‘वर्क फ्रॉम होम’ नव्हे, ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची ठेवा तयारी !

-शेखर पाटील

कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर सातत्याने ऐकू येणार्‍या शब्दांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ याचा समावेश आहे. जगभरातील आघाडीच्या कंपन्यांपासून ते अगदी गाव पातळीवर याची चर्चा सुरू आहे. कधी काळी फक्त आयटी कंपन्यांमध्येच घरून काम करणे शक्य असल्याचे मानले जात होते. मात्र कोरोनामुळे जगभरातील कार्य संस्कृतीत आमूलाग्र बदल होणार असून घरून काम करणे हे याचे केंद्रस्थान असेल असे मानले जात आहे. तथापि, व्यापक प्रमाणात विचार केला असता घरूनच नव्हे तर ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ अर्थात कुठूनही काम करण्याची तयारी असणारा व त्या प्रकारची प्रणाली विकसित करणार्‍याला भविष्यातील आव्हानांचा सामना करणे बर्‍यापैकी सुलभ असल्याचे माझे मत आहे. मी स्वत: १३ वर्षांपासून या कार्यसंस्कृतीचा अवलंब केला असल्याने आज याबाबत आपल्याला दोन शब्द सांगावेसे वाटतात.

‘वर्क फ्रॉम होम’ ही कार्यसंस्कृती कधीपासूनच प्रचलीत असली तरी एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी याला खर्‍या अर्थाने वेग आला. इंटरनेटचा वापर करून आपण घरी बसूनही काम करू शकतो ही बाब सर्वसामान्यांना समजली. पहिल्या टप्प्यात फक्त मोजकी आयटी बेस्ड कामे ही घर बसल्या करता येत असल्याचे दिसून आले. यथावकाश अगदी डाटा एंट्रीसारख्या प्राथमिक कामांपासून ते ब्लॉगींग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, ऑनलाईन फ्रीलान्सींग आदींसारखी याबाबत विवेचन करत असे. आपण घरी बसून पाने वगैरे लावू शकतो तर ऑफिसात येण्याची गरज काय ? असा साधारणपणे या चर्चेचा रोख असे. यातच साधारणपणे २००६च्या अखेरीस राज्यातील एका ख्यातनाम फिचर सर्व्हीसचे संचालक आमच्या कार्यालयात आले. आमचे संपादक सुभाष सोनवणे यांच्या कॅबिनमध्ये मी देखील असल्याने आमच्या गप्पा रंगल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी मला कार्ड देऊन संध्याकाळी भेटण्यास सांगितले. यानुसार मी त्यांना एका हॉटेलात भेटलो असता त्यांनी मला दररोज स्पेशल फिचर पाठविण्याची विनंती केली. ही ऑफर ऐकून मी खरं तर गांगरून गेलो. अर्थात, यासाठी इंटरनेटची व्यवस्था असणे आवश्यक असल्याने त्यांच्या ऑफरला स्वीकारण्यासाठी काही महिने निघून गेले. यानंतर मी २००७ च्या प्रारंभी घरी इंटरनेटची व्यवस्था करून हे काम सुरू केले. साधारणपणे एका तासात चार फिचर तयार केल्यामुळे मला तेव्हा देशदूतमध्ये मिळणार्‍या वेतनापेक्षा जास्त पैसे मिळत असल्याचे पाहून मला यातील पोटॅन्शियल लक्षात आले. यानंतर मी अनेक ठिकाणी याच प्रकारे म्हणजे घरूनच विविध प्रकारच्या कंटेंट रायटिंगची कामे सुरू केली. यात वर्तमानपत्रे, कार्पोरेट कंपन्या आणि काही मोजक्या राजकारण्यांचा समावेश आहे. सध्या मी लाईव्ह ट्रेंडस न्यूजसोबत फिजीकल तर अन्य तीन ठिकाणी व्हर्च्युअल काम करतोय. यात एका विदेशी मीडिया हाऊसचा समावेश आहे. अर्थात, यातील व्हर्च्युअल कामे सहसा घरूनच होतात. ( कंटेंट मॉनेटायझेशन बद्दल लवकरच सविस्तर लिहतो !)

