शिवराय माथा, तर घाला लाथा

 
साभार : साप्ताहिक चित्रलेखा
– ज्ञानेश महाराव
शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस-राष्ट्रीय कॉंग्रेस   या पक्षांच्या ‘महाविकास’ आघाडीची स्थापना आणि या आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या जयघोषात झाली. त्यावेळी सर्वच वक्त्यांनी-नेत्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवरायांचा नामघोष केला. तसंच, शिवरायांचं रयतेचं राज्य पुन्हा आणण्याचं वचन दिलं. उद्धव ठाकरे यांनीही आपल्या आभाराच्या भाषणात छत्रपती शिवरायांचा उल्लेख करून ‘छत्रपती महाराष्ट्रातच का जन्मले आणि स्वराज्य का निर्माण केले,’ या प्रश्नाचा उलगडाही केला. त्यातून देशहितासाठी महाराष्ट्राची जबाबदारी  काय आहे आणि ती पुढच्या काळात महाराष्ट्राला कशाप्रकारे पार पाडायची आहे, त्याचेही भान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. त्यातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचेच, हा अट्टहास ठळकपणे दिसतो. हा अट्टहास आवश्यक होता; तसे जनमतच होते, म्हणूनच *महेश शिवाजी धानके*  (शहापुर -ठाणे) हा तरुण कवी लिहितो –
 खोटारडी हुकूमशाही उलथवुनी
 आली शिवशाही –
 महाराष्ट्राचे मर्द मावळे
 आता झुकणार नाही – १
 पुन्हा येईन’ची वाघाने
 रोखली सत्ता गती-
 दोन शेटजींना कळली नाही,
 वारकरी शरद नीती – २
 उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे,
 झाले नवे मुख्यमंत्री –
 ‘संविधान’ दिनी गाडले गेले,
 नंगे पाताळयंत्री – ३
 मुक्त जाहली महाराष्ट्राची,
 खुषीत काळी आई –
 स्वप्न विकासाचे पूर्ण करतील,
 अमुचे जनभाई – ४
यासाठी केलेला अट्टहास खोटा नव्हता, म्हणूनच ‘महाविकास आघाडी’च्या सत्ता स्थापनेचा आनंद मोठा झाला. या अट्टहासाबाबतचा आग्रह ‘संयुक्त महाराष्ट्र निर्मिती’ लढ्याचे सेनापती  (पांडुरंग महादेव) बापट यांनी अधिक स्पष्टपणे मांडलाय. ते म्हणतात –
महाराष्ट्र मेला, तरी राष्ट्र मेले
 महाराष्ट्राविना, राष्ट्रगाडा न चाले
खरा वीर वैरी, पराधीनतेचा
 महाराष्ट्र आधार, या भारताचा
यामधून येणार्या  जबाबदारीची जाणीव ठेवूनच सेनापती बापट यांनी ‘महाराष्ट्र धर्म’ जागवला. तसेच त्यांचे जीवनकार्य होते. त्यांच्या पूर्वी आणि नंतर या वरील काव्य ओळी सार्थ करण्याची अपूर्व कामगिरी अनेकांनी पार पाडलीय. तेच ऐतिहासिक कार्य राज्य विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्र धर्माला उजाळा देत पार पाडलंय. यासाठी विचाराचे, धोरणाचे सवतेसुभे त्यांनी कर्तव्यकर्म समजत मोडून काढले, हे महाराष्ट्र हिताचे ठरले. तसेच ते राष्ट्रहिताचेही ठरणार आहे.
 मोदी-शहांच्या हुकूमशाहीला झुगारून देणारा हा ‘महाविकास आघाडी’चा कार्यक्रम देशव्यापी होण्याची शक्यता लक्षात आल्यानेच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना साथीला घेऊन सत्तेचा ‘पाट’ लावण्याचा उद्योग केला. तो फसला. त्याने ‘फडणवीस हे बालिश आहेत,’ हे शरद पवार यांचे म्हणणे खरे ठरले. तसेच, ‘शरद पवारांचे राजकारण आणि त्यांची देशहिताबाबतची भूमिका समजण्यासाठी भाजपच्या पुढार्‍यांना शंभर जन्म घ्यावे लागतील,’ हे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे म्हणणेही सत्यात उतरले.
