संभाजीराजांची हत्त्या आणि गुढी पाडवा !

 

संभाजी महाराजांचा शहिद दिन तारखेनुसार का पाळला जात नाही?                                                                                                                    
इंग्रजी कालगणनेनुसार येणाऱ्या तारखेला शिवजयंती साजरी करावी, असं म्हणणारी मंडळी संभाजी महाराजांचा मृत्यूदिन मात्र तिथीनं पाळला जावा, असा आग्रह का धरत असावेत?
‘मनुच्या नियमानुसार संभाजींची हत्या झाली’, ‘संभाजींच्या हत्येचा आनंद साजरा करण्यासाठी गुढ्या उभारल्या जातात’, ‘गुढीपाडवा बहुजनविरोधी सण आहे’ असा डांगोरा पिटायचा असेल तर याला पर्याय नाही.

1. दसरा आणि होळी या दोन सणांव्यतिरीक्त फार सणवारांचे उल्लेख ऐतिहासीक साधनांमध्ये क्वचितच आढळतात. तरी गुढी पाडव्याचा उल्लेख शिवचरित्रात एकदा सापडतो. शिवाजी राजांच्या निकटवर्तींयापैकी एक निराजीपंत गुढीपाडवा साजरा करण्यासाठी घरी गेले, असा उल्लेख आहे. म्हणजे संभाजीराजांच्या हत्येपुर्वी गुढीपाडवा साजरा होत होता. संतसाहित्यात गुढ्या उभारण्याचे उल्लेख आहेत.

2. संभाजीराजांच्या हत्येसंदर्भांत ‘आलमगीर विजय’ म्हणजेच ‘फुतूहाते आलमगिरी’ या ग्रंथांची साक्ष काढायला हरकत नसावी. याचा लेखक ईश्वरदास नागर हा राहणार मुळचा पाटण, गुजरातचा. औरंगजेबाचा मुख्य न्यायाधीश शेखुल इस्लाम याचा कारकुन होता हा ईश्वरदास. शेखुल इस्लाम नेहमी औरंगजेबासोबत असे. ‘गाड्याबरोबर नळ्याची यात्रा,’ या न्यायानं साहजिकच ईश्वरदासही नेहमी त्याच्या धन्याबरोबर असायचा. या ईश्वरादासानं 1696 मध्ये औरंगजेबाची नात सैफुन्निसा हिला ब्रह्मपुरीच्या (ता. मंगळवेढे, जि. सोलापुर) छावणीत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली. या कामगिरीबद्दल औरंगजेबानं ईश्वरादासाला मनसब देऊन गौरविलं. थोडक्यात ईश्वरदास हा औरंगजेबाच्या जवळच्या वर्तुळात होता. या ईश्वरदासाच्या ‘फुतूहाते आलमगिरी’ या ग्रंथाच्या हस्तलिखीताची प्रत लंडनच्या ब्रिटीश म्युझियमध्ये आहे. एकूण 339 पानांचा हा ग्रंथ फारसी भाषेत आहे.

