विदर्भातील निकाल कमालीचे धक्कादायक असणार !

(पूर्वप्रसिद्धी- दैनिक दिव्य मराठी, दिनांक २४ एप्रिल २०१९ )

-अविनाश दुधे 

      २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील दहाही मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले होते . भाजपला २०१९ च्या या निवडणुकीतही तशाच दणकेदार विजयाच्या पुनरावृत्तीची आशा असली तरी मतदानानंतरची मतदारांची भाषा काही वेगळंच सांगत आहे. यावेळी विदर्भाच्या काही मतदारसंघातील निकाल कमालीचे धक्कादायक राहणार असल्याचे  स्पष्ट संकेत मिळत आहेत. विदर्भात यावेळी कुठलीही लाट नव्हती . निवडणुकीच्या प्रारंभीच्या टप्प्यात मतदार अगदी सायलेंट होता . त्याच्या मनात काय चालू आहे , हे कळू द्यायची त्याची तयारी नव्हती . पण त्याच्या चेहऱ्यावरची खदखद लपायला तयार नव्हती . ही खदखदच भाजप –सेना युतीसाठी धोकादायक ठरेल , असे दिसत आहे.

विदर्भात २०१४ च्या तुलनेत यावेळी काही विषयातील फरक अगदी स्पष्ट जाणवला .२०१४ च्या निवडणुकीत मुस्लीम व दलित हे दोन मोठे दबावगट भाजपप्रती काहीसे सॉफ्ट होते. त्यांचा कॉंग्रेसवर मोठा रोष होता. त्यामुळे त्या निवडणुकीत या दोन समाजातील काही टक्के मतदान तरी भाजपच्या वाट्याला गेले होते . यावेळी हे दोन्ही समाज आपल्या मतदानाप्रती कमालीचे जागरूक होते . मुस्लीम समाजाने तर प्रत्येक मतदारसंघात भाजप-सेना उमेदवाराला पराभूत करू शकेल, अशाच उमेदवाराला मत देण्याचा निर्णय घेतला होता . त्यामुळे एमआयएम, समाजवादी या मुस्लीमधार्जिण्या मानल्या जाणाऱ्या पक्षाच्या सभांना विदर्भात मुस्लिमांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही . अगदी ओवेसी , अबू आझमींच्या सभांकडेही मुस्लिमांनी पाठ फिरवली.एमआयएमला ज्या पद्धतीने मुस्लीम समाजाने थंड प्रतिसाद दिला तसा प्रकार दलित समाजाने वंचित आघाडीबाबत केला नाही . मात्र सरसकट सगळा दलित समाज वंचित आघाडीकडे गेला असेही झाले नाही . दलित समाजातील एक मोठा समूह आपल्या मतांमुळे भाजप- सेनेचा फायदा होणार नाही याबाबत जागरूक होता . मुस्लीम व दलित समाजातील ही सजगता विदर्भात निर्णायक ठरणार आहे .                                                                  शहरी व ग्रामीण मतदारांची भिन्न मानसिकता हा सुद्धा विदर्भाच्या निकालात महत्वाचा घटक ठरणार आहे. शहरी मध्यमवर्गीय , उच्च मध्यमवर्गीयांना अजूनही मोदीचे , भाजपचे आकर्षण असल्याचे या निवडणुकीदरम्यान लक्षात आले . मात्र शेतकरी , कामगार , कष्टकरी वर्ग उघडपणे बदलाची भाषा बोलत होता . विदर्भातील ही निवडणूक गेल्या अनेक वर्षापासून खासदार असलेल्या शिवेसेना –भाजपच्या सर्व खासदारांची परीक्षा घेणारी ठरली . पश्चिम विदर्भात चारपैकी तीन  विद्यमान खासदार हे शिवेसेनेचे आहेत. मात्र बुलडाण्यात प्रतापराव जाधव, यवतमाळ- वाशिममध्ये भावना गवळी आणि अमरावतीत आनंदराव अडसूळ या तिघांनाही ही निवडणूक चांगलीच जड गेली . या तिघांनाही anti incumbancy सोबत पक्षातील अंतर्गत गटबाजीचाही सामना करावा लागला . आदित्य ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या वेगवेगळ्या नेत्यांमध्ये दिलजमाईचे प्रयत्न केले , पण त्याचा फार उपयोग झाला असे दिसले नाही. बुलडाण्यात विजयराज शिंदेंनी जे करायचे ते केलेच . तिथे राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे यांचेसाठी कॉंग्रेस –राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रितपणे काम केले . येथील उमेदवारीसाठी इच्छुक असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर प्रारंभी काहीसे नाराज होते . मात्र शरद पवारांच्या भेटीनंतर त्यांनी आपली संपूर्ण ताकद लावली . त्याचा फायदा शिंगणेंना निश्चित होणार आहे . खरं तर शिंगणे ही निवडणूक लढविण्यास फार इच्छुक नव्हते , पण पवारांच्या आग्रहामुळे त्यांना लढावे लागले . खूप दिवसानंतर निवडणूक रिंगणात आल्याचा फायदाही त्यांना होईल , असे दिसते आहे .