 तथापि, हे जे घडले, ते आहे. असे हवे ते, ते घडवण्यासाठी एकत्र यावे लागते. त्यासाठी शक्तीप्रमाणे बुद्धिबळही वापरावे लागते. १००-२०० कडवे झुंजार शिलेदार मिळवायचे. त्यांच्या जोरावर लढाया मारून आपले एक छोटेसे राज्य बनवायचे. शेजारच्या अशाच कुणाच्या राज्यात घुसाघुशी करून दंगाधोपा करायचा. हा उद्योग मराठी भूमीत पुराणाच आहे. अशा स्थितीतही वतनासाठी भांडत बसणार्‍या अथवा पातशहाची चाकरी करण्यातच धन्यता मानणार्‍या, राष्ट्रीय प्रपंचाबाबत संपूर्णपणे उदासीन बनलेल्या अथवा ठेविले अनंते तैसेची राहावे  या वृत्तीने निष्क्रीय बनलेल्या लोकांना, स्वराज्याच्या आकांक्षेने चेतवून महाराष्ट्रात नवे कर्तृत्व फुलवणारी घराणी उभी करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यांनी छोट्या-छोट्या संकल्पात-स्वार्थात गुंतलेल्यांना हा सारा देश तुमचा आहे; तुम्ही तो आपला म्हणून सांभाळायचा आहे,  हे शिकवलं. त्यातूनच जेधे, मालुसरे, पालकर, कंक, नरसाळा, पानसंबळ, हंबीर, जबीर, कोरडे, हणमंते, गुजर, पिंगळे, माहिते, रांझेकर, लोहेकर, काकडे, नाईक, चिटणीस, देशपांडे अशी कर्त्या पुरुषांची एक फौज शिवरायांनी आपल्या भोवती जमवली. या फौजेत स्वराज्याचा पहिला सरसेनापती  नूर खान होता. घोडदलाचा प्रमुख सिद्दी हिलाल होता. आरमार प्रमुख  दौलत खान होता. वकील काझी हैदर होता. या सर्वांमध्ये शिवरायांनी ‘हे राष्ट्र आमचे आहे,’ हा अट्टहास पेरला-रुजवला-वाढवला आणि मगच स्वाभिमानाचा झेंडा फडकवत मराठे मोहिमेवर निघाले.
तर राज्यातील आणि देशातली सत्तापदं गेल्यावर ‘हे राष्ट्र लोकशाहीचे आहे; मनमानी करणार्‍यांचे नाही,’ याची जाणीव करून देण्याचं काम शरद पवार गेली ५ वर्षं करीत आहेत. राज्यात आणि देशात पायाला भिंगरी लावल्यागत फिरत आहेत. त्यांच्या या राष्ट्रीय कर्तव्याची ओळख शिवसेना  अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना वेळीच झाली, हा त्यांच्या विचारशक्तीचा मोठेपणा आहे. त्यांनी महाराष्ट्र धर्म-कर्तव्याची मशाल जागती ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्या मशालीचा पोत विधानसभेच्या निकालापासून सव्वा महिना धगधगता ठेवण्याचं काम संजय राऊत यांनी शीर तुटलं, तरी धड लढत राहील  या निश्चयाने केलं. त्यांनी टाकलेला प्रत्येक घाव वर्मावर बसला, म्हणूनच व्यापारी वृत्तीने सत्ता मिळवणार्‍या मोदी-शहांची दातखीळ बसली. यात मुख्यमंत्री पदासह सत्तेच्या५०-५० टक्के वाटणीचा वाद हा निमित्तमात्र होता. हे मोदी-फडणवीस यांच्या ‘दाखवायच्या दातांना भुलून’ मुतात मासोळ्या मारणार्‍यांच्या अजून लक्षात आलं नसावं. ज्यांच्या ते लक्षात आलं असेल, त्यांनाच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा घोष कशासाठी, ते कळेल.
