लैंगिकता, मानसिक स्वास्थ्य आणि नैतिकता..

– डॉ सचिन लांडगे
आहार, निद्रा, भय, मैथुन या माणसाच्या मूलभूत अंतःप्रेरणा (Basic Instincts) आहेत.. प्रत्येक सजीव प्राण्याचं ‘जगणं’ म्हणजे याचा अर्थ त्याने फक्त ‘खावे आणि श्वसन करावे’ असा नसून, त्याने शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त असले पाहिजे, हे महत्त्वाचे असते.. त्या दृष्टीने पोटाची भूक आणि लैंगिक भूक हे सजीव तंदुरुस्तपणे जगण्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत..
एखाद्या खाद्यपदार्थाचा तुकडा माणूस तोंडात टाकतो, म्हणजे त्याला भूक लागलेली आहे, असा त्याचा अर्थ नसतो.
अन्नाचा निव्वळ आस्वाद घेण्यासाठी किंवा कुणाला साथ-सोबत करण्यासाठी किंवा स्वत:चा वेळ घालविण्यासाठी किंवा मनाचा ताण, नैराश्य आणि शीण कमी करण्यासाठी, एकटेपणा विसरण्यासाठी माणूस खात (किंवा पीत) असतो..
म्हणजेच ‘पोटाची भूक’ या नैसर्गिक ऊर्मीचे माणूस स्वत:चे मन स्वस्थ ठेवण्यासाठी उपयोग करून घेतो. तसंच शरीरसंबंधातूनही लैंगिक उत्कटता (orgasm) प्राप्त झाल्यास माणूस दैनंदिन ताणातून मुक्त राहू शकतो, उत्साह अथवा सकारात्मक ऊर्जा मिळवू शकतो.
भिन्नलिंगी आकर्षण आणि लैंगिक इच्छा ही प्रत्येक सजीवाला निसर्गाची देण आहे.. पण मानवप्राण्यात मात्र विवाहसंस्थेच्या उगमानंतर लैंगिक इच्छांचे नियमन करण्यात येऊ लागले.. आणि ते योग्यही होते.. पण नंतरनंतर काही संस्कृतीत तर ती बंधने इतकी वाढली की, पती-पत्नीने आपसातली प्रेमभावना, ओढ लपवायची, एकमेकांजवळ बसायचे नाही, हास्यविनोद, गप्पा करायच्या नाहीत आणि फक्त रात्रीपुरतेच एकत्र यायचे, इतक्या टोकापर्यंत स्त्री-पुरुष (पती-पत्नी) संबंध हे हास्यास्पद आणि कृत्रिम होऊन गेले.. ते केवळ विवाहाच्या आणि भन्नाट नैतिक तसेच धार्मिक कल्पनांच्या अट्टहासामुळे !
प्राण्यांपेक्षा मानवाची लैंगिकता वेगळी आहे. स्त्री-पुरुष प्रत्येक वेळेस अपत्य होऊ देण्यासाठीच शरीरसंबंध करीत नाहीत हे आता सिद्ध झाले आहे.  स्त्रीचा जननकाळ संपल्यावरसुद्धा स्त्री व पुरुषांमध्ये आकर्षण असते आणि शरीरसंबंधाची इच्छाही (Desire) असते. अर्थात या वयातील लैंगिक संबंधाचा आनंद हा मूल मिळविण्यासाठीचा नाही हे तर स्पष्टच आहे. पण तरीही स्पर्शाच्या आणि orgasm च्या परमोच्च आनंदातून शारीरिक- मानसिक ताणाचा निचरा होऊन त्यायोगे ‘मानसिक फिट’ राहण्यासाठी हे शरीरसंबंध उपयुक्त असतात हे लक्षात येते.
