संगीत मन को पंख लगाये, गीतों से रिमझिम रस बरसाये..!

नीलांबरी जोशी

“संगीतात आणि चित्रपट-संगीतात प्रयोग करायला ते कधी कचरले नाहीत. भारतीय संगीत देताना त्यांनी भारतीय नसलेल्या संगीताचंही स्वागतच केलं. गुणगुणावीशी आणि ओळखीची वाटणारी त्यांची गाणी ऐकल्याबरोबर प्रत्येकाच्या काळजाच्या कप्प्यात एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण केल्यावाचून रहात नाहीत”

“Hindi Film Song – Music Beyond Boundaries” या अशोक दा रानडे यांच्या पुस्तकात हे ज्या संगीतकाराबद्दल लिहिलं आहे, ते संगीतकार म्हणजे सचिनदेव बर्मन.

पुढे ते लिहितात, सचिनदेव बर्मन यांच्या संगीताचं १५ प्रकारात वर्गीकरण करता येईल.

१.रागावर आधारित गाणी (साजन बिन नींद ना आये – मुनीमजी, लता मंगेशकर, केदार, पूछो ना कैसी मैंने रैन बितायी – मेरी सूरत तेरी आंखे, मन्ना डे, अहिरभैरव); २.स्वत: गायलेली गाणी (वहॉं कौन है तेरा (गाईड), ओ रे मांझी (बंदिनी); ३. कॉमिक गाणी (कसूर अपना (बहार), ऐ मेरी टोपी (फंटूश); ४. साधीसुधी, चांगली गाणी (जीवन के सफर में राही (मुनीमजी), काली घटा छाये (सुजाता); ५. किचकट -चांगली गाणी (है अपना दिल (सोलवा साल), देखी जमानेकी यारी (कागज के फूल); ६. पाश्विमात्य धर्तीची गाणी (चुप है धरती आणि फैली हुई है (हाऊस नं ४४); ७. कॅबेरे प्रकारातली गाणी (तदबीर से बिगडी हुई (बाजी), होठों पे ऐसी बात (ज्युवेल थीफ); ८. स्वर आणि ध्वनी यांच्यातल्या बदलांवर आधारित गाणी (कोई आया (लाजवंती), सांझ ढली (काला बाजार); ९. लोकसंगीतावर आधारित गाणी ( नैन दिवाने (अफसर); १० द्वंद्वंगीतं (नायक / नायिका यांची किंवा इतर प्रकारची (चांदनी रातें प्यार की बातें (जाल), गुनगुना रहे है भंवरे (आराधना); ११. स्वत:च्या किंवा इतरांच्या संगीतावर आधारित गाणी (भरम तेरी वफाओंका (हम बेखुदी में तुमको या गाण्याची आठवण होते..) गा मेरे मन गा (प्यार हुआ इकरार हुआ है..); १२. नेहमीच्याच साच्यातली लक्षवेधी गाणी (किसने चिलमनसे मारा (कव्वालीसारखं पण त्यापेक्षा वेगळं गाणं), मोसे छल किये जाय (बंदिश की ठुमरी या प्रकारावर आधारित पण नृत्याचा ठेका असलेलं गाणं..); १३. भक्तीसंगीत (ना मैं धन चाहूँ (काला बाजार), आज सजन मोहे (प्यार); १४. फक्त चांगली गाणी ( खोया खोया चांद (काला बाजार), तेरे मेरे सपने (गाईड); १५. इतर..!

************

सचिनदेव बर्मन किती कंजूष होते.. “सेटवर एखाद्या दिवशी ते अचानक जाहीर करत.. आता लंच ब्रेक घेऊ. मी डब्यात मासे आणलेत.. सगळ्यांना आता आपल्याला खास बंगाली पध्दतीनं मासे खायला मिळणार असं वाटत असताना सचिनदा एकटेच आपला डबा उघडून खात बसायचे.. इतरजण त्यांच्याकडे पहात बसायचे” असेही किस्से अधूनमधून वाचायला मिळतात.