सवाई डेव्हिड, तीन ग्लालिएथ
शिस्तीच्या नावाखाली आधी मुर्दाडपणा थापला जातो आणि मग मुडदे पाडले जातात. यानुसारच, आधी ४-५ लाखाचे ५० शिस्तबद्ध ‘मराठा मूक मोर्चे’ निघाले; पण ते सामाजिक सलोख्यांचा मुडदा पाडणारे सरकारी कारस्थान होते. त्यातूनच कोल्हापूरच्या शाहूनगरीतील ‘मराठा मोर्चा’त पोस्टर्सवरून छत्रपती शिवराय, राजर्षी शाहूराजे यांच्याबरोबर महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे नाव नको, हा आग्रह तडीस नेण्यास आला. कोरेगाव-भीमाची दंगल घडवण्यात आली. हा सारा खेळ सत्ताकारभारात आलेले अपयश जनतेला कळू नये, यासाठी खेळण्यात आला.
 सेनापती बापटांचं नाव घेत जनजागृती करावी, अशी चिंताजनक परिस्थिती महाराष्ट्रात होती. देशात ती आजही आहे. तथापि, महाराष्ट्राला मारण्याचे कारस्थान राजरोसपणे आणि दिवसागणिक पुढे जात होते. त्याची सुरुवात सात वर्षांपूर्वी झाली होती. संपूर्ण देश कवेत घेताना प्रत्येक राज्याला कशाही प्रकारे आपल्या मुठीत घेण्याचे प्रकार सुरू झाले. सहा वर्षांपूर्वी अच्छे दिनची गुंगीच इतकी होती, की महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी होते, असा भूतकाळदर्शक उल्लेख करावा अशी परिस्थिती आपल्यापुढे आली. महाराष्ट्रात जो पक्ष सूत्ररूपाने भटजी आणि शेठजीच्या कह्यात होता, त्या भाजपने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत १२२ जागा एकहाती जिंकल्या आणि मित्रपक्षांना फरफटत नेऊन आपली सत्ता स्थापन केली. सत्ता भोगली आणि हवी तशी राबवलीसुद्धा !
राज्यात १९९५ मध्ये मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप  युतीचं सरकार आलं होतं. त्यावेळी जोशी  या आडनावामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना त्याचा आनंद झाला असेलही. तसा होणे स्वाभाविक आहे. कारण आपल्या सार्वजनिक जीवनात आजही जात हा घटक महत्त्वाचा आहेच. पण तुलनात्मक विचार केल्यास जोशींपेक्षा फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा आनंद अवर्णनीय असा होता. ‘आमचा देवेंद्र किनई दुसरा आणि सवाई डेव्हिडच म्हणा ना ! त्याने एकदोन नव्हे, चक्क तीन-तीन ग्वालिएथचा पाडाव केला,’ अशीही महती सांगितली जात होती. हे तीन ग्वालिएथ म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस  आणि राष्ट्रीय कॉंग्रेस !
राज्यातल्या आणि देशातल्या परिस्थितीचा विचार केल्यास महाराष्ट्रासारखे प्रगतिशील आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं राज्य उजव्या विचारसरणीने पादाक्रांत करणे, हे अघटीतच होते. २०१४ ते २०१९ चा हा काळ मंतरलेला नव्हताच; तो गुंगविलेला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा भाजपचे स्पष्ट बहुमताचे राज्य आले. महाराष्ट्रात तर लोकसभेच्या निवडणुकीवेळी २२८ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आघाडी घेत लोकसभेच्या ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या. त्यावरून विधानसभेला पण महाराष्ट्रात राज्य युतीचेच नव्हे, तर एकट्या भाजपचेच येणार, असं वातावरण तयार झालं. परिणामी, दाती तृण धरून मित्रपक्ष भाजपला शरण गेले. विरोधी पक्ष गारठले. त्यांचे नेते-कम-कार्यकर्ते हातात पांढरे निशाण घेऊन थेट भाजपमध्येच प्रवेश करते झाले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस  पक्ष गलितगात्र झाला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस  पक्षात शरद पवार वगळता इतर सर्वांची अवस्था पानिपतावरील मराठी सैन्यासारखी झाली होती. शिवसेनात नेमकं काय चाललंय, हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वगळता कुणालाही माहीत नव्हते.