पती-पत्नीमध्ये एकमेकांना लैंगिक तृप्ती (sexual satisfaction) प्राप्त करून देण्याचे प्रयत्न होत असतील तर दोघांमधील कोणताही गंभीर तणाव विरून तर जातोच; परंतु दिवसेंदिवस विश्वासाचे व प्रेमाचे नाते वाढत जाते. महत्त्वाची बाब म्हणजे या लैंगिक तृप्तीसाठी त्यांनी दरवेळी संभोगक्रियाच करावी असंही नाही.. स्त्री शारीरिक अथवा मानसिक दमलेली असेल तर निव्वळ स्पर्शानेसुद्धा ते सुख कोणत्याही दोन व्यक्तींना देता/घेता येत असते. परस्परांना जवळ घेणे, मिठीत घेणे, हातात हात घेणे, चुंबन घेणे, किंवा परहस्तमैथुन करणे, अशा क्रिया mental satisfaction साठी खूप महत्वाच्या आहेत.. अनेक सेक्सॉलॉजिस्टचे म्हणणे असते की, ”Sex doesn’t always mean intercourse.”
पुरुषांनी हस्तमैथुनाद्वारे लैंगिक उत्कटतेचा (orgasmचा) अनुभव घेणे हेही स्वाभाविक मानले जाते, ती विकृती नाहीये. Orgasm पुरुषाला संभोगक्रियेतून मिळू शकतो. परंतु स्त्रीला मात्र ही उत्कटता संभोगक्रियेतून खात्रीलायकपणे मिळेलच असे नाही. याला पुरुषांची “आपलं ‘झालं’ की झालं..” ही वृत्ती कारणीभूत असते.. स्त्रियांसाठी सेक्स म्हणजे केवळ ‘घर्षण’ नसते, त्याचं प्रवेशद्वार मनातून असते हे पतीला समजत नसेल किंवा जमत नसेल, तर असंख्य विवाहित स्त्रिया अशा परमोच्च सुखाच्या क्षणापर्यंत (Orgasmपर्यंत) पोहोचतच नाहीत. त्यामुळे अंतर्यामी त्या अस्वस्थ आणि नैराश्यग्रस्त राहू शकतात. त्यांच्यासाठी सेक्स ही फारशी “आनंददायी कृती” रहात नाही.. (सेक्समध्ये ती ऍक्टिव्ह नसणे किंवा तिला त्याचा आनंद घेता न येणे, यासाठी तिच्यावरचा पारंपरिक विचारांचा नैतिक पगडा आणि धार्मिक समजुती ही कारणे देखील आहेत, पण त्याचा विचार आपण इथे करणार नाहीत). अशावेळी मग स्त्रिया यासाठी फारशा उत्सुक नसतात किंवा मग डोकेदुखी कंबरदुखी वगैरे कारणे देतात.. कालांतराने सेक्स ही त्यांना पतीने लवकर उरकून घेण्याची कृती वाटते.. (पत्नी सेक्समध्ये ‘ऍक्टिव्ह’ नसल्याची बऱ्याच पुरुषांची तक्रार असते, पण याला काही टक्के आपणही कारणीभूत आहोत हे मात्र त्यांच्या गावीही नसते..)
माणसाचे मन आणि शरीर ही एकमेकांना जोडलेली ‘अवलंबित अवस्था’ असल्यामुळे मनावरील ताणाचा निचरा लैंगिक उत्कटपणातून (ऑर्गझम मधून) होऊन जाणे, ही physiological क्रिया अशावेळी थांबते.
मग आपण नेमके कशामुळे असमाधानी (dissatisfied) आहोत, हे स्त्रियांना कळत नसल्यामुळे, पत्नी-पत्नीच्या संसारात हे असमाधान ‘धुसफूस’ या स्वरूपात पत्नीकडून बाहेर पडत राहते. काही वेळेला याबाबत मन:शांती मिळविण्यासाठी स्त्रिया देव-धर्मात स्वत:ला बुडवून टाकतात, तर अनेक स्त्रिया बुवाबाजी करणाऱ्या पुरुषांच्या नादी लागतात. तर अत्यल्प स्त्रिया विवाहबाह्य संबंधात याचं उत्तर शोधतात.. पण बहुतांश स्त्री-पुरुष आध्यात्मिक प्रवचनांतून या असमाधानाचे, बेचैनीचे उत्तर शोधू पाहतात.. पण उत्तर दुसरीकडेच असते..
