‘कथार्सिस’- स्त्रीवादी जाणिवेचा कलात्मक आविष्कार

-दिलीप चव्हाण

मागील पीढीच्या एक महत्त्वाच्या भारतीय इंग्रजी कवयित्री कमला दास यांनी “अ‍ॅन इन्ट्रोडक्शन” या शीर्षकाची एक कविता जवळपास पन्नास वर्षांपूर्वी लिहिली. भारतीय इंग्रजी कवितेत ही कविता मैलाचा दगड मानली जाते. पितृसत्ताक रचनेच अगदी नेमका वेध घेत स्वत:ची ओळख शोधण्याची प्रक्रिया कशी असू शकते याचा प्रत्यय ही कविता देते. “आय डोन्ट नो पॉलिटिक्स” या अतिशय भेदक आणि विडंबनयुक्त अशा ओळीने या कवितेची सुरूवात होते.

स्त्रियांचे व्यक्तिगत जीवन हे केवळ कौटुंबिक जीवन असते आणि अशा कौटुंबिक जीवनात राजकारण नसते, असे दीर्घकाळ मानले गेले. पुढे चालून स्त्रीवाद्यांनी “जे जे खासगी, ते ते राजकीय” अशी घोषणा दिली. यातून कौटुंबिक बाबींना खासगी संबोधून त्यांची बोळवण करण्याच्या प्रघाताला आव्हान दिले गेले. स्त्रीवाद्यांनी ही घोषणा करण्यापूर्वीच कमला दास यांनी ही जाणीव कवितेतून व्यक्त केली होती.

कमला दास यांच्यासारख्यांनी जी उग्रता या कविता आणि साहित्यामध्ये दाखविली त्याचा योग्य असा परिणाम भारतातभरातील स्त्रियांच्या लेखनावर झाला. अमृता प्रितम, कुरअतुल ऐन हैदर, इस्मत चुगताई, महाश्वेता देवी आदींच्या साहित्यातूनही नव्या विचार आणि संवेदनांची पेरणी केली गेली. स्त्रिया ह्या जेव्हा त्यांच्या कुटुंबाविषयी बोलतात तेव्हा त्या विशिष्ट अशा सत्तासंबंधांविषयी बोलत असतात आणि हे सत्तासंबंध सत्तेची संसद, विधीमंडळे यांसारख्या औपचारिक सत्ताक्षेत्रातील संबंधांइतकेच किंवा त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे सत्तासंबंध असतात. सारिका उबाळे यांचा  ‘कथार्सिस’ हा कवितासंग्रह या पार्श्वभूमीवर आणि या परंपरेत मराठीच्या साहित्याच्या प्रांगणात दाखल होत आहे.

Sarika Ubale

‘स्त्रीवाद’ ही एक एकसंध अशी विचारप्रणाली नाही; तथापि याकडे स्त्रीवादाची मर्यादा म्हणून स्त्रीवादी बघत नाहीत. स्त्रीवादी चळवळीमध्ये एक विचारप्रवाह हा जहाल (रॅडिकल) स्त्रीवाद असा आहे. हा विचारप्रवाह असे मानतो की, पुरुष एक समूह म्हणून स्त्रियांच्या समूहावर वर्चस्व प्रस्थापित करतात. हे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पितृसत्ता ही एक संरचना आकारास आणली जाते. पितृसत्तेचं मूळ हे इतर कोणत्याही सामाजिक संरचनेत नाही, असं जहाल स्त्रीवाद मानतो. पितृसत्ता ही इतर कोणत्याही व्यवस्थेची उपपत्ती आहे, असे जहाल स्त्रीवाद मानत नाही. उदाहरणार्थ, पितृसत्ता ही भांडवलशाहीची देण आहे, असं जहाल स्त्रीवाद मानित नाही. पितृसत्ता ही जवळपास सर्वच मानवी समुदायांमध्ये भांडवलदारी समाज उदयाला येण्यापूर्वीपासून अस्तित्वात आहे, असे हा विचारप्रवाह मानतो.

जहाल स्त्रीवाद्यांनी स्त्रियांच्या दमनशोषणासाठी विवाहसंस्थेला जबाबदार धरलेले आहे. विवाहसंस्था ही पितृसत्ताक कुटुंबसंस्थेच्या पुनरुत्पादनाचे कार्य करते. कुटुंबसंस्थेद्वारे स्त्रियांचे गृहिणीकरण साधले जाते आणि त्यातून विशिष्ट अशा पितृसत्ताक हितसंबंधांनी विणलेल्या दमनकारी नातेसंबंधांच्या पायाशी स्त्रियांच्या आजन्म जखडलेपणाची हमी मिळविली जाते.

स्त्रियांचे शरीर, त्यांचे खासगीपण, त्यांची लैंगिकता यांवर मालकीहक्क प्रस्थापित करून पुरुषांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या संपूर्ण प्रक्रियेत हिंसेचा वापर करण्यात आला. जहाल स्त्रीवादाने सामाजिक चर्चाविश्वात स्त्रियांच्या जीवनातील व्यक्तिगत बाबी आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत स्त्रियांचे खासगी अनुभवविश्व हे या चर्चाविश्वाचा भाग समजले गेले नव्हते. अशावेळी ‘खासगी’ समजल्या गेलेल्या अनुभवांचे खासगीपण प्रश्नांकित करून त्यांनी स्त्रियांचे जीवन हे त्यांच्या खासगीपणासह या चर्चाविश्वाचा भाग बनविले. या कवितासंग्रहातील कविता ही या जाणीवेतून लिहिली गेली आहे. कवीला स्त्रीदेहाविषयी विशिष्ट अशी जाणीव आहे.