यवतमाळ-वाशिममध्ये भावनाताई गवळी व कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यात चुरशीची लढत झाली .माणिकरावांबद्दल जिल्ह्यातील कॉंग्रेसचे जेष्ठय नेते शिवाजीराव मोघे , वसंतराव पुरके , वामन कासावार, राष्ट्रवादीचे मनोहर नाईक आदी नेत्यांच्या मनात फार स्नेह नसला तरी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेवून या नेत्यांनी कॉंग्रेसचे काम केले . राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया सोडले तर माणिकरावांना कॉंग्रेस – राष्ट्रवादीतून विरोध झाला नाही . भावना गवळी यांच्यासाठी मात्र निवडणुकीची सुरुवात काही ठीक नव्हती . शिवेसेनेचे मंत्री संजय राठोड , यवतमाळचे पालकमंत्री भाजपचे मदन येरावार व कारंजाचे सेना आमदार राजेंद्र पाटणी या तिघांनीही त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता . भाजपने तर पी . बी .आडे या उमेदवाराला रिंगणात उतरविण्याची पूर्ण तयारीही केली . नंतर मातोश्री आणि भाजपमधून सगळं शांत केलं असलं तरी आडे यांनी निवडणूक लढविलीच . आडे हे बंजारा समाजाची किती मत घेतात , ही बाब महत्वाची ठरणार आहे . संजय राठोड यांनी आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात सेनेचे काम केले , पण त्यांची नाराजी लपत नव्हती .

यवतमाळसारखीच अमरावतीची लढतही उत्कंठापूर्ण झाली . येथे २०१४ चाच रिप्ले आहे . शिवसेनचे आतापर्यंत पाचदा खासदार राहिलेले आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध युवा स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत राणा यांच्यात येथे थेट लढत झाली . राष्ट्रवादीने आपल्या वाट्याचा हा मतदारसंघ यावेळी स्वाभिमानीला दिला आणि स्वतः बाहेरून पाठिंबा दिला . शरद पवार यांनी  येथे स्वतः नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेतली . या गोष्टी नवल वाटाव्या अशा होत्या . अमरावतीची निवडणूक कुठल्या मुद्द्यांपेक्षा मागील निवडणुकीप्रमाणे आरोप –प्रत्यारोपानेच अधिक गाजली . आमदार रवी राणा व उमेदवार नवनीत राणा यांनी अडसूळ यांची निष्क्रियता आणि त्यांचं बाहेरचं असणे यावर जोर दिला . दुसरीकडे शिवसेनेने आमदार रवी राणांच्या ‘जुगाडू’ राजकारणाचा मुद्दा वारंवार  चर्चेत आणला . उद्या नवनीत राणा निवडून आल्या तरी त्या कॉंग्रेस – राष्ट्रवादीसोबत प्रामाणिक राहतील , याची काहीही हमी नाही असा अप्रचार सेनेने जोरात केला . परिणामी कॉंग्रेस नेत्यांनी त्यांच्याकडून एकनिष्ठतेची शपथ घेतली . अर्थात या घडामोडींचा राणा दाम्पत्यावर काही परिणाम झाला नाही . त्यांनी त्यांच्या पद्धतीने मतदारसंघ ढवळून काढला . राष्ट्रवादीचे काही दुसरया फळीतील नेत्यांनी राणांचे काम केले नसले तरी कोंग्रेसच्या आमदार  यशोमती ठाकूर , रावसाहेब शेखावत , बबलू देशमुख , सुनील वऱ्हाडे यांनी आपल्या परीने राणांसाठी जोर लावला . शेवटच्या काही दिवसात नवनीत राणा निवडून आल्यात तर जिल्ह्यातील पाटील –देशमुखांचे राजकारण धोक्यात येईल , असा प्रचार शिवसेनेकडून झाला . मात्र ग्रामीण , आदिवासी व शहरातील युवा मतदारांना नवनीत राणांचे आकर्षण असल्याचे आढळून आले .