3. फारसी भाषेचे तज्ज्ञ सेतुमाधवराव पगडी यांनी या ग्रंथाची नक्कल मिळवली होती. या ग्रंथाचं भाषांतर करताना पगडींनी केलेली नोंद अशी – संभाजीराजांची कैद आणि त्यांची निर्घृण हत्त्या यासंबंधी ईश्वरदासाने दोन गोष्टी सांगितल्या आहेत. त्या अभ्यासकांना नवीन वाटतील. “औरंगजेबासमोर उभे केल्यानंतर संभाजीराजांनी त्याच्यासमोर आपली मान लवविली नाही. इखलासखान आणि हमीदुद्दीनखान यांनी पुष्कळ समजावूनही काही उपयोग झाला नाही. औरंगजेबानं त्याचा बक्षी रुहुल्लाखान याला आदेश केला, की संभाजीला विचार – ‘तुझे खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्तीचा ठावठिकाणा कुठं आहे? बादशाही सरदारांपैकी कोण-कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करुन संबध ठेवीत होतं?’ संभाजी गर्विष्ठ होता. माहिती देण्याचं नाकारुन त्यानं बादशहासंबंधी घाणेरडे शब्द उच्चारले. त्याची निंदा-नालस्ती केली, असं ईश्वरदास लिहितो. यावर औरंगजेबानं आज्ञा केली की संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून (आंधळा करुन) त्याला नवीन दृष्टी द्यावी (वठणीवर आणावं). त्याप्रमाणं करण्यात आलं. गर्विष्ठ संभाजीनं डोळे काढल्यापासून अन्नत्याग केला. काही दिवस उपास घडल्यावर ही बातमी औरंगजेबाला कळवण्यात आली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशहाच्या आज्ञेनं त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले. संभाजीचे डोके औरंगाबादेहून बुऱ्हाणपुरापर्यंत मिरविण्यात आले. यानंतर ते दिल्लीला नेण्यात येऊन शहराच्या द्वारावर लटकविण्यात आले,” असं ईश्वरदासनं नमूद केलं आहे.

4. औरंगजेबाची कारकिर्द म्हणजे केवळ राजकारणाचा भाग होता, अशा प्रचाराची आपल्याकडे लोकप्रिय ‘फॅशन’ आहे. ती अनैतिहासीक आहे. कैद्यांना धर्मांतराच्या अटीवर सोडणं हे इस्लामी व्यवहार-धर्मशास्त्राच्या हनफी परंपरेला धरुन होतं. इनायतुल्लाखान हा औरंगजेबाचा चिटणीस-पत्रलेखक. इनायतउल्लाखानच्या ‘अहकामे आलमगिरी’ (आलमगिरीचा आदेश) या ग्रंथात औरंगजेबाची पत्रं आहेत. हा फारसी ग्रंथाचं हस्तलिखीत उपलब्ध आहे. इच्छुकांनी जरुर त्याचं वाचन करावं. सन 1702 ते 1707 या काळातल्या औरंगजेबाच्या या आज्ञापत्रांमध्ये काफिरांचा (हिंदू) नायनाट, मंदिरांचा विध्वंस, मूर्तिपुजकांची हकालपट्टी, चोर (मराठे), गाव-किल्ल्यांची नामांतरे, धर्मांतरे याचे संदर्भ उदंड आहेत.

5. मुस्लिम राज्यकर्त्यांनी विशेषतः बाबर आणि औरंगजेबानं हनीफ परंपरेचा उपयोग सर्वाधिक करुन घेतला. शिवरायांचे सेनापती प्रतापराव गुजर यांची दोन मुलं औरंगजेबाच्या तावडीत सापडली. तेव्हा इ.स. 1700 च्या 27 मे रोजी औरंगजेबानं निरोप पाठवला. ‘अगर इरादा ये इस्लाम दाश्ताबाशद निज्दे शहाजादा मुहंमद बेदारबख्त महादुर बफिरस्तंद, इल्ला दर कैद दारंद’ (इस्लाम ग्रहणाचा बेत असल्यास राजपुत्र बेदार बख्त बहादुर याजपाशी पाठविण्यात येईल, नाही तर कैदेत ठेवावे.) प्रतापराव गुजर यांच्या खंडोजी व जग्गनाथ या दोन मुलांनी कैदेतून सुटण्यासाठी धर्मांतर केलं. 13 जुलै 1700 रोजी हे दोघं खटाव (सातारा) तालुक्यातल्या औरंगजेबाच्या छावणीत दाखल झाले. धर्मांतरानंतर ते ‘खंडूजी अब्दु-रहीम’ आणि ‘जगन्नाथा अब्दु-रहमान’ बनले.

