हिमालयाच्या कुशीतून गंगेच्या किनाऱ्यावर

साभार- साप्ताहिक साधना

 

-सुरेश द्वादशीवार

ज्ञानाची समृद्धी, समाधानाने भरलेली घरे, रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांची सोबत, द्राक्षासारखी रसरशीत मधूर फळे आणि बर्फाळ पाण्याचे थंडगार वाहते प्रवाह अशी स्वर्गातही न सापडणारी सुखभरली भूमी म्हणजे काश्मीर. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या स्वर्गभूमीचे असे वर्णन कल्हणाने त्याच्या राजतरंगिणीत केले आहे… 1858 मध्ये हा प्रदेश सम्राट अकबराने आपल्या साम्राज्याला जोडला. त्याआधी  तेथे बौद्ध व हिंदू राजांची राज्ये होती. अकबराचा पुत्र जहांगीर याचे या भूमीवर नितांत प्रेम होते. ‘जिथवर डोळे जातात, तिथवर हिरवी राजी आणि वाहते पाणी. तांबडे गुलाब. जांभळ्या नार्सिससची दाटी. फळे, फुले आणि सुगंधी झुडुपांची सोबत. शिवाय ती नजरेत आणि मनातही न मावणारी’ असे त्याने काश्मीरचे वर्णन आपल्या काव्यात केले आहे. नेहरूंचे पूर्वज या देखण्या भूमीतून आले. तेथील ब्राह्मण कुटुंबांना सन्मानाने प्राप्त होणारी पंडित (ज्ञानी) ही उपाधी त्यांनाही होती. नेहरू कुटुंबाचे मूळ आडनाव कौल होते. 1716 मध्ये त्यांचे पूर्वज पं. राज कौल हे दक्षिणेत दिल्लीला आले. तेव्हाचा मोगल बादशाहा फारुखशायर याने त्यांची विद्वत्ता ओळखून त्यांना राजधानीत आणले होते. त्याने त्यांना एका छोट्या जहागिरीसह दिल्लीतील नहराकाठचे घर राहायला दिले. नहराकाठचे म्हणून नेहरू हे नाव त्यांना कालांतराने चिकटले. प्रथम ते नेहरू-कौल असे नाव लावीत. पुढे कौल गळले व नेहरू कायम झाले.

 

14 ऑगस्टची मध्यरात्र उलटून 15 ऑगस्ट 1947 च्या आरंभाचा सुवर्ण क्षण प्रगटला होता. सार्‍या बाजूंनी ढोलताशे आणि वाद्यांचा गजर सुरू होता. त्यातच अनेकजण शंखांचा ध्वनी काढीत होते. भारत ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्र होण्याचा तो सोनेरी क्षण होता. शहरे सुशोभित झाली होती. सगळ्या शासकीय इमारती दिव्यांच्या रोषणाईने श्रृंगारल्या होत्या. लोकांनी आपापल्या घरांवर तिरंगी झेंडे उभारले होते आणि सगळ्या सडका आनंदाने नाचू-गाऊ व घोषणा देऊ लागणार्‍या लोकांनी भरल्या होत्या. सारा देशच रंग आणि प्रकाशाने न्हाऊन देखणा झाला होता.

खेडी सजली होती, सभोवतीच्या टेकड्यांवर मशाली जळत होत्या. दिल्लीतील सारी गर्दी संसद भवनाच्या दिशेने एकत्र येत होती. देश स्वतंत्र झाला. आम्ही मुक्त झालो. आता आमचे राजे आम्हीच. परक्यांचे राज्य गेले आहे. आमचे राज्य आले आहे. आता आम्हीच राज्यकर्ते आहोत ही भावनाच एवढी बलशाली की तिने समर्थांएवढाच दीनदुबळ्यातही उत्साह भरला होता.