शरीर आणि मनाबाबत एक पारंपरिक धारणा आहे. ती अशी की मन हे नियंत्रित करणारी शक्ती असून शरीर हे केवळ निष्क्रीय प्राप्तकर्ता असे मानले जाते. मन आणि शरीर यामंध्ये शरीराला गौण लेखण्याच्या या धारणेला तत्त्वज्ञानाच्या प्रांतात जॅक देरिदा आणि मिशेल फुको यांच्यासारख्या विचारवंतांनी आव्हान दिले. फुको यांनी असे मांडले की, शरीर हे सर्व प्रकारच्या पीडनाचे लक्ष्य बनते आणि त्यासाठी समाजात तुरुंग, इस्पितळे, सैन्यदले, शाळा अशा शिस्तीकरण साधणार्‍या दमनकारी राजवटींचा साधन म्हणून वापर केला जातो. फुको यांनी स्त्रियांच्या शरीराबाबत फारसे लिहिले नसले तरी स्त्रीवाद्यांनी फुकोची भूमिका पुढे नेत असे मांडले की, कुटुंबाच्या राजवटीत स्त्रीचे शरीर हे पितृसत्ताक सत्तेच्या राजकारणाचे क्षेत्र बनते. नाजूक, पुरुषांच्या लैंगिक भावना चाळविण्यासाठी पात्र असलेले, मोहक, मादक पण विनयशील असे स्त्रीशरीर घडविणे हे अशा कुटुंबाचे कार्य असते. फुको यांच्या मते, सत्ता स्थापित करण्यात आणि ती प्रदर्शित करण्यात आणि या सत्तेचा प्रतिरोध करण्याचेही महत्त्वाचे साधन हे शरीर बनते. स्त्रियांचे व्याख्यांकन करताना त्यांचे शरीर हे मध्यवर्ती बनविले जाते आणि पितृसत्ताक हेतूंच्या पूर्तीसाठी स्त्रीशरीर हे साधन केले जाते आणि त्यासाठी ते नियंत्रितही केले जाते. स्त्रिया आणि पुरुषांच्या व्यक्तित्वाची (subjectivity) जडणघडणीत शरीर हे गुंतलेले असतेच; रोजच्या जीवनाचे ताणेबाणे

स्त्रीवादाच्या दुसर्‍या लाटेत शरीराबाबत अधिक सिध्दांतन केले गेले. पुरुषी नजर, (male gaze), पुरुषी वासना, सौंदर्यप्रसाधन उद्योग, (फॅशन उद्योग, स्लिमिंग उद्योग इत्यादी), हिंसा, वर्गोन्नत कुटुंबाची प्रतिमा आणि उपभोगवादाशी जोडले गेलेले जाहिरातीचे विश्व, चित्रपट उद्योग, दूरचित्रवाहिन्या यासंबंधीच्या गरजपूर्तीसाठी स्त्रीशरीर हे साधनरूप केले जाते. सारिका उबाळे यांची कविता स्त्रीशरीर हे पुरुषी देखरेख (कधी कुठे कसा मोबाईल कॅमेरा /  पाहात असेल नकळत… / कधी कुठले सीसीिटहीज  / असतील पाळत ठेऊन / कुठे कधी कसेही होतील / िलक आपले अवयव / िवकया जातील, हायरल होतील फुटेज / ही भीती सतत..) कुटुंबांतर्गत बलात्कार (बाई.. सोसत राहते मकुाट / अनेक संभोग झिरो लाईटकडे पाहात, / डोळे िमटून. .. अथवा / स्लॅब कडे पाहात) आणि कौटुंबिक यांत्रिक श्रम (पोळ्या लाटत राहातात बाया / थापत राहातात भाकरी / रपारपरपारपरपारपरपारप / कणिक-पाणी, पीठा-मीठासोबत / स्वतःला मळून घते / गोलाकार गोलाकार गोलाकार गोलाकार)  यांमध्ये कसे पिचून निघते याचा प्रत्यय आणून देते.

स्त्रीवादामध्ये अलीकडे देहाविषयी सघन असे सिद्धांतन सुरू आहे. स्त्रीदेह हा सर्व प्रकारच्या भोग (उपभोग्यपण), यातना, इच्छा, छळ, वासना यांचे लक्ष्य आणि वहन करणारे साधन आहे. स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील ताणेबाणे, संघर्ष, विविध प्रकारची हिंसा, अवहेलना, पुरुषांकडून होत असलेली सौंदर्यधारणा (ज्यामध्ये सुप्त अशी हिंसा आणि भोगलालसा दडलेली असते) यांचे व्रण हे शेवटी मनावर जसे उमटतात तसे शरीरावरही उमटतातच. सारिका उबाळे यांच्या कवितेत विलक्षण अशी देहजाणीव, देहनिष्ठा आणि त्यासंबंधी स्वातंत्र्य व स्वायत्ततेची प्रखर अशी आस दिसून येते.