काही स्त्रिया उद्वेगाने किंवा भांडण वगैरे झाल्यास पतीबरोबरच्या संभोग क्रियेलाच विरोध करतात, कारण संभोगातून ‘फक्त पतीला सुख मिळते’, असं मानण्याचा आपल्याकडे पारंपरिक प्रघात आहे. आणि त्यांना स्वतःलाही असंच वाटत असतं.. पण ‘आपल्यालाच त्यातून सुख घेता येत नाही’ किंवा ‘मिळू शकत नाही’, हे मात्र त्यांच्या गावीही नसते.. पतीला ‘धडा’ वगैरे शिकवायच्या नादात आपणही मानसिक ताणतणावाचे कारण निर्माण करत आहोत हे त्यांना मान्यच नसते.. त्यामुळे पती-पत्नी संबंध आणखीच तणावपूर्ण बनतात. असे वारंवार होऊ लागल्यास त्या जोडप्यांना समुपदेशनाची गरज असते, पण त्याऐवजी मग एकमेकांवर अनेक व्यक्तिगत चुकीचे आरोप करणे/संशय घेणे वगैरे सुरू होते.. आणि कालांतराने त्यात इतरही वाद मिसळून त्यांचे घटस्फोट अथवा mental separation घडून आलेले पाहावे लागतात. एकमेकांबद्दल मनात फक्त कोरडेपणा उरतो.. एकमेकांच्या ओढीऐवजी संसार हा ‘kids oriented’ सुरू होतो.. अशांनी कौन्सिलरकडे जाऊन समुपदेशन करून घेण्याची गरज आहे..  (टीप – असमाधान आणि नैराश्य यांच्या अनेक कारणांपैकी फक्त ‘लैंगिक अतृप्ती’ या कारणाचाच विचार या लेखात केला आहे..)
दुसरीकडे, ज्या पुरुषांना लैंगिक सुख पत्नी देऊ शकत नाही, किंवा त्यासाठी पत्नीकडून अडवणूक केली जाते, असे लोक मग अस्वस्थ, चिडचिडे, असमाधानी किंवा नंतरनंतर विक्षिप्त आणि कालांतराने antisocial बनत जातात.. म्हणजे पत्नीच्या अडवणुकीमुळे पतीची चिडचिड आणि कटकटी, आणि पुन्हा त्या कटकटींना वैतागून पत्नीकडून पतीची परत सेक्ससाठी अडवणूक.!! असे ते vicious cycle बनत जाते.. त्याचेही बहुतांश वैवाहिक तक्रारींचे (marital disharmony चे) मूळ हे sexual dissatisfaction मध्ये दडलेले असते.. विवाहबाह्य संबंध किंवा लैंगिक अत्याचार ही त्याचीच पुढची पायरी आहेत, पण ते ज्याच्यात्याच्या संस्कारावर (moral values) ठरते.. विवाहबाह्य संबंध हे नेहमी शारीरिकच असतात असे नाही, मानसिक आणि भावनिक कुचंबणा हे त्याचे मोठे मूळ आहे.. बरेच पुरुष हे टिपिकल पुरुषी अहंकारामुळे स्त्रीच्या कोमल भावना समजून घेऊ शकत नाहीत, अथवा त्यांना समजूतदारीने ट्रीट करू शकत नाहीत.. ज्या घरात पती पैशांसाठी आणि पत्नी सेक्ससाठी एकमेकांची अडवणूक करतात ते घर हे ‘घर’ नसून केवळ दोन माणसांचे हॉस्टेल असते..