संसदेच्या सभागृहातले दृश्य रंगीत;  पण वातावरण गंभीर होते. सारे सभासद साध्या, सामान्य भारतीय पोषाखात व बहुदा खादीच्या पांढर्‍या शुभ‘ वेशात एकत्र आले होते. त्यातला एखादा सभासद त्याच्या रंगीबेरंगी पोषाखाने लोकांच्या नजरेत भरत होता तर सभागृहाच्या गॅलरीत उंची पेहरावाने नटलेल्या स्त्रियांची गर्दी दाटली होती… घड्याळाचे काटे संथगतीने रात्री बाराच्या ठोक्याकडे वळत होते. तो क्षण येताच सारेच स्तब्ध झाले होते.

सभागृहातील समोरच्या रांगेत, अंगात पांढरी शुभ‘ अचकन घातलेला एक सडपातळ अन् देखणा माणूस अध्यक्षांच्या बैठकीला सामोरा झाला होता. त्याच्या डोक्यावर खादीची कडक शुभ्र टोपी होती. प्रकाशाने न्हाऊन निघालेल्या सभागृहात त्याचा देखणा चेहरा काहीसा तणावपूर्ण दिसत होता. डोळ्यांखाली काळपट उंचवटे होते. देहावर अनेक दशकांचा थकवा होता. जरासा हरवल्यागत आणि तेवढा चिंतेचा वर्ण त्याच्या चर्येवर होता. त्याने अचकनीला लावलेले गुलाबाचे फूलही जरासे कोमेजलेले व खाली झुकलेले होते.

मात्र तो बोलायला उठला आणि सारे दृश्यच विजेने भारल्यासारखे तेजस्वी व लखलखाटाने भरल्यासारखे दीप्तीमान झाले. त्याच्या चर्येवरच्या चिंतेच्या रेषा हरवल्या. प्रथम हळू सुरात बोलणारा त्याचा आवाज काही क्षणातच वाढला. उत्साहाने ओसंडल्यासारखा झाला होता आणि त्याच्या मुखाने प्रत्यक्ष देशच बोलत असल्याचे सार्‍यांना वाटू लागले.

‘फार पूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आताचा क्षण त्या कराराविषयीची आपली निष्ठा फिरून जागविण्याचा आणि तो करार सर्वार्थाने पूर्ण करण्याचा आहे.’ पं. जवाहरलाल नेहरू- भारताचे पहिले पंतप्रधान स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च व्यासपीठावरून त्यांचे पहिले भाषण करीत होते. ‘मध्यरात्रीच्या या ठोक्याला जेव्हा सारे जग  झोपले असेल तेव्हा भारत जागा व सजीव होईल. इतिहासात असे क्षण क्वचित येतात, जेव्हा एक युग संपते आणि एका राष्ट्राचा दीर्घकाळ बंदिस्त असलेला आत्मा स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतो आणि त्याला नवा स्वर्ग गवसतो. हा क्षण या देशाच्या व त्याच्या जनतेच्या सेवेत स्वत:ला झोकून देण्याची आणि पुढे सार्‍या जगाची व त्यातल्या मानवतेची सेवा करण्याची प्रतिज्ञा करण्याचा आहे.’

‘भविष्य साधे नाही. ते विश्रांतीचेही नाही. ते सदैव कार्यरत राहण्याचे व आजवर आपण केलेल्या आणि आज करणार असलेल्या प्रतिज्ञा पूर्ण करण्याचे आहे. या देशाची सेवा ही येथील दलित, पीडित, उपेक्षित व अजून निरक्षर आणि निराधार राहिलेल्यांची सेवा असणार आहे. देश निकोप करण्याचा व त्याला प्रगतीची संधी उपलब्ध करून देण्याचा हा सुवर्ण क्षण आहे.’

‘आपल्या काळात झालेल्या जगातल्या सर्व थोरपुरुषांची व विशेषत: महात्मा गांधींची आकांक्षा प्रत्येक डोळ्यातला अश्रू पुसण्याची होती. ते आपण करू शकलो नाही तरी जोवर हे अश्रू आहेत आणि त्यासोबतच्या व्यथा आहेत तोवर आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही… ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले तिला मी कृतज्ञतापूर्वक आवाहन करतो की भारत मातेचे हे विशाल मंदिर उभारण्याच्या कामात तिने आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करावे. हा काळ मतभेदांचा नाही, कुरापतींचा नाही. तो एकोप्याचा व एकात्मतेचा आहे…’

नेहरूंसाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता. नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधार्‍या वाटेवरचा, कष्टाचा, वेदनांचा आणि विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. नेहरूंचे वय 58 वर्षांचे होते. तारुण्याचा काळ मागे पडला होता. संसार संपला होता. यापुढचा काळ देशाचा संसार करण्याचा, त्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीचा व संघर्षाचा होता. झालेच तर तो त्यांना एकट्याने पूर्ण करण्याचा होता… गांधीजींची साथ संपणारी होती आणि सरदारही फार काळ सोबत राहणारे नव्हते. पक्षातली बाकीची माणसे त्यांच्यापुढे निष्प्रभ होती. यापुढे जे करायचे आणि ठरवायचे ते आपणच. इतरांची फक्त सोबतच तेवढी घ्यायची, ही जाण पंतप्रधानाचे पद स्वीकारत असतानाच त्यांना आली होती.

आयुष्याची २७ वर्षे राजकारणाच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे नेहरूंनी तुरुंगात काढली होती. संसार तसाही दुरावला होता. १९१७ मध्ये त्यांचा कमला नेहरूंशी विवाह झाला. १९१९ मध्ये त्यांना इंदिरा ही मुलगी झाली आणि लागलीच कमला नेहरूंना क्षय रोगाची बाधा असल्याचे लक्षात आले. त्याही स्थितीत त्या नेहरूंना घरात व राजकारणात १९३७ पर्यंत साथ देत राहिल्या. यातला फार थोडा काळ नेहरूंसोबतचा तर उर्वरित काळ नेहरूंच्या तुरुंगवासामुळे वाट्याला आलेल्या एकटेपणाचा. १९२१ च्या डिसेंबरात नेहरू प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा व दीर्घकाळचा कारावास १०४१ दिवसांचा होता. तो १५ जून १९४५ या दिवशी संपला होता. दरम्यान ते सात वेळा तुरुंगात गेले. अखेरच्या कारावासानंतर मात्र दोनच वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले.

 

हिमालयाच्या कुशीतून गंगेच्या किनार्‍यावर..

 

ज्ञानाची समृद्धी, समाधानाने भरलेली घरे, रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांची सोबत, द्राक्षासारखी रसरशीत मधूर फळे आणि बर्फाळ पाण्याचे थंडगार वाहते प्रवाह अशी स्वर्गातही न सापडणारी सुखभरली भूमी म्हणजे काश्मीर. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या स्वर्गभूमीचे असे वर्णन कल्हणाने त्याच्या राजतरंगिणीत केले आहे… 1858 मध्ये हा प्रदेश सम्राट अकबराने आपल्या साम्राज्याला जोडला. त्याआधी  तेथे बौद्ध व हिंदू राजांची राज्ये होती. अकबराचा पुत्र जहांगीर याचे या भूमीवर नितांत प्रेम होते. ‘जिथवर डोळे जातात, तिथवर हिरवी राजी आणि वाहते पाणी. तांबडे गुलाब. जांभळ्या नार्सिससची दाटी. फळे, फुले आणि सुगंधी झुडुपांची सोबत. शिवाय ती नजरेत आणि मनातही न मावणारी’ असे त्याने काश्मीरचे वर्णन आपल्या काव्यात केले आहे.

नेहरूंचे पूर्वज या देखण्या भूमीतून आले. तेथील ब्राह्मण कुटुंबांना सन्मानाने प्राप्त होणारी पंडित (ज्ञानी) ही उपाधी त्यांनाही होती. नेहरू कुटुंबाचे मूळ आडनाव कौल होते. १७१६ मध्ये त्यांचे पूर्वज पं. राज कौल हे दक्षिणेत दिल्लीला आले. तेव्हाचा मोगल बादशाहा फारुखशायर याने त्यांची विद्वत्ता ओळखून त्यांना राजधानीत आणले होते. त्याने त्यांना एका छोट्या जहागिरीसह दिल्लीतील नहराकाठचे घर राहायला दिले. नहराकाठचे म्हणून नेहरू हे नाव त्यांना कालांतराने चिकटले. प्रथम ते नेहरू-कौल असे नाव लावीत. पुढे कौल गळले व नेहरू कायम झाले.

