‘टोपली’एवढी कथा!

-मुकुंद कुळे

साधी बांबुची टोपली. तिचं काय एवढं मोल लागून गेलं, असं नागर संस्कृतीतल्या कुणाला वाटेलही. पण ग्रामीण भागातील अनागर संस्कृतीत गेल्याशिवाय आणि तिथल्या मातीत राबल्याशिवाय या टोपलीचं मोल ध्यानात यायचं नाही. शहरांतून प्लॅस्टिकपासून कागदापर्यंत आणि नायलॉनपासून लोकरीपर्यंत कसल्या कसल्या थैल्या-पिशव्या मिळतात, सामानसुमान वाहायला. पण खेड्यात माती उपसायची असो, नाहीतर आठवडी बाजारातून वाणसामान आणायचं असो, टोपलीला पर्याय नाही. म्हणून तर साध्यासुध्या टोपलीसाठी जीव टाकणाऱ्या आयाबाया अजून खेडेगावात सापडतात. त्यांच्यासाठी टोपली ही नुस्ती निर्जीव वस्तू नसते. ती घराच्या कारभाराला-संसाराला हातभार लावणारी एकप्रकारे पाठराखीणच असते. त्यामुळेच कुणा पराया घरच्या मायमालनीनं टोपली मागितली की घरोघरच्या सासुरवाशिणी ती देतात. पण देताना ओरडून सांगतात-‘काम झालं की लगेच आणून दे गो. आन् सांभाळून वापर. नायतर टाकशील मोडून-बिडून…’ अशा निगुतीनं सांभाळलेल्या टोपलीला जर एखादा भोसू (भोक) पडला, तर मग त्या सासुरवाशिणींच्या जिवाची कालवाकालव होते. तो भोसू लिंपण्यासाठी त्यांच्या जिवाचा आटापिटा सुरू होतो. भोसू पडलेल्या ठिकाणी चिंध्या किंवा गवताचा बोळा अडकवून टोपलीला एकावर एक सारवण घातलं जातं. की मग पुन्हा टोपली तयार, सासुरवाशिणीबरोबर संसाराचा गाडा उपसायला… गावाकडे घराघरातले कोनाडे ही टोपल्या ठेवायची हक्काची जागा. काम असेल, तेव्हा उचलून घ्या आणि झालं की पुन्हा कोनाड्यात आणून ठेवा.
टोपली म्हणजे जणू रानावनात खपणाऱ्या बाईचं प्रतीकच. त्यामुळे घरासाठी खपणाऱ्या बाईला या टोपलीचं प्रेम जरा अधिकच. मग संधी मिळाली की ती टोपलीचं गुणगान सुरू करते-

कोनाड्यातली टोपली, तिचं काय ग कवतिक
मायबायनं धाडली, सईबाई बघ नेक…

माहेरावरून आलेल्या अशा या टोपलीचं कौतुक कुणाला नाही वाटणार? पण माहेरावरून आलेली असो, नाहीतर बुरुडाकडून पायलीभर दाणे देऊन विकत घेतलेली असो, टोपली ही कायम गावाकडच्या आयाबायांच्या आस्थेचा विषय असते. कारण क्षणोक्षणी त्यांना टोपलीची गरज पडत असते. चुलीवर थापलेल्या गरमागरम भाकऱ्या शेकवून थेट पसरट टोपलीतच टाकायची पध्दत आहे. खळ्यातनं आलेलं धान्य साठवून ठेवायचं असलं, तरी ते आधी टोपलीतच ठेवलं जातं. शेतासाठी-मळ्यासाठी माती उपसायची असली, तर ती टोपलीनंच उपसली जाते. सूर्यदेव मावळतीला गेल्यावर घरातल्या कोंबड्या टोपलीखालीच झाकल्या जातात. शिजवलेल्या अन्नाची झाकपाक करताना ते टोपलीखालीच ठेवलं जातं. सकाळी गोठ्यातली ढोरं सोडल्यावर जमिनीवर पडलेलं शेण उचलण्यासाठीही टोपलीच वापरली जाते. अनागर जीवनातली अशी एक गोष्ट नाही, जिथे संसाराला टोपलीची साथ नाही. अगदी पाव्हण्या-रावळ्याच्या घरी जायचं, तरी रिकाम्या डोक्याने कसं जायचं, असं म्हणून घरधनीण डोक्यावर टोपली घेते आणि टोपलीत सुरेख घावनं घेते. टोपली ग्रामजीवनात अशी विरघळलेली आहे.

