स्त्री-जन्माची सनातन वेदना

-मुकुंद कुळे
खंडोबा आणि म्हाळसाबाईचं तसं छान चाललं होतं की! दोघांचा राजा-राणीचा संसार सुरू होता. म्हाळसाबाई रोज सकाळी लवकर उठायची. वाड्याची सडा-सारवण करायची. आपलं न्हाऊन झालं, की देवाच्या न्हाण्याच्या-जेवण्याच्या कामाला लागायची. कारण पहाटेला उठून रानात फिरायला गेलेली खंडोबाची स्वारी कधी परत येईल त्याचा नेम नसायचा. आणि स्वारी परत आली, की तिला का धीर असायचा? नुस्तं एकसारखं म्हाळसा म्हाळसा करून स्वारी म्हाळसाबाईला बेजार करून टाकायची.
… पण म्हाळसाला हे आवडायचंच. स्वारीचं सतत अवतीभवती असणं. तिच्या तोंडी तरी दुसऱ्या कुणाचं नाव कसं असणार? वरकरणी मात्र ती कृतककोप दाखवायची. तिच्या या अनुरागाचं वर्णन खेड्यापाड्यातल्या सासुरवाशिणींनी आपल्या ओव्यांमध्ये नेमकं केलंय. त्या म्हणतात

‘जेजुरीचा खंडेराया, चारी मुलुखाचा राजा
म्हाळसा त्याची नारी, म्हणे किती करू काजा’

वरवर म्हाळसाबाई खंडोबाला रागावण्याचा आविर्भाव करत असली, तरी अंतर्मनातून ती सुखावलेलीच असायची. आणि त्याच्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाचा कंटाळा येण्याऐवजी उलट त्याच्यासाठी किती करू न किती नको असंच म्हाळसाबाईला होऊन जायचं. त्यामुळेच सकाळी शिकारीला बाहेर पडलेला खंडोबा दुपारी परत आला की, ती आनंदून जायची. तिच्या या आनंदाचं आणि तिने स्वारीच्या स्वागतासाठी केलेल्या तयारीचं वर्णन आयाबायांनी रचलेल्या म्हाळसेच्या लोकगीतांतून अल्लद घडतं

‘मी गं आनंदले मनाला माझा गं बाई मल्हार कुणीकडनं आला…
काचेची न्हाणीबाई, गुलाबाचं पाणी
पाणी विसणते म्हाळसाराणी
न्हाऊ घालते देवाला… माझा गं बाई मल्हार कुणीकडनं आला
पक्वान्न परोपरी, शिरा अन् पुरी
भात केशरीबाई आवडतो भारी
जेवू घालिते देवाला… माझा गं बाई मल्हार कुणीकडनं आला चिकनी सुपारी बाई, पानं पिकली
कात केवडा लवंग घाली
विडा करीते देवाला… माझा गं बाई मल्हार कुणीकडनं आला…’

खंडोबा अन् म्हाळसाबाईचा असा राजाराणीचा संसार सुरू होता. सारं सुरळीत सुरू होतं. संसारात लुटुपुटूचं रागावणं होतं, पण त्यात रागावण्याऐवजी लोभच भारी होता. म्हाळसाबाई अगदी सुखाच्या परमोच्च बिंदूवर तरंगत होती. खंडोबाच्या गडकोटावर तिला जाब विचारणारं कुणीच नव्हतं. तिचीच मर्जी हरघडी सारे झेलीत होते. खंडोबाचं तर तिच्यावाचून पानही हलत नव्हतं. कुणाही स्त्रीला याहून अधिक काय हवं असतं.
… पण घात झाला. ज्याच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकली, त्यानेच आपला आधाराचा खांदा काढून घेतला. एकदा शिकारीला गेलेल्या खंडोबाला कुठे तरी धनगराच्या बानुबाईचं ओझरतं दर्शन झालं. एका हातात मऊ जावळाचं गोजिरवाणं मेंढरू घेतलेली आणि दुसऱ्या हातातल्या काठीने मेंढरांचा मोठा कळप हाकणारी बानुबाई दिसली आणि खंडेरायाचं मन चळलं. त्याला जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी बानुबाईच दिसायला लागली. एवढंच कशाला, त्याच्या स्वप्नातही बानुबाईच यायला लागली. देव तहान-भूक विसरला. त्याला कशाचंच भान उरलं नाही. आजवर आपल्या सुख-दुःखात साथ देणाऱ्या लाडक्या म्हाळसाराणीचंही त्याला स्मरण राहिलं नाही.
पुरुषांची ही लक्षणं कळतातच बाईमाणसाला. कितीही लपवू म्हटलं तरी त्यावर पांघरुण टाकता नाहीच येत. तेव्हा म्हाळसाबाईलाही आपल्या दैवगतीची जाणीव झालीच. आपल्या नवऱ्याचं खंडोबाचं चित्त थाऱ्यावर नाही, हे तिने लगेच ताडलं. आणि लगोलग त्याला शिकारीहून रोज उशिरा येण्याचा जाबही विचारला. पण खंडोबा मोठा हुशार. त्याने लगेच तिला जशास तसं उत्तर दिलं

