HIV संक्रमित बालकांसाठी Happy Indian Village उभारणारे रवी बापटले

आम्ही सारे फाऊंडेशनच्या २०१८ च्या कार्यकर्ता पुरस्कारासाठी सेवालय (लातूर ) इथे एचआयव्ही (HIV) संक्रमित बालकांसाठी Happy Indian Village उभारणारे रवी बापटले यांची निवड झाली आहे . येत्या २७ जानेवारीला १ लाख रुपये व सन्मानचिन्ह देवून त्यांना गौरविण्यात येणार आहे . त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा विशेष लेख -संपादक

 

-महारुद्र मंगनाळे

लातूर जिल्ह्यातील धोंडीहिप्परगा या सीमावर्ती गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला तरूण. प्राथमिक , माध्यमिक शिक्षण गावातील शाळेतच झालं.शालेय आयुष्यातच रवी देशभक्तीनं भारलेला.  सैन्यात जाऊन देशाची सेवा करण्याचं स्वप्न त्यानं बघितलं. त्यादृष्टीने  त्याने शारिरीक तयारीही केली. मात्र उंची कमी पडली.एक स्वप्न भंगलं. रवी पदवीधर झाला. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील गोरगरिबांना न्याय देता येतो, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करता येते,हे त्याच्या लक्षात आले.त्याने औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पत्रकारिता पदवीला प्रवेश घेतला.आर्थिक परिस्थिती  बेताची असल्याने एका मठात राहून,विद्यापीठातील ‘कमवा-शिका’ योजनेत सहभागी होऊन त्यानं शिक्षण पूर्ण केलं. लगेच एक वर्षाचा पत्रकारिता पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.जे.) पूर्ण केला. त्याला स्वावलंबी होणं गरजेचं होतं.

आम्ही सेवकची सुरुवात

लातूरला ‘संचार’ या सोलापूरहून प्रसिद्ध होणार्‍या दैनिकाचे रवी बापटले जिल्हा प्रतिनिधी बनले. त्यांची समाजसेवी पत्रकारिता सुरू झाली. याच काळात लातूरमधील एका खाजगी पत्रकारिता महाविद्यालयात रवींनी अध्यापनाचे काम सुरू केले. ते प्रा.रवी बापटले बनले. सगळं सुरळीत सुरू होतं.सर्वसाधारण तरूणासाठी आनंदानं जगण्यासाठी एवढं पुरेसं होतं.पण रवीचं समाजाप्रती बांधिलकी मानणारं मन शांत बसू देत नव्हतं.त्यांना चाकोरीबद्ध जीवन जगण्यात रस नव्हता. पत्रकारितेच्या माध्यमातून लातूरच्या कचर्‍याचा, स्वच्छतेचा प्रश्न त्यांनी ऐरणीवर आणला.पत्रकार म्हणून त्यांचं तेवढंच काम होतं.मात्र समाजसेवी मनाच्या रवींना हे पुरेसं वाटलं नाही. स्वच्छतेच्या या कामात आपलेही योगदान द्यावे असे त्यांना वाटले. त्यांनी आपली ही कल्पना त्यांचे काही मित्र व विद्यार्थ्यांना बोलून दाखवली. त्यांनी ती उचलून धरली.यातून ‘आम्ही सेवक ’या ग्रुपचा जन्म झाला.रवीच्या नेतृत्वाखाली तरूणाई कामाला लागली. १२ तरुणांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम प्रत्यक्ष राबविली जाऊ लागली. जवळपास दोन वर्षे हे काम चाललं.या उपक्रमाचं सगळ्या स्तरातून स्वागत झालं. विविध वृत्तपत्रांनी, प्रशासनातील अधिकार्‍यांनी या कामाची नोंद घेतली.

