हमदम हरदम!

-हिनाकौसर खान

मी फार विचार करते हे मला माहितीये, पण तू अजिबात विचार करत नाहीस, हे तुला माहितीये का? किती वरवरचं बोलतोस काही वेळा.

समझती हूँ, खात्री कशाचीच नसते. पर्मनंट काहीच नसतं. म्हणून आपल्याला कशाची तमन्नाच नसते का? असतेच ना आस-अपेक्षा. बघतोच ना स्वप्नं. तू हमदम हरदम असावास…असं स्वप्नं मीही पाहते, तर त्यात चूक काय? अशी कायमची बियमची भानगड म्हटलं की, तुला दडपल्यासारखं होतं; पण खरं सांग, काही माणसांनी आयुष्य अगदी व्यापून नसलं तरी दीर्घकाळ सोबत असावं असं नाही वाटत? तुला काहीच नाही वाटत माझ्याविषयी. प्रेमबिम नाही विचारतेय रे. त्याचा उलगडा कुणाला झालाय? पण, काही तरी तर वाटणं…जीव तुटत नाही माझ्यासाठी? कधीच? तुझ्यालेखी सगळा सगळाच व्यवहार आहे? आणि तुला वाटतं की, सगळ्याच कृतींकडं निव्वळ व्यवहार म्हणूनच बघता येऊ शकतं…

….पण मला नाही ना बघता येत. नाहीच पाहिलं कधी! कसम से तू मला इतका इतका आवडत गेलास दोस्त की, माझ्यासाठी शारीर होणंदेखील त्याचाच भाग होता. आवडण्याचा-आवडून घेत राहण्याचा-समरसून जाण्याचा. तो असा सुटा करून कसं बघणार? आपले आचारविचार मूल्य जसं एकमेकांत सहज सिंक होत गेले, तसंच स्पर्शाचंदेखील अन् त्याच लयीत इंटिमेट होणं ही, अजाणता सहज!
तुला काय वाटतं, मी जिस्मानी झाले ते अगदी मेकॅनिकल पद्धतीनं. शरीराच्या पोटाची भूक म्हणून. असं काही होता येतं हीच मुळी भानगड माझ्यासाठी नवीये. कुणीही दोन व्यक्ती एकमेकांच्या वर्तुळात शिरतात, तेव्हा एकमेकांविषयी एक मुलभूत कुतूहल, जराशी उत्सुकता तरी असतेच ना…मग त्या दृष्टीनं नकळतपणेच एकमेकांचं खोदकाम सुरू होतं …काहीतरी हाताशी गवसल्याखेरीज का आपण त्या वर्तुळात सहज वावर करतो? संवादाची देवघेव करता करता अलवार अपनापन, थोडी आस्था तर जागत असेलच की… आपल्यात काही अबोला नाहीये, आपण एकमेकांना अपरिचित नाहीयोत, तरीही तुला वाटतं हमबिस्तरी ही एक तांत्रिक पद्धतीनं करण्याची गोष्टंय? असं असेल, तर माझा भाबडेपणा तरी बघ, म्हणजे तू भावनाशून्य होऊन निव्वळ मॅकेनिकल पद्धतीनं पुढं जाऊ पाहतोयस, हे तरी तेव्हा कुठं ठाऊक होतं. तू इतका रूखा, रूक्ष, कोरडाय यावर माझा अजूनही विश्वास नाहीये…
किंवा तू काय म्हणाला होतास, ‘नो स्ट्रिंग्ज अटॅच्ड’ ही जगात भारी कन्सेप्ट आहे. कुणाचा कुणावर काही जोर नाही आणि तरीही एक न-नाव नातं. टेंशन्स का घ्यायचेत तुला. मोकळी राहा, एकटी. स्वतःच्या टर्म्सवर.
न-नाव नातं! आहा काय मस्त वाटलं ऐकून. तू सहज बोलून गेलास, पण हे दोन शब्द माझं मन व्यापून राहिले कित्येक दिवस. ए वेड्या ! न-नाव नातं ही उलट जगात भारी कन्सेप्ट नाहीये का? नात्याला नाव आलं की, त्याच्या म्हणून चौकटी येतात. बिनचौकटीचं नातं हे मोकळं, स्वतंत्र हे कसलं सुंदरंय. कसलं सेंसीबल. पण, एकदम टोटलमध्ये भावनाशून्यचं व्हायचं याला काय लॉजिक? ते काही मला पटलेलं नाही.
14 डिसेंबर. रात्री 2 वाजता.