 अशा परिस्थितीत विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा काळ कठीण आणि परीक्षेचा होता. कारण या निवडणुकीत पुन्हा एकवार जर भाजपच्या बाजूने एकसुरी कौल गेलाच, तर धोका फक्त विरोधी पक्षांनाच नव्हता. त्यांचं आस्तित्व राहाणार नव्हतंच. पण मोकळ्या, मुक्त, निर्धोक सार्वजनिक
जीवनाचंही विसर्जन होणार होतं. देशात गेल्या साडेपाच वर्षांत एकपक्षीय लोकशाही एकाधिकारशाहीचा पाया खणला गेला; तो भक्कम केला जाणार होता. लोकशाहीची मूल्य, लोकांचे हक्क, मूलभूत अधिकार यांचे जगणेच अवघड होणार होते. पाहाता पाहाता माणसे नराची वानर होत होती. त्याची किती उदाहरणं द्यायची ?
भाजप ७० वरून ४० टक्के भूमीवर
पाच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आल्यापासून बेमुर्वतपणा वाढला होता. बहुमत नसताना सरकार स्थापन केलं होतं. फडणवीस सरकारला स्वतःचं असं बहुमत २०१९ च काय, तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा नव्हतं. तरीही यावेळीसुद्धा भाजपला आपलीच सत्ता सलगपणे ठेवायची होती. विधानसभा निवडणुकीचे निकाल (२४ ऑक्टो.) लागले त्यादिवशी सेनापती बापट यांच्या कल्पनेतला महाराष्ट्र जागा झाला आणि तो मेला नसल्याचे दिवसागणिक स्पष्ट होत गेले. उद्धव ठाकरे यांनी अत्यंत सूचकपणे आणि दृढ निश्‍चयाने भाजप  हाच पक्ष महाराष्ट्रापुढची अडचण असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर भाजपबरोबर शिवसेना  जाणार नाही, हे आपले म्हणणे उद्धवजी ठाम करत गेले. पण अनेकांना शिवसेना भाजपची साथ सोडेल, असे वाटत नव्हते. संपूर्ण महिनाभरात एखाद्या चित्रपटाला लाजविल असे टि्वस्ट, क्लायमॅक्स, ऍन्टी क्लायमॅक्स  होत गेले आणि अखेरीस उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले.
महाराष्ट्र मरणारच आणि भारताचा लोकशाही गाडा मोदी-शहांच्या हुकूमशाही कारभाराने खोदलेल्या खड्ड्यातच रुतून बसणार, अशा वातावरणात ही घटना घडली. २७ नोव्हेंबरची संपूर्ण देशातील वर्तमानपत्रे पाहिल्यास महाराष्ट्रातल्या या घटनेकडे संपूर्ण देशाचे लक्ष गेल्याचे दिसते. विशेषतः भाजपने दुसर्‍यांदा देशावर कब्जा केल्यानंतर महाराष्ट्रातील या घडामोडी देशातील बिगर भाजप  पक्षांसाठी आशादायक ठरव्यात, अशा या घटनेच्या ‘हेडलाईन’ आहेत. सुजाण नागरिक, तज्ज्ञ लोकशाहीवादी आणि असंख्य राजकीय पक्ष-बिगर राजकीय संघटनांना महाराष्ट्रातील घडामोडीत २०२४चे भवितव्य दिसू लागलंय. त्याबद्दल शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी जो काही महाराष्ट्र धर्म देशापुढे ठेवला; म्हणून ते प्रशंसेस पात्र ठरतात. आता कुणीही खात्रीने सांगू शकतो की, पुलवामा हल्ला  आणि ईव्हीएम  ही दोन कारणे नसती, तर पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव झाला असता. तो झाला नाही. केवळ महाराष्ट्रावरून सांगत नाही, तर देशाचं आजचं वर्तमान लक्षात घेतलं, तर भाजपची प्रत्यक्षातील लाट ओसरलीय. हवा विरलीय. २०१८ मध्ये भाजपची देशाच्या ७० टक्के भूभागावर सत्ता होती; आता ती ४० टक्के भूभागापुरतीच मर्यादित झालीय. त्याशिवाय भाजपने न सोडवलेले प्रश्‍न आणि निर्माण केलेले अरिष्ट दिवसेंदिवस गडद होतंय. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले म्हणून जळणारे वास्तव गैरलागू ठरत नाही.