पण तिच्यासाठी सर्वत्र सरसकट टोपली असं नामाभिधान वापरलं जात असलं, तरी टोपलीला तिच्या आकारानुसार आणि तिच्या उपयुक्तततेनुसार वेगवेगळी नावंही आहेत. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली- मंडणगड परिसरात गेलात, तर तिथे मध्यम आकाराच्या, हरेक कामासाठी उपयोगी पडणाऱ्या बांबुच्या टोपलीला ‘टोपली’ असंच म्हणतात. जेवण झाकण्यासाठी किंवा वाणसामान आणण्यासाठी याच टोपलीचा वापर केला जातो. तिच्यापेक्षा मोठ्या आकाराच्या टोपलीला ‘हारा’ म्हटलं जातं. गोठ्यामागच्या ‘शेणकी’त (शेण टाकण्यासाठी खणलेला खड्डा) साठवलेलं शेणखत न्यायचं असो, किंवा तीन-चार पायल्या धान्य (एक पायली म्हणजे अंदाजे तीन किलो) न्यायचं असो, त्यासाठी हा हाराच वापरला जातो. साधारणपणे जड सामान वाहून न्यायचं असतं, म्हणून टोपली किंवा हाऱ्याची वीण एकदम घट्ट असते. मात्र जेव्हा शेताची भाजावण करण्यासाठी पालापाचोळा किंवा गवताचं गुताड न्यायचं असतं, तेव्हा टोपली किंवा हारा उपयोगात येत नाही, त्यासाठी मोठा ‘डालगा’ लागतो. हा डालगा तीन-चार फूट व्यासाचा असतो. तेवढ्याच उंचीचाही. मात्र तो घट्ट विणीचा नसतो. बांबुच्या कामट्यांनी (पातळ पट्ट्यांनी) तो सुटसुटीतपणे विणलेला असतो आणि तो हलकंफुलकं सामान वाहून नेण्यासाठीच कायम वापरात आणला जातो.
लहान-मोठ्या आकाराच्या टोपल्यांचा असाच वापर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वत्र होतो. पण प्रत्येक ठिकाणी तिचं नाव मात्र थोड्याफार फरकाने बदललेलं आढळतं. अगदी कोकणातल्या कोकणातही जरा सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेलात, तर तिथे तिचं नाव ‘वेचणी’ होतं. ही वेचणी मध्यम आकाराची असते. हीचा तळ आणि वरचा आकार सारखाच असतो. वरचा काठ जरा पसरट असतो. फुलंवगैरे वेचण्यासाठी हिचा हमखास वापर केला जातो. वेचणीच्या आतल्या टोपलीला तिथे टोपलीच म्हणतात. हिचा तळ निमुळता असतो आणि वर ती पसरट होत जाते. मातीवगैरे उपसण्यासाठी हिचा वापर होत असल्यामुळे, हिचे काठ वर मुडपलेले नसतात. साधारणपणे हाऱ्याच्या आकाराच्या टोपलीला तिकडे ‘फाटे’ असं म्हटलं जातं. या फाट्यांचा वापर भात, सुपाऱ्या किंवा उन्हाळ्याच्या दिवसात रातांबे साठवून ठेवण्यासाठी केला जातो. त्याशिवाय गवतासारखं हलकं सामान वाहून नेण्याच्या टोपलीला मात्र डाल असंच म्हणतात. मोठ्या प्रमाणातलं म्हणजे वर्षाचं धान्य साठवण्यासाठी कोकणात बहुतेक ठिकाणी बांबुच्याच कणग्या वापरल्या जातात. या कणग्या म्हणजे एकप्रकारे मोठ्या आकाराची टोपलीच. फक्त तिचं तोंड वर निमूळतं असतं. या कणग्यांमध्ये दोन-तीन खंडी भात आरामात राहतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कणग्यांऐवजी धान्य साठवण्यासाठी म्हणून आयत्यावेळी ‘तटा’ बांधला जातो. या तट्याचा आकार टोपलीऐवजी पिंपासारखा असतो. तटा म्हणजे खरंतर चटईच असते. धान्य साठवताना जिथे ते ठेवायचं, ती जमीन आधी सारवली जाते. मग तळाला गवताच्या पेंढ्या टाकून गोल तट्या उभारला जातो. हा तट्या सात-आठ फूट उंचीचा असतो. त्यात धान्य टाकल्यावर याचं तोंड ओलं शेण टाकून लिंपलं जातं. तटा म्हणजे बांबुचं पिंपच जणू. पण ते येतं टोपलीच्याच जातकुळीत. कारण वस्तुंची साठवण करणं हेच दोन्हींचं काम.
रत्नागिरी असो वा सिुंधुदुर्ग जिल्हा, कोकणात भाताचं पीक अमाप. साहजिकच तांदळापासून विविध पदार्थ बनवण्याची पध्दत इथे आहे आणि त्यासाठी तांदूळ सतत धुवावे लागतात. हे तांदूळ धुण्यासाठी कोकणात खास ‘रवळी’चा वापर केला जातो. रवळी म्हणजे लहान आकाराची उभट टोपली. धुवायचे तांदूळ रवळीत टाकायचे आणि रवळी वाहत्या पाण्याखाली धरायची की, धुतलेले तांदूळ रवळीतच राहतात नि पाणी निमूट खालून झरून जातं. एक कणही खाली न पडता तांदूळ स्वच्छ धुऊन होतात. कोकणात केवळ तांदूळ धुण्यासाठीच टोपल्या वापरल्या जातात असं नाही, आमसुलं (कोकम) आणि उसरी (वर्षभराच्या वापरासाठी मीठ लावून ठेवायची हिरव्या कैऱ्यांची कापं) धुण्यासाठीही टोपल्या वापरल्या जातात. मात्र त्या रवळीपेक्षा मोठ्या असतात. गंमत म्हणजे संसारात हरघडी उपयोगात येणाऱ्या टोपल्या सारवल्याशिवाय वापरात आणत नाहीत. अगदी धान्य पाखडण्यासाठी वापरायचं सूपही सारवूनच घेतलं जातं. त्यातून धान्यधुन्य काहीही खाली पडू नये म्हणून. पण तरी प्रत्येक घरात एक बिनसारवलेली रवळी आणि टोपली असणारच. तांदूळ-सोलं-उसरी धुण्यासाठी. या दोन्ही सारवल्या जात नाहीत, त्यातून पाणी झरावं म्हणून.
ग्रामीण जीवनात टोपल्यांच्या सारवण्यालाही काही प्रतीकात्मक अर्थ आहे. टोपली असो नाहीतर सूप, घरात नेण्याआधी त्यांना हळदकुंकू वाहण्याची पध्दत आहे. कारण टोपली काय किंवा सूप काय, त्यांच्यात लक्ष्मीचा अंश पाह्यला जायचा. तेव्हा घरात आल्यावर सारवून तिला ठाकठीक करणं महत्त्वाचं मानलं जातं. हे सारवणं म्हणजे जणू त्यांचं लग्न लागणंच असतं. त्यामुळेच घरातल्या-दारातल्या कुठल्याही कामाला कोकणात बिन सारवलेली टोपली कधीच वापरत नाहीत. उलट कुवार मुलींच्या काही धार्मिक विधीप्रसंगी बिनसारवलेलं सूप किंवा परड्या म्हणजे लहान टोपल्या वापरायची पध्दत अनेक ठिकाणी आहे. अशा टोपल्या किंवा परड्यांना ‘असोरी’ असं म्हटलं जातं. कोकणात गौरीच्या सणाला कुवार मुलींचा कुवारओवसा (एक सुफलन विधी) करण्याची पध्दत आहे. त्यावेळी असं असोरी सूप वापरलं जातं. किंवा अगदी हरतालकेच्या पूजेच्या दिवशीही अशाच सुपाचा वापर केला जातो.

