संत्र्याला प्रतिष्ठा देणारा भूमिपुत्र…. श्रीधर ठाकरे

संतोष अरसोड

आकांक्षेला वयाचं बंधन नसतं. मनात प्रचंड आत्मविश्वास असला की कुठल्याही वयात अशक्यप्राय ते शक्य करता येतं. साठी ओलांडली तरीही आष्टी तालुक्यातील एक माणूस असाच धडपडताना दिसतोय, कधीकाळी ज्या संत्रापिकामुळे ‘विदर्भाचा  कॉलीफोर्निया ‘ अशी ओळख ज्या भागाला प्राप्त झाली होती . तो लौकिक पुन्हा परत मिळवून देण्यासाठी हा माणूस  ज्या वयात विश्रांती घ्यायला पाहिजे त्या वयात अविश्रांत श्रम करीत आहे. त्याचे हे श्रम स्वतःसाठी नसून विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे . विदर्भाची ओळख ज्या संत्री पिकांमुळे  जगभर पोहोचली तो संत्रा  केवळ जागृती अन नियोजनाच्या अभावाने गेल्या अनेक वर्षापासून अडगळीत पडला होता . त्याच संत्रा पिकाला पुन्हा  प्रतिष्ठा देत देश -विदेशात  पोहोचविण्याचे काम करणाऱ्या एका   किमयागाराची  ही प्रेरणादायी कहाणी आहे . त्यांचं नाव आहे-  श्रीधर शंकरराव ठाकरे , मुक्काम -आष्टी जिल्हा वर्धा.  कृषिशास्त्रात पदवीधर असलेल्या श्रीधर ठाकरे यांचा सामाजिक, राजकीय, कृषी आणि दुग्धव्यवसायातील प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. काळाची पावलं ओळखून काम करणाऱ्या या माणसाच्या धडपडीकडे पाहिलं की त्यांना सलाम करावासा वाटतो. विदर्भाच्या भूमीत मोठ्या प्रमाणात संत्राचे पीक घेतले जाते. मात्र या संत्राला पाहिजे तशी प्रतिष्ठा मिळत नव्हती. प्रतिष्ठा नसलेल्या या संत्रा पिकाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा देण्याच काम श्रीधर ठाकरे यांनी केलं आहे. ट्रक मधून जाणारी संत्री विमानातून जाऊ लागली, बाजारात मिळणारी संत्री विमानतळावरही मिळू लागली, एव्हढच नव्हे तर कंटेनरच्या माध्यमातून विदेशातही जाऊ लागली. दूध आणि संत्रा या क्षेत्रात लक्षणीय असं काम श्रीधर ठाकरे यांनी केलंआहे. गाव खेड्यापासून ते इस्राईल, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंडपर्यंतचा प्रवास केलेला हा कृषी वारकरी. वर्गीस कुरियन यांच्या धवलक्रांती ने प्रेरित होऊन गावागावात धवल क्रांतीची पताका खांद्यावर घेऊन फिरणारा हा मुसाफिर. महानंद ते महाऑरेंज या त्यांच्या प्रवासात प्रेरणेची अनेक बीज आपल्याला दडलेली दिसतील.

       स्वातंत्र्यसंग्रामात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेल्या आष्टी गावात श्रीधर ठाकरे यांच्या आयुष्याची  जडणघडण झाली. ‘झाड झडूले शस्त्र बनेगे, भक्त बनेगी सेना ‘चे क्रांतिगीत याच आष्टीच्या भूमीत गुंजलेले. आष्टीला इतिहासात मोठे स्थान होतं मात्र भूगोलात त्याची किंमत शून्य होती. या आष्टी गावात श्रीधर ठाकरे कृषी सेवा केंद्र चालवून शेतकऱ्यांच्या मनाच्या बांधावर नवतंत्रज्ञान पोचविण्याचे काम करीत होते. शेतीला आधुनिकतेची जोड मिळावी म्हणून १९७५ च्या काळात त्यांनी थ्रेशर, ट्रॅक्टर ही संकल्पना शेतकर्‍यांच्या गळी उतरवण्यासाठी धडपड सुरू केली होती. कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून श्रीधर ठाकरे यांचा जनसंपर्क दिवसेंदिवस वाढत होता. अशातच आष्टी हा तालुका व्हावा ही मागणी समोर आली आणि याच नेतृत्व केलं श्रीधर ठाकरे यांनी. अनेक तरुण त्यांच्या नेतृत्वात समोर येऊ लागले. तालुका निर्मितीच्या या आंदोलनात अनेक स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते. १९७८ ते १९८२असे चार वर्षे हे आंदोलन श्रीधर ठाकरे यांनी सक्षमपणे पुढे नेले. परिणामी १९८३ ला सर्वात छोटा तालुका म्हणून आष्टी तालुक्याचा जन्म झाला.

