शब्द-अपशब्द

-डॉ. मुग्धा कर्णिक

माझ्या लेखनात छिनाल शब्द आल्यामुळे माझा एक छोटा मित्र अस्वस्थ झाला. हा शब्द मी निराशाग्रस्त झाल्यामुळे लिहिला की संतापातून… माझ्या सारख्या ज्येष्ठ काकूने हा शब्द कसा काय वापरला असे अनेक प्रश्न त्याला पडले होते. त्याला जी उत्तरं दिली त्याचा एक लेखा इथे सर्वांसाठीच लिहिते.
मी लेखनात अपशब्द वापरण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. ते ही त्याला सांगितलं. शब्द ‘अप’ असतात कारण ते ज्या परिस्थितीला उद्गार देतात ती परिस्थितीच वाईट असते. संतापाचा, त्वेषाचा, द्वेषाचा, तिरस्काराचा उद्गार जेव्हा तोंडातून बाहेर पडतो तेव्हा तो केवळ त्या व्यक्तीला मोकळं करतो आणि विरतो. पण तो लेखकाच्या लेखनातून येतो तेव्हा तो केवळ लेखकालाच नव्हे तर एकंदर समाजात झिरपलेल्या एका भावनेलाच वाट करून देत असतो. छिनाल हा शब्द चॅनेल्सच्या बाबतीत मी वापरला तेव्हा त्या भावनेशी सहमती दाखवणाऱ्या कमेंट्स आल्या. साहित्यिक वर्तुळातील एक सन्मित्राने भा.पो.भा.नि. असे म्हटले. म्हणजे भावना पोहोचल्या- भाषेचा निषेध. त्यांच्यापुरते योग्यच म्हटले. पण निषेधार्ह गोष्टीचा निषेध करताना शब्द तापले तर भावना खऱ्या अर्थाने पोहोचतात असे मला मनापासून वाटते. ते साजुकपणे मांडण्यात अर्थ नाही. मग गप्पच का न बसावे…
या मुलाला सांगताना मला आठवल्या माझ्या गेल्या दोन वर्षांतल्या दोन कविता. या दोन कवितांतील शब्दांमुळे फेसबुक परिसरात गदारोळ उडाला होता. असा तो उडेल याची मी कल्पनाही केली नव्हती. मी आहे आई ही कविता तर रस्त्यावरच्या पोरसवदा मुलांच्या तोंडून दोन मिनिटांत सातवेळा आईची गांड आईच्या गांड हे शब्द- अपशब्द ऐकून मी पराकोटीची संतापले होते. आणि त्याच झटक्यात ती लिहून काढली होती. काय होती ही शिवराळ (!) कविता-
मी आहे आई,
साधीसुधी कुणाही माणसाच्या बाळाची.
झोपते कधी प्रेमाखातर, कधी नाईलाजाखातर कुणातरी नराबरोबर.
आणि जन्म घेतात नर मादी माणसाच्या माझ्या योनीतून.
चक्र सुरू रहाण्यासाठी.
याच योनीवर जणू थुंकता तुम्ही सारे मर्द
गांडपुचीच्यूत नि कायकाय…
तिच्यात कोण घुसला नि कुणी काय घुसवलं.
थूः.
कधी कुणा नराने दुसऱ्या नराला परम दुःख देण्यासाठी केला असेल
त्याच्या आईचा अपमान.
नंतर ही तुमची सांस्कृतिक रीत होऊन गेली.
आईतल्या बाईने आपल्या वेदना सांगायलाही योनीचा उल्लेख करायचा नाही.
खाली दुखतंय म्हणतात आय़ा, तिकडे आत फार खुपतं सांगतात डॉक्टरलाही.
आणि तुम्ही… तुमच्या हृदयासकट जिथून धडधडलात त्या योनीला
मुद्दाम हलकट शब्द सहजच वापरता-
म्हणून आज मी ही लिहून ठेवतेय इथे जळजळत्या काळजातल्या संतापाने.
——