***
माझी मुहब्बत तुझा प्रोब्लेम कसा असेल? तुला कुणी सांगितलंय त्याचा इतका विचार करायला? आणि माझी मुहब्बत माझा प्रॉब्लेमंय की स्ट्रेंथ, हे मला ठरवू दे की. माझ्यावतीनं इतका वचावचा का भांडतोय तू स्वतःशी… माझ्या फिलींगसाठी तुला कुठं कटघरात उभं केलंय तेव्हा. यारा तुझी इनायत व्हावी असं तुझ्याकडं मागणं असलं, तरी ती ज़िद नाहीये रे! और मागून थोडी मुहब्बत मिळते. ती असेल, तर तुमच्या जाणिवांतून मनापर्यंत पाझरत जाते फक्त. आपापल्या जाणिवेच्या खोलात शिरण्याचा समय इकडं तिकडं होऊ शकतो इतकंच. त्यासाठी फारतर आपल्याच धुरकटलेल्या, दडपलेल्या रंध्राना वेळ देऊन मोकळं करता येऊ शकतं. पुन्हा तेही करण्याची पाबंदी कुठंय? सो चिल!
तुला तोडून मस्त बोलता येतं, ज्याचा मला खूप राग येतो. परवाच घुश्श्यात म्हणालास ‘तू बेहद पसंद आहेस असं तू डायरेक्ट कसं म्हणू शकतेस, मी तुला सगळं आधीच क्लिअर केलंय. आय डोन्ट फील एनीथिंग यूनो!’ मॅन, आता मी काय विचार करायचा, फॉर दॅट मॅटर काय फील करायचं हे तू कसं ठरवणार? तुझं वैतागणं एकदम गैरलागूय ना रे ! आणि तू कशाला माझी फिकर करतोयस? स्वतःला सांभाळून नेण्याइतकी काबिलियत आहे माझ्याकडं. आणि मी प्रेमात आहे रे, आजारी नाहीये मग माझ्याशी असं सांत्वनापूर्ण वागायचं काय काम? हे बघ मला कुणी सहानुभूती, सांत्वना किंवा बिचारी वगैरे समजलं की, फार डोक्यात जातं. प्रेम कधीकधी उदास करतं, पण मला नाउमेद नाही वाटत. तू काळजी करू नको. मी करते ना माझ्या वास्ते ज्या भानगडा करायच्या असतील. तू का तंगडी घालतोयस त्यात. तू सिगरेट मार चूप, अ‍ॅक्चुअली इटस इन्जुरस… तर तू नुसता टाळा लाव तोंडाला. स्वतःला कुणावर ही लादू नये, प्रेमात तर नक्कीच. इतकी सयानी तर मी नक्कीचंय रे. नाही वाटतं का तुला?
नसेल तर नजर साफ करून घे.
5 जानेवारी दुपारी 4 वाजता. म्हणजे ऑफिस वेळात.
***
मला मुळात तुझं काही कळतच नाही. तू जे म्हणतोस त्याहून भलतंच काही तरी वागतोस. आता हेच बघ, माझं तुझ्याकडं जरा लक्ष नसतं म्हणतोस, पण तुझी नजर खूप शातीर आहे माहितीये तुला.. म्हणजे एकेका वेळच्या आठवणीतून माझ्याविषयीचं अगदी अनपेक्षितसं इवलंसं काही तर डिटेलिंग सांगतोस. आता माझा कुठलासा डीपी मलाही धड आठवत नाही, तुला बरोबर आठवतो. आज आता भामचंद्रगडावर गेले तर विचारलंच, काय घातलं होतं. म्हंटलं आता याला कसं सांगू? तस्वीर घेतली असती तर पाठवली असती. पण तेही नाही, मग नुसतंच सांगितलं करड्या रंगाचा पंजाबी होता. तर लगेच उत्तर, गुलाबी चुनरीवाला. हे कमाले, इतकं कोण लक्षात ठेवतं. तरी म्हणणार तुझ्याकडं लक्ष देण्याइतकी फुरसत नाही बुवा माझ्याकडं. अजिबात बघत नाही हं!
बघतच नाही म्हणणारा तू माझ्याकडं किती थेट रोखून बघतोस, तेही तुला माहिती नसेलच. तू मान्य करणार नाहीस, म्हणून तुला हे सांगितलेलंही आवडणार नाहीये तरी सांगते, तू भीडभाड न ठेवता माझ्याकडं रोखून बघतोस, तेव्हा माझ्यात जिवंत सळसळ प्रवाहित होते. असं वाटतं की, मी अगदी मूर्तस्वरूप आहे. या गर्दीनं व्यापलेल्या कोलाहलात मीदेखील एक्जिस्ट करते. माझ्या अस्तित्वाला नवनवे धुमारे फुटू शकतात. असं वाटतं मी कुणीतरी एकमेवाद्वितीय आहे, जी फक्त तुलाच उमगलीये. केवळ तुलाच कळण्यासाठी आपला एकमेकांपर्यंतचा प्रवास झालाय! असं बरंच काही.