पुढचा मुद्दा, मानसिक ताणसुद्धा स्त्री आणि पुरुषांचे वेगवेगळे आणि कमी-अधिक तीव्रतेचे असतात. याला स्त्री-पुरुषाची नैसर्गिक जीवनशैली आणि वृत्ती कारणीभूत आहे. जगातील बहुसंख्य स्त्रियांना मातृत्वामुळे नवनिर्मितीचा आनंद मिळतो. आणि त्या निर्मितीचे पुढे अनेक वर्षे संगोपन करण्यामधून स्त्रियांच्या मानसिक ताणाचा निचरा होत असतो. स्त्री जितकी आपल्या मुलांमध्ये मानसिक-भावनिक गुंतलेली असते, तितका पुरुष निसर्गत: नसतोच. (म्हणून अलीकडे ‘चांगले मन:स्वास्थ्य’ राहण्याकरिता, मुलांच्या संगोपनात स्वत:ला पुरुषांनी गुंतवावे, असा त्यांना सल्ला दिला जातो.) स्त्रीकडे असणाऱ्या या नैसर्गिक देणगीमुळे, तिच्या आयुष्यातील ताणतणावांचा आणि लैंगिक उत्कटतेच्या असमाधानकारक अनुभवाचा ती बऱ्यापैकी सामना करू शकते. पुरुष व्यक्तिमत्त्वात ही नैसर्गिक त्रुटी आहे. शिवाय पुरुषाची वृत्ती ही जास्तकरून स्पर्धात्मक आणि (म्हणून) सूडात्मक आहे, जी कोणत्याही दोन नरांमध्ये नैसर्गिकपणे वसलेली असते. बाहेरच्या जगात वावरताना, स्वत:च निर्माण करून ठेवलेल्या या स्पर्धेला तोंड देताना पुरुषाला स्त्रीच्या तुलनेत जास्त ताणाखाली जगावे लागते.. व्यसन करण्याचे जरी नाकारले तरी, ताणमुक्तीचे इतर चांगले पर्याय माहिती नसल्याने म्हणा किंवा तेवढा वेळ नसल्याने, आणि बालसंगोपन वा तत्सम कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये पुरुषाला भाग घेता न येण्याची अनेक कारणे असल्यामुळे, केवळ “सेक्स अॅक्टिव्हिटी” हा एकमेव पर्याय ताणमुक्त होण्याकरिता कित्येक पुरुषांसमोर शिल्लक राहतो. त्याकरिता पत्नीवर जबरदस्ती किंवा मग विवाहबाह्य़ संबंध, बलात्कार अशा मिळेल त्या मार्गाने पुरुष जेव्हा स्वत:ला satisfaction मिळवू पाहतो, तेव्हा पुन्हा ‘स्त्री’लाच त्याच्या अन्याय, अत्याचाराचे बळी व्हावे लागते.
सेक्सबाबत स्त्री-पुरुषांमधील नि:संकोच भावना या नैसर्गिक आहेत. त्यात “वाईट चालीचे” वगैरे काहीही नाही..पण  हे सर्व “विवाहाच्या पार्श्वभूमीवर” वाईट ठरवणे भाग पडलेले आहे, हे नेमके आपण लक्षात घेत नाही.
विवाहाने स्त्री-पुरुषांच्या लैंगिक इच्छेचे खासगीकरण करून टाकले आहे. हे खासगीकरण स्वीकारताना ‘चोरून पाहणे’ किंवा ‘लपूनछपून करणे’ या (प्रति)क्रिया दाबून टाकलेल्या लैंगिक भावना व्यक्त करण्यासाठी अपरिहार्य झालेल्या दिसतात. त्यातून निर्माण होत गेलेली स्थिती आणि परंपरा नैतिक म्हणायच्या का, हे आता एकदा ठरवावे लागेल.. विवाहामुळे व्यवस्था उत्तरोत्तर ‘पुरुषांकरिता’ होत जाणे आणि स्त्रीच्या कौमार्याचे, चारित्र्याचे नवे स्तोम माजवले जाणे, यामुळे लैंगिक उत्कटतेचा विचार स्त्रीयांच्या बाबत जगभरात कुठेच शिल्लक राहिला नाही.
निसर्गाने मानवास ठराविक वयानंतर लैंगिक इच्छा दिल्या.. त्या इच्छांच्या योग्य नियमनासाठी मानवाने स्वतः विचारपूर्वक विवाहसंस्था अस्तित्वात आणली.. ते जरुरीचे होते/असेल.. पण पूर्वी वयात येताच मुलामुलींची लग्ने होत असत. आता मात्र गेल्या काही दशकांपासून लग्नाचे वय वाढत गेले.. तशात चित्रपटातील सेक्सी नृत्ये आणि बेडसीन्स, अर्धनग्न फोटोज, पोर्नोग्राफी, टीव्हीवरील अंगप्रदर्शन व सेक्सी जाहिराती, फोन आणि सोशल मिडियाचा वापर वाढला.. जणू काही सेक्सचा विस्फोटच झाला..
