सूर्यकांता पाटीलांची निवृत्ती आणि मराठवाड्याचं ‘न’  नेतृत्व…

-प्रवीण बर्दापूरकर

सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून निवृत्त व्हायचा निर्णय घेतल्याचं वाचनात आलं . त्या भाजपच्या राजकारणातून निवृत्त झाल्या की एकूणच राजकारणातून , हे कांही अजून स्पष्ट झालेलं नाही . अलीकडच्या दीड-दोन वर्षात सूर्यकांता पाटील यांच्याशी ज्या कांही भेटी झाल्या त्यातून त्यांची झालेली घुसमट जाणवत होती . त्यामुळे भाजपच्या गोटातून तरी त्या आज-ना-उद्या बाहेर पडणार हे दिसत  होतं . त्यामुळे हा निर्णय कांही अनपेक्षित आहे , असं म्हणता येणार नाहीच . सूर्यकांता पाटील यांचा ‘राजकीय डिएनए’ काँग्रेसचा आहे आणि अस्सल काँग्रेसी कधी राजकारणातून निवृत्त होत नाही , हा तर इतिहास आहे . त्यामुळे सूर्यकांता बाई काँग्रेसमध्ये परत जातील , की आणखी कांही नवं उभं करतील हे आज तरी सांगता येत नाही .

सूर्यकांता पाटील आणि माझ्यातलं मैत्र सख्ख आहे , नितळ आहे आणि या मैत्राला ‘अरे-तुरे’ची भरझरी  झालर आहे  . ( आमच्या मैत्रीबद्दल ६ ऑक्टोबर २०१९ला लिहिलेल्या स्तंभातील मजकूर शेवटी जोडला आहे . उत्सुकता असणार्‍यांनी तो आवर्जून वाचावा म्हणजे आमच्या मैत्रीची जात आणि कूळही समजेल ! ) माझे आणखी कांही सख्खे मित्र विविध पक्षांच्या राजकारणात आहेत . नुसते राजकारणात नाहीत तर , अविरत संघर्ष करुन सत्ता आणि पक्षात एक विशिष्ट ऊंची प्राप्त केलेले हे मित्र आहेत पण , त्यांचं राजकारण आणि माझी पत्रकारिता यासंदर्भात आम्हा परस्परांत आजवर कधीच चर्चा , वाद , मतप्रदर्शन झालेलं नाही . त्यांनी त्यांचं राजकारण सुखनैव करावं आणि मी माझी पत्रकारिता , पाहिजे तशी करावी अशी आमची त्यामागची अलिखित धारणा आहे . आमच्यातल्या निखळ मैत्रीवर त्याची छाया पडू न देण्याचं भान आम्ही कटाक्षांनं आम्ही पाळलेलं आहे . हे सांगायचं एवढ्यासाठी की , स्वत:च्या यशस्वी नेतृत्वाचा झेंडा  एकहाती रोवणार्‍या ‘राजकारणी’ सूर्यकांता पाटील यांच्याविषयी आज प्रथमच लिहितो आहे .

I

सूर्यकांता पाटील यांना राजकारणात येऊन आता सुमारे साडेचार दशकं होतील . नगर पालिकेची सदस्य ते केंद्रात मंत्री असा त्यांचा प्रवास आहे . एक महिला म्हणून कोणतंही आरक्षण आणि संरक्षण न घेता सूर्यकांता पाटील यांनी राजकारणात मारलेली भरारी थक्क करणारी आहे . अशी भरारी मारण्यासाठी आवश्यक असणारी नजर , धमक , धाडस हे गुण आणि सुडाचं राजकारण न करण्याचा उमदेपणा त्यांच्यात आहे . इंदिरा गांधी , राजीव गांधी यांच्याशी असणारा त्यांचा थेट संपर्क काँग्रेस वर्तुळात कायम असूया आणि जरबेचा विषय राहिलेला आहे . त्यामुळे त्यांच्याशी पंगा घेण्यापूर्वी काँग्रेस नेते विचार करत असत . ‘वाचन संस्कृतीचा होणार संकोच’ आणि ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला का नाही’ हे आपल्या साहित्य , स्त्रीमुक्ती आणि राजकारणाच्या दालनातले कायम तेवत असलेले चर्चेचे दिवे आहेत . मधला एक काळ असा होता की यातल्या , महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत सूर्यकांता पाटील यांचं नाव हमखास असायचं .