अकोल्याची भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे , बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेसचे हिदायत पटेल यांच्यात तिरंगी लढत झाली. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात येथील उमेदवार बदलला पाहिजे ,असा निष्कर्ष समोर येवूनही भाजपने बंडखोरीच्या भीतीने धोत्रेंना रिपीट केले . कॉंग्रेसने येथे मुस्लीम उमदेवार टाकल्याने आंबेडकरांची गोची झाली . कॉंग्रेसचा राज्यातील एकमेव मुस्लीम उमेदवार इथे अकोल्यात असल्याने यावेळी मुस्लीम समाजाने आंबेडकर यांच्याऐवजी पटेलांना पसंती दिली . आंबेडकर यांची ओवेसी यांच्या एमआयएमसोबत युती असतानाही समाजाच्या दडपणामुळे ओवेसी यांनी अकोल्यात आंबेडकरांसाठी जाहीर सभा घेतली नाही , अशी अकोल्यात जोरात चर्चा होती . अकोल्यात भाजपच्या अपेक्षेप्रमाणे मुस्लीम व दलितांचे मतविभाजन झाल्याने येथे भाजपसाठी लढत सोपी झाली , असे मानले जात आहे .

पूर्व विदर्भात सर्वाधिक लक्षवेधक लढत नागपुरात झाली . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व गेल्या निवडणुकीत भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेलांना पराभूत करणारे नाना पटोले यांच्यातील लढतीचा निकाल धक्कादायक लागेल , असे दावे केले जात आहे . नागपूरची लढत सरळसरळ जातीवर गेली . नाना पटोले ज्या कुणबी समाजाचे आहेत , तो समाज बहुसंख्येने पटोलेंसाठी एकत्रित आला . याशिवाय मुस्लीम व दलित समाजानेही एकगठ्ठ्याने भाजपविरोधात मतदान केले, असे म्हटले जातेय . ही डीएमके (दलित, मुस्लीम ,कुणबी ) युती गडकरींना पराभूत करण्याचा चमत्कार घडवेल , असे सांगितले जाते . गडकरी व भाजप समर्थकांना हे मान्य नाहीय . गडकरींनी गेल्या पाच वर्षात सर्वच समाजासाठी केलेलं सर्वसमावेशक समाजकारण आणि विकासकामे त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल असा विश्वास भाजप वर्तुळात आहे. गडकरींचे मताधिक्य घटेल , पण विजयी तेच होतील, असा संघपरिवाराला विश्वास आहे . नागपूरचा निकाल काय यायचा तो येईल , मात्र भाजपला अपेक्षित होती तशी एकतर्फी लढत येथे झाली नाही , हे निश्चित .

नागपूरप्रमाणे चंद्रपूर व वर्ध्याची निवडणूकही जातीभोवती फिरली. चंद्रपुरात भाजपचे उमेदवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याविरोधात  कॉंग्रेसने आधी विनायक बांगडे यांचे नाव जाहीर केले . मात्र त्यामुळे खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नाराज झाल्याने ऐन वेळेवर शिवेसेना आमदार बाळू धानोरकर यांना पक्षात घेवून त्यांना उमेदवारी देण्यात आली . त्यांच्या उमेदवारीने कॉंग्रेसमध्ये एकदम चैतन्य निर्माण झाले. एक नरेश पुगलिया सोडले तर कॉंग्रेसचे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील सारेच नेते धानोरकर यांच्यासाठी जोरात फिरलेत . मात्र कॉंग्रेसजवळ हंसराज अहिर यांच्याविरोधात जोरकस मुद्दा असा काही नव्हता . चारदा खासदार , मंत्री राहूनही त्यांच्या खात्यावर कुठलंही भरीव काम नाही , हा मुद्दा कॉंग्रेसने लावून धरला . अहिरांची अकार्यक्षमता , लोकांचा बदलाचा मूड आणि धानोरकारांची जात यावेळी चंद्रपूरचा निकाल बदलवेल , अशी खात्रीने सांगणाऱ्यांची संख्या मोठी आहे . वर्धेच्या निवडणुकीतही जात हा मुद्दा महत्वाचा राहिला . भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांचेसाठी त्यांच्या तेली समाजातील काहींनी पुढाकार घेवून समाजाच्या सभा लावल्याने दुसरीकडे कुणबी स्पिरीट जागृत झाले . त्यांनीही आपल्या जातीचे धृवीकरण केले. या जातीच्या लढाईत जनसंपर्क हा मुद्दाही वर्धेत महत्वाचा ठरला .कॉंग्रेस उमेदवार चारुलता टोकस यांचे कायम मतदारसंघाबाहेर राहणे आणि तडस यांचा मतदारांसोबत नियमित संपर्क या गोष्टी वर्धेच्या निकालावर फरक पाडतील, असे सांगितले जात आहे .