त्यांनतर अचानक रवी बापटले यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली.ते त्यांच्या मित्रांसोबत एका खेड्यात गेले. तिथे  त्यांना कळलं की, एका घरात जन्मजात एचआयव्ही संक्रमित बालकाचा मृत्यू झाला आहे. मात्र भीतीपोटी कोणीही त्याचा अंत्यविधी केलेला नाही. रवी मित्रांसोबत त्या घरी गेले.समोरचं दृष्य हादरवून टाकणारं होतं.त्या बालकाला किड्या-मुंग्यांनी पोखरलं होेतं. फक्त  सांगाडा शिल्लक होता. त्यांनी त्या अवशेषावर अंतिम संस्कार केले.या घटनेमुळे या रोगाची भयावहता आणि समाजात असलेलं अज्ञान त्यांच्या लक्षात आलं. समाजातील कोणाचंच या प्रश्‍नाकडं लक्ष नव्हतं. त्याचवेळी रवी बापटले यांनी निर्णय केला की, जन्मजात एचआयव्ही संक्रमित बालकांचं संगोपन करायचं. या प्रश्नावर जनजागृती करायची. त्यांनी केवळ निर्णय केला नाही, तर त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली.

सेवालयाची मुहूर्तमेढ

एचआयव्ही संक्रमित बालकांच्या पुनर्वसनाचं काम सुरू करायचं तर, त्यासाठी पहिल्यांदा जमीन हवी होती.ती जमीन दान देणारा दाताही आवश्यक होता.रवीनी त्यांची ही व्यथा आपला मित्र शांतेश्वर मुक्ता यांच्याजवळ बोलून दाखवली. रवीची या कामाची तळमळ त्याला पटली. त्याने ही कल्पना त्याचे आजोबा मन्मथ्लृप्पा मुक्ता यांना समजावून सांगीतली. त्यांनाही या कामाचे महत्त्व पटले. २००७ मध्ये मन्मथ्लृअप्पा मुक्ता यांनी औसा तालुक्यातील हासेगाव येथील त्यांची साडे-सहा एकर जमीन ‘आम्ही सेवक’ या संस्थेच्या नावाने दानपत्र करुन दिली. जमिनीचा महत्त्वाचा प्रश्‍न सुटला. मात्र पुढची वाटचाल ही खडतर होती. हा प्रश्‍न समाजाचा असल्याने लोकसहभागातूनच पुनर्वसन प्रकल्प राबविण्याचे त्यांनी निश्‍चित केले. २००७ मध्ये एचआयव्हीबाबत आजच्यापेक्षा अधिक गैरसमज होते. लोकांच्या मनात भीती होती. हा रोग कशामुळे होतो, ही साधी माहितीही लोकांना नव्हती. रवी बापटले एचआयव्ही संक्रमित बालकांसाठी सेवालय सुरू करणार याची माहिती मिळताच हासेगावातील हितशत्रूंनी अनेक अफवा पसरवायला सुरुवात केली. ‘सेवालय’ गावात उभे होऊ नये यासाठी समाजकंटकांनी प्रयत्न सुरू केले.कार्यक्रमस्थळी दगडफेक  होणार असल्याची चर्चाही सुरू करण्यात आली. सेवालयासाठी शुभारंभाचा हा कार्यक्रम महत्त्वाचा असल्याने रवी बापटले यांनी काशीपिठाचे जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याचा निर्णय केला. पत्रिका छापली. परिसरातील अफवांची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस बंदोबस्तात जगद्गुरुंच्या उपस्थितीत भूमिपुजनाचा कार्यक्रम पार पडला. जगद्गुरुंनी आपल्या भाषणात कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी एचआयव्हीग्रस्ताच्या घरी एक दिवस घालवून जनजागृती केल्याचा दाखला दिला. रवी बापटले यांच्या कामाचे कौतुक करून ग्रामस्थांनी  या समाजोपयोगी कामाच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहनही केलं. मात्र जगदगुरुंचा हा उपदेशसमाजकंटकाच्या पचनी पडला नाही.