स्त्रीचे शरीर हे ‘दिलेले’ अथवा केवळ ‘नैसर्गिक’ असे केवळ नसते; तर ते फॅशन, उपभोगवाद आणि विशिष्ट अशा साचेबद्ध लैंगिक भूमिकांशी समरूप राहील अशा रितीने घडविले जाते. जी आदेशात्मक सत्तारचना पितृसत्ताक समाजात अस्तित्वात असते तिला बळकटी आणण्यासाठी शरीर हे लिंगभाव, वंशवाद आणि वर्गवाद यांनी कलंकित केलेले एक रचित बनते. पितृसत्तेचा प्रत्यक्ष शारीरीय आघात हे स्त्रीशरीरच झेलत असते. त्यामुळे, पितृसत्ताक सत्ताकारणाची प्रत्यक्ष रणभूमी म्हणूनही स्त्रीशरीराकडे पाहता येते. पितृसत्तेची चौकट ही भरभक्कम पोलादी अशी असेल तर स्त्रीदेह हा पुरुषी हिंसेचा केवळ निष्क्रीय प्राप्तकर्ता बनून राहतो. या संग्रहातील ‘शवासन’ ही कविता याची अनुभूती देते.

सामाजिक विज्ञानामध्ये अलीकडच्या काळात ‘कौटुंबिक क्षेत्र’ व ‘सार्वजनिक क्षेत्र’ या संकल्पनांबाबत नवी मांडणी करण्यात आलेली आहे. ‘कौटुंबिक क्षेत्र’ हे राजकारणविहीन असते; तर ‘सार्वजनिक क्षेत्र’ हे राजकीय स्वरूपाचे आणि सत्तासंबंधांच्या उभ्या-आडव्या धाग्यांनी विणलेले असते, असेही गृहीतक निर्माण झाले. एका बाजूला सार्वजनिक क्षेत्राची जी चर्चा होते त्यातून स्त्रीप्रश्नाला वगळले जाते. दुसर्‍या बाजूला कौटुंबिक क्षेत्राची जी चर्चा झाली ती चर्चा कौटुंबिक संबंध हे अंत:स्थरित्या राजकीय किंवा सत्तासंबंध असतात याकडे दुर्लक्ष केले जाते.

स्त्रिया आणि पुरुषांसाठी अनुक्रमे ‘कौटुंबिक’ आणि ‘सार्वजनिक’ क्षेत्र यांच्या साचेबद्ध रचना ह्या स्त्री आणि पुरुषांबाबतच्या साचेबद्ध प्रतिमा, भूमिका आणि धारणा निर्माण करतात आणि दृढ करतात. गृहिणी जन्माला येत नाही; तर ती घडविली जाते याचा अर्थ असा की, गृहिणी या संकल्पनेबाबतच्या धारणा आणि रितीभाती यांचे समाजात सातत्यपूर्ण उत्पादन आणि पुनरुत्पादन सुरू असते. एखाद्या घटिताच्या सातत्यपूर्ण अस्तित्वासाठी त्या घटिताचे अव्याहतपणे पुनरुत्पादन आवश्यक असते. घटिताच्या अशा अव्याहत पुनरुत्पादनासाठी अशा घटितांच्या अस्तितासाठी आवश्यक असलेल्या पूर्वअटींचे पुनरुत्पादन आवश्यक असते, असे लुई अल्थुझर यांनी मांडले. अशा पूर्वशर्तींचे पुनरुत्पादन हे धर्म, संस्कृती, परंपरा, रीतीभाती, व्रतवैकल्य, कर्मकांड, धारणा इत्यादींद्वारे शक्य केले जाते. गृहिणी या संस्थेचे पुनरुत्पादन हे याच प्रक्रियेतून शक्य केले जाते आणि कुटुंब हे या पुनरुत्पादनाचे इप्सित स्थळ बनते. कुटुंब या संस्थेचा उदय हा पितृसत्तेच्या उदयासोबतचा आहे आणि कुटुंब या संस्थेचे राजकीय कार्य हे पितृसत्तेच्या व्यापक अस्तित्वासाठी आवश्यक अशा पूरक परिस्थितीचे निर्माण करणे हे आहे.

आधुनिक काळात स्त्रियांसाठी अभिव्यक्त होण्याच्या आणि स्वविकासाच्या नवनव्या संधी जरी निर्माण होत असल्या तरी त्यांची ‘गृहिणी’ म्हणूनच्या घडवणूकीची प्रक्रियादेखील नित्यपणे सुरुच असते. आधुनिक काळातील स्त्रीचा प्रवास हा ‘गृहिणी’ ते ‘सुगृहिणी’ असा घडला.  विशेषत:, कनिष्ठ मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय स्त्रियांवर कुटुंबातील शोभेची वस्तू, कुटुंबाची आधुनिक पद्धतीने देखभाल करणारी, पतिपरायणता निष्ठेने जोपासणारी आणि अपत्यांचे पारंपरिक व आधुनिक पद्धतींनी संगोपन करणारी ‘कर्तबगार’ गृहिणी बनण्याची जबाबदारी येऊन पडली. अशा सुगृहिणीने त्याग, समर्पण, प्रेमळपणा, आत्मक्लेश, कारुण्य, सेवकवृत्ती ही मूल्ये जापासली पाहिजे, ही अपेक्षा केली गेली. अशा ‘सुगृहिणी’ या संकल्पनेस अननुरूप असलेल्या स्त्रिया ह्या पुरुषांकडूनच नव्हे तर स्त्रियांकडूनही कठोर टीकेच्या लक्ष्य केल्या जातात. या संग्रहातील ‘शूचिर्भूत’ ही कविता स्त्रीजीवनातील ही ससेहोरपळ व्यक्त करते. या कवितेत ‘गृहिणी’ या संकल्पनेस अनुरुप असलेल्या आणि या संकल्पनेशी विसंगत असलेल्या स्त्रियांच्या जीवनदृष्टींमधील फरक व्यक्त केला आहे.