मी आहे आई, बाई सर्वसमावेशक.
माझ्या गांडीचा उल्लेख तुमच्या ओठांत रुळलेला असतो.
माझ्यावर चढायला कोणतीही लेकरं तयारच असतात.
कधी शाब्दिक कधी प्रासंगिक.
रामाचं नाव घे नायतर- आईची गांड तयारच असते घालून घ्यायला.
शिवाजीराजाचा जयजयकार करताना तुम्ही आईच्या पुच्चीला विसरत नाही.
बाबासाहेबांचा जयजयकार करणारांना तरी कुठे बाबाच्याही जननस्थानाचा विसर पडेल?
तेरी माँ की च्यूत
तिकडे ते जगातली सर्वश्रेष्ठ प्रगत संस्कृती म्हणून मिरवणारे सश्रद्ध पाश्चात्यही
एकमेकांच्या मदरला फक करतात किंवा तूच तुझ्या मदरला केलंस म्हणतात.
अल्ला के बंदे काय डायरेक्ट पडत नाहीत पृथ्वीवर.
त्यांनाही तर यावं लागतं बाहेर आईच्याच मांडीमधून
त्यांचाही कुणीही दुश्मन त्याच्या माँला ‘घालणारा’ असतो.
आणि तोही त्याच्या काफीर दुश्मनाला…
तरी असतात सगळेच त्यांच्या आयांची लेकरं. बछडी…
मी आहे आई.
कधी तुमची आई कधी त्याची आई.
‘घालून’ घेण्याच्या पोझमध्ये जणू जन्मजन्मांतरी वाट बघत रहाणारी.
निरखत, ऐकत रहाते गर्दीतही कानावर सहज पडणारे घण
गांडगांडगांडगांडगांड…
तुमचे शब्द, तुमच्या जिभा माझ्या आईपणाच्या इंद्रियावरून लपलपताना.
वाट पाहात रहाते झडतील कधी जिभा या- महाकुष्ठ झाल्यासारख्या.
लक्षातही येणार नाही तुमच्या- जेव्हा कदाचित् होऊनही जाईल तसं.
आत्ताच पहा.
तुमचा मेंदूच झडतो आहे.
महाकुष्ठ जडलंय त्याला.
रक्तपू होऊन तो पिसाळेपर्यंत देतच रहा तुम्ही आईच्या योनीच्या नावे शिव्या.
एक काळ असा उगवेल
तुम्हाला आईच्या योनीतून जन्मच नाही मिळणार.
हा असेल गांडीचा शाप.
उःशाप नसलेला.
मन ठिकाणावर असेल तर सांगा यात वापरलेल्या अपशब्दांचा अर्थ काय. डोकं ठिकाणावर आणण्यासाठी वापरलेल्या शिव्या तर तुकयाच्या अभंगांतही होत्या…
गोखले नि रावळ या नटांनी अरुंधती रॉय आणि शबाना या बुद्धीवंत स्त्रियांबद्दल जे काही भकले त्याचा संताप आणखी एका कवितेतून फुटला होता.
संस्कृती जतन करणे हा आपलाच ठेका आहे असे मानणाऱ्या अनेक भक्तवर्गीय श्वापदांनी या दोन कविता प्रसृत झाल्यानंतर जी काही अपशब्दांची आतषबाजी केली होती ती खरं म्हणजे मराठी भाषिक घटनांच्या इतिहासात नोंदलीच जायला हवी. अगदी भजन-कीर्तन करणाऱ्या महोदयांपासून ते फुटकळ ट्रोलपुत्र आणि ट्रोलकन्यांनी या कवितेचे निमित्त करून मला अपशब्दांचे नजराणे पाठवले. आपापल्या भिंतींवर भरपूर रंग उधळले.
म्हणजे जी कविता बाईला शिव्या देण्याबद्दलचाच संताप ओकत होती त्याच शिव्या कविता रचणारीला साभार परत मिळाल्या होत्या.
परेश रावळना इच्छा आहे… या कवितेतील शेवटच्या ओळींतला योनीचा उल्लेख म्हणजे अनेक सात्विक, स्निग्ध स्त्रीपुरुषांना माझ्या चारित्र्यहीनतेचाही पुरावा वाटला. नवल नाही. ही कविता काय होती…

परेश रावळना इच्छा आहे अरुंधती रॉयला जीपसमोर बांधून फिऱवण्याची.
ते पाच हजार लोक लाइक करतात, चारशे लोक शेअऱ करतात.
विक्रम गोखलेंना इच्छा आहे अनेकांना फाशी देण्याची
आणि
शबानाला ओरबाडण्याची.
त्यांच्यासमोरचा श्रोतृवर्ग टाळ्या वाजवतो. कुणीच सांगत नाही थोबाड बंद करायला.
आणखी कुणाला वाटतं ही विरोधी बोलते हिला नागडी करून मारायला हवं.
आणखी कुणाला वाटतं त्या बाईला तुरुंगातच बसवायला हवं.
बरखा दत्त रांड आहे. तिला ‘ते’ भोगतात आम्हीच का नाही?
ट्विंकल खन्नाला ते म्हणे फक्त रंडी म्हणून सोडून देतात कारण ती देशप्रेमीची बायको आहे.
सागरिका कधी सापडतेय का पाहू कुठे!
तीस्ता सेटलवाड, नेहा दीक्षित, स्वाती चतुर्वेदी,
गुरमेहर कौर, नंदिता दास, स्वरा भास्कर, शीला रशीद… कितीकितीजणी…
सर्वांच्या योन्यांमध्ये खंजीर खुपसून आडवातिडवाच फिरवला पाहिजे खरं…

