वर्धा लोकसभा – तडसांसाठी मेघे समर्थक डोकेदुखी

कॉंग्रेसला अंतर्गत गटबाजीचे आव्हान
-अजिंक्य पवार
वर्धा लोकसभा मतदार संघ हा अनेक वर्षेपर्यंत काँग्रेसचा गड समजला जायचा परंतु मागील काही वर्षात ही समजूत मोडित निघाली आहे .आतापर्यंत ४ वेळा येथे काँग्रेसचा पराभव झाला आहे.तीन वेळा भाजप तर एक वेळा माकप उमेदवार या मतदारसंघातून  विजयी झाला आहे. यावेळी भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले माजी मंत्री दत्ता मेघे आपला सुपूत्र सागर मेघे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे. गेल्यावेळी सागर मेघे यांचा पराभव करुन रामदास तडस निवडून आले होते. तडस यांच्या जमेच्या बाजू सांगायच्या झाल्यास त्यांनी मागील साडेचार वर्षांत प्रचंड जनसंपर्क ठेवला आहे . रेल्वेशी संबंधित अनेक प्रश्र्न त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला . नितीन गडकरींमुळे  या मतदारसंघात  सिंदी रेल्वे  येथे ड्रायपोर्ट प्रकल्प मार्गी लावण्यात त्यांना यश आले . महामार्गांच्या कामाला गती ,आरोग्य सुविधा आदी प्रश्र्न सोडविण्यासाठीही त्यांनी धडपड केली. वरुड,मोर्शी भागातही त्यांनी अनेक समस्या सोडविल्यात.मात्र भाजपातील मेघे समर्थक ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. तेली – कुणबी कार्ड चालणा-या या मतदारसंघात तडस तेली समाजाचे एकमेव प्रतिनिधी आहे.तडस यांच्याऐवजी मेघे यांना उमेदवारी देवून भाजप तेली समाजची नाराजी पत्करेल का, याबाबत शंका आहे .
  काँग्रेसकडून महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अँड. चारुलता टोकस यांनी उमेदवारी मागितली आहे. किरकोळ काही नावे वगळता त्यांना पक्षात तशी स्पर्धा नाही . ‘एकच मिशन शेतकरी आरक्षण’ चे शैलेश अग्रवाल यांनी कॉंग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहे. अग्रवाल यांच्या उमेदवारीला आमदार अमर काळे यांचे शिफारस पत्र असल्याने दिल्ली दरबारात त्यावर विचार सुरु आहे .  स्वाभिमान शेतकरी संघटनेकडून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहीते  दावेदार आहेत. दीड वर्षापासून ते कामाला लागले आहे. वंचित बहूजन आघाडीकडून सेवानिवृत्त सनदी अधिकारी धनराज वंजारी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बहुजन समाज पार्टीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. भाजप – काँग्रेस मधील लढतीत इतर पक्ष व उमेदवार यांचा विशेष प्रभाव पडण्याची शक्यता कमी आहे.
     भाजपची स्थिती २०१४ पेक्षा मजबूत असून काँग्रेस गटबाजीने विखुरलेली आहे. चारुलता टोकस या दिल्लीनजीक गुडगाव येथे राहतात, .त्या कॉंग्रेसच्या एकेकाळच्या प्रभावी नेत्या प्रभा राव यांच्या कन्या आहे. मात्र राव यांचे भाचे आमदार रणजीत कांबळे यांच्या कार्यपद्धतीवर जिल्ह्यात प्रचंड नाराजी आहेत. तेली समाजाचे काँग्रेसमध्ये खच्चीकरण करण्यात येत असल्याचा आरोप पक्षाचे कार्यकर्ते करीत आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कसोटी लागणार आहे.  भाजपातही किरकोळ गटबाजी आहे . पण या   गटबाजीला वाड्यावरुन कंट्रोल केले जाऊ शकते . नितीन गडकरीसाठी नागपूरनंतर वर्धा हा महत्वाचा मतदारसंघ आहे . हा मतदारसंघ ते गमावू इच्छिणार नाहीत . गेल्या साडेचार वर्षांत भाजपचा या मतदारसंघात मोठा विस्तार झाला आहे. जिल्हा परिषद, नगरपालिकांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत भाजपने प्रचंड मुसंडी मारली. या मतदारसंघात काँग्रेसचे तीन व भाजपचे तीन आमदार आहेत.जिल्ह्यातील आठ नगरपालिका-पंचायतीत १०४ सदस्य असून भाजपचे ५८, कॉँग्रेसचे ३०, राकॉँचे ६, सेनेचे ४ व इतर ६ सदस्य आहेत. सर्वच पालिकांवर भाजपची सत्ता आहे. जिल्हा परिषदेवरही भाजपची एकहाती सत्ता असून ५२ पैकी ३१ सदस्य भाजपचे आहेत.  कॉँग्रेसचे तेरा ,  राकॉँचे दोन, सेनेचे दोन , तर  अन्यचार  सदस्य आहेत. भाजप गावागावात  पोहचला असून काँग्रेसमधून गेलेल्यांनीच तो वाढविला, हे विशेष.
        शेतकऱ्यांच्या शेतामालाला भाव नसल्याने ग्रामीण भागात भाजपविषयी नाराजी असली तरी ती नाराजी विरोधक कशी ‘कॅश’ करतात, हे महत्त्वाचे राहणार आहे.  मोदी सरकारच्या  शेतकरी सन्मान योजनेचे २००० रुपये मतदारसंघात  शेतक-यांच्या खात्यावर जमा होत आहे यांचा थेट परिणाम निवडणुकीवर होईल असे दिसते.      माजी मंत्री सुबोध मोहिते दीड वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कामाला लागले आहेत. या मतदारसंघात स्वाभिमान शेतकरी संघटनेची फारशी दखलपात्र  नसली तरी ते रिंगणात असल्यास मतविभागणी नक्की करू शकतात . काँग्रेस-राकाँ आघाडीत हा मतदारसंघ स्वाभिमानला सोडण्याबाबत चर्चा आहे. पण ती शक्यता फारच कमी आहे .
(टीम मीडिया वॉच)
Previous articleलैंगिकता, मानसिक स्वास्थ्य आणि नैतिकता..
Next articleअकोला लोकसभा: आंबेडकर व काँग्रेसच्या भांडणाचा फायदा भाजपलाच
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here