शर्विलचे स्क्रीन ऍडिक्शन तोडताना…

-डॉ. शीतल आमटे

माझा सहा वर्षांचा मुलगा शर्विल करजगी लहानपणापासून अतिशय सृजनशील आहे. खोडकर पण सुस्वभावी, कोणाला त्रास देणार नाही, नेहमी सर्वांना मदत करणारा आणि आईवडिलांना समजून घेणारा असा आहे. तसा तो व्हावा यासाठी आम्ही बरेच प्रयोगही केले. त्याला लहानपणापासून खूप मुक्त वातावरणात वाढविले. मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक ते खेळ आणून दिले. मातीत खेळू दिले आणि मुख्य म्हणजे त्याचे वय न बघता वेगवेगळी माध्यमे त्याला हाताळायला दिली. यात acrylic रंग, कॅनव्हास, चिखल, झाडांची पाने, फुले, धान्ये अशी वेगवेगळी माध्यमे देऊन त्यांच्यातून स्वतःचे खेळ बनवायला प्रोत्साहित केले. तीन वर्षाच्या वयात त्याला 8 तुकड्यांचे एक पझल दिले, तिथपासून त्याने जो वेग पकडला की आज तो 9 वर्षांच्या मुलाने केली पाहिजेत अशी 300 तुकड्यांची पझल्स सहज करतो. एका जागी चिकाटीने तासनतास बसून पझल्स करणे हा जणू त्याचा छंदच बनला.

तो जात्याच अत्यंत हुशार आणि संवेदनशील आहे. त्याची रंगांची जाण आणि अवकाशीय ( spatial) प्रतिभा वेगळीच आहे. अगदी दीड वर्षांपासून सुंदर सुंदर abstracts आणि acrylic paintings करतो. पहिल्यांदा हातात ब्रश आणि कॅनव्हास दिला तेव्हा अंगाला लावून घेण्यापासून आज एक प्रसिद्ध छोटा चित्रकार म्हणून त्याची महाराष्ट्रात ओळख आहे.

डायनोसार आणि समुद्राचा तर तो चालता बोलता encyclopedia आहे. एक विषय घेतला की खोलात नेऊन संपवायचा यावर त्याचे लक्ष असते. झाडांवरही त्याचे प्रेम आहे. त्याने आजवर 93 झाडे लावली असल्याने वनखात्याचे सचिव त्याला वनखात्याचा हिरो म्हणतात.

एकंदर माझ्याकडे बरेच लोक ‘आदर्श पालकत्व’ या विषयावर सल्ला मागत असतात. आम्ही देतोही पण आमच्याही चुका होतातच, त्यातून आम्ही वर कसे येतो हे ही विशद करतो. त्याबद्दल मला लिहायचे आहे.

त्यापैकी एक मोठी चूक म्हणजे त्याला विविध स्क्रीन देणे. त्याला मोठे करण्यात आमची ही खरंच अक्षम्य चूक झाली. आम्ही लहानपणापासून त्याला गाणी शिकवायला मोबाईल देत असू. सुरुवातीला मज्जा वाटे. त्याची बडबडगीते ऐकताना दिवस मस्त जाई. त्यामुळे याचे पुढे भयंकर काही होईल असा अंदाज आला नाही. सुरुवातीला दहा मिनिटांपासून ते पाच वर्षांच्या वयात दिवसाला तीन तीन तास तो TV बघू लागला. सगळे भीतीदायक बघायला त्याला आवडू लागले. Scary शार्क म्हणून एक भीतीदायक series आहे ती त्याची आवडती होती. पुढे Halloween चे भूत आवडू लागले. अर्धा तास, एक तास ठीक होते. मग शाळेतून आल्यावर दप्तर फेकले की TV लावणे ओघानेच आले. हट्ट वाढू लागले.

घरी माझी आणि गौतमची याबद्दल तात्विक भांडणे होत. मला हे आवडत नसे परंतु त्याच्या हट्टापायी गौतम काहीच करू शकत नसे. खरे म्हणजे मी आजूबाजूच्या आणि घरातील सर्वांना कात्रणे पाठविणे, डोळे कसे खराब होतील याबद्दल शास्त्रीय कारणे देणे असेही करून बघितले. पण त्यामुळे काहीच साध्य झाले नाही.

पुढे तर त्याला त्याचे व्यसन लागत गेले. इतके की दररोज न चुकता काहीही खाताना त्याला TV किंवा मोबाईल लागत असे. पाच वर्षांचा झाला तरी स्वतःच्या हाताने खात नसे, कारण खाताना त्याचे लक्षच नसे. त्यामुळे खूपच कमी पदार्थ खाई. बहुतेक त्याचे पाचक रस बाहेर येत नसल्याने त्याला अन्नाची quality आणि quantity कळत नसे. कधीकधी चार चार पोळ्या खाल्ल्या तरी त्याला कळत नसे. कधी एक पोळी खातानाही खूप त्रास. अन्नाकडे लक्षच नसल्याने पंचेंद्रिये साथ देत नव्हती.