मालूमेय तुला, तू खोल गढून बघतोस तेव्हा तुझ्या टपोर्‍या डोळ्यांतली ती बदमाश चमक माझ्या बदनवर फिरत नाही. तीही माझ्या नजरेत गुंतायला उत्सुक असते आणि तू म्हणतोस, ‘हे, कमॉन यार, इमोशनल लोचे कशाला हवेत तुला. यारा, नातं आलं की त्याचं गणित आलं आणि मग त्या गणिताच्या अचूक उत्तराचं कंपलशन. आपण चुकलेलं गणित असूयात की. हे बेस्टंय ना. दिवसातला कुठलासा वेळ द्यायचा एकमेकांना, भरपूर गप्पा मारायच्या. कधी तरी भेटायचं. चिल करायचं. संपला विषय.’
हट् खोटारड्या, भावनाशून्य होऊन चिल करायचं म्हणे. तुला तरी जमतं का? आँ काय? हम्म, शहाण्या तरीही तुला वाटतंय तू कॅज्युअल राहू शकतोस आणि एक न एक दिवस मीही कॅज्युअल होऊनच जाईन. कलटी मार इथून, मला नाही व्हायचंय, यंत्रमानव. मी तर मुहब्बत केली म्हणून जिस्मानी झाले आणि हे एवढं सत्य पुरेय माझ्यासाठी!
14 फेबुवारी रात्री 11 वाजता.
***
सकाळी सकाळी केलेले तुझे फोनकॉल्स पाहिले नाहीत. नाहीतर तेव्हाच सांगितलं असतं, ‘आय अ‍ॅम ओके.’ माझ्यासाठी तू इतकं फिक्रमंद असण्याचं कारण नाही. इतके मेसेज किंवा कॉल करून माझ्यापर्यंत पोचण्यासाठी धडपडही करण्याचीही जरूरत नाहीये. काल मला तुझा निश्चितच राग आला होता. माझा राग माझा प्रोब्लेमंय. त्यामुळं रात गयी बात गयी करत आज बोलतेचेय ना. आता खोटं कशाला बोला तुझ्या मेसेजला जाणीवपूर्वक इग्नोर केलं. तू म्हणशील किती भाव खातेय. कुचक्यासारखं बोलते. थेट मनाला लागेलंसं बोलून मोकळी होते. नाहीच बोलणार तुझ्याशी तर बिनधास्त म्हण. नुसतं म्हणू नकोस करूनही दाखव. यारा, तू म्हणतोस ते खरंय, रिअल फ्रेंड्स कमी असतात. मी लक्षात ठेवेन.
आणि कालचा मुद्दा… काय रे शहाण्या, तुला संध्याकाळी भेटायचं नव्हतं, तर ते तू दुपारी सांगू शकत नव्हतास? ऐनवेळेवर ठरल्या ठिकाणी पोचल्यावर कसं काय सांगू शकतोस…आणि यावर मी काही म्हणायचंही नाही? मी खालीफुकट रिकामटेकडी असल्यासारखं मला गृहित धरायचं नै का? कुणीही आपल्याला गृहित धरावं, हे किती वैतागवाणंय. मी तुझ्याशी असं एकदा वागूनच दाखवते, म्हणजे कळेल तुला. वर तू ‘गृहित काय धरलं गं’ म्हणून मलाच प्रश्न कर… हमदम! सांगण्याचीसुद्धा एक पद्धत असते. तुला येता येणार नाही हे कळवताना तू जराही अपोलोजेटिक नव्हतास. सगळंच कसं कॅज्युअल असतं तुझ्यालेखी. किती थेट मेसेज केलास, ‘मी मित्रांसोबत डिनरला चाललोय. ऑफिसच्या दारात येऊन धडकलीत अचानक. इथलं उरकलं की तुझ्या सोसायटीत येतो रात्री.’ मी काय तू म्हणशील तेव्हा अव्हलेबल आहे? बिलकुल नहीं!
कधीकधी तुझं असं वागणं डोक्यात जातं. राग उफाळून येतो. कधीच परत बोलायलाच नको असं वाटतं, पण तू वेगळ्याच धुंदीत असतो. मला कधी तर वाटतं, मी तुला धड ओळखत नाही. परक्यासारखाच वाटतो. वागतोही कधीमधी तसाच बहुधा. मुद्दाम करतोस का तू असं तोडूनबिडून वागल्यासारखं. त्यानं काय होतं? मला तू थेट सांग. शून्य मिनिटात एक्झिक्यूट करून दाखवते. काही वेळा तर दीर्घ गप्पा झाल्यानंतरही मला अशीच सेम फीलिंग येते. मला माहीत असलेला माझा मित्र तू कुठंतरी दडवून येतोस. खूप वरवरचं वागतोस. खोटं देखील. तुटक आणि शुष्क.
