समाधी, ध्यान आणि चार्वाक

(साभार: ‘कर्तव्य साधना’- चार्वाक लेखमाला  भाग – १२)

– सुरेश द्वादशीवार

संत, सत्पुरुष, ज्ञानी, योगी, हटयोगी व ईश्वराच्या आराधनेत स्वतःला हरवून घेतलेले सर्व थोर यांचीही एक मोठी श्रेणी आपल्यात आहे. त्यांतील प्रत्येक जण समाजाला आदरणीयच नव्हे तर ईश्वरसम वाटत आला आहे. त्यांचीही पूजा ईश्वरासारखीच करायची. त्यांची यात्रा भरवायच्या, त्यांची प्रवचने ऐकून त्यांचा प्रसाद भक्तिभावाने ग्रहण करायचा हीदेखील समाजाच्या एका मोठ्या वर्गाची धारणा झालेली सवय आहे. ही माणसे या धर्मात्म्यातच ईश्वर पाहत व अनुभवत असतात. प्रश्न, ही माणसे व त्यांचे योगी असणे वा त्यांनी समाधिस्थ होणे याचे नेमके स्वरूप कोणते व कसे असते? ते असते की नसते? तो भास असतो की भ्रम? तो भक्तांएवढाच त्यांनाही होत असतो काय?

संस्कृती कोशानुसार अष्टांगयोगातील शेवटची पायरी म्हणजे समाधी. आपल्याला हव्या त्या विषयाखेरीज दुसरा कोणताही अर्थ भासणारी न होता ती वस्तूच भासमान होणे (ही त्या वस्तूची निर्भासता) म्हणजे समाधी. चित्ताची हव्या त्या वस्तूशी एवढी तन्मयता होणे की, आपण त्या वस्तूचे ‘मी ध्यान करत आहे…’ याचीही जाणीव शिल्लक न राहणे हीच स्वरूपशून्यता आहे. ध्येय हे केवळ अर्थरूपानेच भासमान होणे आणि त्याच्या रूपाचेही अनुसंधान न होणे हीच समाधी. ही ध्यानाची पुढची अवस्था आहे. ध्यानच जेव्हा ध्येयस्वरूप होते व त्याला अन्य वस्तूचे कोणतेही ज्ञान उरत नाही त्या अवस्थेला समाधी म्हणायचे. समाधीत देहावलंबन सुटते आणि अर्थमात्राचाच एकाकार प्रत्यय येतो. त्यात चित्ताची एकाग्रता साजते.

विद्यारण्यांनी म्हटले, ‘ध्याता, ध्यान व ध्येय या त्रिपुटीपैकी क्रमाने ध्याता व ध्यान यांचा लोप होऊन केवळ ध्येयावरच चित्त स्थिर होते… तेव्हा तो योग समाधीचा असतो.’

मानसशास्त्रानुसार अन्नमय कोष (शरीर), मनोमय कोष (मन), प्राणमय कोष (श्वास) व आनंदमय कोष (चित्त व आनंद) एकमेकांशी तादात्म्य पावतात व त्यांच्यात कोणतेही वेगळेपण उरत नाही तेव्हा ती समाधी. प्राणत्यागाची प्रक्रियाही अशीच असते. आपल्या साध्य वस्तूवर तन, मन व बुद्धी एकाग्र करून तिच्याशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्नच प्राणायामातही होतो. आपले साधूसंत याच पद्धतीने ध्यान लावत. त्यालाच आपण त्यांची समाधी अवस्था म्हणत असतो… मात्र खरी समाधी, जी ज्ञानेश्वरांनी घेतली ती याहून वेगळी आहे. तीत प्रथम श्वास रोखून प्राणच अडवला व सोडला जातो. ही समाधी म्हणजे प्राणायाम नव्हे. प्राणायामाची वा चित्त एकाग्र करण्याची क्रिया आता शाळा-कॉलेजांतूनही शिकवली जाते… त्यामुळे बुद्धी तल्लख होते व मेंदू सक्षम होतो असे सांगितले जाते. ही मनाच्या व्यायामाचीच एक स्थिती आहे. अशा प्रत्येकच स्थितीची तुलना ज्ञानदेवांच्या समाधीशी करता येत नाही. तीत मन स्थिर असले तरी जागृत अवस्थेत असते. प्राणायामतही ते स्थिर असते. संपूर्ण समाधीच्या स्थितीत तन, मन व प्राण हे सारेच त्यांचे अस्तित्व गमावत असतात. प्रत्यक्षात तो मृत्यूच असतो… पण साधूसंतांनी व महात्म्यांनी स्वीकारला म्हणून त्याला मृत्यू न म्हणता समाधी, निर्वाण किंवा प्रायोपवेशन अशी नावे आपण देतो.

