सनातन संस्थेच्या मुसक्या कधी आवळणार?

लेखक – अलका धुपकर

हिंदू राष्ट्र समितीचा धनंजय देसाई, झाकीर नाईक आणि सिमी या अतिकडव्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या मुसक्या भारत सरकारनं – महाराष्ट्रानं आवळल्या. मग डॉ. जयंत आठवले यांची ‘सनातन प्रभात’, संभाजी भिडेंची ‘शिव प्रतिष्ठान’ आणि प्रमोद मुतालिकच्या ‘श्रीराम सेने’ची भीती का, हा प्रश्न शुक्रवारी नालासोपारा आणि इतर भागात केलेल्या कारवाईनंतर उपस्थित होतोय.

गोवा राज्यातील फोंडा येथील रामनाथी गावातील सनातनच्या मुख्यालयाला मी २०१५ साली भेट दिली. रामनाथी गावामध्ये आत्तापर्यंत अनेक वेळा सनातनचं मुख्यालय तिथून हलवण्यात यावं, यासाठी गावकऱ्यांची आंदोलनं झालेली आहेत. अत्यंत आधुनिक बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये पूर्वपरवानगीशिवाय कुणालाही प्रवेश मिळत नाही. अगदी गावकऱ्यांनाही नाही. इथला कारभार ‘संशयास्पद’ आहे. ‘सनातन प्रभात’ या संस्थेच्या मुखपत्राचं कार्यालयही याच इमारतीमध्ये आहे. या इमारतीला ‘सनातनचा आश्रम’ असं ‘सनातन’चे लोक म्हणतात. ‘सनातन प्रभात’च्या मुख्यालयात संस्थेच्या ध्येयधोरणाचं वेळापत्रक लावलेलं आहे. त्यानुसार, संस्थेची बांधणी, उभारणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळेच आज कुणालाही ‘सनातन’चा सदस्य व्हायचं असेल तर ते शक्य नाही. नोंदणी त्यांनी काही वर्षांपूर्वी बंद केली आहे. दुर्जनांच्या नाश करण्याचा टप्पा सध्या सुरू आहे. २०१९ पर्यंत ‘सनातन’ हिंदुराष्ट्र निर्मितीचं स्वप्न गाठणार आहे.

सनातनचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांची मी दोन तास मुलाखत घेतली होती. त्यानुसार, हिंदुराष्ट्र निर्मितीच्या या स्पप्नपूर्तीसाठी गरज पडल्यास स्वसंरक्षण करण्यासाठी किंवा प्रार्थनेसाठी हिंसेला परवानगी दिलेली आहे. हिंदुराष्ट्र निर्मितीच्या ध्येयामध्ये येणारे अडथळे दूर करण्याचाही एक टप्पा त्यांच्या ध्येयामध्ये नमूद केलेला आहे. हिंदू जनजागृती समिती ही सनातनची भगिनी संस्था. तिचं कामही इथून चालतं

सनातन’नं अध्यात्म विश्वविद्यालयही उघडलंय. प्लॅस्टिकच्या वापरलेल्या बादलीवर आलेला काळा थर हा वाईट शक्तीमुळे आलेला थर आहे, प्लॅस्टिकच्या वापरलेल्या काळ्या पडलेल्या स्लीपर्स या वाईट शक्तीमुळे काळ्या पडल्या आहेत, टांगलेला आरसा हवेत फिरतो तो परमपूज्य आठवलेंच्या शक्तीमुळे, असले थोतांड दावे या विद्यापीठात करण्यात येतात. परदेशी नागरिकही या अध्यात्म विश्वविद्यालयाचे फॉलोअर्स आहेत, असा संस्थेचा दावा आहे

२०१५ साली इमारतीच्या प्रवेशद्वापुढच्या कोपऱ्यात हे सगळं सामान रचून प्रदर्शन मांडलेलं होतं. तिथल्या एकाही ‘तथाकथित’ साधकासोबत बोलण्याची परवानगी दिली जात नाही. अनेक परदेशी नागरिक या इमारतीमध्ये राहतात. गोव्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं २००९ च्या मडगाव बॉम्बस्फोटानंतर मला एका इंटर्नल रिपोर्टची प्रत दिली होती. त्यानुसार यातील अनेक परदेशी नागरिकांकडे आवश्यक व्हिसा आणि इतर कागदपत्रं नसतानाही त्यांच्यावर कोणी कारवाई करण्याची हिंमत करत नाही असं म्हटलं होतं.