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पुकारली गेलेल्या आणीबाणीपूर्व , आणीबाणीनंतर , जागतिकीकरण आणि खूली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर आणि नरेंद्र मोदी यांचा उदय , असे आपल्या देशातील १९७५ नंतरच्या राजकारणाचे महत्वाचे टप्पे लक्षात घेतले तर सूर्यकांता पाटील आणि त्यांच्यासारख्या बाजूला फेकल्या जाणार्‍या किंवा गेलेल्यांच्या  राजकारणाकडे नीट बघता येईल . इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेसचं राजकारण व्यक्तीनिष्ठ झालं तरी कार्यकर्ता दुर्लक्षित राहिला नाही . नंतर मात्र राजकारणाचा घाट बदलत गेला . हळूहळू  काँग्रेसला तुल्यबळ पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाचा उदय झाला आणि डावे क्षीण होत गेले . राजकारण केवळ सत्ताप्राप्तीसाठी हा मूलमंत्र झाला .  निवडणुका ‘इव्हेंट’ झाल्या . सहकार सम्राट लयाला जाऊन स्वत:चं हित जपणारे शिक्षण सम्राट , उद्योगपती राजकारणात उदयाला आले . राजकारण ‘कॉर्पोरेट’ झाल्यानं नवे धनवंत निर्माण झाले .  कार्यकर्त्याला दणकट ‘रोजी’ मिळू लागली .  लोकांशी असणारा संपर्क , काम बाजूला पडलं आणि  निवडणुका जिंकवून देणारा एक नवा वर्ग राजकारणात निर्माण झाला . ‘इलेक्शन स्पेशालीस्ट’ नावाची एक ‘पेड’ जमात जन्माला आली . पैसा , जात आणि धर्माची गणितं धंदेवाईक पद्धतीनं जुळवत उमेदवार व पक्षाला ब्रॅंड म्हणून विकत हे स्पेशालिस्ट निवडणुका जिंकवून देऊ लागले . सत्तेत येणारे याच वर्गाच्या नजरेतून सत्तेकडे एक व्यवसाय म्हणून बघू लागले . पाहता , पाहता राजकारणातले लोक ; अगदी साधा नगरसेवक कोट्याधीश झालेला दिसू लागला .

एकदा का धंदा म्हटलं की  सहाजिकच लोकहित , निष्ठा आणि मूल्य वगैरे बाबी दुय्यम ठरतात ; केलेली गुंतवणूक वसूल करणारी एक नवी जमात व व्यवस्था आस्तित्वात येते . अगदी तस्सचं आपल्या देशातील राजकारणाच्या बाबतीत घडलं . परंपरागत राजकारण आणि राजकारणी बाजूला पडून एक नवी घराणेशाही आणि ‘उदो-उदो’चं नवा घोष उदयाला आला . नवे ‘शिशुराजे’ , ‘बाळराजे’ , ‘शहजादे’ आणि त्यांचे नवे शागीर्द यांचं प्रस्थ वाढलं . अलीकडच्या कांही वर्षातले बहुसंख्य राजकारणी आणि त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ बघा , पहिल्यांदा निवडणूक लढवणार्‍या या पठडीतल्या एखाद्या राजकारण्याच्या मुलगा किंवा मुलगीच्या संपत्तीचे आंकडे बघा , म्हणजे या म्हणण्यातील तथ्यांश लक्षात  येईल . हे चित्र एकजात नसलं तरी व्यापक आहे यात शंकाच नाही .

राजकारणाच्या या नवीन व्यवस्थेत बसू न शकणारे नेते–कार्यकर्ते सर्वच पक्षात आहेत . आपण त्यापैकी एक आहोत याची जाणीव सूर्यकांता पाटील यांना अलीकडच्या कांही व्हायला सुरुवात झालेली होती . त्यातच त्यांनी ज्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला होता तिथे त्यांची ( अपेक्षित ) घुसमट सुरु झालेली होती . लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी देण्याबद्दल पक्षाने अनुकूलता दर्शविणे तर लांबच राहिलं , पक्षातही सूर्यकांता पाटील यांना मोक्याचं ना कोणतं स्थान देण्यात आलं ना कोणत्या निर्णिय प्रक्रियेतील समिती/मंडळावर त्यांना सामावून घेण्यात आलं .  राज्य वा राष्ट्रीय पातळीवरचे तर सोडाच स्थानिक पातळीवरचे   नेते-पदाधिकारीही अशाच प्रकारचे वर्तन करत आहेत हे स्पष्टच दिसत होतं . अगदी खरं सांगायचं तर , पक्षांतर करुन आलेल्यांना जशी दुय्यम/तुच्छ वागणूक प्रस्थापित पक्षात मिळते तसं सूर्यकांता पाटील यांचं जीणं भाजपत झालेलं होतं आणि अशी वर्तणूक वाट्याला येणं त्यांना सहन होणं शक्यच नव्हतं .