फक्त कोकण नाही, पश्चिम महाराष्ट्र-खानदेश-मराठवाडा-विदर्भ सर्वत्रच टोपलीचा सारखा वावर-वापर आहे. कधीकधी प्रदेशानुसार तिचा घाट बदलतो. पण तिची उपयुक्तता कायम आहे. निसर्गकन्या बहिणाबाईंच्या खानदेशात सर्वसाधारण आकाराच्या टोपलीला ‘टोपली’च म्हणतात. शेतातलं नवं धान्य आणायचं असो वा भाकर काढायच्या असो तिथं टोपलीच वापरली जाते. पण टोपल्यांची धाटणी मात्र वेगवेगळ्या आकाराची आणि आकर्षक असते. टोपलीच्या काठाला किंवा बुडाला दुमडीची वेगवेगळी वळणं दिलेली असतात. त्यामुळे रोजचीच टोपली एकदम नव्या रुपात-ढंगात सजून जाते. खानदेशात मोठ्या आकाराच्या टोपल्यांना ‘डालकी’ म्हणायची पध्दत आहे. इथे या डालक्यांचा वापर जड आणि हलकं दोन्ही प्रकारचं सामान वाहून नेण्यासाठी केला जातो. त्यामुळे जड सामानासाठी घट्ट विणीची आणि हलक्या सामानासाठी विरळ विणीची अशा दोन्ही प्रकारची डालकी इथे वापरली जातात. अगदी लहान आकाराच्या टोपलीला इथे परडी म्हणायची पध्दत आहे. नवरात्रात घट बसवताना नवं धान्य पेरण्यासाठी याच परडीचा वापर करतात. साधारणपणे धार्मिक कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या या परडीला लिंपण करायची पध्दत इथे नाही. पण बाकी विविध कामासांठी वापरण्यात येणाऱ्या टोपल्या मात्र आवर्जून लिंपल्या जातात. कोकणात हे लिंपण फक्त शेणाचं असतं. खानदेशात मात्र टोपली असो किंवा डालकी तिला चिखल किंवा शेण-मातीच्या मिश्रणाचं लिंपण घेतलं जातं. विशेष म्हणजे कोकणात बांबुच्या म्हणजेच कळकाच्या कामट्यांपासूनच टोपल्या विणल्या जातात. खानदेशात तुरीच्या तुराट्यांपासूनही (काड्यांपासून) टोपल्या विणल्या जातात. या तुराट्या ओलसर असतानाच टोपल्या विणतात आणि मग त्या सुकवतात. या तुराट्या पातळ-बारीक असल्यामुळे त्यापासून विणलेल्या टोपल्या छान दिसतात.