१९९९ ला जयंत आठवलेंनी ‘सनातन’ची स्थापना केली. अनेक भाषातील असंख्यं पुस्तकं, कॅलेडर्स, प्रार्थनेचं साहित्य, ‘सनातन प्रभात’सारखी प्रकाशनं यातून मोठा व्यवसाय संस्थेनं उभा केला आहे. धर्मादाय आयुक्तांकडे सनातन नोंदणीकृत असताना त्याची चौकशी करण्याची हिंमत धर्मादाय आयुक्त दाखवत नाहीत.

सनातन एका दशकापूर्वी जेव्हा नवे कार्यकर्ते जोडून घेत होती, तेव्हा उच्च शिक्षण देणाऱ्या अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचं त्यांनी ‘ब्रेनवॉशिंग’ केलं. तरुण मुलं बहकली. या मुलांच्या पालकांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना असंख्य पत्रं लिहिली. सनातनचे लोक मुलांना भेटू देत नाहीत अशी तक्रार केली. पण सरकारनं काहीही केलं नाही. अखेर त्यापैकी चार नातलगांनी एकत्र येऊन उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली. त्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळीच सनातनवरील बंदीबाबत केंद्राकडे राज्यानं प्रस्ताव पाठवल्याची माहिती राज्य सरकारनं दिली होती. ही केस अनेक महिन्यांत सुनावणीसाठी आलेली नाही. त्यामुळे केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाची सध्याची परिस्थिती गुप्त आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारनं हा प्रस्ताव पाठवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील अधिवेशनात अशी माहिती दिली की, या प्रस्तावाबद्दलची आठवण राज्य सरकारनं केंद्राला करून दिली आहे.

कंडोम, ड्रग्ज आणि बॉम्ब

काही वर्षांपूर्वी सनातन संस्थेच्या मुख्यालयाच्या इमारतीबाहेर वापरलेले अनेक कंडोम गावकऱ्यांना आढळून आले. एकीकडे पालक आपल्या तरुण मुलांना भेटण्यासाठी आश्रमाबाहेर ताटकळत असायचे. या तरुणांचं लैंगिक शोषण होत असल्याच्या त्यांच्या तक्रारी होत्या. या तक्रारी आल्यानंतर या तरुणांची सनातननं परस्पर लग्नं लावून दिली. सनातनचे महाराष्ट्रात इतर ठिकाणी असलेले आश्रम, तिथं चालणारं काम यावर सरकारनं किंवा पोलिसांनी कोणतीही निगराणी ठेवलेली नाही.

सनातन दरवर्षी अतिकडव्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांची हिंदू एकता परिषद भरवतं. तिथं हिंदुराष्ट्र निर्मितीच्या ध्येयाला विरोध करणाऱ्या लोकांची नावं पुकारून टार्गेट ठरवली जातात. अत्यंत भडकावू भाषणं दिली जातात. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नावावर ‘सनातन’च्या वेबसाईटवर लाल फुल्या मारल्या होत्या हा त्यातलाच भाग आहे. पूर्वी पत्रकारांना या संमेलनाला खुला प्रवेश असायचा. आता काही निवडक कार्यक्रम पत्रकारांना कव्हर करता येतो. पत्रकार, पुरोगामी कार्यकर्ते यांच्यावर बदनामीचे खटले टाकणं हा ‘सनातन’ संस्थेच्या रणनीतीचा एक भाग आहे. खटल्याच्या भीतीनं अनेक मीडिया हाउसेस आत्तापर्यंत ‘सनातन’च्या वाटेलाच गेल्या नाहीत. पण ‘गोवन ऑर्ब्झव्हर’सारख्या प्रकाशनसंस्थांनी सनातनला पूर्ण एक्सपोज केलं. दहा वर्षं कायदेशीर लढाई दिली आणि सनातननं लादलेला बदनामीचा खटला जिंकला. या निकालपत्रात न्यायाधीशांनी ‘सनातन’ला चांगलंच फटकारलंय.