***********

सचिनदेव बर्मन यांच्यानंतर लगोलग नाव मनात येतं ते राहुलदेव बर्मन.

त्यांच्याबद्दलही या पुस्तकात फार सुरेख लिहिलं आहे.

“भोवतालचे सगळे ध्वनी आपल्या संगीतासाठी लागणारा कच्चा माल आहे” असं त्याला (राहुलदेव बर्मनला) वाटायचं. ड्रम्स, gongs, झायलोफोन्स, कॅस्टनेटस अशी वाद्यं आणि अशा वाद्यांमधून निघणाऱ्या ध्वनींसारखे इतर कशातूनही निघणारे ध्वनी यांचा त्याच्या संगीतात भरपूर वापर केलेला दिसतो. अनपेक्षित वळणानं जाणारं संगीत त्यानं कायम वापरलं. ही प्रवृत्ती जरा आपल्या विचारशक्तीनं ताणली तर, त्यानं मानवी आवाजाचे वापरलेले उसासे, श्वासांचे आवाज, कधीकधी आरडाओरडा केलेले आवाज, ला, ता, रा.. असे अर्थहीन भासणारे आवाजदेखील त्यानं चिक्कार वापरले. “आओ ना गले लगाओ ना”, “ओ मांझी रे”, “चोरी चोरी सोला सिंगार करुंगी”, “सपना मेरा टूट गया” ही गाणी त्याची काही उदाहरणं आहेत.

राहुलदेव बर्मनवर एक आरोप नेहमी होतो तो म्हणजे त्यानं पाश्वात्य किंवा इतर गाण्यांवर आधारित दिलेल्या चाली. यावर अनेक वेबसाईटसवर यादीदेखील आहे. आपल्या वडिलांच्या चालींवर आधारित गाणी त्यानं कशी केली याचेही अनेक दाखले दिले जातात. उदा. जाने क्या तूने कही आणि दिये जलते है.. यातला Rhythm सारखा आहे.. “मात्र सगळे ध्वनी हे संगीत देण्यासाठी असलेला कच्चा माल आहे” या मूळ गृहीतकामुळेच हे घडलं असावं..

मेलडीमध्ये नवनवीन गोष्टींचा कल्पकपणे शोध घ्यायच्या प्रवृत्तीच्या माणसाचं राहुलदेव बर्मनच्या सान्निध्यात भलं झालं असतं. राहुलदेव बर्मन हा प्रायोगिक रंगभूमी, नाटक आणि चित्रपट या माध्यमांपैकी कोणत्या माध्यमाला जास्त चांगल्या प्रकारात संगीतकार म्हणून चपखल ठरला असता याचं मला कधीकधी आश्चर्य वाटतं.

हे राहुलदेव बर्मनवरच्या मजकुरात वाचायला मिळतं.

***************

हिंदी चित्रपटसंगीतामागची सांस्कृतिक आणि सामाजिक पार्श्वभूमी लोकांपर्यंत पोचावी या हेतूनं लिहिलेल्या या पुस्तकात संगीतकारांची सांस्कृतिक, सामाजिक, मानसिक, भावनिक पार्श्वभूमी लक्षात येते. त्यांच्या संगीतामागचा सखोल विचार जाणवत रहातो.

“संगीत नाटक अकादमी”च्या सेमिनारमध्ये या पुस्तकाची संकल्पना कशी स्फुरली ते या पुस्तकाच्या प्रस्तावनेत वाचायला मिळतं. त्यानिमित्तानं या सेमिनारमध्ये सहभागी झालेले बी एन सिरकार, अनिल बिश्वास, दिलीप कुमार, के ए अब्बास यांची मतंही वाचनीय आहेत.