म्हशीची शिंगे , हत्तीचा मुका
अर्थकारणाच्या आघाडीवर भाजप सरकारची रोजच नाचक्की होत आहे. खरं तर, अर्थकारण हेच सार्‍या राजकारणाचं सार आहे. त्यात समाजाच्या सर्वांगाला कवेत घेतलं जातं की नाही, यावरच सगळं राजकारण होत असतं. कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथाचं सूत्र इकॉनॉमिक्स  नाही; तर समाजकारण हेच आहे. पण बसता-उठता आणि चालता-बोलता कौटिल्याचं, चाणक्याचं नाव घेणार्‍यांना अर्थशास्त्र म्हणजे पैशाचं शास्त्र वाटतं. निवडणुकीच्या निमित्ताने फसवी-नटवी भाषणे करणे, प्रचंड पैसा मिळवणे आणि तो खर्च करून निवडणूक जिंकणे, यालाच ते यशस्वी राजकारण म्हणत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्यक्षात हरले तरी कशाही प्रकारे पुन्हा सत्ता मिळवणे, हा पांचटपणा जनतेला शिसारी यावी इतका असह्य झालाय.
 महाराष्ट्रात घडलेल्या एकूण घटनाक्रमाने भाजपच्या प्रतिपक्षांनी जे काही केले, त्यावर निदान रा.स्व.संघाला बोलण्याचा आता काडीचाही आधार नाही. ग्रामीण भागातील एका म्हणीनुसार, भाजप रूपी म्हैस आजवर विरोधकांसह मित्र पक्षांना आपल्या शिंगांनी ढोसत होती, तीच शिंगे आता शिवसेना, राष्ट्रवादी  आणि कॉंग्रेस  आघाडीने त्याच म्हशीच्या पार्श्‍वभागात घातलीत. महाराष्ट्र आता देशपातळीवर लोकशाही रक्षणाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झालाय. यातून देशव्यापी बिगर भाजप महाआघाडी आकारास येईल. महाराष्ट्रातील ‘महाविकास आघाडी’ही राज्याच्या सत्तेपुरता मर्यादित नाही. ती येणार्‍या प्रत्येक निवडणुकीसाठीही असल्याने शिवसेना  मुंबई आणि शहरी पट्ट्यात किंवा मुंबई-नाशिक-पुणे या त्रिकोणात, कोकणात आपला प्रभाव निर्विवादपणे राखेल. पश्‍चिम महाराष्ट्र आणि एकूणच ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस  व विशेषतः विदर्भात आणि राज्याच्या सर्व भागात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सत्तासूत्र  भाजपच्या नाकात दम आणेल. मुळात भाजपचे अवसान ते आहेच ते किती ? पुणे, नागपूर आणि नाशिकमधील पेठा आणि महानगरातील काही उपनगरे ! आताही भाजपने जे १०५ चे शरीरसौष्ठव दाखवले आहे, ते स्वतःचे नाही. ते विखे, राणे, पाचपुते, नाईक, म्हात्रे, लाड, आणि पायलीला पंधरा या सत्तेच्या भावात मिळणार्‍या पाटील आणि देशमुख यांचं आहे. विशेष म्हणजे, ते सर्वात जास्त हावरे सत्तेला आणि घाबरतातही सत्तेलाच ! त्यांच्या भरवशावर फडणवीस यांनी आतातरी हत्तीच्या ढुंगणाचा पुन्हा मुका घेऊ नये. ‘७२ तासांचा मुख्यमंत्री’ ही स्वतःची निचांकी ओळख निर्माण करून ठेवलीय, ती पुरेशी आहे.

(लेखक साप्ताहिक ‘चित्रलेखा’चे संपादक आहेत)

9322222145
Previous articleताई आणि दादा
Next article‘टोपली’एवढी कथा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here