विज्ञान आणि धर्म यांचा समन्वय आवश्यक आहे!

(साभार : साप्ताहिक साधना)

– दत्तप्रसाद दाभोळकर

मानवी जीवनातील ही विसंगती दूर करावयाची असेल, तर विज्ञान आणि धर्म यांना समन्वय करावा लागेल का? विज्ञान का आणि कसे, हे सांगेल; धर्म का आणि कशासाठी, हे सांगेल. हे करता येईल, असे विवेकानंद आणि आईनस्टाईन यांनी सांगितलंय. विवेकानंद म्हणालेत, ‘यासाठी आपणाला नवा धर्म शोधावा लागेल. तो सर्व धर्मांच्यावर आधारित असेल. मात्र विज्ञान हा त्याचा पाया असेल. त्यामुळे तो स्थितीशील नसेल, तर गतिशील असेल.’ आइन्स्टाईनने हे अधिक भेदकपणे सांगितलेय. त्यांनी सांगितले आहे, ‘विज्ञानाशिवाय धर्म आंधळा आहे आणि धर्माशिवाय विज्ञान-तंत्रज्ञान पांगळे आहे.’
…………………………………………………………….

मला माझे आजचे अस्तित्व विज्ञानाने दिलेय. मलाच नाही तर तुम्हा सर्वांना किंवा खरं तर आपणा सर्वांना. काही हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. पृथ्वीचा जन्म पहिल्या सजीवाचा जन्म- अगदी माणसासारख्या प्राण्यांचा जन्म यांची वर्षे मोजली तर, काही हजार वर्षांपूर्वीची- म्हणजे अगदी अलीकडची घटना!

तर, या काही अशा हजार वर्षांपूर्वी गोरिला, चिंपांझी आणि माणसे घनदाट जंगलात राहत होती. प्रचंड ताकदीचा गोरिला, अतिचपळ चिंपांझी यांच्यासमोर माणूस बिचारा घाबरून राहत होता. झाडावरची सर्वांत चांगली फळे गोरिला आणि चिंपांझी पटकावीत. उरलेली फळे माणूस खात होता. जमिनीवर झोपणे शक्यच नव्हते. वाघ, सिंह, साप यांची भीती होती. मात्र झाडावरच्या सुरक्षित रुंद फांद्या गोरिला आणि चिंपांझी यांच्यासाठी असत. माणूस कुठल्या तरी फांदीला चिकटून झोपत असे. माणसाकडे गोरिलाची ताकद नव्हती, चिंपांझीची चपळता नव्हती. माणसाने असेच जगावयास पाहिजे, हे निसर्गानेठरवून टाकले होते.

हे असे काही हजार वर्षे सुरू होते. खरं तर निसर्ग-नियमाप्रमाणे कायम असेच सुरू राहावयास हवे होते. पण जगभर सर्वत्र जंगलात राहणारी माणसे भोवतालच्या घटनांचे निरीक्षण करत होती. त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली होती. जंगलात कधी कधी अचानक वणवा लागतो. वाघ, सिंह, गोरिला, चिंपांझी, माणूस, सारे पशू-पक्षी घाबरत जंगल सोडून बाहेर पळतात. जगभरची निरीक्षणे करणारी काही माणसे विचार करायला लागली. हा असा वणवा लागतो तरी कसा? निरीक्षण आणि विचार करणाऱ्या जगभराच्या काही माणसांच्या लक्षात आले- प्रचंड झंझावात सुटतो, झाडे एकमेकांवर आदळतात; त्यातून ठिणगी पडते. ती ठिणगी वाळलेल्या गवतावर पडते व आग भडकते, म्हणजे वणवा लागतो.

निरीक्षण आणि अनुमान काढणे याच्या जोरावर जगभरची काही माणसे प्रयोग करायला लागली. झाडाच्या फांद्या, काटक्या घ्यावयाच्या आणि एकमेकांवर जोरात घासावयाच्या. ठिणगी काही पडत नव्हती. मग जगभराच्या काही माणसांनी दगड एकमेकांवर घासायला सुरुवात केली. नकळत एकदा दगडाऐवजी गारगोट्या घेतल्या. ठिणगी पडली. गवत पेटले. जगभर एकमेकांना नकळत प्रयोग सुरू होते. या प्रयोगात एकदा मारलेल्या प्राण्याची चरबी लाकडावर लावून त्यावर ठिणगी पाडली. माणसाच्या हातात मशाल आली.

