हास्याची ढगफुटी- महाराष्ट्राची हास्यजत्रा 

– राजेश देशपांडे

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – या कॉमेडी शो ने सध्या अफाट लोकप्रियता मिळवली आहे . आज मराठीच नव्हेत तर अमराठी लोक पण हास्य जत्रा बघून धो धो हसताहेत. मनमोकळं हसलो तर इडीची धाड पडेल अशी भीती असलेल्या राजकीय नेत्यांना पण हास्यजत्रा हसवतेय . सोशल मीडियावरही  या मालिकेने धुमाकूळ घातला आहे. भारतातील प्रमुख शहरासह अमेरिका , कॅनडा  आदी देशातही  मालिकेने झेंडे रोवले आहेत . समीर चौघुले , नम्रता संभेराव, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर , शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदुलकर,  वनिता खरात, इषा डे,रसिका वेंगुर्लेकर , पृथ्वीक प्रताप , ओंकार भोजने आदी कलाकारांनी चित्रपट नट- नटयांना हेवा वाटेल अशी लोकप्रियता मिळवली आहे . या मालिकेतील प्रत्येक स्किट हे दहा -बारा मिनिटांचे असते . मात्र त्यासाठी  सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी चमू जबरदस्त मेहनत घेत असते . 

There is no humour in Heaven म्हणजेच स्वर्गात विनोद नाही, असं म्हणतात. कारण, जिथे दुःख नाही तिथे विनोद कसा असणार? कारुण्यातून जन्माला येणारा विनोदच चिरकाल टिकतो. म्हणूनच चार्ली चॅपलिन आजही अमर आहे. Anybody can play the tragedy but comedy is very Serious business हे मात्र अगदी खरं आहे. माझ्या अनुभवातून सांगतो की, लोकांना हसवणे अत्यंत कठीण काम आहे; आणि आजच्या काळात तर अजून अवघड झालं आहे. त्याला अनेक कारणं आहेत. त्याबद्दल पुढे बोलूच.

आपल्या महाराष्ट्राला विनोदाची मोठी परंपरा आहे. ‘टवाळा आवडे विनोद’असे समर्थांनी म्हटले होते, त्याचा संदर्भ कदाचित वेगळा असावा. कारण, मूर्खांची लक्षणे त्यांनी विनोदी अंगांनीच लिहिली आहेत. ज्याला Satire म्हणजेच उपहासात्मक म्हणतात, तसंच आहे ते. एकनाथ महाराजांची भारुडं म्हणजे उत्तम हसवत हसवत डोळ्यात अंजन घालणारीच होती. आपली लोकनाट्यं ही तर विनोदाची खाणच. कोंकणी गजाली पण त्यातलाच प्रकार. पुढे अनेक महान लेखकांनी अवघ्या मराठीजनास हसत ठेवले. कधी कथांमधून, कधी लेखातून, कधी व्यक्तिचित्रणातून, तर कधी नाटक-सिनेमातून विनोदाची ही गंगोत्री अविरत वाहत आहे. आणि पुढेही वाहत राहील.

मराठी नाटकांनी तर विनोदाची पालखी आजवर यशस्वीपणे वाहिली आहे. त्यानंतर आला टेलिव्हिजन. सुरुवातीच्या काळात अनेक सुंदर विनोदी मालिका आल्या. स्किट्स म्हणजेच प्रहसन. लोकनाट्यातली बतावणी हा प्रहसनाचाच एक उत्स्फूर्त आविष्कार. विनोदाचे सगळे प्रकार यात सढळ हस्ते वापरले जातात. रसिकांना हसवणे हाच त्याचा मुख्य हेतू. टीव्हीवर तेव्हा दूरदर्शन ही एकच सरकारी वाहिनी होती. तिच्यावर प्रथम हा प्रकार आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू या जोडगोळीने आणला आणि गाजवला. त्यांचे निर्माते दिग्दर्शक होते याकुब सईद. त्यानंतर गजराच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी मराठी रसिकांना उत्तम विनोदाचा दरवळ दिला. त्याचे अध्वर्यू होते विनय आपटे.