म्हाळसाबाई बोले येळ का लागला मल्हारी
इसरून आलो भंडारा झाडावरी
म्हाळसाबाई बोले का हो मल्हारी रागात
गेलो होतो शिकारीला बानू घावली बागेत…’

हे ऐकून म्हाळसेचं काळीज फाटलं. आजवर ज्याच्यावर आपण आभाळमाया केली, तोच आपल्या पतिधर्मापासून ढळल्याचं बघून तिचं मन विदीर्ण झालं. तिने खंडोबाला समजावण्याचा लाख प्रयत्न केला. पण खंडोबाची बानुवर अशी प्रीत जडली होती, की तो जनरीतच विसरून गेला होता. त्याला आता म्हाळसाची पर्वा होती कुठे. बानुच्या प्रेमात तो नादखुळा झाला होता. म्हणून म्हाळसेच्या देखतच तो बानुला आणायला तिच्या चंदनपूर गावी गेला.
घरची लक्ष्मी वाऱ्यावर सोडून दारची लक्ष्मी आणण्यासाठी देव गडाची पायरी उतरला. तेव्हा म्हाळसाबाई सैरभैर झाली. देवाबरोबर आजवर केलेल्या संसाराच्या आठवणी तिच्या मनात उचंबळून आल्या. त्याच्याशी केलेल्या गुजगोष्टींनी तिच्या मनात फेर धरला. आणि…
आपली स्वारी आता आपल्या वाट्याला यायची नाही, हे जाणून ती दुःखी-कष्टी झाली. देव आता कुठे असेल, काय करत असेल, बानुशी बोलत असेल का, तिची मेंढरं राखत असेल का, असे विचार मनात येऊन ती अधिकच घायाळ झाली आणि तिचं मन केवळ स्वतःचीच नाही, अवघ्या स्त्रीजन्माचीच वेदना गाऊ लागलं. तिची ही वेदना खंडोबाम्हाळसाची गाणी गाणाऱ्या वाघ्या-मुरळ्यांनी आणि शाहिरांनी नेमक्या शब्दात पकडलीय. ते लिहितात-
देव मल्हारी रुसून आला घोड्यावर बसून
गेला बानूला आनाया मी गं लग्नाची असून… देव चंदनपुरात राखतो मेंढरं,
खाई बानूच्या हातची ताक कन्या न् भाकर
बोले बानूशी गोड गोड देव गालात हसून
गेला बानुला आनाया मी गं लग्नाची असून… किती मी सांगितलं देवा तुम्ही माझं ऐका
नका नका या संसारी, नका करू दोन बायका
बाई लागंना मन माझं, देव गेल्या ग पासून
गेला बानुला आनाया मी गं लग्नाची असून…

(चंपाषष्टीपासून खंडोबा नवरात्र सुरू झालंय. त्यानिमित्ताने जुनं टिपण)

(लेखक महाराष्ट्रातील लोककला व लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत)

9769982424

Previous articleएकाकीपणाचे पिशाच!
Next articleबाबा !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here