हा विषय इथे आणण्याचे कारण ईश्वर व संतांचा भक्तिमार्ग यांविषयी समाजात असलेले चुकीचे समज स्पष्ट करणे हे आहे. एखाद्याची समाधी लागते असे आपण म्हणतो तेव्हा त्याचे चित्त एकाग्र असल्याचे आपण सांगत असतो. ती खरी समाधी नसते. ज्याचे चित्त स्थिर होत नाही… पण ज्याला ते व्हावेसे वाटत असते ते अकारणच आपली समाधी लागत नाही असे म्हणतात. मनाची एकाग्रता साधणे ही बाबदेखील साधी नाही… मात्र ती समाधी नव्हे हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे. ज्ञानीयोग्यांची समाधी व सामान्य माणसांच्या चित्ताची एकाग्रता यांतला फरक स्पष्टपणे समजून घेतला पाहिजे. विठ्ठलाच्या पायी चित्त एकाग्र होणे वेगळे आणि ज्ञानदेवांनी समाधी घेणे वेगळे हे लक्षात घेतले पाहिजे. समाधी ही देह, मन, बुद्धी व असलाच तर आत्मा या साऱ्यांची समाप्ती असते. तिच्यात यांतली कोणतीही बाब सजीव उरत नाही. मनाची एकाग्रता व समाधी यांतला हा फरक एकदा ध्यानात घेतला की आपल्या संतसज्जनांच्या भक्तिभावाविषयीचे आपले चुकीचे समजही दूर होतात. (फार वर्षांपूर्वी मराठीच्या एका विद्वान प्राध्यापकाने आळंदीला असलेल्या ज्ञानदेवांच्या समाधीत कॅमेरा सोडण्याची व ज्ञानदेव तिथे आजही बसून असतील तर त्यांच्या त्या संजीवन समाधीच्या अवस्थेतील त्यांचे फोटो काढून घेण्याची बहारदार सूचना करून अनेकांची करमणूक केली होती याचे इथे अनेकांना स्मरण व्हावे.)

समाधी, मनोधारणा, चित्ताची एकाग्रता व सामान्यांना ते फारसे न जमणे यांतून चुकीचे समज वा गंड निर्माण होतात. ते तसे होऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण. या न लागणाऱ्या समाधीचा वा न होणाऱ्या एकाग्रतेचा गैरफायदा घेऊन वा त्याची नाटके करून सामान्य स्त्री-पुरुषांची फसवणूक करणारे बुवाबाबा अलीकडे फार झाले म्हणूनही हे सांगणे. आपल्या कामाची व्यग्रता वा त्यात होणारी मनाची एकाग्रता हीदेखील एक प्रकारची अल्पकाळासाठी जमणारी ध्यानधारणाच असते. ती दरवेळी ईश्वर वा धर्म यांच्याशी जोडण्याची गरज नसते. धर्माचे नाव आले की लगेच काही माणसे साक्षात्काराची बाब पुढे आणतात. त्याहीविषयी काही गोष्टी स्पष्टपणे समजून घेतल्या पाहिजेत.

ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन (?) वा परोक्ष प्रातिभ अनुभूती म्हणजे साक्षात्कार होय. असे दर्शन होऊ शकते या विचारसरणीलाच साक्षात्कारवाद असे म्हणतात. दुसरीकडे ईश्वर हा बुद्धी, मन व इंद्रिये यांच्या अतीत असल्याने त्याचे दर्शन होऊच शकत नाही असे कान्ट, स्पेन्सर इत्यादी पाश्चात्त्य तत्त्वज्ञ म्हणतात. अरविंदांच्या मते मात्र ईश्वर प्रत्येकाच्या अंतर्यामी असतो व सातत्याने प्रयत्न केल्याने त्याचा साक्षात्कारही होतो. बुद्धी, भावना व क्रियाशक्ती यांच्या पलीकडे असलेल्या, परतत्त्वाने स्पर्श केलेल्या प्रतिभेच्या  साहाय्याने साक्षात्कार घडतो. साक्षात्कार हे प्रतिभेचेच (?)  कार्य आहे. उचित अनुग्रहांमुळेही तो होतो असेही म्हटले जाते. या इंद्रियांचा बाह्यानुभव महत्त्वाचा नसतो. अंतःस्फूर्त अनुभवच महत्त्वाचा असतो. अनाहताचा नाद ऐकू येणे, अमृताचा (?) आस्वाद घेता येणे हे अनुभव अंतःस्फूर्त असतात. ते अतींद्रिय असले तरी प्रत्यक्षासारखे असते. त्यांचा अनुभव कविकल्पनेसारखा नसून प्रत्यक्ष असतो असेही म्हटले जाते.

एका साधकाला अनेक प्रकारचे साक्षात्कारी अनुभव येऊ शकतात असे संतांचा इतिहास सांगतो. रूपदर्शी, तेजोदर्शी, वर्णदर्शी, नादश्रवा व रसास्वादी असे या अनुभवांचे वर्ग कल्पिले जातात. साधकाला प्रथम येणारा रूपाचा अनुभव बिंदूलयाच्या अनुभवासारखा असतो. त्यालाच आध्यात्मिक अणू असे म्हटले जाते. तीळाएवढा अणू असे त्याचे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे.

इतर संत मोती, रत्न, प्रवाळ व लाल या प्रकारांत त्यांचा अनुभव सांगतात. शून्याच्या स्वरूपातला त्याचा अनुभव ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व तुकाराम यांनी सांगितला आहे… शिवाय ईश्वराच्या नेत्रांचे दर्शन, पावलांचे दर्शन यांसारखे अनुभवही त्यांनी सांगितले आहेत… मात्र देवाचा आपादमस्तक अनुभव कमालीचा दुर्लभ असल्याचे असे संतच सांगतात.

तेजाच्या व वर्णाच्या स्वरूपातल्या ईश्वराचा अनुभव ज्ञानदेवांनी सांगितला आहे.
नीलवर्ण तनु, नीलवर्ण गुणू
निली निलिमा, पूर्ण हृदयी नांदे
असे ते म्हणतात. अनाहत नादाचा अनुभव गुरुदेव रानड्यांसह अनेकांनी सांगितला आहे. जीवनाला तो धन्य व परिपूर्ण करतो… शिवाय तो ‘विश्व कल्याणकारी’ आहे असे साक्षात्काराचे तत्त्वज्ञान असल्याचे मत संत सांगतात.

