हा तर अप्रिय लेखनाचा बहुमान

सौजन्य -लोकसत्ता akhand bharat
ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांची अंदमान येथे भरणाऱ्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या संमेलनात अध्यक्षीय भाषण करण्यापूर्वी त्यांनी व्यक्त केलेले हे मनोगत म्हणूनच महत्त्वाचे..
सप्टेंबरमध्ये अंदमान येथे होणाऱ्या चौथ्या ‘विश्व मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष म्हणून माझी निवड झाल्याचे कळताच मला खूप आनंद झाला. हे संमेलन सावरकरांच्या सुवर्णस्मृतिवर्षांनिमित्त त्यांनाच अर्पण केले जाणार आहे, ही चर्चा अनेक दिवसांपासून वृत्तपत्रांतून चालू होती, पण त्याचे अध्यक्ष म्हणून आपली निवड व्हावी किंवा होईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. कारण मी सावरकरांवर दोन ग्रंथ लिहिले असल्यामुळे माझ्या नावाला ‘सावरकर’ चिकटलेला होता. ‘शेषराव मोरे हा अभ्यासू, हुशार व बहुजन समाजातला, पण सावरकर विचारांच्या नादी लागला नि जातीय बनला (काहींच्या मते ‘वाया’ गेला),’ असे अनेक पुरोगाम्यांनी म्हटल्याचे व ते मानीत असल्याचे मला माहीत आहे. तेव्हा या पुरोगामी महाराष्ट्रात आपल्याला असा अध्यक्ष वगैरे होण्याचा बहुमान मिळेल, असे मलाच काय, पण माझ्या एखाद्या भाबडय़ा चाहत्यालाही वाटले नसेल. परंतु अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने माझी निवड करून एक चमत्कार केला आणि सर्वच महाराष्ट्राला विलक्षण आनंद झाल्याचे पाहून आपण ‘वाया’ गेलो नसल्याचे कळाल्याने मोठे समाधान वाटले.
अनेकांचा असा समज झालेला मला माहीत आहे की, कोणा तरी अस्सल सावरकरवाद्याने लहानपणीच माझ्या डोक्यात ‘सावरकर’ घुसडून दिला आहे. म्हणून मुद्दाम सांगू इच्छितो की, खेडय़ातील शाळेत असताना लिंगायत समाजातील वैजनाथ उप्पे गुरुजींनी आम्हाला बुद्धिवादी व समाजक्रांतिकारक सावरकर अभ्यास करण्याची प्रेरणा दिली आहे. त्यानंतर आम्ही ‘स्वत:च्या धडावर स्वत:चेच डोके ठेवून’ समग्र सावरकर समजून घेतला आहे. सावरकरवाद्यांनी किंवा अन्य हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला सावरकर शिकविलेला नाही, तर खरा बुद्धिवादी समाजक्रांतिकारक, सेक्युलर सावरकर त्यांनाच समजावून देण्याचे काम आम्ही केले आहे. आमच्या गुरुजींनी [दुर्दैवाने ते गुरुजी वयाच्या ४५व्या वर्षीच (१९८७) वारले] सावरकरांकडे पाहण्याची वस्तुनिष्ठ व बिगरजातीय दृष्टी दिली नसती तर आम्ही कदाचित साहित्यिक, विद्वान, विचारवंत वगैरे बनलो असतो तरी सावरकर हे ब्राह्मणवादी, जातीय, प्रतिगामी, सनातनी, मनुवादी, माफीवीर आहेत म्हणून ओरडत राहिलो नसतो. असे ओरडण्याचा राष्ट्रीय गुन्हा हातून घडू न देण्याचे श्रेय या माझ्या गुरुजींकडे जाते.