स्त्रीवाद्यांनी पुरेशा व्यासंगाने हे मांडले की, कौटुंबिक संबंध हे प्राय: सत्तासंबंधच असतात आणि सार्वजनिक क्षेत्रातील सत्तासंबंधांएवढेच हे संबंध क्लिष्ट असतात. या संबंधांची चर्चा तितकाशा खुलेपणाने न केली गेल्यामुळेदेखील कौटुंबिक क्षेत्रातील संबंध हे दुर्लक्षिले गेले.

स्त्रियांचे कुटुंबाप्रतीचे जखडलेपण हे कुटुंबाप्रती एक प्रकारची विनयशीलता, शरणागतता, पावित्र्य आणि पूज्यभाव निर्माण करून करण्यात आले. धर्मशास्त्रे, तत्त्वज्ञाने, शासकीय धोरणे, कामगार चळवळी आणि अगदी आधुनिक समाजशास्त्राची पुस्तके या सर्वांमधून कुटुंब या संस्थेला एक प्रकारचे आदर्शत्व चिकटवले गेले. कुटुंब ही चिकित्सेची बाब न बनता ती जोपासणूक करण्याची, गोंजारण्याची आणि फुलविण्याची बाब बनली. जहाल स्त्रीवादाने स्त्रियांचे हे कुटुंबाप्रती असलेले जखडलेपण प्रश्नांकित केले. कुटुंब हे प्राय: पितृसत्ताक मूल्ये आणि संरचना यांच्या पुनरुत्पादनाचे साधन असल्यामुळे स्त्रियांनी कुटुंबसंस्थेच्या ठायी असलेल्या जखडलेपणाला आव्हान देवून सार्वजनिक अवकाशावर दावा केला पाहिजे.

स्त्रिया ह्या एकसंध समूह नसून त्या धर्म, वर्ग, वंश आणि भारतासारख्या देशामध्ये जातीने विभागलेल्या आहेत हे अलीकडच्या काळात स्त्रीवाद्यांमध्ये मान्य होत असलेले सत्य आहे. अर्थात, असा बदल होत असला तरी विविध वर्ग, धर्म, जात किंवा वंशांमध्ये विभागलेल्या स्त्रियांचे ‘स्त्री’ म्हणूनच्या असण्यात बरेचसे साम्यही बहुल रूपात दडलेले आहे. वर्ग, धर्म, जात आणि वंश यांनी तयार केलेले भेद हे जणुकाही बाह्यात्कारी भेद बनतात आणि या सर्व समूहांमध्ये पितृसत्ताक दाहाची सामायिकता सापेक्ष रूपात अस्तित्वात राहतेच. प्रस्तुत कवितासंग्रहात कवयित्रीची ही जाणीव तीव्ररूपात दिसून येते. स्त्रिया ह्या वर्ग, धर्म, जात आणि वंश यांमध्ये जरी विभागलेल्या असल्या तरी या सर्व समूहांना व्यापून असलेली कुटुंबांची सामायिकता स्त्रियांच्या ‘स्त्री’ म्हणूनच्या जगण्याला एकत्व बहाल करते. या कवितासंग्रहातील “एक दोन तीन / दहा वीस पन्नास / शेकडो हजारो लाखो / अगणित अगणित बाया”  ह्या बाया असे वर्ग, धर्म, जात आणि वंश असे भेद बाजूला सारून अनुभवाचे एकत्व साधतात. दिवस सरत जातात / उन्हं चढत जातात / शिराळ सावल्या उतरत / रात्री पसरत जातात / बायाबायांवर / नवरे चढत जातात / पसंतीचे, नापसंतीचे / होकाराचे, नकाराचे / निचेष्ट निपचित अविचल / शिथिल शिथिल” हा अनेक स्त्रियांचा अतिखासगी अनुभव जात, वर्ग नि वंशाचे भेद भेदून जगभरातल्या स्त्रियांसाठी एक सामायिक अनुभव बनतो. स्त्रियांच्या अनुभवातील ही वर्गवंशातीत सामायिकता या खासगीपणात दडलेली सार्वजनिकत्व पुढे आणते.

स्त्रियांचे जीवन हे एकसंध वा साचेबद्ध असे अजिबातच नाही. त्यांच्या जीवनात येणारे अनुभव हे अतिशय व्यामिश्र स्वरूपाचे आहेत. बाई म्हणूनचे सामायिकत्व आणि बाई म्हणूनचे भिन्नत्व हे एकाच वेळी स्त्रिया अनुभवत असतात. मुलगी, बहिण, पत्नी, मैत्रीण, नोकरदार अशा विविध भूमिकांमध्ये ती वावरत असते. खोटी प्रतिष्ठा, खोटे प्रेम, अवहेलना, हिंसा, शालीनतेची झूल, बलात्कार, नकोसा शरीरसंबंध अशा अनुभवांचा विस्तृत असा पट  या कवितांमधून पुढे येतो. या कवितामधून व्यक्त होत असलेल्या स्त्रीजीवनातदेखील कमालीचे वैविध्य आहे. अन्याय मुकाट्याने सहन करीत बसलेल्या स्त्रिया, गृहिणी म्हणूनच्या आदर्शत्वात स्वत:ला पक्के बसविण्याचा मनोमन प्रयत्न करणार्‍या स्त्रिया, “चल ही व्यवस्थेची उतरंड फोडत जाऊ आपण” अशा शब्दांत प्रियकराला साद घालणार्‍या प्रेयसी, धर्मांची चिकित्सा करणार्‍या स्त्रिया, आपलं लैंगिक दमन नानाविध मार्गांनी भोगत राहतार्‍या स्त्रिया अशा अनेक रूपांतील स्त्रीजीवन या कवितांमधून अभिव्यक्त झालेले आहे.