गोव्यात नरकासूर दहनाचा मोठा कार्यक्रम होतो. सनातनचं म्हणणं होतं की, ही भारतीय संस्कृती नव्हे. २००९ मध्ये रावण दहनाच्या वेळी बॉम्बस्फोट करायचा त्यांचा कट होता. पण स्कूटरवरून बॉम्ब नेताना त्याचा स्फोट होऊन योगेश नाईक आणि मलगोंडा पाटील हे सनातनचे सदस्य मरण पावले. मलगोंडा पाटीलची राहण्याची व्यवस्था ही आठवले यांच्या निवासस्थानाच्या बाजूला होती. काही भडकावू सीडीज आणि इतर साहित्य गोवा पोलिसांनी तेव्हा हस्तगत केलं होतं. पण या खटल्यातील सहा जणांची मुक्तता झाली. त्या स्फोटप्रकरणी एनआयएनं केलेलं अपिल प्रलंबित आहे. सारंग अकोलकर, रूद्रा पाटील, जयप्रकाशअण्णा, प्रवीण लिमकर हे सनातन संस्थेचे चार सदस्य तेव्हापासून फरार आहेत. त्यांच्यावर रेड कॉर्नर नोटीस लागलेली आहे. विनय पवार हा सनातन संस्थेचा अजून एक कार्यकर्ता फरार आहे. दाभोलकर आणि पानसरे खून खटल्यात चार्जशीटमध्ये तो मारेकरी दाखवलेला आहे. विक्रम भावे आणि रमेश गडकरी या सनातनच्या सदस्यांना ठाणे, वाशी आणि पनवेल बॉम्ब स्फोटप्रकरणी १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ते सनातनचे सदस्य असल्याचं न्यायालयानं अमान्य केलं असलं तरी त्याविरोधात राज्य सरकारचं अपिल प्रलंबित आहे. २००९ पासून रडारवर असलेल्या सनातनच्या पनवेल आश्रमावर २०१६ साली कोल्हापूर पोलिसांनी धाड टाकली. दाभोलकर आणि पानसरे खून खटल्यातील अटकेत असलेला प्रमुख आरोपी वीरेंद्र तावडे याच्या पत्नीच्या स्टेटमेंटनंतर ही धाड टाकण्यात आली आणि सायकोट्रोपिक ड्रग्जचा साठा जप्त केलाय. साधकांना प्रसादामधून सायकोट्रोपिक ड्रग्ज विदाऊट प्रिस्क्रिप्शन दिली जातात. ड्रग्जच्या प्रभावामुळे काही काळ तणावविरहित जगतात. प्रसाद – तीर्थ प्यायल्यामुळे तुम्हाला असं रिलॅक्स वाटत आहे, असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात तो प्रभाव ड्रग्जचा असतो. रायगड एफडीएनं सनातन संस्थेविरोधात चार्जशीटही दाखल केलंय. ही केसही प्रलंबित आहे.

माझा माजी सहकारी धर्मेंद्र तिवारी आणि मी, आम्हा दोघांवरही कल्याण न्यायालयात सनातननं बदनामीचा खटला दाखल केलाय. पण संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांच्या सहीचं लेटरहेडवर लिहिलेलं एक पत्रं माझ्याकडे आहे. २००१ मध्ये १५ सदस्यांना वाळपोईला स्वरंसरक्षाचं प्रशिक्षण दिलं. एअर रायफल हॅंडल करायचं ट्रेनिंगही देण्यात आलं, असं त्यामध्ये म्हटलंय. धर्मादाय संस्था असलेल्या सनातनला एअर रायफल कुठून मिळाली? २००१ ला एअर रायफल आणि इतर प्रशिक्षण, २००८ आणि २००९ ला बॉम्ब, २०१३ ते २०१७ गोळ्या घालून विचारवंतांची हत्या, २०१८ मध्ये गावठी बॉम्बचा साठा इथपर्यंत येऊन आपण पोचलोय.

सनातन प्रत्येक वेळी आपला कोणत्याही गुन्हाशी संबंध नसल्याचा निर्वाळा देते. पण, फरार पाच आरोपींच्या संपर्कात असलेल्या अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी आरोपींची माहिती तपासयंत्रणांना का दिली नाही, असे असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत. हिंसेच्या आधारे हिंदुराष्ट्र स्थापन करायला निघालेली सनातन संस्था ही सेक्युलर भारताच्या सुरक्षेला धोका आहे. कर्नाटक पोलिसांनी तपासातील बारकावे, फॉरेन्सिक पुरावे पुढे आणून सबळ केस उभी केली. गोवा आणि महाराष्ट्र पोलीस, सीबीआय आणि एटीएस आजपर्यंत हे करू शकले नाहीत. बातम्या येतात, चर्चा होते, पण सनातन संस्थेविरोधात न्यायालयात सबळ पुरावे देणं तपासयंत्रणांना जमत नाही, म्हणूनच या संस्थेचे सदस्य मोकाट आहेत.
-अलका धुपकर

Previous articleदुर्जन माणसा!
Next articleरोज़गार के घटते आंकड़ों के बीच क्यों बढ़ रहा है हिन्दू मुस्लिम डिबेट
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here