हे रे तुझ्याच पुढं तर स्वत:ला मी उलगडून ठेवते. आहे तशी असते. आतून-बाहेरून. तुझ्यापासून मनातलं, ओठांतलं लपवता येत नाही. तुझ्यावर रागवताही येत नाही आणि तुझ्याविषयीची मुहब्बतही आटत नाही… आत्ता आस्थेनं बोलणारा आत्ता झिडकारून बोलशील… तुझं खर-खोटं काहीच उमगत नाही. मग मी कन्फ्युज्ड होते. स्वत:ला कोशबंद करून घ्यावंसं वाटतं मग. चालेल का तुला?
20 मार्च रात्री 1.45 वाजता.
फूटनोट- झोप येत नाहीये. खवचटा स्वत: ढाराढूर असशील…
***
मागच्या आठवड्यात तू हैद्राबादला गेला होतास, तर रोज रात्री शहाण्यासारखा कॉल करत होतास. परत आलास की पुन्हा बिझी. दोन दिवसांपासून मी कोल्हापूरात मैत्रिणीच्या लग्नात आलीये हे तुला माहितीये का? उद्या निघेन. इथं बर्‍याच दिवसांतून निवांतपणा अनुभवतेय. भला मोठा मित्र-मैत्रणींचा गोतावळा जमलाय. फुल धमाल सुरूय. कित्येक वर्षांपासूनचा आमचा जुना ग्रुपंय. तरी तुला मिस करतेय. खूपखूप मिस करतीये. एकाएकी साक्षात्कार झाला तुझ्यासोबत मी जितकी कंफर्टेबल आहे तितकी कदाचितच कुणासोबत…! काळ-वेळ-भान सगळं विसरून आपण एकमेकांच्या सोबतीत आनंदी असतो. मला तुझ्यासोबत मजा येते कारण तुलाही येत असते.
काही वेळा आपण काहीच बोलत नाही. फक्त आसपास असतो. तू तुझ्या कामात गर्क मी माझ्या कामात मग्न. तासंतास एकमेकांच्या सोबतीनं आणि तरीही एकेकटी बसून राहातो. एकमेकांच्या प्रेजेन्सनं ना डिस्टर्ब होतो, ना कंटाळतो, ना आपल्याला त्याची अडचण वाटते. एकटे नाहीयोत याची आपल्याला पुरेशी जाण असते आणि ती हवीहवीशी देखील. त्यावेळी संवादाला खाणाखुणा पुरतात किंवा अल्प शब्दांतली उत्तरं. काहीवेळा खूप बोलतो. बोलायला कुठलाही विषय पुरतो. विषय नसला तरी चालतो. बोलताबोलता अनेकदा वाद घालतो. मग गप्प होतो आणि पुन्हा बोलायला लागतो. कुठल्याच घडीला काहीही सांगताना, कसंही वागताना दोघांनाही अवघडल्यासारखं होत नाही आणि तरीही तुला वाटतं आपल्या हृदयीच्या तारा एकमेकांना छेडत नाहीत.
मला तुझ्याशी बोललं तरी त्रास होतो अन् नाही बोललं तरी. जितकं तुझ्यापासून दूर जाण्याचा विचार करते आणि कृतीही. मी तितकी अधिक तुझ्याकडं खेचली जाते. कित्येकदा ठरवते, बास आता आपण नाही बोलायचं, नाही भेटायचं. तुझं क्लिअर आहे सारं, तू वारंवार त्याची आठवणही देतोस. मग उगीच कशाला मी ताण करून घ्यायचं. सगळं सगळं ठरवते. नीट प्लॅनबिन आखते. काय काय बोलून टाळायचं, कसं कसं सांगायच, सगळंच, मात्र ‘तुमसे दूरी तुमसे मोह है…’ कवी गीत चतुर्वेदी म्हणतो तसं होतं बघ. त्या दूरीतून अशक्य कोटीच्या मोहाचा बघावा तेव्हा प्रत्यय येतो. भेटीचा लोभ तीव्र होतो. विरह दाट होऊन जातो. आत्तासारखा.
माझ्या मेहंदीचे हात पिवळेधम्मक झालेत. विरहाचा रंगही लालपिवळा असेल का?
21 मे, संध्याकाळी 7 वाजता.

***
‘एकाच व्यक्तीचं असलं पाहिजे, त्याच्यावरच प्रेम करता येतं अन् त्याच्याशीच सेक्स करता येतं अ‍ॅन्ड ब्लाब्लाब्ला किंवा निव्वळ सेक्सपुरतं संबंध असणार्‍यांशीही कमिटेड राहावं, याला काय अर्थय. फालतू संस्कार! या शब्दाला इंग्रजीत मस्त शब्दय कंडीशनिंग. ते अजून तुझं पुसलं गेलं नाहीये. चाईल्डीश आहे हे. मोठी हो.’ काय गरज होती सकाळी सकाळी गु्रपमध्ये असा मेसेज करण्याची. सगळेच या विषयावर आपापलं काहीतरी बोलत होते. जनरलाईज. तू थेट मला मार्क करून इतकी पसर्नल कमेंट करायची काय गरज होती.