प्रसारमाध्यमांमध्ये घरून काम करणे अशक्य असल्याचे मानले जाते. खरं तर कर्मचार्‍यांची मानसिकता यासाठी कारणीभूत आहे. मी घरी काम करतांना कुटुंबियाशी बोलू शकतो. माझ्या घरातल्या ‘इको-सिस्टीम’शी जुळवून घेणे फार सोपे असल्याने घरून काम करणे हे तसे सुलभ आहे. तथापि, यासाठी मानसिकता पक्की असण्याची आवश्यकता आहे. माझ्या घरच्यांना याची सवय झालेली आहे. अगदी माझे आप्त व शेजारी यांनाही याची माहिती आहे. तर मुले देखील मला काम करतांना फारसे डिस्टर्ब करत नाहीत. मात्र ज्यांना सवय नाही त्यांच्यासाठी या नवीन कार्यसंस्कृतीसोबत जुळवून घेणे तसे फार अवघड आहे. कोरोनामुळे आता ‘वर्क फ्रॉम होम’ हा शब्द सातत्याने ऐकू येऊ लागला असला तरी अनेक क्षेत्रांमध्ये याचा कधीपासूनच अवलंब करण्यात आलेला आहे. तथापि, यासाठी नियोक्ता आणि कर्मचारी या दोघांची मानसिकता बदलल्याशिवाय ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना प्रत्यक्षात वापरणे अवघड आहे.

मी अलीकडेच जळगावात नवीन कार्यालय सुरू केले. याप्रसंगी मी सर्व सहकार्‍यांनी घरून काम करण्याची ऑफर दिली. मात्र त्यांनी याला साफ नकार दिला. परिणामी तूर्तास कार्यालय सुरू असले तरी दोन वर्षात प्रत्येकाने घरून काम करण्याची तयारी ठेवण्याचा माझा आग्रह आहे. यासाठी त्यांना माझ्या कार्यसंस्कृतीत मोल्ड करण्याचे काम सध्या सुरू आहे. अगदी मेनस्ट्रीम मीडियातही जितक्या विलक्षण आयामातून व्हर्च्युअल पध्दतीत काम होत नसेल तितके काम आम्ही सध्या करत आहोत. आमची बरीचशी कामे ही कोलॅबरेशन पध्दतीत स्मार्टफोनवर शिफ्ट करण्यात आली आहेत. अर्थात, लवकरात लवकर ‘ऑफिसलेस कंपनी’ होण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. किंबहुना आमचे हेच प्रमुख टार्गेट आहे.

‘वर्क फ्रॉम होम’ ही कार्यसंस्कृती अनेक वर्षांपासून वापरली जात असली तरी इंटरनेटच्या आगमनानंतर याला प्रचंड वेग आला आहे. आज अगदी लहान शहरांमध्येही १०० मेगाबाईट प्रति सेकंद इतक्या वेगाचे ऑप्टीकल फायबरच्या माध्यमातील इंटरनेट सहजपणे उपलब्ध आहे. इतक्या वेगात अनेक क्षेत्रांमधील प्रोफेशनल्स हे घरून काम करू शकतात. यात कामासाठी आवश्यक असणार्‍या मिटींग्जसाठी तर साध्या व्हिडीओ कॉन्फरन्सींगपासून ते स्काईप व झूमसारखे अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यामुळे कुणीही अगदी सहजपणे आपल्या सहकार्‍यांसोबत बैठक करू शकतो. तर प्रत्यक्षात अगदी ‘रिअल टाईम कोलॅबरेशन’साठी आवश्यक असणारे टुल्स देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच वर्कस्टेशन्स, संगणक, लॅपटॉप्स आदींपासून ते स्मार्टफोनपर्यंतची उपकरणे देखील यासाठी उपयुक्त ठरली आहेत. यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अर्थातच कुठेही उपलब्ध होणार्‍या वायरलेस इंटरनेटचा वेग होय. फोर-जी नेटवर्कच्या स्पीडमध्येही घरून काम करणे सहजशक्य आहे. फाईव्ह-जी आल्यानंतर इंटरनेटचा वेग हा किमान २० पटीने वाढणार असल्याने नवीन कार्यसंस्कृतीला नक्कीच गती येणार आहे.

यात आजवर शारीरीक उपस्थिती आवश्यक असणार्‍या क्षेत्रांचाही समावेश असेल. उदाहरणार्थ, आजवर डॉक्टर हा टेलीमेडिसीन आणि व्हाटसअ‍ॅप व स्काईपसारख्या टुल्सचा वापर करून मर्यादीत प्रमाणात घरून रूग्ण तपासू शकत असला तरी भविष्यात परिपूर्ण पध्दतीत व्हर्च्युअल कन्सल्टींग शक्य होणार आहे. यात रूग्णाच्या शरीराची चाचणी सेन्सरच्या मदतीने करणे शक्य होईल. अनेक शासकीय व खासगी आस्थापनांमधील कामे या प्रकारात करता येतील. इंटरनेटच्या वाढत्या वेगाला स्मार्टफोनसारख्या उपकरणांची जोड मिळणार असल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ ही प्रणाली वर्क फ्रॉम एनीव्हेअरमध्ये परिवर्तीत होणार असल्याचेही आपण लक्षात घेण्याची गरज आहे.