सूर्यकांता पाटील यांच्या राजकीय चुका चार झाल्या . पहिली चूक म्हणजे त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत जायला नको होतं . हे म्हणजे सागरातून डबक्यात उडी घेण्यासारखं होतं . देशव्यापी असणार्‍या काँग्रेसचं राजकारण सर्व जाती-धर्मांना जोडून घेणारं तर राष्ट्रवादीचा सर्व जाती-धर्म समभाव मराठ्यांपासून सुरु आणि मराठ्यापाशी समाप्त अशा पद्धतीचा . शिवाय काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याला असणारी राजकीय विश्वसनीयता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार यांच्याकडे नाही . या मर्यादा माहिती असूनही शरद पवार यांच्याविषयी सूर्यकांता पाटील यांना ( बर्‍यापैकी अंधत्वाकडे झुकणारी ) अपार श्रद्धा आहे , या पक्षानं खासदारकी , केंद्रात मंत्रीपद दिलं याची कृतज्ञ जाणीव आहे . तरी शरद पवार यांनी संवाद खंडित केल्याची व्यथा सूर्यकांता यांच्या पदरी पडलीच . तिसरी चूक राष्ट्रवादी सोडणं आणि  भाजपत जाणं ही तर भयंकर मोठ्ठी चौथी चूक होती . भाजप तेव्हा केंद्र आणि राज्यात सत्तेत होता तरी , लोकांना मात्र सूर्यकांता पाटील यांचं या पक्षात जाणं मुळीच रुचलेलं नव्हतं आणि ही ‘ना’रुची , खरं तर नाराजी , सूर्यकांता पाटील यांच्या लक्षात का आलीच नाही हे एक कोडंच आहे .

जर आपण वर उल्लेख केलेल्या नवीन संस्कृतीत  बसू शकत नसूत तर आपली गरज पक्षाला पडावी असं स्थान निर्माण करायला हवं , याचं भान बहुसंख्य नेत्यांना नसतं ; म्हणजे मतदार संघाच्या बाहेर त्या नेत्याची पाळंमुळं रोवलेली असावी लागतात . अलीकडच्या चार दशकात  मराठवाड्यातून चार मुख्यमंत्री झाले , केंद्र आणि राज्यात मंत्री झाले , अनेक आमदार झाले , खासदार झाले पण , त्यापैकी शंकरराव चव्हाण यांच्यानंतर मराठवाड्याचे नेते कोण तर विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे दोघेच ! मतदार संघाच्या बाहेर पूर्ण राज्यात या दोन्ही नेत्यांचा प्रभाव होता , लोकसंपर्क आणि त्यांचा जनाधार मोठा  , कार्यकर्त्यांची फौज होती . कोणत्याही सभागृहाचं सदस्य असो वा नसो , त्यांच्याकडे सत्ता असो वा नसो , विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचं राजकीय वजन कधी कमी झालं नाहीच .

अशोक चव्हाणांपासून ते सध्या मराठवाड्यात  राजीव सातव , पंकजा मुंडे , राजेश टोपे , अतुल सावे , अमित देशमुख , संभाजी पाटील निलगेकर , अर्जुन खोतकर , हेमंत पाटील , सतीश चव्हाण , विक्रम काळे…असं नेत्यांचं दमदार पीक आहे आहे पण ,  ( विलासराव आणि गोपीनाथ मुंडे वगळता ) हे सर्व नेते त्यांच्या मतदार संघ किंवा जिल्हयापुरते कथित  प्रभावशाली आहेत . स्पष्ट सांगायचं तर हे सर्व एका बीळापुरते मर्यादित नेते आहेत . इथे उल्लेख केलेल्या कांहीची राजकीय कारकीर्द अशातली आहे पण , सूर्यकांता पाटील यांचं तसं नाही . युवक काँग्रेसपासून त्यांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली . देश पातळीवर इंदिराजी ते मनमोहनसिंग , राज्य पातळीवर मुख्यमंत्री म्हणून अब्दुल रहेमान अंतुले ते देवेन्द्र फडणवीस असा सत्तेचा व्यापक पट सूर्यकांता पाटील यांनी पाहिला आहे . संघटना आणि लोकसंपर्काचा विशाल घनदाट महावृक्ष असलेल्या शरद पवार यांच्या छायेत त्यांनी प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे .

पण , कटू वाटलं आणि त्यांच्यासकट त्यांचे चाहते , कार्यकर्ते , हितचिंतक यांना आवडणारं नसलं  तरी मैत्रीधर्म बाजूला ठेऊन सांगायलाच  हवं- धमक , धाडस , राजकीय आकलन आणि व्यापक दृष्टी असूनही सूर्यकांता पाटील यांचं नेतृत्व नांदेड जिल्हा आणि हिंगोली लोकसभा  मतदार संघाच्या बाहेर रुजलं नाही ; त्यांनी त्यासाठी कधी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत असं जाणवलं नाही . मराठवाड्याच्या राजकारणातील एक अपरिहार्यता म्हणून  सूर्यकांता पाटील प्रस्थापित झाल्याच नाहीत . वयानं कमी अधिक असणारे त्यांचे समकालीन अशोक चव्हाण , माधव किन्हाळकर , चंद्रकांत खैरे , रावसाहेब दानवे यांचीही अशीच राजकीय शोकांतिका आहे . मंत्रीपदासोबतच  वृत्तपत्राची ढाल हातात असूनही राजेंद्र दर्डा हेही याबाबतीत यशस्वी झाले नाहीत .

 (लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२०५५७९९

……………………………………………………………………………………………..

मैत्रीण सूर्यकांता पाटील यांच्यावर लिहिलेला मजकूर –

*असे वाचक आणि दोस्त – १५

सूर्यकांता पाटील

नितळ खळाळत राहणारी मैत्री कशी असते ? या प्रश्नाचं उत्तर सूर्यकांता पाटील आणि माझी मैत्री , हे आहे ! १९७५मधे सूर्यकांता नांदेड नगर परिषदेची सदस्य होती बहुदा  तेव्हापासून  आमच्यातला मैत्रीचा हा प्रवाह सुरु झाला म्हणजे , त्याला आता सुमारे चार दशकांवर आणखी कांही वर्षे उलटली आहेत . आमच्या मैत्रीत आम्ही दोघंच आहोत , आमचे कुटुंबीय कुणीही नाही . तिच्या वाढदिवसाला मी न चुकता फोन करतो तर ती माझ्या वाढदिवसाला मेसेज पाठवते ; हे आमच्यातल्या संपर्काचे वर्षातले न चुकणारे दोन दिवस आहेत . भेटीही नियमित नाहीत .  संपर्क अधूनमधून फोनवर आणि लेखनातून . अजूनही आमच्यात वाद होतात, एकमेकाशी बोलतांना आमचे संवाद साधारणपणे फटकळ आणि तिरकस असतात ; ( हा मजकूर लिहायचा विचार मनात आला तेव्हा मी तिला म्हटलं , एखादं हंसरं छायाचित्र पाठव तर तिचं म्हणणं ‘कशाला पाहिजे , मी हंसते यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत , नाही पाठवत’ वगैरे . मी तिला म्हणालो ‘नको पाठवूस मी चेटकिणीचा फोटो छापेन…’ अशी असते आमच्यातल्या संवादाची तऱ्हा ) . राजकीय मतभेद तर आमच्या मैत्रीच्या पांचवीलाच पुजलेले आहेत तरी ते आमच्या मैत्रीआड येत नाहीत . भेटी होत नसल्या तरी , आम्ही एकमेकाची खबरबात ठेऊन असतो , काळजी करतो कारण आमच्यातला जिव्हाळा मुळीच आटलेला नसतो . आमच्यातला एका समान दुवा म्हणजे तिची अपत्य राजकारणाकडे आणि माझी लेक पत्रकारितेकडे वळली नाही !