खानदेशप्रमाणेच मराठवाड्यातही केवळ बांबुच नाही, तर विविध झाडांच्या काड्यांपासून टोपल्या विणल्या जातात. नदीच्या काठी वाढणारी निरगुडी, शिंदीचे फोक, कापसाच्या पऱ्हाट्या आणि तुरीच्या तुराट्या अशा अनेक झाडांपासून. अर्थात ही झाडं नसतात, असतात रोपट्यांच्या कुळातली. साहजिकच त्यामुळे ती लवचीक असतात आणि त्या गुणधर्मामुळेच हव्या त्या आकाराच्या टोपल्या विणण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मराठवाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे लोखंडाच्या घमेल्याला टोपली म्हटलं जातं, तर बांबुच्या-तुराट्या-पऱ्हाट्यांपासून बांधलेल्या टोपलीला खास ‘दुरडी’ असा शब्द आहे. महाराष्ट्रातल्या लोकगीतांत टोपली शब्द फार वापरला गेलेला नाही. पण मराठवाड्यातला हा ‘दुरडी’ शब्द मात्र वारंवार येतो. उदाहरणच द्यायचं झालं तर, नवरात्रात हादगा खेळताना म्हटल्या जाणाऱ्या ‘अक्कण माती चिक्कण माती’ या प्रसिध्द लोकगीताचं देता येईल. या गाण्यावर नाचणाऱ्या, नवीनच लग्न झालेल्या माहेरवाशिणी म्हणतात-