नांदेडचे नरहर कुरुंदकर यांच्या तर्कशुद्ध व तर्ककठोर विचार करण्याच्या पद्धतीचा माझ्यावर झालेला परिणाम सावरकर समजून घेण्यासाठी अतिशय उपयोगी पडला. कुरुंदकर हे काही सावरकरवादी नव्हते; परंतु हिंदू संघटनांचा उघड पुरस्कार व गांधी-नेहरूंवर टीका या दोन बाबी वगळता सावरकर व कुरुंदकर यांचे अन्य विचार सारखेच होते. तर्कशुद्ध विचारांती जे निष्कर्ष येतील ते निर्भीडपणे मांडण्याचा धीटपणा आम्ही कुरुंदकरांकडून शिकलो. आम्हाला सामाजिकशास्त्रांचे विद्यार्थी व्हायचे होते व कुरुंदकर प्राध्यापक असलेल्या नांदेडच्या पीपल्स कॉलेजला प्रवेश घ्यायचा होता; परंतु माझ्या शिक्षणाची सर्व व्यवस्था तेथेच नव्याने स्थापन झालेल्या यशवंत महाविद्यालयाने केल्यामुळे व आमचा गणित हा हातखंडा विषय असल्यामुळे तेथील प्राचार्यानी आम्हाला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायला लावला. त्यामुळे मनाविरुद्ध कला शाखेऐवजी विज्ञान शाखा घ्यावी लागली व पुढे नाइलाजाने विज्ञानाचे व अभियांत्रिकीचे विद्यार्थी व नंतर प्राध्यापक व्हावे लागले. परिणामत: माझ्या जीवनाची अनेक अनमोल वर्षे यात वाया गेली. जर कला शाखेचा व कुरुंदकर गुरुजींचा विद्यार्थी होण्याचे सद्भाग्य मिळाले असते तर आजवर मी जे केले आहे ते वीस वर्षांपूर्वीच केले असते. दुर्दैवाने कुरुंदकर गुरुजीही वयाच्या ५०व्या वर्षीच (१९८२) गेले. त्यामुळे त्यांचेही मार्गदर्शन आम्हाला लाभू शकले नाही.
आतापर्यंत आम्ही जे ग्रंथ लिहिले त्यासाठी आम्हाला कोणाचेही मार्गदर्शन उपलब्ध झाले नाही. पहिला ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ (१९८८) हा ५६० पृष्ठांचा ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वी अन्य कोणीही वाचला नव्हता. या पहिल्या ग्रंथाच्या प्रसिद्धीनंतर त्यातील माझ्या विचारांना पाठिंबा व पुढील लेखनासाठी प्रेरणा देणारे एक विद्वान व बुद्धिवादी विचारवंत मला लाभले- ते म्हणजे डॉ. स. ह. देशपांडे. आपण योग्य दिशेने चाललो आहोत याची त्यांच्यामुळे आमची खात्री झाली. नंतर प्रसिद्ध झालेले काही ग्रंथ प्रसिद्धीपूर्वी त्यांच्यासहित अन्य काही विद्वानांना वाचण्यास दिले होते, पण त्यात कोणीही कोणत्याही प्रकारची दुरुस्ती सुचवली नाही व आम्ही जे लिहिले तेच जसेच्या तसे प्रकाशित झालेले आहे. कुरुंदकर हयात असते तर आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केले असते, लेखनाची चिरफाड केली असती व लेखन अधिकच तावून-सुलाखून निघाले असते.
