हिंसेला भेटलेली सत्यभामा

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१७

शर्मिष्ठा भोसले

हिंसेला आपण बहुतेकदा काचेच्या पारदर्शक भिंतीआडून अनुभवत असतो. ती दिसते, पण तिची धग आपल्यापर्यंत पोचत नाही. आपण हिंसेविषयी वाचत-ऐकत-बोलत राहतो. जगण्यातला हिंसेचा हस्तक्षेप माणसांना तोडून-मोडून टाकतो. मात्र त्यातून सावरलेली काही माणसं कमालीच्या निर्भयपणे काळाला सामोरी जातात. कदाचित हिंसा त्यांना मोहमायाभयापार पोचवते. त्यातल्याच एक सत्यभामाबाई सूर्यवंशी. जात, वर्ग, लिंग, प्रदेश अशा सगळ्या निकषांवर शोषित ठरलेल्या माणसासोबत घडणारी हिंसा नक्की कशी  असते? बहुरूपी हिंसेच्या निखाऱ्यांवर जळणं, धुमसणं, विझणं सोसलेल्या सत्यभामाबाईची ही जुबानी, त्यांच्याच शब्दांत.

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………

 

 

‘पोरी, एवढी दहशत सोसले, की सगळ्यातून तरून आता मी निसुग झाले. लोकायनी माझ्या नेसूचं फेडून मला गावात फिरवली तवाच माझा जीव गेला. आता निसता देह उरलाय. जळालेली कोंबडी कसली भीती आगीला?’

अर्ध्यामुर्ध्या-सारवलेल्या उखडलेल्या जमिनीवर मी आणि सत्यभामाताई बसलोय. कुडाचं घर. समोर लहानशी दगडी न्हाणी. इवलंसक अंगण आणि अंगणात पिंपळाचं, कडुलिंबाचं झाड. याच घर-अंगण-झाडाची मालकी शाबूत ठेवायला सत्यभामाताईनं जितेपणी मरण पाहिलं.

सत्यभामा सूर्यवंशी. राहणार बोरगाव, तालुका चाकूर, जि. लातूर. वय ५२ वर्षं. ‘महिलेची विवस्त्र धिंड, आठ जणांना अटक’ ‘अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या महिलेला विवस्त्र करत मारहाण’, ‘धिंड काढणाऱ्यांना अटक करा, पिडीत महिलेची मागणी’ ‘’त्या’ अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको’ उभ्या गावानं वैर पुकारल्यावर पुढं घडलेल्या आक्रीताच्या पेपरात आलेल्या बातम्या ताई वाचून दाखवत होत्या. फक्त ठळक मथळे. ते वाचताना त्यांच्या आवाजातला थंडपणा अंगावर येणारा.

त्याच शांतसंथ स्वरात ताई बोलू लागतात, ‘माझे वडील माणिकराव तेलंगे या  गावचे कोतवाल होते. त्यांना नोकरीपायी इथं येऊन राहाव लागलं. या गावात तसं उपरेच म्हणायचे. तर, १९८१ साली गायरान जमिनीत शासनानं दहा झोपडपट्ट्या काढल्या. त्यात वडलाला ही ३३ बाय ३३ ची जमीन भेटली. त्यांनी डोक्यावर पाणी आणू-आणू अंगणातली झाडं वाढवली. आम्ही तीन बहिणी. भाऊ नाही. दोघींची लग्नं झाली. वडील १९९५ मध्ये कोतवालकीवरून निवृत्त झाले. पेन्शन नव्हती. तेव्हा १२०० रुपये पगार होता शेवटचा. वडलांनी तिघींचीबी लग्नं लावून दिलती. माझा नवरा मारझोड करणारा निघाला. उदगीरजवळच्या नावंदीला मला दिलतं. नवरा बाहेरख्याली निघाला. सगळ्यांनी खूप समजावलं त्याला. पण शेवटी त्यानं मला सोडचिठ्ठी न देताच दुसरी बायको केली. आता मी इतकी लढले. पण त्यानं कधी एका शब्दानं माझी खुशाली विचारली नाही. बराच छळ सहन करून शेवटी गावी परत आले. याला आता पंचवीस वर्षं झाली. आई-वडिलाबराबर राहायचे. मला तीन मुलं. बालाजी, ज्ञानेश्वर आणि रविकांत. त्यांना इथंच लहानाचं मोठं केलं. ‘चटनी भाकर खाऊ पण अभिमानानं राहू’ असं आमचं धोरण. मी आई-वडिलाबराबर रोजाला जायचे. गाव खूप आडबाजूला. कुठल्याही दिशेला सात किलोमीटर गेल्यावाचून हमरस्ता भेटत नाही. माझी मुलं शहाणी झाली म्हणता-म्हणता आई-वडील म्हातारे झाले. त्यांची सेवा करण्यात मी गुंतले. तशात २०१२ साली आई वारली. मी आणि वडील दोघंच उरलो. वडिलांना डोळ्याला खूप अंधुक दिसायचं. थकले होते खूप.