नेहरू कुटुंबाच्या आयुष्यात नंतरच्या काळात अनेक वळणे आली. त्यात त्यांची जमीन जुमला व लहानशी जहांगिरी संपुष्टात आली. नेहरूंचे पणजोबा लक्ष्मीनारायण नेहरू यांनी त्यावेळी कंपनी सरकारात वकिलीचे काम पत्करले. त्यांचे आजोबा गंगाधर नेहरू हे दिल्लीचे कोतवाल होते. १८६१ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षीच त्यांचा मृत्यू झाला. १८५७ च्या युद्धाने नेहरूंचे कुटुंब अस्ताव्यस्त झाले. घरदार, कागदपत्रे असे सारे गमावून ते आगर्‍याला राहायला गेले. त्यांच्या दोन तरुण भावांवर सार्‍यांच्या पालनपोषणाची जबाबदारी होती. त्या दोघांनाही इंग्रजी येत होते. त्याचमुळे त्यांची एका संकटातून मुक्तताही झाली.

नेहरूंची एक आत्या इंग्रजी स्त्रीसारखीच, ती काश्मिरी असल्याने गोरीपान होती. नेहरूंचे कुटुंब रेल्वेतून प्रवास करीत असताना ते एका गोर्‍या स्त्रीचे अपहरण करीत असल्याची शंका येऊन त्यांना पोलिसांनी हटकले. तेव्हाची न्यायालये झटपट निकाल देत आणि आरोपींना तात्काळ झाडावर लटकावून फाशी देत. नेहरूंच्या काकांनी त्या गोर्‍या पोलिसांना सारी स्थिती इंग‘जीतून समजावून सांगितल्याने ते संकट टळले व नेहरूंचे कुटुंब आगर्‍याला पोहचले.

या स्थितीत मोतीलालांचा जन्म ६ मे १८६१ या दिवशी आगर्‍यात झाला. त्यांचे वडील त्यांच्या जन्माआधी तीनच महिन्यांपूर्वी मृत्यू पावले होते. त्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्या दोन थोरल्या भावांवर आली. त्यातले थोरले बन्सीधर नेहरू सरकारच्या न्याय खात्याच्या नोकरीत लागून वेगवेगळ्या शहरात राहायला गेले. परिणामी धाकटे बंधू नंदलाल यांच्यावर सार्‍या घराची जबाबदारी आली. ते राजपुतान्यातील खेत्रीच्या नवाबाचे दिवाण होते. पुढल्या काळात वकिलीच्या परीक्षा देऊन ते अलाहाबादच्या उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करू लागले. त्यांचे व मोतीलालजींचे संबंध कमालीच्या जीवाभावाचे होते. मोतीलालजीही मग नंदलालजींच्या मार्गाने जाऊन वकील झाले व अलाहाबाद उच्च न्यायालयात एक यशस्वी वकील म्हणून नामांकित झाले.

विद्यार्थीदशेत एक बर्‍यापैकी बुद्धिमान म्हणून ओळखले जाणारे मोतीलालजी कमालीच्या हूड वृत्तीचे होते. अभ्यासाहून खेळात रमणारे, पाश्चात्य शौकांकडे आकर्षिले जाणारे आणि शाळेहून खेळाच्या मैदानावर अधिक रमणारे. त्यांचा पर्शियन व अरेबिक भाषांवर अधिकार होता. इंग्रजीही त्यांना सहजपणे अनुकूल झाले. मात्र अभ्यास व महाविद्यालये याबाबतचा काहीसा दुरावा मनात असल्याने त्यांनी बी.ए.च्या परीक्षेचा पहिला पेपर दिला आणि तो वाईट गेला असे वाटल्याने ते आगर्‍याच्या ताजमहालात जाऊन बसले. पुढे तो पेपर चांगला गेल्याचे व त्यात त्यांना चांगले गुण मिळाल्याचे समजल्यानंतरही त्यांनी पुढची परीक्षा दिली नाही. परिणामी त्यांना पदवीची प्राप्ती काही झाली नाही. त्यानंतर तेव्हा असलेल्या सोयीनुसार त्यांनी वकिलीच्या परीक्षा दिल्या. त्यात मात्र त्यांना अतिशय चांगले यश मिळाले.