डॉ.शीतल आमटे यांचा या विषयातील ABP Mazha या वृत्तवाहिणीवरील Video Blog-नक्की पहा- https://youtu.be/_pPV0RwYH-E

जेवण सोडले तर इतर अनेक बाबतीतही सतत त्याला मोबाईल हवा असे. प्रवासात गुगल मॅप्स, जेवताना पेप्पा पिग, रात्री scary शार्क. चित्र काढणार तर मोबाईल मध्ये पाहून, ओरिगामी करणार असेल तर TV मध्ये बघून. प्रत्येक ठिकाणी विविध स्क्रीन त्याच्या आयुष्याचा भागच बनत गेले.

शाळेतील गृहापाठातील माहिती बघायची, बाकी काहीही करायचे तर त्याला इंटरनेट हवे असे. पुढे ऍमेझॉन वापरायची त्याला सवय लागली. एकदा माझ्या ऍमेझॉन च्या कार्ट मध्ये त्याने 68,000 च्या वस्तू टाकून ठेवल्या होत्या. पुढे एकदा तर क्रेडिट कार्डाच्या OTP पर्यंत पोचला. आम्ही जे स्क्रीनवर करायचो ते लक्षात ठेवून ते तो करीत असे हे आमच्या फार उशीरा लक्षात आले. अमहो दोघेही प्रचंड कामात व्यग्र असल्याने आमच्यापाठी तो काय करतोय हे ही तो कळू देईना.

बाकी सुरुवातीपासूनच तो असा खूप सोशल नाहीच. मित्र एकच होता. परंतु एक लक्षात आले की स्क्रीन वापरायला लागल्यापासून शर्विल सतत distracted असायचा. आम्ही त्याला चष्म्यापासून ते भुतापर्यंत खूप भीती दाखवली पण त्यामुळे तो स्क्रीन सोडत नव्हता. होमवर्क करणे त्याने सोडून दिले होते. हट्टीपणा टोकाला गेला होता. हट्ट म्हणजे टोकाचे होऊ लागले. शर्विल आणि हट्ट हे समीकरणच आमच्याने जुळेना.

वेळोवेळी मी घरातील इतरांना अलर्ट करूनही त्याचे हे वेड जात नव्हते. कारण त्यात माझ्याकडून active प्रयत्न होत नव्हते.

एकदा बालरोगतज्ञ डॉ. समीर दलवाई यांचा एक व्हिडिओ बघण्यात आला. त्यात त्यांनी स्क्रीन आणि नशेच्या पदार्थांची तुलना केली होती. ते बघून मन व्यथित झाले. त्यांना भेटायचे ठरविले. त्यांनीही हो म्हटले आणि आम्ही पुण्यात भेटलो.

त्यांना भेटल्यावर मी ही व्यथा मांडली आणि त्यांनी मला स्क्रीनच्या अतिवापरामुळेमुळे होणाऱ्या Attention Deficit Hyperactivity Disorder बद्दल सांगितलं. त्यांनी मला विचारले की त्याला काय येतेय यापेक्षा तो काय गमावतोय हे तुझ्या लक्षात येतेय का? त्याने किती नवीन मित्र बनविले, तो किती चाणाक्ष आहे, त्याला स्वतःच्या हाताने का जेवता येत नाही आणि का तो सतत हट्ट करतो. यावरून माझे डोळे उघडले. याकडे मी कधी लक्षच दिले नव्हते.

बाकी त्यांनी अनेक अनुभव सांगितले. ते ऐकून मी ठरवले की कशीही करून या प्रश्नावर आपण मात करायचीच.

मी घरी आल्यावर सर्वात पहिले आठ दिवस सुट्टी घेतली. या आठ दिवसांत पूर्ण वेळ मुलाला द्यायचे ठरविले. घरच्या सर्वांना थोडे प्रेमाने आणि थोडे धमकावून सांगितले की मी आता एक प्रयोग करणार आहे आणि त्यात काहीही झाले तरी आपण त्याला कुठलाही स्क्रीन द्यायचा नाही. कितीही तमाशा त्याने केला तरी सहन करायचा आणि आता व पुढे जे होईल त्याला मी जबाबदार राहीन.

माझा अवतार बघून घरच्यांनी सहकार्य करायचे मान्य केले. सर्वात पहिले मी शर्विलला विश्वासात घेऊन त्याला सांगितले की आठ दिवस आपण खूप मजा करणार आहोत. मी पूर्ण वेळ तुझ्यासाठी उपलब्ध आहे. जे तुला हवे ते सगळे करू फक्त आपण TV आणि मोबाईल बघणार नाही. जे ही करू ते तुझ्या मनानेच करू. त्याला ते समजले नाही परंतु काहीतरी वेगळे घडणार यामुळे तो खूश झाला.