आई वारली तशी गावातले काही राजकारणी माझ्या मागेच लागले. ‘तू ही जागा सोडून जा, तू काय गावची आहेस का?’ म्हणू लागले. मी बधले नाही. मग एका रात्रीत त्यांनी घराला समोरून तार-कुंपण घातलं. मग माझ्या शेजारीन कलूबाई तिकटेनं यायजायाला एक छोटं बोळकांड काढून दिलं. २००६ साल होतं. तेव्हाचा सरपंच विनायक भोसलेनं घराच्या बाजूला अतिक्रमण करत अण्णाभाऊ साठे समाजमंदिर बांधलतं. आमची बरीच जमीन त्या समाजमंदिरापायी गेली. समाजमंदिर घराला आडवं झालं. पण म्हणलं, आपल्या समाजासाठी करतेत, आपण खोडा घालू नाही. पण आता तर हे आमच्या घराच्याच मुळावर उठलते.

तवा गोपाळ कानवटे सरपंच होते. विनायक भोसले माजी सरपंच. दोघांनी मिळून सारखा तगादा लावला. त्या दोघांच्या घराजवळ गावच्या पलिकड दुसरी मातंग वस्ती आहे. तिथल्या घरांना त्यांनी माझ्याविरुद्ध फितवलं.’

सत्यभामाबाईचा आवाज कातर झालता. त्यांनी मला सवाल केला, ‘हा न्याय आहे का? मग लढावं का लढू ने? शासन उठवू देत ना मला. तुम्ही उठवणारे कोण?’

पुढं त्या सांगतच राहिल्या. ‘मी आता एकटी बाई होते. हे लोक दारू पिऊन यायचे. रात्रीला घराबाहेर जोरजोरात शिवीगाळ करायचे. छातीतून आरपार जाऊन पाठीतून निघाव्या असल्या शिव्या! घरात सत्तर वर्षाचा बाप निजलेला. मी जमिनीला घट्ट धरून पडून रहायचे. उशाखाली साप ठिवल्यावर नीज कसली येती? ‘दारू विकणारी’ ‘धंद्याला बसलेली’ असं गावात माझ्याविषयी काय-काय पसरवलेलं रोज कानावर यायचं. आत काळजाचं पाणी झालं तरी मी वर दिसू द्यायचे नाही.’

इतका वेळ खंबीर आवाजात कहाणी सांगणाऱ्या ताईच्या डोळ्यातून आता आसू ओघळू लागले. डोळ्याला पदर लावत त्या बोलतच राहिल्या.