एकीकडे, सेक्सची इच्छा किशोरवयात (teenage) जागृत होते आणि लग्न मात्र सरासरी २५ व्या वर्षी होतं. तोपर्यंत या भावनिक ऊर्जेचं नियमन कसं करायचं या प्रश्नाचा विचार भविष्यात प्रत्येकालाच करावा लागणार आहे.. फुटबॉलला लाथ मारल्यावर सगळी उर्जा बाहेर निघते. स्विमिंग, सायक्लिंग, ट्रेकिंग असे खेळ थोडाफार परिणाम करू शकतात खरंतर.. पण त्यालाही मर्यादा आहेत.. मैदाने संपली, मुलं कॉम्प्युटर गेम खेळायला लागली. केवळ खेळ खेळणं ही अपुरं पडू लागलं.. शारीरिक आनंद लुटण्याचे मार्ग बंद झाले आणि उर्जेचं उत्सर्जन बंद झालं.. आता मुलांची उर्जा दुसऱ्या (अवैध) रुपानं बाहेर पडतेय. छेडछाड, चिडचिडेपणा, मारामाऱ्या, व्यसनाधीनता, वाढतं डिप्रेशन आणि वाढत्या आत्महत्या ही त्याचीच फलितं आहेत..
मागे एका मानसोपचार तज्ञाने फक्त तरुणांसाठीची, (गुंडांचा अथवा पोलिसांचा अजिबात त्रास नसणारी) “लव्हर्स पार्क” असण्याची गरज असल्याचे लिहिले होते.. त्यावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी त्या पार्कमध्ये मुलं केवळ ‘बसणार’ नाहीत तर, अश्लील चाळेही करतील अशी भीती व्यक्त केली होती.. पण त्या मानसोपचार तज्ञाच्या लेखामागचा मूळ मुद्दा बहुतांश जणांना समजलाच नव्हता.. मुलामुलींनी “त्या पार्कमध्ये नैसर्गिक ‘लैगिंक कृती’ कराव्यात म्हणून तर पार्क हवा” असं त्या तज्ञांचं म्हणणं होतं.. आपल्या समाजाच्या भाषेत मात्र त्याला आपण अश्लील चाळेच म्हणणार.. “विवाहपूर्व लैंगिक कृती” समाज आज कायदेशीरदृष्ट्या अथवा नैतिकदृष्ट्या मान्यच करणार नाही.. पण भविष्यात केवळ वरवरच्या कृतींनाच नव्हे तर विवाहपूर्व लैंगिक संबंधांना (sexual relations ना) देखील आपल्याला सामाजिक मान्यता द्यावीच लागणार आहे..
एकीकडे विवाहाचं वाढलेलं वय आणि दुसरीकडे अगदी कमी वयापासून मुलांवर मिडियातून होणारं सेक्सचं आक्रमण याला आपण फार काळ थोपवू शकणार नाहीये.. पाश्चात्य देशांप्रमाणे योग्य वयात लैंगिक शिक्षण आणि परस्पर संमतीने (सुरक्षित) विवाहपूर्व संबध, हा त्यावरचा उपाय आपण जेवढ्या लवकर अवलंबू तेवढी आपण आपल्या पुढच्या पिढीची हानी टाळू शकू..
उगीच ‘तुमची मुलगी अशी दहा जणांबरोबर फिरली तर चालेल का?’ वगैरे प्रश्न विचारून आपण फार दिवस वेळ मारून नेऊ शकणार नाही..
मुलांचे मोबाईल पॉर्न फोटो आणि व्हिडीओनी का भरलेले असतात? मौका मिळताच सामान्य माणसांकडून पण लैंगिक छळाचा आनंद का घेतला जातो? पुरुष गर्दीत वा अंधारात स्त्रीची छेडछाड करण्याची संधी का शोधतात? एरव्ही नॉर्मल असलेली माणसे अचानक पाशवी बलात्कार का करतात? स्त्रिया अंगप्रदर्शन करण्याच्या आहारी का जातात? स्त्री पुरुष सायकोसोमॅटिक आजारांनी त्रस्त का असतात?
राखी सावंतचे चुंबन असो किंवा ब्रिटनचा रॉयल किस असो, भारतीय स्क्रीनवर भडिमाराने हे का दाखवले जाते? या प्रश्नांचा आज ‘नव्याने’ विचार करण्याची गरज आहे..
.– डॉ सचिन लांडगे
Previous articleभारतात परतल्यानंतर …
Next articleवर्धा लोकसभा – तडसांसाठी मेघे समर्थक डोकेदुखी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.