पुढे कानपूरच्या न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली व तीत त्यांना चांगला लौकिक मिळविता आला. मात्र याही काळात त्यांचा जास्तीचा वेळ कुस्ती आणि दांडपट्यासार‘या खेळातच अधिक गेला. तीन वर्षे कानपुरात वकिली करून ते अलाहाबादला आले आणि उच्च न्यायालयात वकील म्हणून दाखल झाले. त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे थोरले बंधू नंदलालजी यांचा मृत्यू झाला आणि सार्‍या कुटुंबाचे ओझे त्यांच्या तरुण खांद्यावर येऊन पडले. मोठ्या भावाच्या जबाबदार्‍यांसोबत त्याच्या अशिलांची कामेही त्यांच्याकडे आली. त्यात ते एवढे रमले की बाकीच्या जगाकडे त्यांनी जणू पाठच फिरविली. यशही त्यांच्यामागे पैशासोबत धावत आले. अल्पावधीतच नामांकित वकील झालेल्या मोतीलालजींनी त्या व्यवसायात अमाप पैसा मिळविला. त्या काळात सकि‘य झालेल्या कॉंग्रेस संघटनेकडेही ते काही काळ वळले. पण त्यातली नुसतीच भाषणबाजी आणि कृतीशून्यता पाहून त्यात त्यांना फारसा भाग घ्यावासा वाटला नाही. तसेही ज्या संघटनेत आपला शब्द अखेरचा नसतो तीत ते फारसा रस घेतही नसत.

मग वकिली, यश आाणि पैसा यांचा मनमुराद आनंद घेत त्यांनी आपल्या कुटुंबाला थेट ब्रिटीश  घराण्याचेच वळण दिले. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यात सधन भारतीयांसोबत इंग्रज अधिकारीही होते. राज्याचे गव्हर्नरही त्यांच्या मैफिलीत येऊन बसत असत. त्यात पत्ते असत, प्येये असत आणि अमाप खर्चही असे. जवाहरलालांचे लहानपण या वातावरणात गेले.

मोतीलालजींची दोन लग्ने झाली. त्यांची पहिली पत्नी काश्मिरातून लाहोरला येऊन वसलेल्या कुटुंबातून आली होती. लग्नाचेवेळी मोतीलालांचे वय 20 वर्षांचे होते. मात्र ती पत्नी पहिल्या मुलाला जन्म देऊन लगेचच वारली. तिच्या पाठोपाठ ते मूलही गेले. त्यांचा दुसरा विवाह जवाहरलालांच्या आईशी- स्वरूपराणींशी झाला. त्याही लाहोरमधून आल्या होत्या व मूळच्या काश्मिरी होत्या. जेमतेम पाच फूट उंचीच्या व ठेंगण्या बांध्याच्या स्वरूपराणी त्यांच्या नावासार‘याच देखण्या होत्या. नेहरूंनी त्यांच्या अतिशय सुंदर हातांचे व पावलांचे वर्णन आपल्या आत्मचरित्रात केले आहे. स्वरूपराणी कणखर व्यक्तिमत्त्वाच्या आणि आपल्या यशस्वी पतीला बरोबरीची साथ देणार्‍या होत्या. लग्नानंतरची 34 वर्षे त्यांनी मोतीलालजींसोबत सार्‍या वैभवात काढली. पुढे मात्र महात्मा गेलेल्या मोतीलालजींनी सार्‍या वैभवाचा त्याग करून साधे जीवन पत्करले. तेव्हा त्या आयुष्यातही त्या तेवढ्याच प्रसन्नपणे सहभागी झाल्या. पुढल्या काळात कधी मोतीलालजींसोबत तर कधी एकट्याने त्यांनी सत्याग्रह उभारले, तुरुंगवास भोगला आणि आपल्या त्यागाचा व कष्टांचा आपल्या पतीएवढाच पुत्रालाही त्यांनी अभिमान वाटायला लावला.