धर्मवेडापायी धर्मांतरं घडवून आणल्याची कैक उदाहरणं मोगलांच्या राजवटीत आहेत. इनाम, संरक्षण, संपत्ती, जहागिरी किंवा जगण्याच्या मिषानं ही धर्मांतरं झाली आहेत. स्वतः औरंगजेबाला धर्मांतरं घडवण्यात, शरियत कायद्याची अंमलबजावणी करण्यात प्रचंड रस होता. संभाजीपुत्र शाहू कैदेत असताना त्याला मुस्लिम होण्याची सूचना औरंगजेबानं केली होती. (तसा औरंगजेब दरबारच्या बातमीपत्रात स्पष्ट उल्लेख आहे.) मात्र शाहुंनी धर्मांतरास स्पष्ट नकार दिल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्याचा आदेश औरंगजेबानं दिला.

6. औरंगजेब धर्मवेडा असल्याचं खरं असलं तरीही संभाजी राजांनी धर्मांतर करावं म्हणून औरंगजेबानं त्यांचा छळ केल्याचा उल्लेख मात्र सापडलेला नाही. संभाजीराजांना ठार मारायचे, हा औरंगजेबाचा निर्धार पक्का होता. शिवाजीराजांचा हा पराक्रमी अंश संपवल्यानंतर मराठेशाही नेस्तनाबूत होईल आणि दक्षिण भारतावर कब्जा करता येईल, अशी त्याची धारणा त्यामागं होती. संभाजीराजांना मुसलमान करण्याच्या फंदात औरंगजेब पडल्याचं आढळत नाही.

7. प्रत्यक्षात मात्र धर्मांतर नाकारणाऱ्या संभाजी राजांची ‘धर्मवीर’ अशी प्रतिमा रंगवणाऱ्या अनेक आख्यायिका रुढ झाल्यात. ईश्वरदासाच्या फारसी ग्रंथावरुन असं स्पष्टपणे म्हणता येतं, की संभाजीराजांच्या धर्मांतराचा प्रश्नच उपस्थित झालेला नाही.

8. “औरंगजेबानं त्याच्या कारकिर्दीत कोणतीही शिक्षा शराला (इस्लामी धर्मशास्त्र) अनुसरल्याशिवाय दिली नाही. केवळ संतापाच्या भरात किंवा बेभान होऊन त्यानं कोणालाही ठार मारण्याची आज्ञा केली नाही,” असं औरंगजेबाच्या अभ्यासकांनी लिहून ठेवलं आहे. संभाजीराजांनी शरणागती पत्करण्याऐवजी कैदेत असूनही औरंगजेबाचा अपमान केला. त्याची बेईज्जती केली.

शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र हां हां म्हणता ताब्यात घेता येईल, या आशेनं आलमगीर आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रचंड साधनसामुग्री, सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चालून आला होता. त्याचे हे मनसुबे संभाजीराजांनी पार उधळून लावले. याचा संताप औरंगजेब आणि त्याच्या सरदारांना असणार. यातून संभाजीराजांची क्रुर हत्त्या झाली. त्यांच्या मृतदेहाचीही विटंबना केली गेली ती मराठ्यांवर जरब बसवण्यासाठी.

प्रत्यक्षात यामुळं मराठे आणखी पेटून उठले. संभाजीराजांच्या बलिदानानंतर म्हाताऱ्या आलमगीरला दख्खन जिंकता आलं नाही. तो त्यानंतर 16 वर्षांनी महराष्ट्रातच मेला.

8. संभाजीराजांना “धर्मवीर” ठरवून मुस्लीम द्वेष पसरवणाऱ्या आणि इतिहासात गाडलेल्या औरंगजेबाचं भूत मानगुटीवर बसवून आजच्या भारतीय मुस्लिमांविरोधात उभं ठाकणाऱ्या हिंदूत्त्ववाद्यांनाही सद्बुद्धी मिळो.
Sukrut Karandikar– यांच्या लेखाचा सारांश- @सुकृत करंदीकर,17 मार्च 2018, पुणे.

Previous articleसुरेश भटांना आठवताना..
Next articleकुमारपंथ
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here