वायर्ड व वायरेलस या दोन्ही प्रकारातील इंटरनेटची वाढणारी गती आणि आटोपशीर आकाराची उपकरणे यामुळे ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ संकल्पना व्यापक प्रमाणात लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये याचा अवलंब करण्यासाठी आपल्या राज्यकर्त्यांकडे दांडगी इच्छाशक्ती आवश्यक आहे. तथापि, खासगी कंपन्या, व्यावसायिक प्रतिष्ठाने आदींमध्ये याचा विपुल वापर होण्याची शक्यता आहे. आज कोरोनाचा प्रतिकार करतांना घरीच नव्हे तर असेल तिथे थांबणे क्रमप्राप्त झाले आहे. यामुळे कोरोनानंतरच्या कालखंडात अशा प्रकारची आपत्ती आल्या नंतरदेखील आपली नोकरी वा व्यवसाय कायम ठेवायचा असेल तर आपण सर्वांनी ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ची संकल्पना अंगीकारण्याची आवश्यकता आहे. खरं तर कोरोनाच्या भितीमुळे आता सुरक्षित निवारा ही जीवनातील आत्यंतीक महत्वाची बाब असल्याचे स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे. कोरोना अथवा यापेक्षा भयंकर विषाणू वा जिवाणूंचा प्रादूर्भाव भविष्यात होणार नाही असे आज कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. यातच अशीच अथवा यापेक्षा भयावह स्थिती उदभवल्यास आपण आहे तिथूनच आपली नोकरी अथवा व्यवसाय करू शकतो यापेक्षा उत्तम बाब कोणतीही नसेल.

कोरोनाच्या प्रकोपामुळे आता रोगांचेही ग्लोबलायझेशन झाल्याची भेदक जाणीव आपल्याला झालेली आहे. यामुळे सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊन सारखी स्थिती उदभवण्याचा धोका देखील आपण ओळखणे आवश्यक आहे. यामुळे कोणत्याही क्षणाला जग थांबले तरी आपल्याला थांबायचे नसेल तर आपले ‘वर्क कल्चर’ बदलणे आवश्यक आहे. यामुळे घर असो की, अन्य दुसरा सुरक्षित निवारा; काम निरंतर चालू ठेवायचे असेल तर यापुढे ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’चा स्वीकार करणे आवश्यक झाले आहे.

आता उरला लाखमोलाचा प्रश्‍न – मीडियात ‘वर्क फ्रॉम होम’ वा ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’ शक्य आहे का ? याचे नि:संदीग्ध उत्तर ‘हो’ आहे. डिजीटल टुल्समुळे जगभरातील मीडिया हाऊसेसच्या न्यूज रूम्स आता आटोपशीर आकाराच्या बनल्या आहेत. याचे विकेंद्रीकरण देखील झाले आहे. यातील डिजीटल मीडियात ऑफीस ही संकल्पना फारशी महत्वाची नाहीच. वर्तमानपत्राचा विचार केला असता बातम्यांचे संकलन करून घरून पेजीनेशन करणे वा वृत्त वाहिन्यांसाठी घटनास्थळावरून रिपोर्टींग आधीच प्रचलनात असतांना घरूनच बातम्या देण्याचा प्रकार देखील फारसा कठीण नाही. काही वाहिन्यांनी लॉकडाऊनमध्ये हा प्रयोग केला आहे. फाईव्ह-जी नेटवर्क आल्यानंतर याला अजून गती मिळू शकते. कोराना इफेक्टमुळे जगभरातील विविध कंपन्या कर्मचारी कपात वा वेतन कपातीच्या तयारीत असतांना मीडियातही याचे प्रतिबिंब उमटणार हे निश्‍चीत झाले आहे.

मी आधीच्या लेखात म्हटल्यानुसार प्रसारमाध्यमांमध्ये ‘कॉस्ट कटींग’ अनिवार्य असून ‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’चा अवलंब करणे हे यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. अर्थात, या सर्व बाबींचा विचार केला असता, कोरोनाने जागतिक कार्यसंस्कृतीला जोरदार हादरा देऊन ‘वर्क फ्रॉम ऑफीस’ वा ‘होम’च्या पलीकडे जात ‘वर्क फॉर एनीव्हेअर’ची पायाभरणी केल्याचे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही.

(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)

92262 17770

https://shekharpatil.com

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातील मास्टरपीस
Next articleभीमराव रामजी आंबेडकर- सर्व देवांचे निर्दालन करणारा विचारवंत
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.