नेहरूंच्या घरात राजकारणाच्या चर्चा नेहमी चालत. त्यात ब्रिटीशांच्या जुलुमाच्या कहाण्या असे. रेल्वेगाड्यातून, बागांमधून व अन्य सार्वजनिक ठिकाणी बि‘टिशांच्या बैठकीची वेगळी व स्वतंत्र व्यवस्था असे. त्यात भारतीयांना बसण्याची परवानगी नसे. खूपदा रेल्वेचे ब्रिटिशांसाठी राखीव असलेले डबे रिकामे जात. पण गर्दीने गच्च भरलेल्या डब्यातून भारतीयांना त्यात बसू दिले जात नसे. गोर्‍या माणसाने एखाद्या भारतीयाची हत्या केली की न्यायालयातले गोरे ज्युरी त्याची निर्दोष मुक्तता करीत. या उलट घडले तर मात्र भारतीयांना तात्काळ मृत्यूदंड दिला जाई… लहानग्या जवाहरलालांच्या कानावर हे सारे येत असे.

वडिलांचा मान आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दरारा यांचे सार्‍यांवर दडपण होते. घरात माणसे खूप होती. त्या सार्‍यांना मोतीलालजींचा धाक होता. शिवाय त्यांच्या आईचीही जरब मोठी होती. मोतीलालजी प्रसन्न झाले की त्यांच्या हास्याचा गडगडाट मोठा असे. मात्र संतापले की त्या रागालाही मग पार नसे. त्यांच्या टेबलवरच्या दोनपैकी एका पेनवर जवाहरलालांचे लक्ष गेले व ते त्यांनी स्वत:साठी वापरायला घेतले. तेव्हा त्यांच्या संतापाला तेही बळी पडले होते. अशावेळी आई हा त्यांचा आधार होई. घरात मुबारकअली हे मुन्शीही मोतीलालजींचे विश्वासू म्हणून वास्तव्याला होते. 1857 च्या युद्धात त्यांचे सारे कुटुंब मारले गेले. हे मुबारकभाई जवाहरलालांना अरबीतल्या सुरस कथा सांगत. 1857 च्या युद्धातले भीषण प्रसंग रंगवून ऐकवत. त्यामुळे आईखेरीज हे अलीही नेहरूंना जवळचे झाले. मात्र मोतीलालांविषयीचा त्यांच्या मनातील अपार आदर अखेरपर्यंत तसूभरही कधी कमी झाला नाही. त्यांच्या कायदेपांडित्याएवढेच त्यांचे जगाविषयीचे ज्ञान त्यांना नेहमीच अचंबित करीत असे. आईकडून आणि पं. नंदलालजींच्या पत्नीीकडून रामायण, महाभारत व अन्य धार्मिक कथा त्यांना ऐकता येत. आईसोबत ते अनेकदा गंगेवर स्नानालाही जात. मंदिरात दर्शने घेत. पण धार्मिक बाबींमध्ये त्यांना आरंभापासूनच फारशी रुची कधी वाटली नाही.

आपल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात ते समरसून भाग घेत आणि तो नेहमी उशिरा का येतो याचा राग करत. पुढच्या काळात हेच वाढदिवस, वाढत्या वयाची आठवण करून देतात म्हणून त्यांना त्रास देऊ लागले. या दोन्ही आठवणी नेहरूंनी गमतीने आपल्या आत्मचरित्रात लिहिल्या आहेत. अलाहाबादेत होणारे सगळे सण, त्यासाठी निघणार्‍या मिरवणुका, दसर्‍याचे रावणदहन, रामलक्ष्मणाच्या मिरवणुकी आणि मोहरमचे सणही ते सारख्याच उत्साहाने पार पाडत. त्या सार्‍यांच्या आठवणी त्यांच्या दीर्घकाळ स्मरणातही राहात.

9822471646

***

(साभार- साप्ताहिक साधना, ५ जानेवारी २०१८)

Previous articleHIV संक्रमित बालकांसाठी Happy Indian Village उभारणारे रवी बापटले
Next articleआमचे प्रिय ‘सर’ महेश एलकुंचवार !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.