर्यंतच्या प्रसिद्ध व प्रमुख वकिलांपैकी एक होते. १९७२ साली त्यांची अॅडीशनल सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती झाली होती व ते १९९९ साली खासदार म्हणून राज्यसभेत देखील गेले होते. त्यांच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्टीय पातळीवर अनेक प्रतिष्ठेची पदे भूषविली होती. त्यांना १९९१ साली ‘पद्मभूषण’ व २००७ साली ‘पद्मविभूषण’ हे नागरी सन्मान देऊन गौरविण्यात आले.

            रोहिंग्टन ह्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील जॉन कॅनॉन स्कूल मधून झाले. रोहिंग्टन ह्यांनी वडिलांप्रमाणेच वकिली क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. दिल्ली येथील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स येथून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर त्यांनी दिल्ली विद्यापिठातून कायद्याची पदवी घेतली व पुढे जगप्रसिद्ध ‘हार्वर्ड लॉ स्कूल’ मधून कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. रोहिंग्टन भाग्यवान होते कि हार्वर्डला जाण्याआधी त्यांना प्रख्यात वकिल नानी पालखीवाला ह्यांना सुप्रसिद्ध अश्या ‘मिनेवरा मिल्स’ केस मध्ये ‘असिस्ट’ करायची संधी मिळाली. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाने (Constitutional bench) सांगितले कि, ‘देशाची संसद नागरिकांचे मुलभूत अधिकार काढून घेऊ शकत नाही’. व त्यामुळे संविधानाच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीतील कलम ४ व ५५ रद्दबादल घोषित केले. (हि केस आजही कायद्याचे शिक्षण घेतांना अभ्यासली जाते).

भारतात वापस आल्यावर त्यांनी मुंबईतून प्रॅक्टिसची सुरुवात केली ती त्यांनी बोमी झायवाला ह्यांच्या सोबत. सुरवातीला जुनिअर म्हणून काम करतांना त्यांना कुठेलेही वेतन मिळत नव्हते पण वकिलीचा भक्कम असा अनुभव ते घेत होते. ह्याच दरम्यान त्यांना विजय तेंडुलकरांची ‘सखाराम बाईंडर’ ह्या नाटकाशी संबंधित केस हाताळायला मिळाली. ह्या केसने त्यांच्या वकिलीला वेगळे वळण दिल्याचे ते आठवणीने सांगतात. कालांतराने रोहिंग्टन ह्यांनी दिल्लीला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. दिल्लीला शिफ्ट झाल्यावर त्यांनी देशाचे सध्याचे अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल ह्याच्या सोबत प्रॅक्टिस सुरु केली व साधारणतः दीड वर्षातच त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचे ते सांगतात.

            रोहिंग्टन ह्यांचे ‘सिनिअर लॉयर’ होण्यामागे देखील रंजक अशी गोष्ट आहे. त्याकाळी भारताचे सरन्यायाधीश आर. एस. पाठक ह्यांनी त्याबाबतीतले निकष ठरवून दिले होते. ज्यामध्ये संपूर्ण कोर्टाची संमती असणे व कमीतकमी पंचेचाळीस वर्षे वय असणे हे प्रमुख निकष होते. पण रोहिंग्टन ह्यांची कामगिरी पाहता न्यायमूर्ती वेंकटाचालि ह्यांनी त्यांना वयाच्या छत्तीसव्या वर्षीच ‘सिनिअर लॉयर’ म्हणून डेजि़गनेट केले. कारण ‘सरन्यायाधीशांना तसे वाटल्यास व सोबतच संपूर्ण कोर्टाची संमती असल्यास’ अपवादात्मक वेळेस तसा निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना होते. वकिल रोहिंग्टन ह्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या केसेस हाताळल्या आहेत. ज्यामध्ये सर्वश्रुत असलेल्या २ बिलियन अमेरिकन डॉलरचे ‘व्होडाफोन’ चे ‘टॅक्स ‍मॅटर’ केसचा देखील समावेश आहे. रोहिंग्टन त्यांच्या वकिलीच्या कारकिर्दीत जवळपास ५०० ‘रीपोर्टेड’ केसेस मध्ये ते ‘अपिअर’ झाले आहेत. त्याचप्रमाणे रोहिंग्टन ह्यांनी जुलै २०११ ते फेब्रुवारी २०१३ या काळात देशाचे सॉलिसिटर जनरल म्हणून देखील काम पहिले.

न्यायमूर्ती म्हणून काम करतांना देखील रोहिंग्टन ह्यांनी आजपर्यंत अनेक महत्वाचे निर्णय दिले आहेत ज्यामध्ये सुप्रसिद्ध अश्या ‘श्रेया सिंघल’ ह्या केसचा देखील समावेश आहे. या केस मध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० (Information Technology Act, 2000) मधील ‘कलम – ६६अ’ हे नागरिकांच्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारे आहे व त्यामुळे ते असंवैधानिक असल्याचा निर्णय देण्यात आला होता. रोहिंग्टन ह्यांचे वेगवेगळ्या धर्माग्रंथांबाबतचे ज्ञान देखील वाखाणण्याजोगे आहे. रोहिंग्टन नैतिकतेला सर्वात जास्त महत्व देतात. त्यांना पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताची, वनभ्रमंतीची व सोबतच इतिहास व विज्ञानावरील साहित्य वाचण्याची आवड आहे. शेवटी वकिलीतील ‘कोड ऑफ कंडक्ट’ बद्दल बोलतांना ते म्हणतात कि, “You should be there on your own merit. Your judgement should speak for you. Also, you should be absolutely straight and open with the bench and with your opponent in court. And lastly, you should, when opposing a young person, take into account his age and then act accordingly.”

अश्या प्रकारे वकिली क्षेत्रातील प्रत्येकाला हे पुस्तक नक्कीच खुणावते. या सर्व जेष्ठ वकिलांच्या गाथा वाचून एक प्रकारची दिशा, उर्जा व जिद्दीने काम करण्याची प्रेरणा मिळते. या पुस्तकातील प्रत्येक भाग वाचकाला एक परिपूर्ण व उत्कृष्ट वकिल होण्याच्या मार्गात बहुमोलाचा आहे व त्यानुसार आपली मुल्ये, आदर्श, विचारसरणी, सामाजिक जीवन, समाजातील आपला वावर; या सगळ्याबद्दल आपल्याला आत्मनिरीक्षण करायला लावणारा आहे. या पुस्तकातील प्रत्येक जेष्ठ वकिलांची कहाणी वाचतांना, नकळतपणे, स्वतःला आपल्या व्यवसायात एका नव्या उंचीवर नेण्याचे बळ प्राप्त होते यात काही शंका नाही.

(लेखक नव्या पिढीतील अभ्यासू वकील आहेत)

86000 60665