          एक  तरुण ज्याला नवी दृष्टी आहे विकासाची, त्याच्या पंखात आकाश भरारी घेण्याचे बळ आहे या भावनेतून श्रीधर ठाकरे यांचे कडे लोक पाहू लागलेत. त्यातच काँग्रेसचे वजनदार नेते वसंत बापू साठे यांचं लक्ष श्रीधर ठाकरे यांचेकडे गेले. हा तरुण तालुक्याला नवी दिशा देऊ शकतो हा विश्वास त्यांना होता. १९८५ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात श्रीधर ठाकरे यांना उतरविण्याच ठरलं. एका मोठ्या उमेदवाराच तिकीट कापून वसंत बापू साठे यांनी श्रीधर ठाकरे यांना तिकीट दिले. वीस दिवस प्रचारही केला  पण अवघ्या ४९६मतांनी श्रीधर ठाकरे यांना आमदारकीने हुलकावणी दिली. असे असले तरी सभागृहात जाऊन काम करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे प्रत्यक्ष गावखेड्यातील ‘लोकसभागृहात ‘काम करणे सुद्धा महत्वाचे आहे हा विचार त्यांना एक नवी उभारी देत होता. कृषीअर्थशास्त्राचे प्रचंड भान असलेला हा तरुण मग गावखेड्यात जाऊन दुधाच्या क्षेत्रात धडपडू लागला. सन १९८७ ला वसंतराव साठे व डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या विश्वासापोटी त्यांची वर्धा जिल्हा दूध संघावर निवड करण्यात आली. इथूनच एका नव्या अध्यायाला प्रारंभ झाला.

        दूध संघाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला. तालुकास्तरावर असलेले आर्वी, वर्धा येथील दूध संघ मोडकळीस आलेले होते. या दोन्ही दूध संघांना सोबत घेऊन त्यांना वर्धा जिल्हा दूध संघामध्ये नव्याने समाविष्ट केले. पहिल्याच दिवशी ५० लिटर दुधाचे संकलन करण्यात आले. पुढे पुढे हा आकडा ६५ हजार लिटर प्रति दिवस असा सरकत गेला. दुधाच्या क्षेत्रात काहीतरी बदल घडवून आणण्याचा इरादा दिवसेंदिवस पक्का होऊ लागला. विदर्भामध्ये दुधाच्या क्षेत्रात जागृतीचा अभाव असल्याचे त्यांना जाणवले. गुजरातमधील आनंद येथे जी धवलक्रांती झाली ती धवलक्रांती श्रीधर ठाकरे यांना खुणावत होती. गुजरातमधील दुग्ध व्यवसाय खास करून स्त्रियांनी वाढविला होता. यासाठीच त्यांनी जवळपास पाचशे लोक व काही जोडप्यांना गुजरातमधील आनंद येथील धवलक्रांती दाखविण्यासाठी नेले. या भेटीमुळे एक नवी दिशा परिसरातील लोकांना मिळू लागली. दुधातून उत्कर्ष साधता येऊ शकतो यावर लोकांचाही विश्वास बसू लागला. सन १९९५ ला डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी तालुक्यातील पिंपळखुटा येथे पाच कोटीचा प्रकल्प मंजूर केला. डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा आशीर्वाद त्यांना असल्यामुळे एक नवा आत्मविश्वास  प्राप्त झाला. पिंपळखुटा येथून दूध सर्वत्र जाऊ लागले. ‘सेवाग्राम दूध ‘ नावाचा ब्रँड ही तयार करण्यात आला. केवळ विदर्भच नव्हे तर मध्यप्रदेशातही हे दूध जाऊ लागले. ‘दिनशॉ ‘ सारख्या मोठ्या कंपनीला दुधाचा पुरवठा होऊ लागला. त्यांच्या या कार्याची दखल घेत विलासराव देशमुख यांनी त्यांची ‘महानंद ‘वर सहा वर्षे संचालक म्हणून निवड केली. यावेळी त्यांनी ‘एक गाय विकत एक गाय फुकट’ ही  योजना संपूर्ण विदर्भामध्ये पोहोचवून क्रांतिकारी बदल घडवून आणला. दुग्धव्यवसायातील खाचखळग्यांचा त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला. हे सर्व करत असताना हे क्षेत्र राजकीय पुढार्‍यांच्या दावणीला बांधल्याचे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांना प्रचंड मनस्तापही झाला. त्यानंतर  त्यांनी आपलं लक्ष विदर्भातील संत्रा या पिकाकडे वळवले.