कांहीशी स्थूल , अगदी टिपिकल मध्यमवर्गीय म्हणजे आपल्या घरातलंच कुणी आहे असा चेहेरा व त्यावरचे भाव आणि राहणी , एकेकाळी ‘फायरब्रांड’ पण आता निवळलेला म्हणून समंजस वाटणारा स्वभाव असणारी  सूर्यकांता पाटील-हदगावकर , हल्ली मुक्काम नांदेड , धाडसी आहे ; माझं स्मरण चूक नसेल तर मराठवाड्यातली तरी स्कूटर चालवणारी ती पहिली महिला आहे .  जिद्दी तर खूपच आहे  , संघर्ष चिवटपणे करण्याची तिची वृत्ती आहे . हे गुण तिला राजकारणात स्वत:चं स्थान निर्माण करताना उपयोगी पडले . मराठवाडा मुक्ती संग्रामात तिचे वडील जयंतराव हुतात्मा झाले याचा तिला सार्थ अभिमान आहे आणि तो तिच्या मनातला अत्यंत स्वभाविक हळवा कोपराही आहे . उमेद न हरण्याचा गुण तिला वडिलांनी बहाल केला असणार .

तसं तर , सूर्यकांता ‘खानदानी’ मातृमुखी राजकारणी आहे . तिचे आजोबा माधवराव पाटील १९५१च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आणि तेही चक्क शंकरराव चव्हाण यांचं पराभव करुन . याचा एक वेगळा अर्थ , ‘चव्हाण-पाटील ये बहोत पुरानी दुष्मनी हैं !’ सूर्यकांताची आई अंजनाबाई याही १९५७च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या होत्या आणि सूर्यकांतानं ही १९८०ची विधानसभा निवडणूक त्याच हदगाव मतदार संघून जिंकली . लेक-आई-आजोबा अशा तीन पिढ्यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा हा एक कदाचित आपल्या देशाच्या लोकशाहीतील  आगळावेगळा विक्रम असावा !

सूर्यकांताला एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या होत्या . चांगली वाचक तर ती होतीच त्यामुळे भाषेवर पकड . नेतृत्वाच्या जन्मजात गुणांमुळे सतत बोलत राहण्याच्या संवयीन तिच्यातलं वक्तृत्व दिवसागणिक बाळसं धरत गेलं . तिला पत्रकार व्हायचं होतं म्हणून तिनं ‘गोदावरी टाईम्स’ नावाच्या एका दैनिकाचं प्रकाशन सुरु केलं ; एका महिलेनं स्वबळावर दैनिक सुरु करणं हे तेव्हा फार मोठा धाडस होतं . तिनं तेव्हा दैनिकाचा आणि दिवाळी अंकही लक्षवेधक काढले , चांगली टीम उभी केली होती . माझ्या २/३ कथा तिच्या अंकात प्रकाशित झाल्या आहेत म्हणजे , राजकीय वृत्त संकलनाच्या क्षेत्रात आल्यावर माझ्यातल्या कायमचा निद्रिस्त झालेल्या कथालेखकाची आणि सूर्यकांताची जान पहेचान आहे .  तिला लेखक व्हायचं होतं . सहकाराच्या क्षेत्रातही काम करायचं होतं . त्यावर गंमतीनं ‘सहकार माफिया व्हायचंय तुला,’ असं मी म्हणत असे . त्या दिशेनं तिनं कांही हालचालीही सुरु केल्या होत्या पण , अखेर ती झाली पक्की राजकारणी . स्वभाव बोलघेवडा , वृत्ती चळवळी आणि जिद्दी स्वभाव यामुळे रस्त्यावर उतरुन आंदोलनं वगैरे तिनं केलेली आहेत . तिच्या राजकारणाची सुरुवात नांदेड जिल्हा    महिला कॉंग्रेसच्या कामापासून झाली . मग जिल्हा सरचिटणीस , राज्य युवक कॉंग्रेसमधे सहभाग ; त्या वेळचे तिच्या सोबतचे युवक कॉंग्रेसचे बहुतेक सर्व महत्वाचे पदाधिकारी खासदार झाले हे विशेष . आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांच्या नजरेत ती विषेशत्वानं भरली . तिच्या उमेदवारीसाठी इंदिराजी आग्रही असल्याची चर्चा तेव्हा कॉंग्रेस गोटात होती . उमेदवारी मिळाल्यावर चक्क विधानसभेवर पहिल्याच प्रयत्नात सूर्यकांता निवडून आली !