स्त्रियांचे दैनंदिन जीवन हे या कवितेचा नित्यविषय आहे. धर्म, संस्कृती, जातिव्यवस्था, भांडवली बाजार यांनी जे स्त्रीत्व साकारले आहे त्या स्त्रीत्वाचे स्त्रीपण हे स्त्रियांच्या दैनंदिन जीवनात ढळढळीत रूपात दिसून येतं. अलीकडच्या काळात सामाजिक विज्ञानात ‘दैनंदिन जीवन’ (everyday live) या संकल्पनेचं सिद्धांतन केले जात आहे. मोठ्या प्रमाणावरील अध्ययनानंतरही ‘दैनंदिन जीवन’ हे संदिग्ध स्वरूपाचे समजले जाते, ही एक समस्या अजून अभ्यासकांसाठी उलगडले नाही. तसेच, दैनंदिन जीवनाचे अतिसाधारण रूप, रुळलेली आणि मनोमन स्वीकारली गेलेली गृहीतके, अतिपरिचयातून घडत असलेले अनुभवांचे सामान्यीकरण, दैनंदिन जीवनातील अनैसर्गिक घडामोडींचे ‘कॉमन सेन्स’च्या आधारे घडत जाणारे नैसर्गिकीकरण ह्या बाबी दैनंदिन जीवन समजून घेण्यात महत्त्वाच्या ठरतात. संकल्पनात्मक संस्कृती ही प्रत्यक्ष भौतिक सामाजिक संरचनेचे रूप कसे धारण करते, हे जाणण्यासाठी दैनंदिन जीवन महत्त्वाचे असते. हे जीवन व्यक्तीचा सामाजिक संरचनेशी असलेल्या नात्याची रूपरेषा समजून घेण्यास सहाय्यभूतही ठरत असते. व्यक्तीचे विशिष्ट अशा विचारसरणीने भारीत असलेल्या आणि विशिष्ट अशी मूल्यरचना आत्मसात केलेल्या व्यक्तिमत्त्वात रूपांतरण घडवून आणण्याचे क्षेत्र हे दैनंदिन जीवन आहे. व्यक्तीचे दमन, शोषण, अंकितीकरण आणि घडवणूक ही दैनंदिन जीवनातील साधारण भासणार्‍या अशा घटना आणि घडामोडींतून साधले जाते.

असे अभ्यासकांनाही अंशत: अनाकलनीय राहिलेले ‘दैनंदिन जीवन’ समजून घेण्यासाठी सारिका उबाळे यांचा हा कवितासंग्रह एक महत्त्वाचे संसाधन ठरू शकते. एक जाणीवजागृत स्त्री जेव्हा स्त्रियांच्या अनुभवाला सर्जनशीलतेच्या आधारे शब्दबद्ध करते तेव्हा ती या साधारण, नित्याच्या आणि अतिसुमार वाटणार्‍या अनुभवांच्या आड लपलेल्या किंवा अकारण गौरविल्या गेलेल्या, अलंकृत केल्या गेलेल्या आणि आदर्शीकृत स्त्रीजीवनात अदृश्य केल्या गेलेल्या अनुभवांच्या भेसूरपणाची आणि नागवेपणाची उसवणूक करीत असते. स्त्रियांच्या जीवनात असलेल्या श्रमाची यांत्रिकता, नात्यांचा कृत्रिम आणि शुष्क बाजार, इतरांकडूनच्या प्रेम आणि ओलसरपणाचा अभाव याची अतिशय तरल अशी मांडणी सारिका उबाळे यांच्या कवितांमध्ये प्रत्ययाला येते. जात्याच अनैसर्गिक असलेल्या बाबींचे नैसर्गिकीकरण करूनच प्रभुत्त्वाची निर्मिती होत असते, असे अ‍ॅण्टोनिओ ग्राम्शी यांनी मांडले आहे.  अशा नैसर्गिकीकरण करण्यात आलेल्या स्त्रीजीवनातील नित्याच्या बाबींचा उलगडा होण्याचा आणि त्यामध्ये लपलेल्या पितृसत्ताक हितसंबंधांचे आकलन झाल्याचा अनुभव ही कविता वाचकाला देते, हे या कवितेचे महत्तम बलस्थान आहे. मराठी कवितेत अशी उपलब्धी एखाद्या कवीच्या वाट्याला येणे, ही बाब दुर्मिळ आहे.