अक्कण माती चिक्कण माती, ओटा तो मळावा
असा ओटा सुरेख बाई, जातं ते रावावं
असं जातं सुरेख बाई, पिठी ती दळावी
अशी पिठी सुरेख बाई, करंज्या कराव्या
अशा करंज्या सुरेख बाई, दुरडी भराव्या
अशी दुरडी सुरेख बाई, माहेरी धाडावी…

म्हणजे घरात एखादा सुरेख पदार्थ केला, तर तो लगेच ‘दुरडी’त म्हणजे टोपलीत भरून माहेरी धाडण्यासाठी माहेरवाशिणींचा जीव उसासत असतो. पण केवळ नाच-गाण्यांत नाही. जात्यावर बसलं की सुध्दा सासुरवाशिणींच्या ओव्यांमध्ये दुरडी शब्द हटकून येतो. कारण तो जिवाभावाचाच शब्द आहे. म्हणूनच ती म्हणते-

बाई दळण घाटिले, राम देवाजीच्या पायी
राम देवाजीच्या पायी, शीण मला आला नाही
बाई दळण घाटिले, आता उरली वंजळ
बाई उरली वंजळ, अवघे गोविले मंडळ
बाई दळण सरलं, उरलं कुठं ठिवू
उरलं कुठं ठिवू, बळदला शिड्या लावू
बाई सरलं दळण, आता उरला आटवा
लक्षुमीमायच्या पुजंला, दुरडी बेलाची पाठवा…

या गाण्यात बेलाची पानं ठेवण्यासाठी ‘दुरडी’चा वापर केला आहे. अशी ही मराठवाड्यातली दुरडी. निरगुडी, पऱ्हाट्या-तुऱ्हाट्यांपासून केलेली. दुरडीपेक्षा मोठ्या आाकाराच्या टोपलीला मात्र मराठवाड्यात नांदेडकडे ‘डाल’ असा शब्द योजला जातो आणि त्याचा वापर जड सामान वाहून नेण्यासाठीच केला जातो. मराठवाड्यात टोपली म्हणजेच दुरडी लिंपण्याची पध्दत नाही. पण धान्य साठवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणारं डाल लिंपलं जातं आणि तेही नहमीसारखं शेणा-मातीने नाही, तर बहुतांशी मेणाने. बिब्ब्याच्या तेलापासून काढलेल्या मेणापासून डाल मेणवण्याची पध्दत तिथे आहे. यामुळे डाल आणि त्यातलं धान्य दोघांनाही कीडा-मुंगी लागत नाही. त्यातलं धान्य सुरक्षित राहतं.

पश्चिम महाराष्ट्रातही टोपलीचा वावर आहेच. पण तिथे टोपली, दुरडीऐवजी ‘शिबडं’ असा शब्द वापरला जातो. शिबड्याचा वापर टोपलीसारखाच केला जातो. या शिबड्याला रोजच्या कामापासून लग्नापर्यंत सर्वत्र सारखाच मान आहे. म्हणजे रोजच्या वापरातल्या या शिबड्यातच लग्नप्रसंगी मुलीला रुखवत देऊन सासरी धाडायची पध्दत आहे. एवढंच नाही, सासरी गेल्यावर मुलगी पहिल्यांदा माहेरी येऊन-राहून जेव्हा पुन्हा सासरी जायला निघते, तेव्हा तिला खास या शिबड्यातच शिदोरी बांधून दिली जाते. ही शिदोरी म्हणजे कधी लाडू सतात, तर कधी साधा भाकरतुकडा. ज्याच्या-त्याच्या ऐपतीप्रमाणे जोत-तो देतो. मात्र शिबड्यातून दिलेली ही शिदोरी सासरी सगळ्यांना वाटून खाण्याची पध्दत आहे. शिदोरी संपली की ते शिबडं रोजच्या वापराला घेतलं जातं. मायबाईची शिदोरी पुरून उरते ती अशी.