नंतर खाजगी वाहिन्या आल्या आणि विनोदी मालिकांचा आणि कार्यक्रमांचा सुकाळ आला. सुदैवाने मला या वाहिन्यांवर दहाबारा मालिका करण्याची संधी मिळाली. त्यातल्या ‘कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक’ने अर्धे तप मराठी मनाला रिझवलं. ‘मालवणी डेज’आजही यू-ट्यूबवर पुन्हा पुन्हा बघितली जाते. अल्फा मराठी, म्हणजेच आत्ताचे झी मराठीवर माझ्याकडून ‘कोपरखळी’नावाची प्रहसन मालिका लिहिली गेली. झी मराठीवर केदार शिंदेची ‘घडलंय बिघडलंय’ यातूनही अनेक अभिनेते आणि नेत्यांची करियर्स घडली. पण, गाजलेली पहिली स्किटची सीरियल म्हणजे ई टीव्हीवरची ‘कॉमेडी एक्स्प्रेस’. ज्ञानेश भालेकर निर्माते दिग्दर्शक असलेली ही मालिका खऱ्या अर्थाने गाजवली, ती प्रशांत लोके आणि आशिष पाथरे या लेखक जोडीने. प्रशांत लोके हा विनोदाचा एक वेगळाच अतरंगी मेंदू घेऊन आलेला लेखक आहे. आशिष पाथरे माझ्या गंगूबाईपासून लिहायला लागला. अत्यंत अभ्यासू लेखक. या दोघांनी लिहिलेल्या स्किट्सची संख्या मोजली, तर एखाद्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल. यांच्यासोबत सचिन मोटे हा सध्या तमाम मराठी समाजाने डोक्यावर उचलून घेतलेल्या हास्य जत्रा या मालिकेचा मुख्य लेखक आणि एक निर्माता.

हास्यजत्रेचे कर्तेधर्ते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे

दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी या आधी ‘फू बाई फू’सारखे कार्यक्रम यशस्वी केले होतेच. त्याचे निर्माते राकेश सारंग होते. पण, या दोन सचिनच्या डोक्यात वेट क्लाऊड नावाची प्रॉडक्शन कंपनी काढून निर्माते व्हायची वीज चमकली आणि त्यानंतर हास्याची ढगफुटीच सुरू झाली. आज मराठीच नव्हे, तर अमराठी लोक पण ‘हास्य जत्रा’बघून धो धो हसतायत. मनमोकळं हसलो, तर इडीची धाड पडेल, अशी भीती असलेले राजकीय नेत्यांना पण हसवतेय हास्य जत्रा! आमच्या गंगूबाईला हे भाग्य लाभलं होतं. पण, तेव्हा विनोदी लिहिणे आजच्या तुलनेत सोप्पे होते. कारण, तेव्हा चॅनलमध्ये मराठी साहित्य, मराठी रंगभूमी, मराठी रसिकांच्या आवडीनिवडीची जाण असलेले ईपीज्, म्हणजे कार्यक्रम अधिकारी होते. त्यामुळे लेखक-दिग्दर्शकांवर विश्वास ठेवून ते स्वातंत्र्य देत होते. त्यावेळी मराठी शब्दांचे अर्थ माहीत नसलेले ‘एसएनपी’म्हणजेच सोशल नॉर्म्स प्रॅक्टिसेस मंडळ नव्हते. ही म्हणजे चॅनल्सचे खाजगी सेन्सॉर बोर्ड. आता काळ्याला काळा, गोऱ्याला  गोरा, बुटक्याला बुटका, जाड्याला जाडा, कडक्याला कडका म्हणता येत नाही. मराठीतल्या अनेक म्हणी तर आता बादच झाल्या आहेत.

तेव्हा सोशल मीडिया नव्हता, आज Whatsapp वर रोज शेकडो जोक्सचा रतीब घातला जातो. आपल्यालाच सुचलेला एखादा विनोद लिहून होण्याआधी मोबाईलवर आलेला असतो. कोण लिहितात हे विनोद, हे एक कोडंच आहे. काही विनोद तर अप्रतिमच असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा आम्ही मुक्तपणे विनोदी मालिका करत होतो, तेव्हा खुल्या दिलाने हसणारे शेतकरी होते. ट्रोल करणारी नेटकरी नव्हते. तेव्हा स्वतःवरचे विनोद मोठ्या मनाने स्वीकारून दाद देणारे नेते होते. याला काही अपवाद होतेच. आतासारखे न्यूज चॅनेलवर चमकण्यासाठी चॅनल्सच्या काचा फोडणारे, निरुपद्रवी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांना अर्वाच्य भाषेत धमक्या देणारे कोते नव्हते. आज यालाही काही अपवाद आहेत. तर, अशा चहुबाजूंनी कौरवसेनेने चक्रव्यूहात घेरलेल्या अभिमन्यूसारखं हास्य जत्रेची टीम आपलं हास्यतिनापूर जिंकण्यासाठी लढत आहे; आणि या सैन्याला पाठिंबा आहे तो सोनी मराठीसारख्या श्रीकृष्णाचा.