हे वर्णन वाचूनही शिल्लक राहणारा प्रश्न अशी अनुभूती कोणी घेतली… ती खरी होती हे त्यांनाच वाटले की इतरांनाही त्यांच्या तशा वाटण्याचा प्रत्यय आला हे प्रश्न त्यातून निर्माण होतात. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरीवर सतत प्रवचने करणाऱ्या एका बड्या महंताला प्रस्तुत लेखकाने याविषयी विचारले, अध्यात्माचा वा परतत्त्वाचा स्पर्श झालेला माणूस तुम्हाला आजवर भेटला काय? त्यावर त्यांनी निराशेने ‘नाही’ असे उत्तर दिले. सारा काळ ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या व सांगणाऱ्या व्यक्तीला अशी माणसे भेटत नसतील तर ती आपल्यासारख्या मर्त्य माणसांना कशी व केव्हा भेटतील? खरा प्रश्न याहून वेगळा आहे. तो अशी माणसे असतात तरी काय आणि त्यांनी सांगितले म्हणून त्यांचा  प्रत्यय आपण खरा मानायचा काय… हाही आहे.

हे खरेतर पचायलाच नव्हे तर वाचायलाही अवघड आहे. तर्क, विचार व वैज्ञानिक मानसिकता असणाऱ्या व्यक्तींना ते सोपे जाणार आहे. ज्यांच्या श्रद्धा जडमूळ आहेत, ज्यांची ईश्वरनिष्ठा बावनकशी आणि संतश्रेष्ठांवरची भक्ती गडद आहे त्यांच्यासाठी असे प्रश्न हा निंदेचा विषय आहे… मात्र बदलत्या काळासोबत हे सारेच विचारले जाणार आहे व त्याला उत्तरेही द्यावी लागणार आहेत. हनुमंताची उड्डाणे आजच्या शाळकरी मुलांनाही खरी वाटत नाहीत. महाभारतात अण्वस्त्रे होती व रामाचे विमान चक्क आकाशात उडत होते ही गोष्ट आता कोणीही खरी मानत नाहीत. खीर खाल्ल्याने मुले होतात वा घाम प्राशन केल्याने गर्भधारणा होते यावर आज कोणाचा विश्वास बसत नाही.

विठ्ठल हा जनसामान्यांचा देव नामदेवाच्या हातून जेवत होता, नाथाच्या घरी नाचत होता आणि त्याच वेळी चोखामेळ्याला घराबाहेर पायरीशी बसवत होता हे आज कोण मान्य करील? आशीर्वादाने फलप्राप्ती होते, शापाने दुर्दशा होते, भक्तीने सारे काही प्राप्त होते व साक्षात्काराने माणूस सर्वज्ञ होतो यावर तरी कोण विश्वास ठेवील?

आईन्स्टाईनने लहानपणीच धर्मत्याग केला होता. ईश्वर मेला असल्याची ग्वाही नित्शेने दिली होती. व्हॉल्टेअरने धर्माची व चर्चची कुचेष्टा केली होती… पण ती माणसे ज्ञानाच्या क्षेत्रात आज कमालीच्या उंचीवर जाऊन बसली आहेत. आपले संत सज्जन, चांगले होते; सेवेत रमत होते. ईश्वराची आराधना करण्यात रमले होते. सर्व तऱ्हेच्या पापांपासून व वासनांपासून दूर होते. याविषयी त्यांच्याबद्दलची पूज्य भावना असणे योग्य… पण त्यांच्या मार्गाने ज्ञान, विज्ञान, संशोधन व विकास होत असतो… हे मात्र मान्य करणे अवघड आहे.

अर्थात हा विषय एवढ्यावर थांबणारा नाही. बुद्धी कधी हरत नाही आणि श्रद्धा कधी थकत नाही. त्यांच्यातील संघर्षासोबत आयुष्य काढणे हे आपले व जगाचेही नित्याचे वास्तव आहे.

(चार्वाक लेखमालेतील अगोदरचे भाग ‘मीडिया वॉच’ वर उपलब्ध आहेत . ही लेखमाला पुस्तकस्वरुपात येत्या २० तारखेला साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. )

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)
98224 71646

Previous articleगोष्ट तुफान यश, प्रचंड अपयशही पचवणाऱ्या बिग बूलची- ‘स्कॅम 1992’
Next articleस्त्रियांचा वर्ग आणि चार्वाक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.