विचार करीत प्रयोग करणाऱ्या माणसांच्या हातात मशाल आली आणि माणसाने पृथ्वीवरील प्राण्यांना सांगितले- आता तुम्ही माझे गुलाम आहात. मी मशाल हातात घेऊन झाडाजवळ गेलो, तर घाबरून गोरिला- चिंपांझी दूर पळतात. झाडावरचे चांगले फळ आणि चांगली जागा आता फक्त माझ्यासाठी आहे. नंतर माणसाच्या लक्षात आले की, झाडावर झोपायची गरज नाही. छानपणे जमिनीवर पाय ताणून झोपावे. भोवताली मशाली पेटवून ठेवाव्यात. साप, वाघ या बाजूला फिरकणार नाहीत. नंतर माणसांच्या लक्षात आले- उबदार गुहा शोधून त्यात झोपावे. आजवर त्यात वाघ झोपायचा. आपण मशाली घेऊन गेलो की, गुहा सोडून तो मुकाट पळून जातो. आपण त्या गुहेत निवांतपणे राहू शकतो. पावसात भिजायचे कारण नाही.

हा काही शतकांचा प्रवास. जगभरच्या अनेक माणसांनी विज्ञान नीट न समजतही ते नकळत वापरले आणि या प्रक्रियेत त्यांनी भोवतालचे पर्यावरण नकळत बिघडवले. हवा दूषित केली. हवेत हानिकारक असा एक वायू सोडला. ही दुसरी गोष्ट विज्ञान वापरणाऱ्यांच्या अगदी अलीकडे लक्षात आली आहे! मात्र विज्ञान न कळता विज्ञान वापरले म्हणजे काय, हे जरा समजावून घ्यावयास हवे आणि ते जर लक्षात आले, तर विज्ञान व धर्म यातला गुंता आपल्या लक्षात येईल. कदाचित त्यांचा समन्वय शक्य आहे का, याचाही आपण विचार करू.

माणसाने ठिणगी पाडली, अग्नी पेटवला. हे माणसाने केले याचे कारण त्याने निसर्गात घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण केले. त्यांना प्रश्न विचारले. मग त्याने प्रयोग केले. यात त्याचा विज्ञानाचा प्रयोग निम्माच झाला. विज्ञान प्रश्नांना उत्तर विचारत नाही, तर उत्तरांना पुन्हा प्रश्न विचारते. काय आहे ते नीट लक्षात घेऊ या. समजा- तुम्हाला कोणी विचारले, ‘जर आग लागली तर तुम्ही काय कराल?’ तुम्ही सारे जण एका क्षणात उत्तर द्याल, ‘त्यावर पाणी मारू.’ विज्ञान येथे थांबत नाही. ते दुसरा प्रश्न विचारते, ‘पाण्याने आग का विझते?’ आणि रागावू नका. आपल्यापैकी अनेकांना त्याचे उत्तर माहिती नसते. आपण आंधळेपणाने विज्ञान वापरतो आणि विज्ञान तर तुम्हाला सांगत असते, ‘विचार तर करा.’ यात आणखीन वाईट गोष्ट अशी की, पाण्याने आग का विझते याला तीन कारणे आहेत, ती तुम्हाला माहीत आहेत. पण तुम्ही विचार न केल्याने किंवा विचार करण्याची शक्ती गमावून आंधळेपणाने गोष्टी स्वीकारायला सुरुवात केल्याने असे होते. मनाशी नीट विचार करा. पाण्याने आग का विझते याच्यामागे असलेली, तुम्हाला खरे तर माहीत असलेली कारणे तुम्हाला माहीत नाहीत, हा तिढा काय आहे?- विचार तर करा!

प्रथम मनाशी खूप विचार करा- नंतर त्या तीन कारणांपैकी मी जे एक कारण सांगतोय, ते वाचा. ते असे आहे- आपण आगीवर पाणी घालतो, त्या वेळी पाण्याची वाफ होते. वाफेचे आकारमान पाण्याच्या आकारमानापेक्षा खूप अधिक असते. ही अधिक आकारमान असलेली आणि ज्वलनशील नसलेली वाफ आगीला वेढून टाकते. त्यामुळे आगीचा बाहेरच्या हवेशी- म्हणजे त्या हवेत असलेल्या प्राणवायूशी- असलेला संपर्क तुटतो. प्राणवायूशिवाय आग जिवंत राहू शकत नाही, म्हणजे आपण आगीची रसद तोडतो!

ते असू दे! मी विज्ञानापासून शिकलो आणि आपण सर्वांनी शिकले पाहिजे अशी गोष्ट म्हणजे, विज्ञान भोवतालच्या घटनांचे निरीक्षण करते. प्रयोग करते. प्रश्नांना उत्तर विचारते. मात्र, ते तिथेच थांबत नाही; ते उत्तरांना प्रश्न विचारत पुढे जाते. पाण्याने आग का विझते यातील एक कारण जरी लक्षात आले, तरी तुम्ही प्रयोग करता. एखादा रासायनिक पदार्थ- जो फार मोठ्या प्रमाणात आगीमुळे वायू बनतो आणि तो वायू ज्वलनशील नसेल, तर तो पाण्यात मिसळून त्या पाण्याची आग विझविण्याची क्षमता वाढवतो.

एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. तुमच्याही आली असेल. निरीक्षण करून, नंतर प्रयोग करून, त्यानंतर अनुमान काढून माणसाने पहिली ठिणगी उडवली. त्या ठिणगीमुळे लागणारी आग पाण्याने विझते, हे पण समजावून घेतले. मात्र, हे तंत्रज्ञान होते. ते निर्माण होते आणि थांबते. हे असे का? हा प्रश्न ज्या वेळी मानवाच्या मनात येतो, त्या वेळी त्याचे विज्ञान बनते. तो कार्यकारणभाव शोधत असतो. मग हे विज्ञान त्याला पाण्यात वेगवेगळे, खूप मोठ्या प्रमाणात ज्वलनशील नसलेले वायू सोडणारे पदार्थ मिसळून पाण्याची आग विझवण्याची शक्ती फार मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी मदत करते.

म्हणजे विज्ञानाने मला ‘प्रश्नांना उत्तरे विचारून थांबू नकोस, तर त्या उत्तरांना प्रतिप्रश्न विचारीत पुढे जा. प्रश्न आणि उत्तरे, उत्तरे आणि प्रश्न यांची जुगलबंदी सुरू ठेव’ म्हणून शिकवले. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. मी येथे विज्ञान म्हणजे तंत्रविज्ञान म्हणतोय. मूलभूत विज्ञानात आपण फक्त निसर्गातील घटना पाहून त्यांची अधिक सुसंगत मांडणी करतो. नारळीकर हॉईल सिद्धांत मूलभूत विज्ञानात येतो. काकोडकरांनी कल्पक्कम येथे भारतातील थोरियम इंधन म्हणून वापरून जी अणुभट्टी उभारली, ती तंत्रविज्ञानात येते. थोड्या सोप्या शब्दांत सांगायचे तर- ग्रहण का व कसे लागते, हे मूलभूत विज्ञान समजावून देते. ग्रहणकाळात अन्नपदार्थावर आणि माणसांवर काहीही बरा-वाईट परिणाम होत नाही, हे तंत्रविज्ञान आपणाला प्रयोगांमधून समजावून देते.

माझ्या मनात एक गोंधळ आहे. तो तुमच्याही मनात असणार. माणसाने पहिली ठिणगी पाडली याचे कारण माणूस विचार करत होता. माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे करणारी एकमेव गोष्ट म्हणजे, त्याची विचार करण्याची शक्ती. काही माणसे वेगळा विचार करत होती. मी जन्माला का आलो? मी जन्माला येण्यापूर्वी कुठे होतो? मृत्यूनंतर मी कुठे जाणार? माणसाला आवडेल असे याचे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही. विज्ञान एवढेच सांगते- जन्माला येण्यापूर्वी तू माती होतास किंवा मातीमधून बनलेला एक रासायनिक पदार्थ होतास आणि मृत्यूनंतर माती बनून तू कायमचा नाहीसा होणार आहेस. हे खरे की खोटे, हा वाद बाजूला ठेवू या. 99 टक्के माणसे हे स्वीकारू शकत नाहीत. अशा वेळी माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून धर्म पुढे येत होते. सर्व धर्म त्याला ठामपणे सांगत होते- जन्माला येण्यापूर्वी तू होतास, मृत्यूनंतरही तू असणार आहेस. बहुसंख्य माणसांना आपल्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून धर्म हवा असतो.

आणखी एक गोष्ट लक्षात आली. झाडावर झोपणारा माणूस जेव्हा गारगोटीवर गारगोटी घासून ठिणगी पाडण्याचा प्रयत्न करत होता, त्याच वेळी झाडावर झोपणारी काही माणसे जन्म-मरण-पाऊस-वणवा हे सारे करणारा कोणी तरी सर्वव्यापी सर्वशक्तिमान असा कुठे तरी आहे… तो भोवतालच्या दगडात, झाडात कुठे तरी आहे, म्हणून मिळालेली चांगली फळे त्यांच्यासमोर ठेवत होता. विचार जेव्हा पंचेंद्रियांच्या मदतीवर आधारित प्रश्नांना उत्तरे आणि उत्तरांना प्रश्न विचारीत प्रवास करत होता, तेव्हा विज्ञान-तंत्रविज्ञान पुढे येत होते. विचार जेव्हा अतींद्रिय शक्तींच्या जोरावर भोवतालच्या घटनांचे सिद्धांत मांडत होते, तेव्हा धर्म पुढे येत होते.