नागपूरच्या ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या रामटेक या राखीव मतदारसंघात शिवेसेनेचे कृपाल तुमाने आणि कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात थेट लढत झाली . रामटेक मतदारसंघ हा अलीकडच्या काही वर्षात शिवसेना –भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे . शिवसेनेने येथे विद्यमान खासदार तुमाने यांनाच पुन्हा रिंगणात उतरविले .कॉंग्रेसने सनदी अधिकारी गजभिये यांना तिकीट देवून अनेकांना चकित केले . फ्रेश चेहऱ्याचा कॉंग्रेसला फायदा होईल , असा अंदाज आहे. भंडारा मतदारसंघात राष्ट्रवादीचे वजनदार नेते प्रफुल्ल पटेल रिंगणात नाहीत , ही गोष्ट अनेक वर्षानंतर घडलीय . शेवटच्या क्षणापर्यंत स्वतः पटेल आणि त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांच्या नावाची चर्चा होती . मात्र ऐन वेळेवर आपले समर्थक आमदार नाना पंचबुद्धे यांची  उमेदवारी पटेलांनी घोषित केली . भाजपनेही येथे नवीन चेहरा दिला . भंडारयाचे नगराध्यक्ष व आरएसएसचे कट्टर कार्यकर्ते सुनील मेंढे यांना भाजपने तिकीट दिले . भंडारा मतदारसंघ हा आलटून पालटून  प्रफुल्ल पटेल आणि भाजपला कौल देत असतो . भाजप-संघाने येथे अनेक वर्षापासून मजबूत संघटन बांधणी केली . त्याचा फायदा त्यांना होत असतो. दुसरीकडे पटेलांनाही प्रत्येक गावात आपले वैयक्तिक नेटवर्क उभारले आहे . ‘यावेळी मी जरी उभा नसलो तरी मीच निवडणूक लढवत आहे , असे समजून मत द्या’ , असे भावनिक आवाहन त्यांनी मतदारांना केले .दुसरीकडे भाजपनेही संपूर्ण जोर लावला आहे . लढत काट्याची होईल, असे दिसतेय .राज्याच्या अगदी टोकावर असलेल्या गडचिरोली या नक्षलप्रभावित मतदारसंघात विद्यमान खासदार भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात लढत झाली . अशोक नेते यांचा जनसंपर्क व्यापक आहे मात्र  आदिवासींचा जमीन पट्ट्याचा प्रलंबित असलेला प्रश्न आणि गडचिरोली जिल्ह्यात ओबीसीचे कमी झालेले आरक्षण, हा विषय निवडणुकीदरम्यान त्यांचेसाठी डोकेदुखी ठरला. दुसरीकडे काँग्रेसही गटबाजीमुळे त्रस्त होती  विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी या मतदारसंघात उसेंडी यांच्या नावाला विरोध दर्शवून डॉक्टर कोडवते यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी पक्षाकडे केली होती. इथे निकाल काय येईल कोणीच खात्रीने सांगायला तयार नाही .

विदर्भाच्या दहाही मतदारसंघातील निवडणुकीनंतरचे हे चित्र आहे . हमखास काय होईल हे सांगता येत नसले , तरी २०१४ च्या निकालाची पुनरावृत्ती होत नाहीय , हे मात्र खात्रीने सांगता येते. विदर्भाचा निकाल ५-५ असा बरोबरीत सुटला तरी आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही .

 (लेखक मीडिया वॉच पब्लिकेशनचे संपादक आहेत)

[email protected]

Previous articleगांधीजींशी मतभेद
Next articleमोदींची ‘अराजकीय’ मुलाखत!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here