सोनू सूद : पडद्यावरचा व्हिलन बनलाय रियल हिरो!

– नितीन पखाले

ज्यांनी आमची घरे बनवली, आमच्यासाठी रस्ते बनवले, ते हजारो, लाखो लोक आपल्या घरी जायला रस्त्यांवर चालताहेत. परदेशात अडकलेल्या लोकांसाठी मायबाप सरकार पायघड्या घालत आहेत, तर देशात अडकलेल्यांची चौथ्या लॉकडाऊनमध्येही पायपीटच सुरू आहे. प्रवासाची कोणतीही साधनं नाहीत. घरी पायी चालत जाताना रस्त्यात कधी मरून पडू, याचा नेम उरलेला नाही. चालून चालून पाय दमले, तळवे भेगाळले, मन थकले, पण रस्ता काही संपायचं नावच घेत नाही. फाळणी नंतरचे देशांतर्गत नागरिकांचे सर्वात मोठे स्थलांतरण होत असताना स्थलांतरितांच्या वेदनांवर माध्यमं टीआरपीचा झेंडा रोवताहेत, तर हवसे, नवसे, गवसे तुटपूंज्या मदतीचे ‘सेल्फी’ काढून सोशल मीडियावर आपल्या सेल्फीश वृत्तीचे दर्शन घडवताहेत.

   अशा वातावरणात पडद्यावर आपण ज्याला व्हीलनच्याच भूमिकेत बघितले आहे तो सोनू सूद आपल्या बांधवांना या संकटकाळात रस्त्यांवर असेच सोडून द्यायचे का? असा प्रश्न स्वत:लाच विचारत स्थलांतरितांच्या मदतीस हिरो बनून धावून आला आहे . सोनू सूद तोच, ‘दबंग’, ‘सिंबा’ सारख्या अनेक चित्रपटांमधला व्हीलन. आयुष्याचा संघर्ष आणि जीवनात अचानक येणारे संकट किती भयावह असते, याची जाणीव असली की अशा परिस्थितीतून जाणाऱ्या लोकांच्या वेदना समजून घेता येतात. सध्या सोनू सूद तेच करतोय. कोणताही गाजावाजा न करता संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांची माणुसकीच्या दृष्टीकोणातून त्यांच्या गावापर्यंत प्रवासाची व्यवस्था नेकीने करत असताना सोनू सूद स्थलांतरितांसह मीडियाच्या गळ्यातील ताईत झाला आहे. कामचं ज्याची ओळख झाली त्या सोनूवर सध्या सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये भरभरून लिहलं, बोललं जाऊ लागलं आहे.  सर्च इंजिनवर गेल्या चार दिवसात सर्वाधिक ‘सर्च’ होत असलेला तो सेलिब्रिटी आहे. एव्हाना, सोनू सूदचे काम सर्वांपर्यंतच पोहचले आहे. स्थलांतरीत मजूर, कामगारांचा तो ‘मसीहा’ झाला आहे.

पंजाबमधील मोगा हे सोनू सूदचे मूळ गाव. त्याचा जन्मही तिथलाच. वडील शक्ती सूद कापडाचे व्यापारी तर आई सरोज शिक्षिका. अडीअडचणीतील लोकांना मदत करण्याचे संस्कार सोनूवर बालपणी आई, वडिलांकडूनच झाले. सोनूने शिकावे, मोठे व्हावे, चांगला माणूस बनावे, अशी त्याच्या पालकांची इच्छा. पुढे अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी सोनू महाराष्ट्रात नागपूरला आला. येथील यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने इंजिनिअरिंग केले. येथेच त्याचा परिचय सोनालीशी झाला. सोनू पंजाबी तर सोनाली तेलगू. सोनू आणि सोनालीच्या लग्नालाही २५ वर्ष होताहेत. सोनाली मात्र बॉलीवूडच्या झगमगाटापासून दूर आहे. त्यांना अयान आणि इशांत ही दोन मुले आहेत. सोनूला मोनाली आणि मालविका या दोन बहिणीही आहेत. सोनूच्या आई, वडिलांचे निधन झाले आहे. खऱ्या आयुष्यात फॅमिली मॅन असलेला सोनू सामाजिक आयुष्यातही संवेदनशील व्यक्ती आहे. आईच्या निधनानंतर त्याने स्वत:चा वाढदिवस साजरा करणे बंद केले.