‘मन घट केलं अन विचार केला, जागा कुणी दिली? कलेक्टरानं. मग उठवायचं असंल तर तोच उठवल. बाकी कुणाचा काय अधिकार? हे तार कुंपण हटवायलाच लावायचं असा विचार करून मी पहिला तक्रारअर्ज ग्रामपंचायतीला दिला. दुसरा पंचायत समितीत दिला. तिसरा तहसीलदाराच्या नावं लिहिला. चौथा उपजिल्हाधिकाऱ्याच्या. हाळी गावाच्या फोटूवाल्याला बोलावून त्या तार कुंपणाचे फोटो काढले. ते अर्जासोबत जोडले. आता मी तर आडाणी बाई, वस्तीतल्या शिकल्या पोरांकडून अर्ज लिहून घ्यायचे. माझ्या तक्रारीची दाखल घेत २०१३ च्या जानेवारीत तहसीलदार विक्रम देशमुख साहेब पाहणी करायला गावात आले. त्यांनी तार-कुंपण आणि दगडं काढायला लावली. गावात सगळ्यांची शांतता बैठकपन घेतली. हे झालं. पण त्यांची पाठ वळली तसं खरं प्रकरण सुरू झालं. दोघं आजी-माजी सरपंचांनी खुन्नस धरली. पुन्हा तार-कुंपण आणून घरासमोर टाकलं. गावात मला कुणाला बोलण्याला मनाई, कुणाला माझी मदत करायला मनाई. मी मात्र धीरानं कागदपत्रं सुलगावत राहिले. कुणा कार्यकर्त्याला भेट, कुणा वकिलाला भेट. माझी मुलं मजुरी, ड्रायव्हरकी करतात. कधी-कधी यायचे. पण त्यांना त्यांचा संसार-कामं असायचे.’

‘मी पडले निरक्षर बाई’ म्हणणाऱ्या ताईला घटितादरम्यानच्या सगळ्या तारखा आणि अनुभव संगतवार पाठ होते.

‘२०१४ च्या जानेवारीत नायब तहसीलदार धम्मशीला गायकवाड गावात आल्या. त्या नायब तहसीलदार होत्या. त्यांच्यासोबत पोलीसपण होते. त्यांनीपण शांतता बैठक घेतली. लोकांना समज दिली. पुढं ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारीपण गावात आले. प्रकरणाचा पंचनामा झाला. पण चित्र काय बदललं नाही. शासनानं ग्रामपंचायतीला तीन नोटिशी पाठवल्या. ‘केलेलं तार-कुंपण बेकायदेशीर आहे. ते लवकरात लवकर हटवा.’ पण तरी भोसले-कानवटे बधले नाही.’

ताईच्या आवाजाला आता धार आलेली.

‘मीबी इरेला पेटले. बाबासाहेबांनी म्हणलेत ना, ‘अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतोय. घरात बाबासाहेबांची पुस्तकं असायची. लहान असल्यापासून वाचायचे. इचार केला, आपली बाजू खऱ्याची हाय. आंबेडकरी चळवळीतले काही कार्यकर्तेसुद्धा माझ्या मदतीला धावून आले. त्यांच्यासोबत मी २०१५ सालात जानेवारीच्या संपतांना चाकूर पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले. माझे शेजारी तिकटेपण सोबत बसले. कारण मला जायला वाट करून दिल्याचा राग धरून सरपंचानं शेजाऱ्याच्या घरापतोर तार कुंपण वाढवलं होतं. तेबी माझ्यावनीच अडाणी. तीन दिवस उलटले. चौथ्या दिवशी माजी सरपंच आला. धमक्या दिल्या. सोबत बसलेल्यांबाबत अफवा पसरवल्या. म्हणाला, ‘हे सत्यभामाबाईसोबतचे माणसं रोजानं आणेलेले हाईत.’ तिकडं गाववाल्यांना भडकावलं. ग्रामसेवक गावात तार काढायला गेल्यावर गाववाल्यांनी विरोध केला. आम्ही तर तोंडात पाणीपण घेतलं नव्हतं. चौथ्या दिवशी सीओ आले. त्यांनी गावात जाऊन कानवटेला लेखी द्यायला लावलं, की मी आठ दिवसात तार-कुंपण काढतो.’ यावर आम्ही उपोषण थांबवलं. त्या आठ दिवसात सगळे गाववाले एक झाले. या दोन्ही सरपंचांच्या शेतावर लोकांना बोलावून दारू-मटनाच्या पार्ट्या व्हायच्या. माझ्याविरोधात वातावरण पेटलं. ‘तुम्हाला एक बाई ऐकत नाही? जिरवा तिची’

ताई स्तब्ध बसल्या. शांत झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर घडून गेलेलं सगळं  वादळ दाटून आलतं.