हे बघ, इथं प्रत्येकाला स्वत:चे चॉइसेस करण्याचा अधिकार आहे. तू तुझा चॉइस केलास मला न निवडण्याचा आणि मी तुझ्यावर नेहमी प्रेम करण्याचा. मला न निवडण्यासाठी तू शंभर कारणं दिलीस मी न मागताही आणि तू माझ्या जिगसॉसारख्या ओबडधोबड व्यक्तिमत्त्वाला सर्वार्थानं पूर्ण करू शकतोस, ही एवढी एक जाणिव काफीये माझ्यासाठी. म्हणून मी तुझ्यात गुंतत गेली असणार. बाकी माझ्याकडे नाहीये काही सांगण्यासारखं.
तुला हे असं आयुष्यभरासाठी कुणा एकाचं असणं वगैरे झूट वाटतं. आयुष्यात न मिळणार्‍या माणसाची आस लावून बसणं, तर एकदम मागास. प्रेम आणि सेक्स या भिन्न गोष्टी आहेत. हा मुद्दा डिनाय केलाय का मी कधी? पण, आता प्रत्येकाची एक वृत्ती प्रकृती असते, हे तर मान्य करशील. सेक्स कुणाबरोबरही करता यावं इतकी कॅज्युअल गोष्ट असू शकेलही, पण मला ती तितकी कॅज्युअली हवीय का?
माझ्या पुरतं बोलायचं, तर त्या व्यक्तीशी माझे धागे जुळायला हवेत. माझं काहीतरी कनेक्शन हवं. कुठल्या तरी पातळीवरचा मिलाफ. आता आपण हेटरोसेक्सुअल आहोत म्हणून, केवळ दोन भिन्नलिंगी शरीरं हवीत- एक लिंग अन एक योनी. असा इतका वरवरचा विचार मी नाही करू शकत. समोरचं शरीर कितीही आकर्षक असलं, तरी माझ्या वासना लगेचच त्यानं उद्दीपित होत नाहीत. मला त्यातला मेंदू महत्त्वाचा वाटतोच. या पुढं जाऊन म्हणजे शरीर, बुद्धी हे दोन्हीही खूप आकर्षक असली, तरी लगेच ते असणार्‍या कुणाहीसोबत शारीर व्हावं, असं नाही होत माझं. आपण माणूस आहोत, स्वतःची बुद्धी असणारी. जनावरांसारखं हपापलेपण म्हणूनच नियंत्रणात ठेवू शकतो. आपल्यातली पशुता आपण सतत नाहीच काढत बाहेर.
आणि म्हणूनच माझ्या शरीराच्या परिघामध्ये कोणाला येऊ द्यायचं, हे मी निव्वळ जगण्याच्या प्रवाहावर नाही सोडून देऊ शकत. त्याबाबत मी जागत्या मनानं निर्णय घेईन. माझं कॉन्शस जागेवर असताना. वासना कितीही शरीरातून पाझरत राहिली, तरी त्याच्या झिरपण्याचा बिंदू मला ठरवता आलाच पाहिजे. वासनेनं माझं ऐकायचं आहे, मी त्याचं नव्हे. माझ्या शरीराच्या स्पेसमध्ये कुणी शिरल्यावर मला किती आनंद होतोय यावर सारं अवलंबून आहे. मुख्य म्हणजे माझ्या शरीराची माती मी कुणासाठी तयार करायची, हे मी ठरवणार. त्या मातीवर कुणाची बोटं फिरणार आणि कुणी रेघोट्या ओढायच्या हे देखील. माझ्या परिघात उठसूट कुणाला ही एन्ट्री देता येणार नाही आणि ना ही मला ती द्यायची आहे. शरीर म्हणजे रोबो मशीन नाही. भावनाहीन. त्याच्या आत जिवंत धुकधुक आहे. मी जनरलाईज बोलणार नाही, त्यामुळं माझ्याबाबत बोलते फक्त. माझ्याकडं श्वास घेणारं जिवंत, विचारी बुद्धी अन मन असलेलं शरीर आहे. आणि ते डावलून केवळ मेकॅनिकल पद्धतीने पोजेस घेऊन प्लेझर मिळवणं इतकाच उद्देश सेक्समधून मला ठेवता येत नाही आणि म्हणूनही ते सतत कुणासाठी उपलब्ध ही होत नाही..