पहिले मी त्याच्या रुटीनचा पूर्ण ताबा घेतला. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याच्या सोबत होते. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये त्याला सांगितले की आपण मज्जा करणार आहोत, त्यामुळे तो प्रत्येक तासाला excited असायचा. त्यात आम्ही जुन्या आणि नवीन छंदाना उजाळा दिला. घरात सासू सासऱ्यांसकट अक्षरशः relay केल्यासारखे काम आम्ही केले. एकाने त्याच्यासोबत पझल्स केली, तर दुसऱ्याने गोष्टी रचून लिहिणे शिकवणे सुरू केले, तिसऱ्याने गोष्टी रचून त्याला त्याचा हिरो बनवून सांगणे सुरू केले, घरात आणि घराबाहेर खूप ऍक्टिव्हिटीज केल्या. एक नियम केला की, कोणीही स्क्रीन हातात घेतला की ‘नो स्क्रीन ‘ असे ओरडणे सुरू केले. आम्हीही आमचे स्क्रीन बाजूला ठेवले.

त्यामुळे असे झाले ‘नो स्क्रीन’ हा घराचा पासवर्ड बनला. यात तो ही आम्हाला ‘नो स्क्रीन’ म्हणू लागला आणि जेव्हा चक्क आम्ही त्याचे ऐकू लागतो तेव्हा तो फारच उत्साहित झाला. ‘नो स्क्रीन policy’ मुळे सर्व एकमेकांशी बोलू लागले, त्यामुळे घरात त्याला फार करमू लागले. प्रत्येक जण आपल्याला पूर्णपणे वेळ आणि भाव देतोय ही भावनाच त्याच्यासाठी मोठी होती.

आठ दिवसात काही वेळा relapse झाला. एक दोनदा त्याने मोठा तमाशाही केला पण तो मीच स्क्रीन हातात घेतल्याने. त्याला थोडी फसवणुकीची भावनाही आली. पण तरीही स्वतःचे स्क्रीन बाजूला ठेवून त्याला मात्र आम्ही स्क्रीन दिला नाही. आम्हीही TV पाहिला नाही.

पण त्यामुळे असे झाले की सर्वांकडे अचानक वेळ उपलब्ध झाला. त्याला मी गोष्टी सांगत हाताने जेवायला प्रेरित करू लागले. त्या आठ दिवसात तो हाताने जेवू लागला, नवनव्या गोष्टी रचू लागला, विसरलेली पझल्स करू लागला. त्यामुळे त्याचे जी ऍक्टिव्हिटी करतोय त्यात पूर्ण लक्ष लागू लागले. आठव्या दिवशी सासूबाईंसोबत 300 चे पझल साडेतीन तास बसून त्याने पूर्ण केले.

यात त्याला कुठलीही भीती आम्ही दाखविली नाही. सतत विश्वास टाकत गेलो. तो स्क्रीन सोडणे ही आमची गरज असल्यासारखे वागत असल्याने आपण आईबाबांसाठी काही करतोय ही भावना त्यात आली.

आठ दिवसात स्क्रीन पूर्ण विसरला. आज स्क्रीन सोडून तीन महिने झालेत पण आता तो स्क्रीन मागत नाही. हवी असलेली माहिती पुस्तकातून घेतो किंवा आम्हाला काढून द्यायला सांगतो. मैदानी खेळ खेळतो. स्क्रीनसाठी अजिबात हट्ट करीत नाही. हट्ट केला की आईवडील बळी पडणार नाही हे त्याला कळले.

आता तो स्वतःच्या हाताने खातो. अन्नाच्या चवी कळतात.त्यामुळे दोनच पोळ्या पण त्या पूर्ण चावून खातो. पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करतो आणि अतिशय सुंदर पेंटिंग करतो. हट्ट त्याचे अजिबात बंद झाले. घरच्या कुत्र्यांमध्येही तो फार रमू लागला.

आम्ही आता दिवसातून त्याला जरी दोन तीन तास वेळ देऊ शकत असलो तरी आम्ही नसताना तो अजिबात स्क्रीनला हात लावत नाही कारण याचे foundation भीतीवर नाही तर परस्पर विश्वासावर आहे. त्याला भीती दाखवून जे झाले नाही ते विश्वासाने झाले. आमचा मुलगा आम्हाला परत मिळाला आहे यातच आम्हाला खूप आनंद आहे.

(लेखिका आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

[email protected]
हे सुध्दा नक्की वाचा. भारत होतोय नोमोफोबियाचा शिकार http://bit.ly/2su677w

हे सुध्दा नक्की वाचा. डिजिटल युगातले सहजीवन ‘सही’ जीवन होईल? http://mediawatch.info/3638-2/

Previous articleसावरकरांना विरोध का ?
Next articleशाओमी नावाची चमत्कारीक सत्यकथा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.