       महानंद ते महाऑरेंज
……………………………………………

         द्राक्ष , डाळिंब विदेशांमध्ये जाऊ शकतात मग संत्रा का जाऊ शकत नाही , ही अस्वस्थता त्यांच्या डोक्यात अनेक वर्षापासून  होती. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणाऱ्या संत्रा उत्पादक पट्टा आणि संत्रा उत्पादकांना एक वेगळी ओळख देण्याचा त्यांनी निश्चय केला. संत्रा विक्री करत असताना उत्पादकापेक्षा दलालच कसे गलेलठ्ठ होतात याचा त्यांनी नीट अभ्यास केला. ट्रान्सपोर्ट या क्षेत्रातही लक्ष घातले. संत्र्याला जर प्रतिष्ठा द्यायची असेल तर विक्रीचे तंत्र बदललं पाहिजे हे त्यांनी मनाशी निश्चित केले . मालाचे वर्गीकरण व पॅकिंग हीच खरी व्यवसायाची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी संत्रा पेटी तयार करत या दुर्लक्षित  फळाला एक वेगळी प्रतिष्ठा देण्याच्या कामाला प्रारंभ केला. कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केले व संस्था तयार करा असे सांगितले. १० मार्च २००८ ला पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात ‘महाऑरेंज’ चा जन्म झाला. आणि याच ठिकाणी पहिला संत्रा महोत्सव कृषी पणन मंडळाच्या सहाय्याने आयोजित करण्यात आला. या महोत्सवाने एक वेगळी आशा संत्रा उत्पादकांच्या मनात निर्माण झाली. या संत्रा महोत्सवाने शासनाच्या अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधून घेतले. कृषी विभागाचे प्रधान सचिव नानासाहेब पाटील व आमदार सुनील देशमुख यांनी श्रीधर ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात मदत केली. नागपूरच्या बसस्थानकासमोर महाऑरेंज चे कार्यालय सुद्धा उभे करण्यात आले. या साऱ्या प्रक्रियेमुळे संत्रा उत्पादकांना लुटणाऱ्या व्यापाऱ्यांना मात्र काही प्रमाणामध्ये चाप बसला. आम्ही कुठेही संत्रा विकू शकतो ही ताकद संत्रा उत्पादकांना प्राप्त झाली. त्यानंतर मुंबईच्या शिवाजी पार्क येथे दुसरा संत्रा महोत्सव घेण्यात आला आणि या संत्रा महोत्सवात जवळपास एक कोटी रुपयांचा टर्नओव्हर  झाला. ‘महाऑरेंज’ च्या माध्यमातून संत्र्याची एक वेगळी ओळख तयार व्हायला लागली . प्लास्टिक थैलीतील संत्री ‘करोगेटेड बॉक्स’मध्ये येऊ लागली. संत्र्याची साठवणूक करण्यासाठी ५० टक्के अनुदानावर क्रेट उपलब्ध करून देण्यात येऊ लागले.