टोपलीची अशी विभागवार उस्तवार करताना एक गंमत लक्षात येते, ती म्हणजे प्रदेशपरत्वे छोट्या टोपल्यांना वेगवेगळी नावं असली, तरी मोठ्या आकाराच्या टोपलीला मात्र सर्वत्र डालगा-डालकी-डाल अशी साधारणपणे समानच नावं असलेली दिसतात. अर्थात आकारानुसार आणि उपयोगानुसार टोपलीची नावं नावं वेगवेगळी असली, तरी घरातलं टोपलीचं स्थान काही बदललेलं नाही. अनागर संस्कृतीत घरात जातं जेवढं महत्त्वाचं, तेवढंच टोपलीही. दोन्हींशिवाय संसाराचं पान हलत नाही. एवढंच कशाला टोपलीत अख्खा संसार सामावलेला असतो. भटक्या जमातींचं विंचवाच्या पाठीवरचं बिऱ्हाड टोपलीतच तर सामावलेलं असतं. घेतलं डोक्यावर की चाललं एका गावाहून दुज्या गावाला. अडीअडचणीला टोपलीच मदतीला येते. अगदी रानावनात जातानादेखील केवळ न्याहारी-जेवणाचा डबा ठेवण्यासाठीच नाही, तर आपल्या पाठीमागे घरात तान्ह्या बाळाला कोण बघेल म्हणून सासुरवाशिणी त्यालाही टोपलीतच टाकतात. आपल्या लेकराला टोपलीत ठेवून शिवारात नेल्याची बहिणाबाईंची कविता प्रसिध्दच आहे. पण त्यांच्याप्रमाणेच अनेक आयाबायांनी शेतात काम सुरू असताना आपल्या लेकरांना टोपलीतच ठेवून जोजवलं आहे. खेळवलं आहे. त्याच्यात टोपीलतल्या श्रीकृष्णाचं रूपही पाहिलेलं आहे. म्हणूनच एका लोकगीतातली माय म्हणते-

टोपलीमंदी ग बाई, माझा खेळतो श्रीहरी
त्याच्या गडबडगुंड्याला, कंसमामा भितो भारी…

कृष्णाच्या तोंडात यशोदेला अख्ख ब्रम्हांड दिसलं, तसं छोट्याशा टोपलीत साऱ्या संसाराचं चित्र पाहायला मिळतं. आताआतापर्यंत आणि अजूनही अगदी ग्रामीण भागात या टोपल्यांनीच मायबाईचा संसार सावरलेला दिसतो. एक टोपली हाताशी असेल, तर माणूस काहीही करू शकतो. शेतावर-बांधावर राबून पोट भरू शकतो. त्यामुळेच बुरुडाने विणून आणलेल्या रवळ्या, टोपल्या, सूप पायलीभर धान्य देऊन विकत घेण्याची पध्दत आजवर चालत आलेली होती. पण आता बांबुच्या-निरगुडीच्या-तुराटी-पऱ्हाटीच्या टोपल्या इतिहासजमा होऊ लागल्यात. त्याऐवजी मशिनवर बनलेली प्लॅस्टिक-लोखडांच्या टोपल्या-घमेली आलीत. या वस्तू मजबुतीला अधिक असतील कदाचित…
…पण त्यांना का बुरुडाच्या हाताची माया नि मायबाईच्या सारवणाची सय?

(मजकूर लेखक मुकुंद कुळे यांच्या ‘लोकरहाटी’ पुस्तकातून)

(लेखक महाराष्ट्रातील लोककला व लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत)

9769982424

Previous articleशिवराय माथा, तर घाला लाथा
Next articleरेड लाईट डायरीज : झुबेदा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.