ह्या कविता वाचताना भयभित व्हायला होतं! आपली आपल्यालाच घृणाही वाटायला लागते. वाचताना आपण आपोआपच अंतर्मुख होत जातो आणि स्वचिकित्सा करायला लागतो.या कवितेतील साकारले गेलेले अनुभवविश्व हे व्यक्तिगत अनुभवविश्व म्हणून एखाद्या स्त्रीचे जरी वाटत असले तरी ही स्त्री एखादी विविक्षित स्त्री राहत नाही. ती तिच्या अवतीभवती असलेल्या आणि नसलेल्या अगणित स्त्रियांची प्रतिनिधी बनते. एकाचवेळी ती एखादी विविक्षित स्त्री असणे आणि समग्र स्त्रियांचे प्रतिनिधीही असणे, हे कवयित्रीच्या समष्टीशी असलेल्या बांधिलकीतून शक्य झालेले आहे. या कवितेत स्त्रीचे खासगीपण सामुदायिक स्त्रीअनुभवात विरघळून जाते आणि स्त्रीचा सामुदायिक अनुभव हा अंतिमत: तिचा खासगी भोगवटा असतोच असतो. अनुभवाचा हा खासगी ते सामुदायिक आणि सामुदायिक ते खासगी असा प्रवास वाचकांना केवळ अस्वस्थच करेल. स्त्रीजीवनातील दु:खाची आणि दमनाची दाहकता व तीव्रता ही अतिशय अलवारपणे आणि सुक्ष्मतेत जाऊन शब्दबद्ध करण्याची कला कवयित्रीने दाखविली आहे. अनुभवाची तरलता अभिव्यक्त करण्यासाठी आवश्यक अशी शब्दकळा त्यांच्याकडे आहे. ही शब्दकळा शोधण्यासाठी त्यांना स्वैरभैर व्हावे लागले नाही. रोजच्या जीवनाशी त्यांची असलेली तादात्म्यता आणि एकंदरच स्त्रीजीवनाशी असलेले जैविक नाते यातून ही शब्दकळा अलगदपणे कवितेत अवतरलेली आहे.

पारंपरिक कविंप्रमाणे प्रतिमांची सृष्टी न उभारता प्रतिकात्मका निर्माण करण्यासाठी लागणारी शब्दकळा ही कवयित्रीने जीवनानुभवातून कमावलेली आहे. कवयित्रीच्या मनातील घालमेल, कासाविस, स्वपीडण, संताप, प्रस्थापित व्यवस्थेविषयी असंतोष, दंभस्फोट करण्याची आतुरता, स्वत:ला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची तयारी, इतर स्त्रियांच्या पराकोटीच्या सोशिकतेविषयीची चीड, पारंपरिक नात्यांच्या जाळ्याला नाकारत शाश्वत अशा प्रेमाचा आणि प्रियकराचा शोध घेण्याची आंतरिक उर्मी, उसवलेले जीवन पुन्हापुन्हा विणू पाहणार्‍या आपल्या अवतीभोवती सामान्यपणे हिंडणार्‍या-फिरणार्‍या स्त्रियांच्या जीवनातील अलौकिकत्व शोधण्याची तयारी, हे सारंच वाचून आपण विषण्णही होतो आणि समृद्धही! वाचकाला अशी अंतर्विरोधमय अनुभूती देण्यासाठी वापरण्यात आलेल्या शब्दयोजनेत अभिनवता आणि प्रयोगशीलता या कवितेत नैसर्गिकपणे अवतरलेली आहे.

स्त्रीजीवनाचा अवास्तव गौरव करण्याचे कवयित्रीने टाळलेले आहे. स्त्रिया पितृसत्ताक जाणीवेच्या वाहक केल्या जातात आणि म्हणूनच स्त्री-पुरुष असे निरामय आणि निकोप संबंध प्रस्थापित करायचे असतील तर यासाठी स्त्रियांच्या जाणीवा बदलल्या पाहिजे हे जे भान स्त्रीवादी चळवळीला आले ते भान कवयित्रीलादेखील आहे. म्हणून या कवितासंग्रहात आत्मटीकेचा स्वर हा दृगोचर होतो. “”मै नफरत करती हं  ऐसी औरतो से” / “आय हटे दिज लेडीज” / मी घृणा करते माझीच / जी ओळखू शकली नाही / इतकी वर्षे  / माझ्या आत लपलेल्या / मुक्त अभिसारिकेला” ह्या ओळी या आत्मटीकेची साक्ष देतात.

शोषणव्यवस्थेविरोधात विद्रोह वगैरे करणार्‍या स्त्रिया या कवितासंग्रहात फारशा दिसत नाहीत. स्त्रिया जशा आहेत तशा आणि स्त्रीजीवन जसे आहे तसे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कवितासंग्रहात दिसून येतो. सत्तेला आव्हान देण्यासाठी सत्तेची विण उकलावी लागते. असे उकललेपण हे सत्तेला प्रश्नांकित करण्याचा एक अविभाज्य आणि अपरिहार्य भागच असतो, असे मिशेल फुको यांचं मत इथे विशेष प्रस्तुत आहे.