जरा वेळानं पुढं बोलायला लागल्या, ‘एका दिवशी काही लोक घरासमोर आले. त्यांनी घर-अंगणाची मोजणी सुरू केली. ‘घर आन रस्ता पाहिजे असंल तर समोर ये’ अशा धमक्या सुरू झाल्या. मी मागच्या रस्त्यानं निसटून एका शेतात जाऊन लपले. आंधळे वडील घरी एकटेच होते. जरा अंधारलं तशी लपत-छपत घरी आले. थोड्या वेळातच पन्नासेक पुरुष घरावर चालून आले. काहीजण घरावर चढले. मी म्हणलं, ‘बाजूला व्हा.’ त्यावर ‘माजलीस का गं मांगटे? आमच्या गावाची बदनामी करतीस.’ अशा भाषेतच हे सगळे बोलाय लागले. मी घराच्या मागं गेले. तिथं येऊन त्यांनी मला ओढलं. म्हणले, ‘चला रे दाखवा रांडंला…’ मला वाचवायला बघणारेपण मागं सरले. आता एकट्या बाईची पन्नास लोकापुढं काय खैर? सगळ्यांनी मिळून मला धरलं. जमावात बायापण होत्या. ‘हिला बायांनी मारलं’ असं दाखवायचं होतं त्यांना! माझ्या अंगावरची साडी फेडली. एका बाईनंच पुढं येत परकराचा बंध तोडला. तीपण मांगाचीच बाई! मी जीवाच्या आकांतानं ओरडत राहले. त्यांनी भवती रिंगण केलं होतं. मी परकर घट्ट धरला. घरामागचे काही पोरं एकदम मध्ये पडायला आले. लोकांची पकड थोडी सैल झाली. तशी मी जीव खाऊन झटका दिले. पळाले की रस्त्यापालिकडच्या किराणा दुकानात जाऊन थांबले. तवर वस्तीतल्या काही बाया-पोरं माझ्याकड आले. बायांनी त्यांची साडी आणून अंगावर घातली. मी साडी गुंडाळ तशीच चाकुरकडं जाणाऱ्या काळी-पिवळीत बसले. पोलीस ठानं गाठून डीवायएसपी वैशाली शिंदेसमोर थांबले. बौद्ध वस्तीतले जमनाबाई आणि दीपक कांबळे माझ्या बरूबर होते. रात्रीचे आठ वाजलते. मी म्हणले, ‘मला या-या लोकायबाबत तक्रार करायची.’ त्यावर शिंदे मॅडम मलाच उलटं विचारली, ‘कशाला तक्रार करतीस, तुला त्या गावात राहायचं नाही का? मिटवून टाक. मी तार काढायला लावते’ मी आतून-भायरून जळायलते. तिला विचारले, ‘माझ्याजागी तुझी अवस्था अशी केली असती तर? तू बाई असून दुसऱ्या बाईला समजून घेईनास का? तारेचं मला काय घेणं नाही आता.’ ती म्हणाली, ‘नाही घेता येणार तक्रार’ मी सोबतच्या माणसांना म्हणलं, ‘आणा रॉकेलचा डब्बा. मी इथंच पेटून घेते.’ यावर शिंदेबाई नरमली. तिनं एफआयआर दाखल करून घेतला. माझं मेडिकल चेकप झालं. बरेच प्रयत्न शिंदे मॅडमनं अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही नोंदवून घेतला. दोनेक तासानं पत्रकार आले. त्यांच्यासमोर मी सगळी कहाणी सांगितली.’