सावरकरांचा अभ्यास म्हणजे केवळ त्यांच्या चरित्राचा व ग्रंथांचा अभ्यास नव्हे, तर महत्त्वाच्या राष्ट्रीय व सामाजिक प्रश्नांचा अभ्यास होय. त्यांच्याबरोबरच म. फुले, आगरकर, लो. टिळक, शाहू महाराज, जेधे-जवळकर, गांधी, नेहरू, डॉ. आंबेडकर प्रभृती नेत्यांचा अभ्यास करावाच लागतो. त्याचप्रमाणे भारताचा इतिहास, जातिसंस्थेचा इतिहास, समाजसुधारणेच्या चळवळी, हिंदू-मुस्लीम प्रश्न, इस्लामचा अभ्यास, भारताची फाळणी इत्यादी आमच्या अभ्यासाचे विषय बनले. त्यातूनच नंतर डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण, काश्मीर-समस्या, १८५७चा उठाव, मुस्लीम मनाचा शोध, चार आदर्श खलिफा, भारताची फाळणी हे ग्रंथ निर्माण झाले. सावरकरांवरील आमचा दुसरा ग्रंथ (सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास) १९९२ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर लिहिलेले सर्व ग्रंथ सावरकरांवर नसून अन्य राष्ट्रीय विषयांवर आहेत. एवढेच नव्हे, तर त्यापैकी दोन ग्रंथांची नावे व त्यातील निष्कर्ष उघडपणे सावरकरांनी मांडलेल्या निष्कर्षांविरुद्ध जाणारे आहेत. १८५७च्या उठावाला त्यांनी ‘स्वातंत्र्यसमर’ म्हटले होते. आम्ही त्यास मुस्लिमांचा ‘जिहाद’ म्हटले आहे. सावरकर उघडपणे अखंड भारतवादी होते, पण आमच्या अलीकडच्या ग्रंथातील प्रतिपादन असे आहे की, ‘अखंड भारत’ हे या देशाला व विशेषत: हिंदूंसाठी अतिशय घातक ठरले असते व काँग्रेसने आणि गांधीजींनी फाळणी करून हिंदू समाजावर महान उपकार केले आहेत. तेव्हा आम्ही सावरकरांच्या अभ्यासातून विचार करण्याची बुद्धिनिष्ठ, तर्ककठोर, वस्तुनिष्ठ, व्यवहारनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ दृष्टी घेतली. या दृष्टिकोनातून लेखनासाठी निवडलेल्या विषयाचा चिकित्सक अभ्यास केला. त्यातून आम्हाला जे सत्य वा निष्कर्ष जाणवले, ते सावरकरांचा विचार न करता निर्भीडपणे समाजासमोर मांडले. त्यामुळे १८५७चा जिहाद मोडून काढणाऱ्या शीख व मराठे यांचा आणि फाळणी करणाऱ्या गांधी-नेहरूंचा गौरव करताना आम्हाला ‘सावरकर’ आड आला नाही. सावरकरांनी बुद्धिवाद शिकविला आहे, शब्दप्रामाण्य नव्हे!
ग्रंथासाठी विषय निवडण्यासाठी सामान्यत: आम्ही तीन कसोटय़ा वापरतो: एक- तो विषय राष्ट्रीय वा सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा असला पाहिजे. दोन- त्या विषयावर आजवर इतिहासकारांनी, अभ्यासकांनी वा विचारवंतांनी केलेली मीमांसा, मांडणी वा निष्कर्ष चुकीचे आहेत, असे अभ्यासांती आम्हाला पटले पाहिजे. तीन- तो विषय आजच्या वर्तमानासाठीही महत्त्वाचा असला पाहिजे. जेथे या कसोटीस विषय उतरला नाही अशा काही अन्य विषयांचा आम्ही अभ्यास केला असला तरी त्यावर ग्रंथ लिहिला नाही.
आम्ही लिहिलेल्या कोणत्याच ग्रंथाचे निष्कर्ष प्रचलित लोकमताशी जुळणारे नाहीत. जणू लोक-अप्रिय होण्यासाठीच आमचे लेखन झाले आहे. आमच्या दोन पुस्तकांची नावेच ‘अप्रिय पण..’ अशी आहेत. आमच्या मनाला वाटणारा सुखद धक्का हा की, असे अप्रिय लेखन करूनही समाज आपल्याला बहुमान देतो. हेतू शुद्ध ठेवून अभ्यासपूर्ण पण अप्रिय लेखन करणाऱ्यासाठी ही घटना प्रेरणादायी ठरेल. एक प्रकारे ‘अप्रिय पण..’ लेखनाचाच हा बहुमान मानला पाहिजे.
सौजन्य -लोकसत्ता

Previous articleस्मार्टफोनपासून दूर राहणेच फायदेशीर
Next articleविदर्भाने मुख्यमंत्र्यांना ताकद देण्याची आवश्यकता
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here