विद्रोह करणार्‍या स्त्रियांची जी अनुपस्थिती या कवितासंग्रहात दिसत आहे ती प्राय: समकाळातील पितृसत्तेची सरशी दर्शविते. जागतिकीकरणाच्या काळात स्त्रियांना पुन्हा एकदा घरांमध्ये बंदिस्त करणार्‍या सांस्कृतिक राष्ट्रवादाची जगभर सरशी होत आहे. हा राष्ट्रवाद स्त्रियांच्या ‘गृहिणी’ म्हणूनच्या भूमिकेचे गौरवीकरण आणि आदर्शीकरण करीत आहे. स्त्रीवाद्यांनी तळहातावर शीर घेऊन स्त्रियांच्या हक्कांची बाजू लढविली असताना ‘मी स्त्रीवादी नाही’ असे आवर्जून सांगण्याची फॅशन नव्या मुलींमध्ये रूढ झालेली आहे. पर्यायी विचार मांडणार्‍या वर्गविरोधी, जातीविरोधी, पर्यावरणवादी चळवळींनादेखील प्रचलित पितृसत्ताक कुटुंबपद्धतीला सुयोग्य असा पर्याय विकसित करण्यात यश आलेले नाही. अशा काळात भांडवली बाजाराने उपलब्ध केलेल्या करिअरच्या व्यावसायिक जगात आपले कर्तुत्व सिद्ध करण्यापलीकडे स्त्रियांना कोणताही ध्येयवाद दिला जात नाही. स्त्रीशिक्षणाच्या मुळाशी स्त्री-पुरुष समतेची ही भांडवली कृतक् धारणा कार्यरत आहे. अशी नवशिक्षित स्त्री एका बाजूला  तिच्या वर्गोन्नत स्थानाला अनुरुप अशी आधुनिकता स्वीकारित आहे; तथापि या आधुनिकतेला जखडलेले पितृसत्तेचे नवे रूपही ती आनंदाने आणि स्वेच्छेने स्वीकारित आहे. या पितृसत्तेने आधुनिकतेला कसे कृतक् केलेले आहे, हे जाणण्याची क्षमता आधुनिक म्हणविल्या जाणार्‍या या स्त्रीमध्ये निर्माण करण्यात आलेली नाही. अशा सर्वव्यापी पडझडीच्या काळात आपल्या अवतीभोवती दिसत नसलेली ‘विद्रोही’ स्त्री कल्पनेतून चित्तारणे, हे कवयित्रीने स्वत: स्वीकारलेल्या जीवननिष्ठेला विसंगत आणि अप्रमाणिकपणाचे वाटते. याऐजवी, स्त्रीजीवनाचे विविध पदर हे हळूवारपणे पण तसेच कणखरपणे आणि योग्य ते धैर्य दाखवून उलगडविण्याकडे कवयित्रीचा कल आहे. याचा अर्थ या कवितेतील स्त्री ही नेहमीच तिचे ‘कर्तेपण’ नाकारून ‘बळी’ या प्रारुपातच बंदिस्त आहे असे नाही. …. या कवितेत कवितेची नायिका पितृसत्ताक धर्माची परखडपणे चिकित्सा करते आणि प्रसंगी पारंपरिक कवितेत अप्रस्तुत आणि अश्लाघ्य मानली गेलेली ‘मोडा’, ‘तोडा’, ‘जाळा’ अशी उग्र आणि निर्भिड भाषा वापरून स्त्रियांच्या कर्तेपणाला साद घालते.

अलीकडे ग्रामीण / दलित सुशिक्षित / नोकरदार कवी हे ते ज्या समाजघटकांशी बांधिलकी मानतात त्यांना उपदेश करण्याकडे कल आहे. असमज / अज्ञानी समाजबांधव आणि प्रबोधक / मार्गदाता कवी असे काहीसे चित्र मराठी कवितेच्या प्रांतात तयार झालेले आहे. या संग्रहातील कविता ही अशी उपदेशपर नाही. कवयित्रीची मूलप्रवृत्ती ही चिकित्सा करण्याची आणि सत्तेचे अदृश्यीकरण केलेले अंतरंग अलवारपणे दृश्यमान करण्याची आहे. दुसर्‍या बाजूला नवदोत्तरी महानगरीय कवी आणि स्वयंप्रज्ञ कवी हे कोणतीही वैचारिक अथवा सामाजिक बांधिलकी झिडकारून भांडवली बाजाराने आणि उपभोक्तावादाने पोसलेले ‘मीपण’ मिरवित आहेत. समष्टीशी बांधिलकी मानायची नाही; परंतु त्या समष्टीवर तिरसट आणि व्यक्तिनिष्ट लहरी टिपण्णी करण्याकडे या नवकवींचा कल आहे. त्यातून निर्माण होणार्‍या विसंगतींना सामोरे जाण्याची जबाबदारी आपली नाही, असा समज या नवकवींनी बुद्ध्याच करून घेतला आहे. समकालीन समाजातील मूलभूत अंतर्विरोध ज्या अचूकतेने सत्तरीतील कवी दाखवू शकले ती अचूकता हे नवकवी गमावताहेत. “आम्हाला जे वाटतं ते आम्ही लिहू” असा काही आत्ममग्न आणि दर्पयुक्त स्वर काढण्याकडे या कविंचा कल आहे. जागतिकीकरणात निर्माण झालेली भयव्याकुळता, परात्मता, सीमांतीकरण, शोषणाच्या नवनव्या तर्‍हा यांचे वर्णन आणि तेही कृतक् भाषेत करण्यापलीकडे या कवींची झेप नाही, अशी अवस्था आज झालेली आहे. जागतिकीकरणाने पोसलेल्या समाजविन्मुखतेबाबत दुर्बोध भाषेत टिपण्णी करायची; पण स्वत: ती समाजविन्मुखता जोपासायची, या द्वैतावर ही नव्वदोत्तरी / शहरी-मध्यमवर्गीय कविता आणि कविंचा व्यवहार वसलेला आहे. ‘स्वयंभू’ आणि ‘स्वायत्तता’ या भ्रांत कल्पनांना कवटाळल्यामुळे समाजातील मूलभूत अंतर्विरोधांचा वेध घेण्याची क्षमता हे कवी गमवताहेत.  याविषयी त्यांना जाणीव नसते आणि ती जाणीव आली तरी बेधुंद आत्ममग्नतेत त्या जाणिवेचा लोप होतो. या पार्श्वभूमीवर सारिका उबाळे पितृसत्तेची उकल करण्याच्या किमानपक्षी ध्येयवादाने भारित आहे. कोणत्याही बांधिलकीकडे ‘ओझे’ आणि ‘मर्यादा’ मानणार्‍या समकालीन कविंच्या आवाजी गदारोळात उबाळे यांची कविता तिच्या मर्यादांसह बांधिलकी आणि परिवर्तनावर विश्वास ठेवून आपल्यालाही विचार आणि कृतीप्रवण होण्यास नि:संशयपणे प्रवृत्त करेल.