     ‘महाऑरेंज’ च्या वाटचालीकडे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचेही लक्ष गेले. कारंजा व काटोल येथील बंद प्लांट सुरू करण्यासाठी त्यांनी महाऑरेंज ला निमंत्रण दिले. ग्रेडिंग ,कुलिंग,पल्प, निर्यात आणि साठवणूक यावर चर्चा करण्यात आली. दहा वर्षांपासून बंद असलेले कारंजा येथील संत्रा निर्यात केंद्र हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे सोबत महाऑरेंज चा सामंजस्य करार झाला. कारंजा येथील संत्रा निर्यात केंद्राला एक वेगळीच झळाळी प्राप्त होऊ लागली. याठिकाणी संत्र्याचे ग्रेडिंग पासून त्याला चमकदार कसे बनवता येईल याचे धडे देण्यात आले. आणि मग इथूनच पहिला कंटेनर समुद्री मार्गे श्रीलंकेला २०१५ मध्ये रवाना करण्यात आला. या कंटेनरमध्ये तेवीस टन संत्रा होता. विदर्भातील संत्र्याच्या वाट्याला आलेला हा पहिला परदेश प्रवास होता. तिथूनच पल्प साठी सुद्धा संत्र्याचा पुरवठा होऊ लागला. २०१६ मध्ये पुन्हा एक नवीन प्रयोग करण्यात आला. दिल्लीच्या व्यापाऱ्यांना कारंजा येथे निमंत्रण देण्यात आले.परिणामी जे दलाल आतापर्यंत संत्रा उत्पादकांना लुटत होते त्या दलालांना चाप बसला. शेतकऱ्यांच्या संत्राला योग्य दर आणि प्रतिष्ठा मिळू लागली. खरं पाहिलं तर हा बदल संत्रा उत्पादकांच्या आशा पल्लवित करणारा आहे. १ जानेवारी २०१७ला मोर्शी येथील बंद पडलेला संत्रा प्रकल्प सुरू करण्यात आला आणि तेथूनही अठरा टन संत्रा बांगलादेशला रवाना करण्यात आला. गावखेड्यातील संत्री विदेशात जाऊ लागली. पुढील काळात हीच संत्री कतार, बहरीन, दुबई येथे सुद्धा जाऊ लागली. अलीकडेच  नागपूरच्या विमानतळावरसुद्धा ‘महाऑरेंज’ ने स्टॉल लावून विमान प्रवास करणाऱ्यांना सुद्धा संत्री आणि त्यापासून उत्पादित मिठाई आणि इतर गोष्टी उपलब्ध करून दिला.  विदर्भाचे राजे रघुजी भोसले यांनी नेपाळमधून आणलेला हा संत्रा आता श्रीधररावांच्या प्रयत्नाने जगभर जाऊ लागला. त्याला जगाची सैर घडवून आणण्याचं भाग्य महा ऑरेंज मुळे लाभले. संत्रा उत्पादकांच्या जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणायचे असतील तर संत्र्याचे दवाखाने उभारणे आवश्यक आहे अशी भावना  श्रीधर ठाकरे व्यक्त करतात .  त्यांच्या या यशोगाथेत  त्यांचे चिरंजीव राहुल ठाकरे यांची मेहनत , कल्पकता व धडपडीचा मोठा वाटा आहे . इस्त्राईल, पंजाब या प्रांतात घेतल्या जाणारी संत्रा पीक विदर्भात घेतली गेली तर संत्रा उत्पादकांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडून येऊ शकते हा विश्वास श्रीधर ठाकरे व राहुल ठाकरे यांना यांना आहे. निर्मितीपासून निर्यातीपर्यंतचे ज्ञान जर अवगत केलं तर संत्रा उत्पादक कुठेच मागे येऊ शकणार नाही ही शिकवण या बापलेकांनी व महाऑरेंजने  दिली आहे.

(श्रीधर ठाकरे यांचा मोबाईल नंबर  98222 28533, राहुल ठाकरे -94221 40636)

(लेखक मीडिया वॉच अनियतकालिक आणि वेब पोर्टलचे असोसिएट एडीटर आहेत)

96231 91923

Previous articleमोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा
Next articleशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. मित्र वर्य श्रीधरजी ठाकरे,
    आज मैत्री दिनाच्या दिवशी तुमच्या बद्दल इतकं काही वाचून उर भरून आला.
    जियो दोस्त.

    अनंत सोनटक्के.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here