शिक्षणानंतर नोकरी करण्याऐवजी बॉलीवुडमध्ये नशीब आजमावण्यासाठी १९९६, ९७ मध्ये त्याने मुंबई गाठली. तिथे लोकलचा प्रवास, वडापाव, निर्माता, दिग्दर्शकांचे उंबरठे झिजवणे हा इतरांच्या वाट्याला येतो तो बॉलीवुडी स्ट्रगल त्याच्याही वाट्याला आला. पण तो निराश झाला नाही. त्याने अनेक ठिकाणी स्वत:चे फोटोशूट केले होते. एका ठिकाणाहून त्याला ऑडिशन करता बोलावणे आले. अखेर बॉलिवूडमध्ये तर नाही, पंरतु टॉलीवूडमध्ये (साऊथ इंडियन) मध्ये त्याला संधी मिळाली. दक्षिणमध्ये अनेक तेलगू चित्रपटांमध्ये त्याला काम मिळाले. दक्षिणच्या चित्रपटांमध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर बॉलिवुडमध्ये ‘शहीद-ए-आजम भगतसिंग’ हा २००२ मध्ये त्याचा पहिला हिंदी चित्रपट रिलीज झाला. या सिनेमात सोनूने भगतसिंगांची भूमिका केली. ‘एक विवाह ऐसा भी’ या चित्रपटही वेगळा ठरला. मात्र सोनूला खरी दबंग व्हिलन म्हणून ओळख मिळाली ती सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातील छेदी सिंहच्या व्यक्तीरेखेतून. अलिकडच्या अनेक चित्रपटांत आपण सोनूला पाहत आलोय.

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या भयाने देश ठप्प झालाय. लॉकडाऊनमुळे कामगार, मजूर देशोधडीला लागले. उराशी असंख्य स्वप्न घेऊन मोठ्या शहरांत आलेले आणि याच शहरात कुठेतरी एखाद्या झोपडपट्टीत, रस्त्यावर, पुलाखाली, रेल्वेरूळांलगत राहणारे हे बांधव लॉकडाऊनने हादरले. त्यांच्या जीवावर चालणाऱ्या शहरांनी त्यांना परकं केलं. वाहतूकीची सर्व साधनं बंद असताना हजारो, लाखो कामगार, मजूर आपल्या गावी जाण्यासाठी पायीच निघाले. स्थलांतरीत कामगार, मजुरांच्या या प्रवासपर्वातील वेदनांनी अनेक संवेदनशील माणसंही गोठली.  त्यातील काही त्यांच्या मदतीसाठी धावून आली. यात ठळकपणे उठून दिसलं ते अभिनेता सोनू सूदने केलेले काम. आम्ही ज्या मजुरांना रस्त्यावर सोडले, हे तेच लोक आहेत ज्यांनी आमची घरे बांधली, ज्यांनी आमच्यासाठी रस्ते बनवले, याची जाणीव ठेवली पाहिजे म्हणत आपलं स्टारडम बाजूला ठेवत सोनू या कामगार, मजुरांच्या मदतीसाठी रस्यानववर उतरला. आपल्या या बांधवांना असे रस्याांवर सोडून देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून तो कामी लागला. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील सरकारकडून मजूर, कामगारांच्या प्रवासासाठी वाहने पाठविण्यासाठी प्रवासाची परवानगी घेतली आणि मुंबईतून देशाच्या पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या सर्व भागातील कामगार, मजूर खासगी बसने रवाना केले. प्रारंभी शेकडोत असलेला हा आकडा आता लाखांत गेला आहे.

