|| हवंतर ||

“अरे, उगाच कोणाच्या तरी वंशाचं झाड,
नायतर वेल काढत,
वंशावळी कोरत,
सजवत
कशाला बसतोस?
जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी,
फिरोज गांधी,
राजीव गांधी, राहुल गांधी
यांची जातपात, धर्म, कुंडली,
पत्रिका, गोत्र, हस्तरेषा
हे सारं विषयांतर झालं रे !
आता फैज, जहीर
आणि कोण कोण तरक्कीपसंद, फेक्युलर कवी…
त्यांच्या वंशावळी घेतल्या करायला?
असलं काही लिहिताना
आपण स्त्रियांच्या विषयी
हीन दृष्टीने लिहितो आहोत,
फॉरवरडतो आहोत
याचं भान स्त्रीने तरी ठेवावं..
द्वेषप्रेमामुळे भान
आणि तारतम्य विसरतं
ते असं
ते  सोड
मुद्दा बोल की
एक तरी
तू खूप श्रम करून, पुस्तके , इंटरनेट
आणि
तुझ्या आवडीच्या “नासा”चं डिजिटल ग्रंथालय धुंडाळून
काढलेली ही सारी वंशावळीची माहिती
वाचून वाचून
तुझा व्यासंग जब्बरदस्त आहे
 हे कळलं
 पण कंटाळा आला
अलीकडे
असल्या वंशावळ्या लिहिण्यात तुला काय इंटरेस्ट असतो
हे कळत नाही, गड्या
भाऊ, कोणी दिलं हे रिकामटेकडं काम तुला?
कोणाचा काका हिंदू
तर कुणाचा पुतण्या कन्व्हरटेड मुस्लिम, हिंदू ब्राह्मण आजोबांची
मावस सुनेची चुलत मामीदेखील
हिंदू ब्राह्मण (किती छान वाटलं न? ),
तिची चुलत मावशी ख्रिश्चन
नायतर शीख,
ख्रिश्चन नणंदेची
मावससासू हिंदू..
तिच्या सुनेचा
अनौरस मुलगा ज्यू…
असेल
असू दे नं
जाऊ दे न यार..
कोण कोणाबरोबर झोपलं?
तुझं त्यात काय बिघडलं ?
त्यांच्या बेडरूममध्ये
डोकावण्याला
“वायुरिझम” म्हणतात
तो एक रोग आहे
त्याने तुला
आणखी एक व्यसन लागणार आहे
त्याला हर्षवायूरिझम म्हणतात
ते तुझ्या तब्येतीलाही चांगलं नाही
तू राहा नं
अतिशुद्ध वंशाचा
आर्य,
वैदिक,
ब्राह्मण..
हिंदू प्युअर!
हवंतर
स्वतःचा डी एन ए तपासून घे,
हवंतर
दर वर्षी तपासून घे
वाढदिवसाला
वेगळा दिसला तं
बदलून घे
हवा तसा
देतात ते.”
-मोहन देस
Previous articleफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री
Next articleशब्द-अपशब्द
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.