उदाहरणार्थ, “चित्रपटातलं संगीत म्हणजे आपण फक्त त्यातली गाणी असा विचार करतो. पण पडद्यावरच्या मूक प्रतिमांना आवाज देणारं, घडणार््याप घटनांना भावपूर्ण प्रसंगांमध्ये गुंफणारं बॅकग्राऊंड म्युझिक महत्वाचं असतं. भारतात आॉर्केस्ट्रेशन अजून बाल्यावस्थेत आहे. वाद्यांमधून निघणार््याग ध्वनींचा आॉर्केस्ट्रामध्ये किती आणि कसे वापरले जाऊ शकतात या कसोटीपर्यंत आपण पोचलेलोच नाही” हे अनिल बिश्वास यांचे उद्गार या पुस्तकामागची प्रेरणा आहे.

************

पुस्तकात चित्र + पट + संगीत, १९३४ ते १९४६ दरम्यानचे संगीतकार, १९४७ ते १९८० दरम्यानचे संगीतकार, गायक / गायिका अशी ११ प्रकरणं आहेत. बी आर देवधर, गोविंदराव टेंबे यांच्यापासून खेमचंद प्रकाश, गुलाम हैदर, बुलो सी रानी, सी रामचंद्र, अनिल विश्वास, ओ पी नय्यर, रोशन, सज्जाद, शंकर-जयकिशन, सचिनदेव आणि राहुलदेव बर्मन ते ए आर रेहमानपर्यंत अनेक संगीतकारांच्या संगीत देण्याच्या पध्दती, वाद्यं, वाद्यमेळ, ताल, राग याबद्दलचं प्रत्येक वाक्य आपल्याला नवीन इनसाईट देऊन जातं.

************

“बॅलन्स शीट” या शेवटच्या प्रकरणात काही मजेदार गोष्टींचे उल्लेख आहेत..!

-शंकर जयकिशन या जोडीतल्या जयकिशननं आपल्या भावी वधूला गुजराती भाषेत एक पत्र लिहिलं.. त्या पत्रातल्या पहिल्या ओळीवरुन राजकपूरच्या चित्रपटातलं रफीचं गाजलेलं गाणं तयार झालं.. यह मेरा प्रेमपत्र पढकर..

-शंकर कायम म्हणायचा.. संगीताचं मला वेड आहे.. त्यावरुन “यहुदी”मधलं मुकेशचं गाजलेलं गाणं तयार झालं.. “यह मेरा दिवानापन है..”

-आनंद बक्षी यांनी ४० वर्षांमध्ये ४००० गाणी लिहिली. सुना, कहा / तू प्यार, तू प्रीत / हम तुम एक कमरेमें बंद हो.. अशी संवादांसारखी भरपूर गाणी त्यांनी लिहिली होती. “आपलं गाणं रेल्वेतला एक आंधळा भिकारी गाताना ऐकणं हा सर्वोच्च समाधानाचा क्षण असल्याचं” आनंद बक्षी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

-भरतमुनीच्या नाट्यशास्त्रानुसार प्रसंगांवर आधारित गाणी हिंदी चित्रपटांमध्येही आहेत. व्यक्तिरेखेची एंट्री, एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना, शोकगीतं, सणसमारंभांमधली गीतं इ.

-लोकांना गाण्यांचं एवढं आकर्षण का वाटतं? तर संगीत / गाणं हे सहानुभूतीपेक्षा सहअनुभूती- समवेदना जाणवण्याकडे नेतं.. Music / song is a way to reach the state of feeling with (empathy) than feeling for (sympathy)

***************

४६ वर्षं या गाण्यांच्या अभ्यासाचा “रियाझ करुन” अशोक दा रानडे यांनी हे ५३४ पानी पुस्तक लिहिलं आहे. ते वाचायला ४६ दिवस कदाचित पुरतीलही पण त्यानंतर कमीतकमी ४६ वर्षं ते पूर्णपणे समजायला लागू शकतात.

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

संदर्भ :

१. “Hindi Film Song – Music Beyond Boundaries” Book – Ashok Da Ranade

२. या पुस्तकाचा एक वाचनीय रिव्हयू

https://countercurrents.org/…/review-summery-and…/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here