मला माझा मिलाफ तुझ्याबरोबर जाणवलं होता म्हणून मी तुझ्याशी एकरूप झाले. पण, म्हणून तो अन्य कुणाबरोबर जाणवेल, असं नाहीये. इतर कुणी मन विचारांशिवाय ही एकत्र येऊ शकत असतील, तर त्यांना मी जज करत नाही. त्यांच्याकडे तसं वागण्याचं त्यांची काहीएक कारणं असतील. प्रत्येकाकडे असतात. आणि मी जो विचार करते तेही काही संस्कार किंवा कंडिशनिंगचा भाग म्हणून ही नव्हे, तसं असतं तर मी केवढं जजमेंटल वागले असते. माझ्यासाठी मुद्दा इतकाच की, मला किती प्रवाह सोसणार आहे मी तेवढीच उडी घेऊ शकते. आणि मी आता तुझ्याखेरीज प्रेम कुणावर करणार? माझ्यासाठी तू म्हणजेच प्रेम अन प्रेम म्हणजेच तू आहेस. म्हणून तर मला तुझं इतर कुणाकडेही आकर्षित होण्याने त्रास वाटला, तरी तुला बांधून ठेवावं नाही वाटत. तुला जाब विचारावं नाही वाटत. तुला एक्प्लेनेशन मागावं नाही वाटत. तुला मी माझा मानला तरी तू स्वतंत्र आहेसच. तुला तुझा आनंद, तुझं समाधान तुझ्या मार्गानं मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. समाजचौकटीत हे जरा विचित्र असेल, पण मला तुझा आनंद अधिक महत्त्वाचा वाटतो.
फक्त इतकंच की तुझ्या निवडीचा मी आदर करते तर तुही माझ्या निवडीचा कर.
10 जून सकाळी 8 वाजता. बिछान्यातच.
***
घरात आज खूप तणतण झाली. कधीकधी घरातूनही पळून जावंसं वाटतं. जायचं कुठं पण? तुझ्याशी बोललं, तरी तू आपलं कमी विचार कर, एवढाच सल्ला देणार.
खरंच, पण बरं चाललंय तुझं, यारा! तुला स्वतःशी संवाद बिंवाद करता येत नाही हे चांगलंचय. चाललंय ते चालू द्यावं, प्रवाहसोबत वाहात राहायचं, येईल ती वळणं घेऊन त्या त्या आकारात वाहत राहायचं. आसान आहे खरंच? वाटेत कधी दो-राहे नाही आले? नाही येत? चाललंय ते चालू न देता काहीतरी आपण चालवावं असं नाही होत, प्रवाहासोबत असणं ही सोपं कुठंय? मग असं इतकं कसं सहज म्हणू शकतोस लै झ्याट डोक्याला लावायचा नाही. प्रवाहात बरंच काही ठरवण्याची मुभा आहेच की स्वतःकडे, तरीही डोकं बांधून कसं घेऊ शकतोस की ते जमतंय तेच बरंय.
शिवाय, समोरच्याला दुखवता येत नाही, म्हणून स्वतःला अजिबात उलगडून न घेणं हे खरंतर बिनत्रासाचंय. दुखवायचं नाहीये, तर टोकाचं बोलायचंच नाही किंवा मग हातचं राखून समोरच्याला रूचेल इतकंच बोलायचं. कधी जमलंच तर टाळायचं, म्हणजे वार करण्याची नौबत येत नाही ना स्वत:ला अडचणीत आणण्याची. किंवा त्याहून सोप्पंय एकदम भिडस्त होऊन माणसांना, परिस्थितीला शरण असणं. मेंदूचा वापर केवळ अर्थार्जनापुरतं करणं हे खूप सुलभंय. एकदम बेस्ट.
फार विचारबिचार करणं, स्वतःशी बोलणं, स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा निश्चय करणं, संवेदनशील असणं, नकार देणं, नको तिथले होकार पचवणं, सगळं सगळं निव्वळ टोचण्या वाढवणारं आहे. तुझं बरं चाललंय. तसंच चालू दे. खरंच!
30 जून दुपारी 3 वाजता.
***
अलीकडे एखाद दोन गोष्टीबाबत माझा निर्धार कमी पडतोय असं मी म्हणाले, तेव्हा तू अगदी सहज म्हणाला, मग त्यावर काम करावं लागेल. तू विचारलं नाहीस कुठल्या गोष्टींवर. त्यातली एक गोष्ट तुझ्यापासून दूर जाणं हीच आहे. म्हणजे हे असं मनापासून नाही वाटत म्हणून तर निर्धार कमी पडत असणार. आणि तू विचारत होता मध्येच काय होतं तुला..मूड स्विंग.. त्याचं ही कदाचित हेच उत्तर आहे.