सगळ्या घटिताच्या बातम्या, वेळोवेळी केलेले अर्ज-तक्रारी, शासनाची आलेली उत्तरं याच्या दोन वेगवेगळ्या फाईल्स त्यांनी केल्यात. त्यामुळे कमालीच्या शिस्तीत सगळा घटनाक्रमाचे तारखेसह पुरावे समोर येतात. ताईंकडे असलेली बोलकी कागदपत्रं सांगत होती, ‘इकडं भोसले-कानवटे फरार झाले. त्यांनी स्वत:ची अटक टाळायला औरंगाबाद उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. ‘३ मार्च २०१५ पर्यंत या दोघांवर कुठलीही कारवाई करू नये’ असे आदेश न्यायालयानं पोलीस उपअधीक्षक आणि महाराष्ट्र शासनाला दिले.’

ताई सांगतात, ‘त्यानंतर हे दोघंही उजळ माथ्यानं गावात फिराय लागले. माझी बदनामी करणं, माझ्याविरोधात मातंग समाजाला उचकवणं, त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात राजकीय हस्तक्षेप करणं हे सगळं त्यांनी सुरू केलं. माझा मुलगा आला तवा त्याला सांगू लागले, ‘कुणीच काही केलं नाही. तुझ्या आईनंच साडी फेडून घेत कालवा केली.’ ‘पुन्हा हल्ला करणार’ अशा धमक्या कानावर याय लागल्या. मी आन वडील सर्वकाळ घरात बसून रहायचो. घराबाहेर पोलीस बंदोबस्त होता. तरी सुरक्षित वाटायचं नाही.

आयजी, कलेक्टर यांच्या उपस्थितीत सहा तारखेला तार-कुंपण हटवलं. तार-कुंपण शेवटी कोरड्या आडात टाकून दिलं. पेपरात बातम्या आल्यावर मंत्र्या-संत्र्यायची रीघ लागली. तेव्हाचे सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरेही सपत्नीक भेट देऊन गेलेत. राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी. एस. थूल यांनी १० फेब्रुवारीला गावात येऊन माझी भेट घेतली. माझ्या एका मुलाला नोकरी देत माझं पुनर्वसन करण्याचे आदेश शासनाला दिलते. कशाचीच अंमलबजावणी अजून झाली नाही.’

ताईचे वडील १४ मी २०१६ ला वारले. ताई गावाजवळच्या समाजकल्याण वसतिगृहात स्वयंपाकी म्हणून कामाला जायच्या. भोसले-कानवटे यांनी ‘ही वाईट चालीची बाई आहे. हिला कामावर ठेऊ नका.’ असं सांगत त्यांचं तेही काम तोडलं. कुणाकुणाच्या शेतावर दिवसभर काम केल्यावर १५ रुपये रोज मिळायचा. तोही बंद झाला. मुलं थोडेबहुत पैसे महिन्याला पाठवतात. त्यावरच त्यांची गुजराण चालते.

ताईनं न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. लातूरच्या जिल्हा न्यायालयात खटला   चालू आहे, त्याला दोन वर्षं झाली. ताई सांगते, ‘दोघा सरपंचांनी या काळात मला नाना तऱ्हेनं दबाव आणला. कुनाकुनाकरवी पैशेपण देऊ केले. साक्षीदार फोडले. आमच्या वस्तीतले जमनाबाई आन दिलीप कांबळे, राजकुमार सोनकांबळे आन त्याची आई कोंडाबाई तेवढे विकले गेले नाही. त्यांना अजूनही लई त्रास होतो.’