असं काहीतरी केलं पाहिजे
तरंच आपली संस्कृती टिकेल
तरंच आपला देश विश्वगुरू होईल
भाऊ… उचल जीभ लाव टाळ्याला
भाऊ, उचल हत्यार… लाव गळ्याला
आसेतूहिमाचल ते हिंदुकुश…
भाऊ, या रांडांना धडा शिकवू या…

आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा पैलू असलेल्या लज्जागौरीचे शिल्पचित्र टाकले तरीही ज्यांचा थरकाप उडतो अशांकडून दुसरी अपेक्षाच नाही माझी.
‘मी आहे एक आई’ या कवितेत राम, शिवाजीराजे, बाबासाहेब यांचा अपमान झाल्याची भुमका उठवून एका सत्शील बेशरमाने पुण्यातील एका पोलीसठाण्यात माझ्याविरुद्ध तक्रार नोंदवली. तेथील एका स्त्री पोलिसांचा फोन आला. त्यांनी नीट समजून घेतले. काही आक्षेप असलेच तर लेखी पाठवू म्हणाल्या- त्याला तुम्हीही लेखी उत्तर द्या म्हणाल्या. पण समजा भीमा कोरेगाव केसमधल्या पोलिसांसारखे प्रेरित पोलीस असते तर काही वेगळाच मनस्ताप देता येणं शक्यच होतं.
योनीवर अत्याचार करू, त्यात काटेरी दांडकी खुपसू, समूहाने बलात्कार करू अशा धमक्या अनेक भाजपविरोधी, किंवा भाजपच्या नेत्यांविरोधात लिखाण करणाऱ्या तरुण पत्रकार महिलांना खरोखरच आल्या आहेत. त्यांना रांडा म्हटले जाते. पुरुष पत्रकारांसाठीही प्रेस-प्रॉस्टिट्यूट वरून प्रेस्टिट्यूट हा सब्द लोकप्रिय- नव्हे ट्रोलप्रिय केला गेला. अशा धमक्या आल्यानंतर पोलिसांत तक्रार करून मग या ट्रोल कंपनीवर संशोधन करणाऱ्या स्वाती चतुर्वेदीचे उदाहरण तर आता तिच्या पुस्तकातून उघड झाले आहे. नेहा दीक्षितने आपल्या सत्कारसमारंभात या बीभत्स धमक्यांचा उल्लेख जाहीरपणे केला.
प्रश्न असा आहे, योनी या स्त्रीजननेंद्रियाच्या उल्लेखालाच भडकाऊ मानणारे हे लोक योनीला किती गलिच्छ शब्दांत आणि कृतीने अवमानित केले जाते याबद्दल खरोखरच अजाण आहेत, अडाणी आहेत की आपल्या चिखलात आपण सुखी या वृत्तीचे आहेत?
या कवितेनंतर अरुंधतीला बांधायलाच नको तर तिला गोळ्याही घाला, तिलाच काय तिची बाजू घेणाऱ्या या बाईला म्हणजे कर्णिक बाईलाही बांधा, हिच्याही योनीमध्ये सुरे खुपसायला हवे- हिचं स्वतःचंही नाव तिने यादीत का नाही घातलं असे लिहिणारे बोलणारे स्त्रीपुरुष कुणाचाही अपमान करीत नाहीत. ते केवळ स्वतःच्याच माणूसपणाचा, स्वतःच्याच थोर मानीव संस्कृतीचा अधिक्षेप करतात हे त्यांना कळेनासे झाले आहे, हे आजच्या वातावरणाचे फलित आहे.
आणि म्हणूनच म्हणेन की अपशब्द वापरताना अविचाराने वापरणे आणि विचारपूर्वक वापरणे हा फरक महत्त्वाचा आहे.
उगीच आपण कशाला त्यांच्या पातळीवर उतरायचं हा साजूकपणा सोडला मी केव्हाच. नामदेव बिघडण्यापूर्वी त्याने शिव्यांचे गडद अर्थ आम्हाला केव्हाच समजावून दिले होते. आणि त्याच्याही तीनशे वर्षं आधी तुकारामाने…
हा आहे माझ्या अपशब्दांचा वारसा.
तेव्हा बेजबाबदारपणे पत्रकारिता करणाऱ्या चॅनल्सना मी छिनाल म्हटलं याचं नवल वाटून घेऊ नका. अधःपतनालाच गौरव समजण्याच्या काळात मी तरी अजून जगत नाही.

(लेखिका परखड लेखनासाठी ओळखल्या जातात)

[email protected]

Previous article|| हवंतर ||
Next articleसरकार पुरस्कृत झुंडशाही !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.