भारतीय अथवा जागतिक स्त्रीप्रश्न हा जसा सुलभ अथवा ठोकळेबाज नाही तसेच त्याचे आकलन अथवा निराकरणदेखील तसे सरधोपट मार्गाने होणार नाही. पितृसत्ता ही कुटुंब आणि कुटुंबाबाहेर सुक्ष्मरूपात अस्तित्वात असते. पितृसत्तेचे असे सुक्ष्मरूप तिची व्यामिश्रता दर्शविते. प्रस्तुत कवितासंग्रहात पितृसत्तेचे हे सुक्ष्मतम संदर्भ अतिशय तरलतेने बघायला मिळतात.

पितृसत्ता ही एकसूरी, एकसाची आणि एकखांबी अशी व्यवस्था नसून ती अतिशय गुंतागुतीची, व्यामिश्र आणि जगव्याळ अशी व्यवस्था आहे. त्यामुळे स्त्रीमुक्तीचा प्रश्न हा पितृसत्तेवर कुठलातरी घणाघाती हल्ला करण्यातून किंवा कुठलीतरी दिखाऊ अशी भव्यदिव्य कृती करण्यातून सुटणारा नाही. पितृसत्ता ही जशी समग्रलक्षी आणि स्थूलरूपात समजून घ्यावी लागेल तशीच ती सुक्ष्मरूपात आणि व्यक्तिनिष्ठ अशा अनुभवविश्वातूनही समजून घ्यावी लागेल. सारिका उबाळे यांच्या कविता वाचणे हे एक प्रकारे पितृसत्तेचे असे समग्रलक्षी आणि सुक्ष्मलक्षी अध्ययन करण्यासारखे आहे. स्त्रीजीवनातील व्यामिश्रता हे त्यांच्या कवितेचे एक प्रधान वैशिष्ट आहे. त्यांच्या कवितेत मध्यमवर्गीय एकसूरी अनुभव जगणार्‍या बायका जशा दिसतात तशाच या कवितेत ‘भ्रमिष्ट बायका’, ‘लोकलमधल्या बायका’, ‘गावाबाहेरच्या बायका’, ‘सिग्नलवरच्या बायका’, ‘लुटलेल्या बायका’, ‘लाचार बायका’, ‘दैवी बायका’, ‘पाठमोर्‍या बायका’, ‘चिरक्या घोगर्‍या बायका’, ‘बुरख्यातल्या बायका’, ‘बसमधल्या बायक्या’, ‘बिनचेहर्‍याच्या बायका’ अशी बायकांची नानाविध रूपे दिसतात. अर्थात कवयित्री या कवितेत स्त्रीदु:खाचा केवळ ‘न’चा पाढा वाचत नाही; तर ती प्रेमाचा बेगमपूराही शोधते आहे: “तुझ्या श्वासातच / तर असतेय मी / आत घेतलास / तर देहात.. / घेतला नाहीस / तर? / देहाबाहेर…” आणि ‘एकमेकांना मोरपीस  भेट देत आहेत मोरपंखी बायका” अशी कल्पना करून “बेनाम गलीच्या काठावरून / एकेक घुंगरु  तोडत..” “अनंतात विलिन  न होणार्‍या बायका” स्त्रियांमधल्या भगिनीभावही शोधते आहे. कवितेचा हा स्वर आश्वासक आणि नवी उमेद देणारा आहे.

शेवटी, स्त्रीदास्याच्या विमोचनाचे मंगलसुक्त कवयित्री गाते: “हे / बिनचेहे-याच्या बायांनो / आम्ही प्रार्थना करतोय / तुमच्यासाठी जगातल्या सगळ्या  ओझी वाहणार्‍या / डोक्याखालच्या / रिकाम्या कॅनव्हासवर /  पसरोत नवे रंग.. / फुटोत नवे चेहरे.. / उमलनू येवोत कान, नाक, ओठ, / पाणीदार डोळे.. / ओठा ओठांवर / लगडून येवो शब्द / अन् एक नवी भाषा / स्वातंत्र्य विद्रोह अन् / आत्मसन्मानाची…”. कवयित्रीचा ही मंगलप्रार्थना प्रत्येक जीवाचा ध्यास बनो!

 [email protected]

Previous articleसत्तेच्या गैरवापराची स्मरणयात्रा…  
Next articleएकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.