विधान सभेतल्या तिच्या शपथ आणि पहिल्या भाषणाचा मी साक्षीदार आहे . विधि मंडळाच्या नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनात भा. दं . सं.च्या  ४९८ या कलमाच्या समर्थनार्थ तिनं केलेलं प्रभावी भाषण सभागृहांनं कसं उचलून धरलं होतं , हेही मला आठवतं . मग वयाच्या पंचेचाळीशीत राज्यसभेवर , नंतर लोकसभा निवडणुकीतले  विजय आणि केंद्रात पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद…असा तिचा राजकीय आलेख चढता राहिला . दरम्यानच्या काळात कॉंग्रेसच्या वाटेवरुन ती राष्ट्रवादीच्या गोटात गेली . नंतर तिनं भाजपचं कमळ हाती घेतलं . हा तिचा राजकीय प्रवास माझ्यासाठी अनाकलनीय होता . १९७८ नंतर मीही या वृत्तपत्रातून दुसऱ्या अशा बऱ्याच उड्या मारलेल्या होत्या .  तिच्या राजकारणाबद्दल मी आणि माझ्या पत्रकारीतेबद्दल तिनं बोलायचं नाही हा आजवरचा अनुच्चारीत संकेत आम्ही दोघांनीही पाळलेला आहे . त्यामुळे पक्षांतराची समर्थनं नं तिनं दिली ना वृत्तपत्र बदलल्याची मी . एकमेकाच्या करियरमधे नाक खुपसायचं नाही हे पाळलेलं भान हा आमच्या निखळ मैत्रीच्या निर्मळ खळाळण्याचा बळकट धागा आहे .

आम्ही दोघांनीही एकमेकाच्या पदांचा किंचित आणि कळत-नकळतही गैरफायदा घेतलेला नाही हे आमच्या मैत्रीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे . ‘माझी बाजू मांड’ किंवा ‘अमुक एक राजकीय गुपित घे’, अशी देवाण-घेवाण तिच्याकडून माझ्याबाबत कध्धीच घडली नाही . ती मंत्री होती तरी दिल्लीत गेल्यावरही मी कधी तिच्या कार्यालयाच्या आसपासही फिरकलो नाही . आमचं बोलणं , फिरक्या काढणं , एकमेकाच्या टवाळ्या करणं हे केवळ आमच्यापुरतंच मर्यादित ठेवणं आम्हाला कोणतीही कसरत न करता जमलं हे मात्र खरं .

सूर्यकांताकडे पाहिल्यावर तिच्या वयाचा अंदाज येणार नाही आणि तिचं आजचं वय मी सांगणारही नाही . ती माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण तिच्यातली कामाची ( आणि वाद घालण्याची ) उर्जा चाळीशीतल्या माणसाला लाजवणारी आहे हे नक्की . सूर्यकांताचा  टणीटणीत आवाज , तेज तर्रार चाल आणि उत्साह पाहता तिला राजकारणात आणखी कांही मोठ्या संधी मिळाल्याला हव्या असं मला एक मित्र म्हणून वाटतं . तिच्यात तसाही एक बंडखोर लपलेला आहे . संधी मिळाली नाही तर वेळ येताच संधीवर झडप घालण्याची तिची वृती अजूनही उफाळून येऊ शकते .

माझी एक तक्रार आहे , सूर्यकांता लिहिण्याच्या बाबतीत आळशी आहे . नांदेड ते दिल्ली मार्गे हिंगोली आणि मुंबई अशी राजकारणात इतकी वर्ष काढल्यानं तिच्याकडे सांगण्यासारखं खूप कांही आहे . सत्तेच्या दालनातल्या आपल्याला अज्ञात असणाऱ्या अन्नेक कथा तिला ठाऊक आहे ; चांगल्या असो की वाईट अनुभवाला  संवेदनशीलपणे सामोरे जाण्याचा स्वभाव आहे . तिची लेखन शैलीही प्रवाही आहे पण , ती लिहिण्याचं कांही मनावर घेत नाही . ३/४ वेळा कबूल करुनही तिनं एकदाही मला लेख दिलेला नाही . मध्यंतरी बोलतांना ‘मी आत्मचरित्र लिहिते आहे’ असं ती म्हणाली होती ; दोन वर्ष उलटली तरी ते अजून आलेलं नाहीये . आजवर साठलेलं हे संचित लिहिण्याची सुबुद्धी सूर्यकांता पाटील नावाच्या माझ्या या सख्ख्या मैत्रीणीला मिळो , हीच अपेक्षा .

( ६ ऑक्टोबर २०१९ )

Previous articleसोनू सूद : पडद्यावरचा व्हिलन बनलाय रियल हिरो!
Next articleटिकटॉक व गुगलची अभद्र युती आणि भारतीयांच्या भावनेची माती !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.