पूर्वी मी मला काय वाटतं याच्याशी सामना करायला बिचाकायचे. अनेक गोष्टी स्वतःशी बोलायचे देखील नाही. कारण, आपण आपल्याशीच त्याचा विचार केला आणि आपल्याला त्याची स्पष्टता आली, तर मग करायचं काय? म्हणजे निर्णय आणि जबाबदारी घ्यावी लागणार होती नं. ती घेता येईल का अशी सतत भीती वाटायची. पण, आता मी स्वतःशी बोलत राहायचं ठरवलंय. जे आपल्याला वाटतं त्याचं पुढे काय होईल, याचा विचार न करता वर्तमानात तरी त्या मान्य करायचं ठरवलंय. होता होईतो, आपल्याला ज्याच्याविषयी जे वाटतं ते बोलायचं. पटत नाही वाटलं सोडायचं. सो, हे सांगण्याचं कारण मी माझ्या मनातल्या भावना तुझ्यापासून कधीही लपवल्या नाहीयेत. पण, मला आत्तापर्यंत भेटलेल्या पुरुषांमध्ये तू मला सर्वाधिक जवळचा वाटलास. सर्वाधिक आवडलास. त्याचं एक कारण आपण कुठल्याही विषयवार अत्यंत मोकळेपणानं बोलू शकतो हेही आहे.
मी मुद्द्याचं बोलायचं सोडून भरकटले बघ.
सो, मला तू आवडतो, हे मी कधीही तुझ्यावर इम्पोज नाही केलं. आणि अशा गोष्टी नैसर्गिक घडतात, लादून नाहीच. तरीही मन बिचारं भाबडं, अप्राप्य गोष्टींचीदेखील आस धरतं. म्हणजे काय तर, मला तुझी सोबत मिळावी, मला तुला साथ देता यावी असं मध्येच काहीसं वाटून जातं. अशा अपेक्षा करू नयेत हे कळत नाही का मला, तर कळतं. मनाला कळत नाही फक्त. पुस्तक वाचत असताना काही मस्त सापडलं की तुला अमुक एक वाचून दाखवलं असतं असं वाटतं, कुठं बाहेर असताना काहीही भारी घडत नसतानाही तू सोबत हवा होतास असं वाटतं, एखादा सिनेमा, कार्यकम पाहताना तुझी आठवण येते. कधी समजुतीचं कधी मिश्कील अशा खाणाखुणा करून तुझ्याशी बोलायला तू हवा होतास, कारण विनाकारण तुझी अशी आठवण येते त्याला मी काय करू? अशी वेडी स्वप्न मनाला पडतात. मला अक्कल आहे, मनाला नाही.
तू त्या दिवशी घरी म्हणाला ना अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की देखील माणसं मध्येच कोसळतात. मला त्या क्षणी या कोसळण्याचा साक्षात्कार झाला. मी माझी सुझबुझ, माझं कॉन्शस ढळू न देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतेच. जमतं ही बर्‍यापैकी. पण, शेवटी मीही माणूस. कधी तरी उनाडक्या मारत भटकायला अन् मला त्रास द्यायला माझं हे येडं कॉन्शस निसटतं, त्याला काय करणार. मी शहाणी अन समजंस असले, तरी माणसांचे नियम मला ही तर लागतातच. बघ ना, साथ सोबत, भेटीगाठी, प्रेम या गोष्टी अजूनही कन्वेन्शनलच आहेत. ते कुठल्या मार्गानं फुलवायचं हे अनकन्वेन्शनल असू शकतं.
तर तू सगळ्याबाबत क्लीअर आहेस. मला याची कल्पना आहे, तरी मध्येच ना मला त्रास होतो. खूप विचित्र काहीसं वाटतं. शब्दात नाही सांगता येत. मला हे असं कुणाविषयी इतक्या टोकाचं, इतक्या तीव्रतेचं पहिल्यांदाच वाटलंय. ते माझ्याच हातून मी नष्ट किंवा किमान दुर्लक्षित करत जायचंय, हे माहिती असलं तरी होत नाहीये. सोपं नसतं ना हे. म्हणून मग म्हणतेय, की आपण संपर्कात नको राहायला.
बघ न आतापर्यंत मी, कुणी माझ्याजवळ येतंय म्हणून अंतर राखून वागले, तोडून बोलले. आणि आता यावेळेस कुणाच्या तरी जवळ जाण्याच्या माझ्या अभिलाषेत मीच अडकेन म्हणून अंतर ठेवायचं म्हणतेय. अजीब है जिंदगी! ज्यांच्यापासून अंतर राखलं, ती माणसं मला आवडली नाहीत, हा भाग आहेच. उलट, मला खूप अनकफंर्टेबल व्हायचं अशा लोकांमुळे. त्याच्यापासून दूर राहावं, अशी एक भावना आतूनच यायची. तुझ्याबाबतचा काय फोर्स होता नाही माहीत? मी सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या. रिग्रेट नाही कशाचाही. मी खूप बदलले देखील. प्रेमाच्या नुसत्या प्रारंभानं तुम्ही बदलू लागता, असं शम्स म्हणतो. तू निश्चित बदललं मला. माझा निर्धार माझ्याकडून कमी पडतोय. स्खलन होतं लगेच. तुझ्याकडूनच बळ हवंय. मी तुझ्या आयुष्यातली पहिली वियर्ड व्यक्ती असेन, जी म्हणत असेन ना की मला तू आवडतोस आणि मला तुझ्यापासून अंतर राखायचंय. याहून अधिक काय बोलणार!