आता पाहू या दहाबारा मिनिटांच्या स्किटमागे किती कष्ट असतात ते. सगळ्यात आधी कामाला लागते लेखकांची तुकडी. ते सतत स्किटच्या विषयांच्या शोधात गुन्हेगाराचा माग काढत फिरणार्‍या गुप्तहेरासारखे भटकत असतात. गवसलेले विषय-गोष्टी, कोळ्याने जाळ्यात आलेले मासे घरी आणून ओतावे तसे सचिन मोटे आणि गोस्वामी समोर ओतले जातात. त्यातले उत्तम ते निवडले जातात. मग त्यावर दिवस दिवस मंथन होतं. मग, त्यांच्यावर स्किट्स लिहिल्या जातात. पुन्हा ती स्किट्स विनायक पुरुषोत्तम, अमोल पाटील, अभिजित पवार, हृषीकांत राऊत, समीर चौघुले (याला लेखक बनवण्याचे पुण्य आमच्याच ‘सतराशे साठ सासूबाई’या मालिकेमुळेच घडलं); प्रसाद खांडेकर, प्रथमेश शिवलकर, श्रमेश बेटकर, विनोद गायकर, स्वप्निल जाधव हे लेखक मावळे एकत्र येऊन वाचतात. मग, सचिनद्वयी त्यांची चिरफाड करून अजून सुधारणा करतात. यात अर्धा आठवडा जातो. त्यानंतर सेटवर तालीम उभी राहते.

रंगभूमीच्या मुशीत तावून सुलाखून निघालेली बावनकशी अतरंगी आणि काही नवोदित हरहुन्नरी कलाकार मंडळी; म्हणजेच समीर, प्रसाद, नम्रता संभेराव, ईशा डे, वनिता खरात (हिने माझ्या श्री बाई समर्थ नाटकात धुमाकूळ घातला होता) अरुण कदम, प्रभाकर मोरे, श्याम राजपूत, चेतना भट, पृथ्विक प्रताप, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने, शिवाली परब, दत्तू मोरे, प्रथमेश शिवलकर, प्रियदर्शिनी इंदलकर, निखिल बाणे, हेमंत पाटील, विराज जगताप, प्रियंका हांडे, श्रमेश बेटकर आणि आधीचे विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे आणि सध्या माझ्या ‘करून गेलो गांव’नाटकात धुमशान करणारा ओंकार भोजने एकत्र येतात आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामीच्या धमाल मार्गदर्शनाखाली तालीम सुरू होते.

मूळ लिखित स्किट्समध्ये अजून वाढीव धमाल भरली जाते. काही स्किट्स एखाद्या राजकीय नेत्याच्या विचारधारेइतक्या पूर्णपणे बदलल्या जातात. शेवटी छायाचित्रणकार शैलेंद्र राऊत यांच्या बारा कॅमेर्‍यांनी सगळ्यांना अचूक टिपणाऱ्या टीमसह आणि आमीर हडकरच्या Band च्या तालावर, प्राजक्ता माळीच्या गोड-मधाळ निवेदनाने शूटिंग सुरू होतं. विनोदाला मनापासून हसून दाद देणारे हास्यरसिक प्रसाद ओक, सई ताम्हणकर, आधी असणारे सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, अलका कुबल, मकरंद अनासपुरे आणि उत्साहाचा प्रपात महेशजी कोठारे या कलाकारांना प्रोत्साहन देतात.कोरोना काळात जेव्हा साऱ्या जगावर एक काळं सावट पसरलेलं होतं, तेव्हा या हास्यकारंज्यांनी जीवनामृत पाजलं. आज पाच वर्षात सातशे पन्नासवर भाग झालेल्या या हास्य वारकऱ्यांना समस्त रसिकांच्या वतीने माझी जिवाभावाची गळाभेट!

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२३

(राजेश देशपांडे हे मराठीतील सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते आहेत.)

9820180979  

Previous articleआवाज कुणाचा…? ‘बाईमाणूस’चा!
Next articleमेंदूचे गूढ
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.