दोघी पन्नाशीकडे झुकलेल्या बाया माझ्याकडं कुतूहलानं पाहत ताईच्या बाजूला येऊन बसल्या. ताईनं माझी ओळख करून दिली, ‘या कलुबाई तिकटे अन या सावित्रा मुस्कावाड’

पुढं बोलू लागल्या, ‘माझा जीव जात होता तवा हे गाव थंड राहिलं. गावानं एक होत मला रस्त्यावर आणलं. घराची चौकट आन अंगावरचा कपडा हीच गरीबाची इज्जत. पण तीच ठिवली नाई लोकांनी. इथं रोज दिवस काढते ते काळजावर दगड ठेऊन. वर्ष झालं माझ्या हाताला काम नाही. कोणीच मजुरीला बोलावत नाही. कलूबाईसारखी  एखादी मन घट असणारी मावली बसती येऊन चार घटका. नसता मी अशीच एकटी. मी बुडापासून खरी होते. पण त्या दिवशी वाचले म्हणून आज तुमच्यापर्यंत आवाज पोचतोय. नसता आमच्यासारख्यांना ना माय असती, ना बाप! बाबासाहेब तवाच सांगून गेले ‘शहराकड चला’ पण आम्ही येडे खेडं सोडलो न्हाई.’

सावित्राबाईही बोलू लागल्या. म्हणाल्या, ‘आम्ही यांना बोलतो, वेळकाळंला विचारतो  म्हणून माझ्याशी लय लोकानी बोलणं टाकलं. माझं माहेर-सासर याच गावातलं. मालक बाहेरगावी ट्रकवर असतात. कानवटे सरपंचानं गरजूंना फसवत घरकुल योजनेतली घरं दुसऱ्याच गडगंज लोकांना वाटले. गरीबाचं कोण नसतं बघा!’

कलूबाईना म्हणलं, ‘तुम्हीही जरा बोला की, जरा सांगा आपबीती’ तसं त्यांनी दहशतीचं अनुभवलेलं रूप दाखवलं. म्हणाल्या, ‘मी सत्यभामाला जायची वाट आमच्या अंगणातून करून दिली तेव्हा आमच्या घरच्यांना खूप धमकावलं. माझ्या मुलाला, केशवलापण गावात गेल्यावर नाही-नाही ते बोलायचे. ‘त्या बाईला रस्ता कसकाय दिलास? तुला गावात राहायचं नाही का?’ विचारायचे. पण तो बधला नाही. या बाईनं पदरात आग घेतली. ताकद धरून भांडली. दुसरी कवाच उठून गेली असती. आताही नाव न घेता ‘गावात चार-दोन बाया लई बिघडलेल्या हायत’ असं टोचून बोलतात काही गावकरी.’

ताई सांगतात, ‘एकेकाळी काय रुबाब असायचा माझ्या वडलाचा. पण माझा त्रास बघून ते लई खचले. माझ्या आई-वडलांकडे पाहून तर मी एवढी लढले. मला भाऊ नाही. मी हिम्मत हारले असते तर त्या दोघांची गत काय झाली असती? म्हणून गाव सोडून जायला धजले नाही. तर गावच अंगावर धावून आलं. याला कसं आपलं गाव म्हणावं?’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा महात्मा गांधीजींजवळ आपली वेदना बोलून दाखवली होती. ‘Gandhiji I have no homeland.’ सत्यभामाताईला वेगळं काय म्हणायचं होतं?

 

ताईनं मुख्य गावात गेले तीन वर्ष झालं पाऊलच ठेवलं नाही. कुणी लग्नकार्यात, भजनकीर्तनातपण बोलावत नाही. ताई म्हणतात, ‘मलाही कुणाचंच तोंड बघण्याची इच्छा होत नाही. शेरात पोलीस स्टेशन तर जवळ असतंय. खेड्यापाड्यात बायका लई जीव मुठीत  धरून रहात्यात. किराणावाले चंद्रकांत भोसले यांनी मला बहिण मानलंय. रस्त्यापलिकड त्यांचं दुकान आहे. तिथून मी किराणा घेते. बाजार तर हाळी गावावरूनच आणते. भरल्या शिवारात एकट्यानं रात काढलेली मी बाई. आता जीवाचंपण भेव उरलं नाही. आता माझा आवाज न्यायालयापतोर पोचलाय. आता न्यायाची वाट बघायची. कोर्टातपण मला रोखून बघतेत दोघं सरपंचं.’