15 ऑगस्ट. रात्री 11.30
***
तू सरळ स्पष्ट कधी बोलणारेस. इतका तर सगळ्या गोष्टीत भाव खातोस. तू कधी खुलून माझ्याशी मुतासीर होणारेस.. सगळं कोड्यात. तू परफेक्ट आहेस गं. पेशन्स ठेव जरा असं म्हणायचं आणि गायब व्हायचं काही दिवस. पण, परफेक्ट म्हणजे कशाच्या अनुषंगानं आणि पेशन्स कशासाठी ठेवायचे, हे तरी आडून न सांगता तोंड उचकटून सांगशील?
‘मेरी ख़ूबसूरत जिंदगी,
तुम मेरे जीने का ख़ूबसूरत फरेब भी हो और ख़ूबसूरत हक़ीकत भी!’
इमरोज़ने जे अमृतासाठी म्हटलंय, तेच मला तुझ्यासाठीही म्हणायचंय. म्हणजे, तसं मी तुला ‘खतों का सफरनामा’ या पुस्तकातली इमेज पाठवून वाक्याखाली रेघ ओढून सांगितलंच. तू म्हणालास तर मला तुझी इमरोज व्हायलाही आवडेल अरे. आय नो, तुला हे काही तरी फिल्मी वाटेल. नाहीतर पुस्तकाची कुंडली मागत बसशील, पण मला त्या शब्दांतून वेगळंही काही तरी पोचवायचंय हे तू तुझ्या नेहमीच्या स्टाईलनं इग्नोरशील असंच वाटलं, पण यावेळी बॉस तूने तो धक्काही दिया. थेट फोन करून चकितच केलंस. ‘सुन, रूक. इमरोज़ने अमृतासाठी म्हटलंय तसंच मलाही तुझ्यासाठी म्हणायचंय. बर्‍याच दिवसांपासून खरंतर. पण, व्यक्त होणं इतकं सोपंय, हे ठाऊकच नव्हतं. तू थांब जरा.’ फोन कट. आता काय आकाशवाणी होऊन कळणारे मला? येडपट. काहीतरी फालतूपणाच असणार म्हणा किंवा पोपट करणार. अजून काय जमलंय त्याला. तेवढ्यात मेसेज. ‘तुझ्याइतकी कमाल हकिकत माझ्यासोबत तरी दुसरी कुठलीच घडलेली नाहीये. ए हरदम हमदम, समजायला जरा उशीर झाला इतकंच.’ दोन क्षण पॉजमध्ये गेले माझे.
‘हं ठीकेय, मला वेगळाच मेसेज अपेक्षित होता.’ म्हणत मी व्हॉटसअपलं. माझी इमरोज-अमृतावाली उत्सुकता संपली नव्हतीच. तर पुन्हा मेसेज. ‘तू एक नंबरची बावळटंय.’
‘हं असू दे. अमृता-इमरोज मेसेज?’ माझा बावळटपणा त्याच्या कधी लक्षात आलाय तेव्हा…
‘यडपट! बरं घे,
मेरे इन्तजारो की तस्वीर,
तुम कुछ हुक्म करो, एक बार मुंह से कहो, तो तुम्हारे कहे को पुरा करने के लिए सब कुछ कुर्बान किया जा सकता है। मेरे वहशत, मेरे जुनून, मेरी हकीकत का इम्तहान तो लो, दुनिया की सारी खुबसूरती और सारी मुस्कुराहटें तुम्हारे होंठों पर देखने के लिए मैं जी रहा हूँ…
समझी?
मी एकदम चूप झाले. भावना व्यक्त करणारं पुस्तक ही सेम. इतकं सिक्रोनायझेशन.
प्लीज हं यारा, कोई साहित्यिक टिपण्णी नको..समझी? समझी क्या?
समझदारी के तो हम अम्मा है मगर फिलहाल नासमझी में कशीश भी है और मज़ा भी!
….अरे! कुछ तो मेसेज कर…बोल ना.. बता ना… कहाँ गायब? भाव क्यूँ खारी…!!!

7 सप्टेंबर रात्री 11.55 वाजता.

(लेखिका मुक्त पत्रकार आणि ब्लॉगर आहेत)

९८५०३०८२००

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२२)

Previous articleगावाकडची जत्रा
Next articleकॉंग्रेसशिवाय राजकीय पर्याय हे मृगजळच !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here