या उपक्रमाची सुरूवात कशी झाली, याची माहिती सोनूने माध्यमांना दिली. तो म्हणतो, ‘टाळेबंदी सुरू झाल्यानंतर आम्ही महामार्गावर गरजूंसाठी अन्नदान करीत होतो. तेव्हा आम्हाला एक कुटुंब भेटले. ते कर्नाटकला जात होते. प्रवासाची कोणतीही साधनं नसल्याने ते कुटुंब शेकडो मैल पायी चालले होते. त्यांच्यासोबत लहान मुले होती. जवळ पैसे नाही, खाण्यासाठी कुठल्या चीजवस्तू नाहीत. या कुटुंबाला त्यांच्या गावी सोडण्यासाठी आपण सरकारकडून परवानगी का घेऊ नये, हा प्रश्न मनात आला आणि कामी लागलो. या परिवारास थांबवून घेतले आणि त्यांच्या प्रवासासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारची सर्व मंजूरी घेतली व त्यांना सोडून देण्याची व्यवस्था केली’. पहिल्यांदा ३०० लोकांना एकत्र पाठविले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू माझ्या कामाचे महत्व पटवून देत होते. त्यानंतर अशा अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी एक प्लॅन तयार केला आणि मोजक्याच लोकांपासून सुरू झालेले हे काम आता प्रचंड वाढले आहे.  सोनूला मित्रांची, कुटुंबाची मोलाची मदत या कार्यात होत आहे. सोनूची पत्नी सोनाली सूद, त्याचे मित्र आणि टीम अहोरात्र काम करीत आहे. मुंबईतील सर्व ठिकाणांहून लोकांना त्यांच्या घरी पाठवण्यास सुरवात केली. उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, पश्चिम बंगाल आदी सर्व सरकारशी सोनू स्वत: बोलला. प्रवासाची परवानगी, मजूरांची आरोग्य तपासणी, खाण्यापिण्याची व्यवस्था अशा अनेक अडचणींवर मात करीत सोनू सूद व त्याच्या टीमचे काम सातत्याने सुरू आहे. प्रत्येक गोष्टीसाठी शासनावरच विसंबून राहता येत नाही. मनाचा निश्चय, संवेदनशीलता आणि अडचणीत असलेले लोकही माणसंच आहेत, या भावनेतून त्यांच्याकडे माणूस म्हणून बघण्याची माणुसकी आपल्यात असेल तर या कामगार, मजुरांना त्यांच्या गंतव्यस्थानी सोडून देण्यात अनेक अडचणींवर मात करून आपण नक्कीच यशस्वी होऊ, हा विश्वास मोलाचा ठरला, असे सोनू सांगतो.

दररोज मदत मागणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पूर्वी वैयक्तिक फोनवरून हे काम करायचो, पण आता ते शक्य नाही. पहिल्याच दिवशी शेकडो कॉल आले. त्यामुळे आम्ही आता एक हेल्पलाइन नंबर सुरू केला. या नंबरवर काही तासातच ६० ते ७० हजार कॉल आमच्याकडे आले. आम्ही संपूर्ण यंत्रणा बनविली आहे. गरजू लोकांच्या मदतीसाठी दिवसाचे २४ तास देखील कमी पडत आहेत. करोनाच्या भयाने आणि घराच्या ओढीने जाताना अनेक कामगार, मजुरांचा अपघाती, चालण्यामुळे, आजारपणामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकून वेदना होत असल्याचे सोनू सांगतो. सरकारने नियोजनपूर्वक व्यवस्था केली असती तर या लोकांना घरी पोहचणे सुलभ झाले असते. किचकट फॉर्म भरण्यापेक्षा त्यांच्यासाठी हजारो किलोमीटर चालणे हा पर्याय सोपा आहे, म्हणून लोकं पायीच निघाले आणि पुढे काय घडले ते आपण पाहत आहोत. आई वडिलांच्या आशीर्वादामुळे मी हे काम सहज करू शकत आहे. मला कोणाकडून प्रशंसा नको. या समाजाचा घटक आणि या देशातील जबाबदार नागरिक म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडत आहो, बस्स! या विषयावर भविष्यात कोणी सिनेमा काढलाच तर त्यात माझी भूमिका मीच करणार, असेही सोनूने आत्ताच जाहीर करून टाकले आहे. या अनुभवातून दररोज नवीन गोष्टी शिकायला मिळत असल्याचे तो सांगतो. सोनू सूद आपल्या कार्याने आज रियल हिरो ठरला आहे.

(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक व वेब पोर्टलचे सहसंपादक आहेत)

९४०३४०२४०१

Previous articleमाईसाहेब : डॉ. आंबेडकरांच्या समर्पित जीवनसाथी
Next article सूर्यकांता पाटीलांची निवृत्ती आणि मराठवाड्याचं ‘न’  नेतृत्व…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.