दिवसभराच्या हळव्या बोलाचालीच्या शेवटी ताई पुन्हा हळव्या होतात. मी गड्यामाणसांना मागं टाकल अशी हिकमती बाई होते. शिक्षण, नोकरी असं सगळं लई मनात होतं. पन सगळी हयात असल्या संघर्षातच गेली बघ! जाऊ दे, तुझ्यासारख्या शिकणाऱ्या-पुढं जाणाऱ्या पोरींकडं बघून माझा जीव लय आनंदून जातो.’ सावित्राबाई मला सांगतात, ‘सत्यभामा गाणीपन लिवती बरं! म्हणायला सांगा तुमी…’

ताई थोड्या संकोचतात. आम्ही तिघींनी आग्रह केल्यावर गाऊ लागतात,

‘दोन हे डोळे असून सुंदर, वाचता येईना मला अक्षर

काय ह्या अर्थ जीवनाचा, न तिसरा डोळा, डोळा शिक्षणाचा…

 

शाळा शिकले मी नाही, जीवना माझ्या अर्थ नाही

सही सोताची येत नाही, बोटा लाविते शाई

जाईना डाग त्याचा काळा, न तिसरा डोळा, डोळा शिक्षणाचा…’

आता सावित्रा आणि कलूबाईपन ताईच्या आवाजात सूर मिसळत होत्या. लौकिकार्थानं अनपढ असलेल्या या तिघी. जगण्यातले सगळे अभाव, अभावातून जन्मणारी सगळी हिंसा पेलत लिहिलेलं, जपलेलं सत्यभामाबाईचं गाणं आत खोलवर झिरपत होतं.

 

 

चौकट -१  

दु:खाचं वर्तुळ मोठं झालं

जखमेची खोलखोल ठसठस विसरत ताईनं आता परिवर्तनवादी चळवळीशी स्वत:ला जोडून घेतलंय. ताईला आता लोक कार्यक्रमांना बोलावतात. त्या तिथं आपल्या संघर्षाची कहाणी मांडतात. मुंबई, अमळनेर, औरंगाबाद, चांदवड अशा अनेक ठिकाणच्या परिषदांमधून त्या बोलल्यात. त्या सांगतात, ‘सामाजिक कार्यकर्ता मनीषा तोकले, वडवळच्या माजी सरपंच माया सोरटे अशा सगळ्याजणी मला येऊन भेटल्या. या हिम्मतवान बायांशी माझं दु:ख वाटून घेतलं. विद्रोही संघटना आणि कबीर कला मंचचे कार्यकर्ते मला शोधत गावात आले. त्यांची गाणी ऐकून मला लई उभारी मिळाली. सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार, रुपाली जाधव, रमेश गायचोर, सागर गोरखे, ज्योती जगताप सगळे पाठीशी उभं राहिले. यांनीच मला संघटनेतले चांगले वकील मिळवून दिले. मला खटला लढवायचा हुरूप आला. या सगळ्यांसोबत आंदोलनात घोषणा देताना मी पुना जिवंत झाले.’

 

चौकट – २

मी बुद्धाची झाले!

ताई सांगतात, ‘मी मांगाच्या कुळात जन्मले. पण वस्तीतल्या बौद्ध लोकांनी तर मला वाचवलं, लढायला बळ दिलं. २२ ऑक्टोबर २०१५ ला मी लातूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मला जातीचं जंजाळ नको झालतं. हा सगळा त्रास जातीमुळंच तर झाला ना! आता मी बुद्धाची आन बाबाची झाले.’


(लेखिका मीडिया वॉच’ च्या कार्यकारी संपादक आहेत

  • शर्मिष्ठा  भोसले

[email protected] 

————-

Previous articleविचारधारांवर कडवी निष्ठा असूच नये!
Next articleहलत्या चित्रांचा ग्लोकल मीडिया
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.