-दिलीप चव्हाण
मागील पीढीच्या एक महत्त्वाच्या भारतीय इंग्रजी कवयित्री कमला दास यांनी “अॅन इन्ट्रोडक्शन” या शीर्षकाची एक कविता जवळपास पन्नास वर्षांपूर्वी लिहिली. भारतीय इंग्रजी कवितेत ही कविता मैलाचा दगड मानली जाते. पितृसत्ताक रचनेच अगदी नेमका वेध घेत स्वत:ची ओळख शोधण्याची प्रक्रिया कशी असू शकते याचा प्रत्यय ही कविता देते. “आय डोन्ट नो पॉलिटिक्स” या अतिशय भेदक आणि विडंबनयुक्त अशा ओळीने या कवितेची सुरूवात होते.
स्त्रियांचे व्यक्तिगत जीवन हे केवळ कौटुंबिक जीवन असते आणि अशा कौटुंबिक जीवनात राजकारण नसते, असे दीर्घकाळ मानले गेले. पुढे चालून स्त्रीवाद्यांनी “जे जे खासगी, ते ते राजकीय” अशी घोषणा दिली. यातून कौटुंबिक बाबींना खासगी संबोधून त्यांची बोळवण करण्याच्या प्रघाताला आव्हान दिले गेले. स्त्रीवाद्यांनी ही घोषणा करण्यापूर्वीच कमला दास यांनी ही जाणीव कवितेतून व्यक्त केली होती.
कमला दास यांच्यासारख्यांनी जी उग्रता या कविता आणि साहित्यामध्ये दाखविली त्याचा योग्य असा परिणाम भारतातभरातील स्त्रियांच्या लेखनावर झाला. अमृता प्रितम, कुरअतुल ऐन हैदर, इस्मत चुगताई, महाश्वेता देवी आदींच्या साहित्यातूनही नव्या विचार आणि संवेदनांची पेरणी केली गेली. स्त्रिया ह्या जेव्हा त्यांच्या कुटुंबाविषयी बोलतात तेव्हा त्या विशिष्ट अशा सत्तासंबंधांविषयी बोलत असतात आणि हे सत्तासंबंध सत्तेची संसद, विधीमंडळे यांसारख्या औपचारिक सत्ताक्षेत्रातील संबंधांइतकेच किंवा त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे सत्तासंबंध असतात. सारिका उबाळे यांचा ‘कथार्सिस’ हा कवितासंग्रह या पार्श्वभूमीवर आणि या परंपरेत मराठीच्या साहित्याच्या प्रांगणात दाखल होत आहे.