पुढे आइनस्टाईन आणि विवेकानंद समजावून घेण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी लक्षात आले- मी वर केलेल्या मांडणीतील दुसरे विधान निसरडे आहे. म्हणजे धर्म काही भोवताली घडणाऱ्या घटना- म्हणजे सूर्य, चंद्र, पृथ्वी कशा प्रकारे फिरतात- हे सांगायला जन्माला आले नव्हते. सगळ्या धर्मांचा मूळ उद्देश माणसाचे मन शोधून त्याला शांत, समाधानी, आनंदी कसे करावे याचा शोध घेण्याचा आहे. त्यांचा नीट वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करावयास हवा. विवेकानंदांनी हे एका उदाहरणाने सांगितलेय. ते सांगतात, ‘एखाद्या फार मोठ्या धर्मगुरूला प्रयोगशाळेत आणून तुमच्या सर्वांत प्रभावशाली दुर्बिणीमधून आकाशातील ग्रहगोल दाखविता. तो ते पाहतो. खरे तर तो फक्त आकाशात हिंडणारे काही ठिपकेच पाहत असतो. मात्र, तुमच्या दुर्बिणीची रचना त्याने मान्य केल्यामुळे तो ते ठिपके म्हणजेच ग्रहगोल हे मान्य करतो. तुम्हाला जर धर्मावर बोलावयाचे असेल, तर तुम्हीसुद्धा प्रथम धर्मातील मूलभूत तत्त्वे समजावून घ्यावयास हवीत. मग तुमच्या लक्षात येईल- धर्म आणि विज्ञान मानवी जीवन सुखी व आनंदी व्हावे, म्हणून जन्माला आलेत.’

मात्र, या सर्वांत झालेला एक महाभयंकर घोटाळा आइन्स्टाईन आणि विवेकानंद यांनी सांगितलाय. त्यावरचा उपायही सांगितलाय आणि त्या दोघांची मांडणी अगदी एकसारखी आहे. त्या दोघांनी सांगितलंय, ‘माणसाच्या मनाला शांती आणि आनंद मिळावा म्हणून जन्माला आलेल्या धर्मांनी माणसांची मने भडकावून सर्वाधिक हिंसा व रक्तपात घडवलाय आणि माणसाचे आयुष्य सहज, सोपे, सुंदर करण्यासाठी जन्माला आलेल्या विज्ञानाने तंत्रविज्ञान निर्माण केले. त्या तंत्रविज्ञानाने पृथ्वीवरचे पर्यावरण बिघडवले. अणुबॉम्ब निर्माण करून एका क्षणात लाखो माणसांची वाफ केली. त्यापूर्वी ‘टी.एन.टी.’सारखा महासंहारक रासायनिक पदार्थ निर्माण करून युद्धात लक्षावधी माणसे जाळून मारली. त्यातून पुन्हा हा पदार्थ बनवून ज्याने अब्जावधी रुपये मिळवले, त्या नोबेलने शांततेचे नोबेल प्राईज ठेवले आणि जगभरचे शांतताप्रेमी ते चढाओढीने मिळवतात आणि मग जगभर मिरवतात!’

मानवी जीवनातील ही विसंगती दूर करावयाची असेल, तर विज्ञान आणि धर्म यांना समन्वय करावा लागेल का? विज्ञान का आणि कसे, हे सांगेल; धर्म का आणि कशासाठी, हे सांगेल. हे करता येईल, असे विवेकानंद आणि आईनस्टाईन यांनी सांगितलंय. विवेकानंद म्हणालेत, ‘यासाठी आपणाला नवा धर्म शोधावा लागेल. तो सर्व धर्मांच्यावर आधारित असेल. मात्र विज्ञान हा त्याचा पाया असेल. त्यामुळे तो स्थितीशील नसेल, तर गतिशील असेल.’ आइन्स्टाईनने हे अधिक भेदकपणे सांगितलेय. त्यांनी सांगितले आहे, ‘विज्ञानाशिवाय धर्म आंधळा आहे आणि धर्माशिवाय विज्ञान-तंत्रज्ञान पांगळे आहे.’

थोडक्यात काय- माझ्या विज्ञानानेच मला शिकवलंय की, विज्ञान आणि धर्म यांच्या समन्वयाची आता गरज आहे.

(लेखक नामवंत विचारवंत आहेत)

9822503656

Previous article‘अर्थाच्या शोधात’-डॉ. हेमंत खडके
Next articleभिऊ नका, मीच तुमच्या पाठीशी आहे !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here