संघर्षमय वाटचाल

भूमिपुजन झालं मात्र ग्रामस्थ  सेवालयाला टाळत असल्याचं बापटले यांच्या लक्षात आलं. त्यामुळे लोकांच्या मनातील एड्सबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही सेवकच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांचे प्रबोधन केले. सतत १५ दिवस हासेगाव व तांड्यामध्ये जनजागृतीचा हा कार्यक्रम राबवला. सगळं काही सुरळीत झालंय असंच सर्वांना वाटलं. सेवालयाला दान मिळालेली साडेसहा एकर जमीन हे माळरान होतं. तिथे कसलंही झाडझुडूप नव्हतं. काम सुरू करायचं म्हणजे एक तरी निवारा तातडीनं उभारणं आवश्यक होतं. रवी बापटले यांनी विविध शाळा-महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना एचआयव्हीबाबतची माहिती देऊन, एचआयव्ही संक्रमित बालकांसाठी सेवालय सुरू करत असल्याचं सांगितलं. मुलांनी त्यांच्या खाऊतून, खर्चासाठी दिलेल्या पैशातून जमेल ती मदत करावी असं आवाहन केलं. याला चांगला प्रतिसाद मिळाला. यातून सुमारे ८५ हजार रुपयांचा निधी गोळा झाला. आपली पत्रकारिता सांभाळत रवी बापटले यांनी दोन खोल्याच्या बांधकामाची तयारी सुरू केली. यासाठी लागणार्‍या विटा सेवालयाच्या जागेवर आणून ठेवल्या. तेव्हा तिथे  कुणी राहत नव्हतं. दोन दिवसातच अज्ञात इसमांनी रात्रीतून हजारभर विटांचे तुकडे केले. हितशत्रूंची ही सुरुवात होती. रवी बापटले यांनी या खोडसाळ प्रकाराची औसा पोलीस स्टेशनला माहिती कळविली. मात्र तक्रार नोंदवली नाही. ग्रामस्थ्लृांना विनाकारण त्रास होऊ नये, ही त्यांची भूमिका होती.

दरम्यान डिजीटल बॅनरचा तंबू उभा करून सेवालयाच्या माळरानावर रवी राहू लागले. काही दिवसातच दोन रुमचे बांधकाम सुरू झाले. ते स्लॅब लेवलपर्यंत आले. एका रात्री ७०-८० लोकांचा जमाव बांधकाम चालू असलेल्या जागेवर आला. रवी बापटले, पोकलँड मशीन चालक व चार-पाच मजूर तिथे होते. जमावातील लोकांनी पोकलँड चालकाला, मशीनने हे बांधकाम पाड नाही तर तुझी मशीन पेटवून देतो, अशी धमकी दिली. नाईलाजामुळे त्याने मशीनने बांधकाम जमीनदोस्त केले. जमावाने शिवीगाळ करत रवीसह चौघांंना मारहाण केली. इथे आश्रम उभारण्याचा प्रयत्न केला तर जीवे मारू,अशी धमकी देऊन जमाव गेला. जाताना त्या लोकांनी बांधकामस्थळी असलेली बॅटरी, टोपले, खोरे व इतर बांधकाम साहित्य पळवले. जमाव निघून गेल्यानंतर बापटले यांनी लातूरच्या पोलीस अधिक्षकांना फोन केला. त्यांनी औसाच्या पीआयना सांगितले. पोलीस आले. त्यांनी तांड्यात जाऊन लोकांना समज दिली. खरंतर गुन्हा दाखल करावा अशीच ही घटना होती. मात्र लोकांचे परिवर्तन होईल, त्यांना विनाकारण त्रास होऊ नये या हेतूने रवींनी गुन्हा दाखल केला नाही.काही लोकांकडून विरोध होणार आहे, हे लक्षात आल्यामुळे सावधगरी बाळगत पुढील काम सुरू झाले. दोन-तीन महिन्यात दोन खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले.

एचआयव्ही संक्रमित बालकांचा निवासी आश्रम सुरू करायचा तर आणखी बांधकाम होण्याची गरज होती. सेवालयावर वीज नव्हती. पुढची कामे सुरू करण्यासाठी विजेची तातडीची गरज होती. रवी बापटले यांनी हासेगाव ग्रामपंचायतीकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तेव्हा सेवालय हासेगावात होऊ देणार नाही. असा ठराव ग्रामपंचायतने केल्याचे त्यांना सांगण्यात आले.बापटले यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथराव डवले यांना भेटून ही परिस्थिती सांगितली. त्यांच्या आदेशामुळे सेवालयाला लगेच वीज मिळाली. एका साध्या बाबीसाठी त्यांना जिल्हाधिकारी यांची मदत घ्यावी लागली.

२००७ मध्ये रवी बापटले यांनी लातूरच्या तत्कालीन खासदार श्रीमती रुपाताई पाटील यांना भेटून सेवालय प्रकल्पाबाबत माहिती दिली. त्यांनी सभागृहासाठी 5 लाखाचा निधी खासदार निधीतून मंजूर केला. आम्ही सेवक संस्थेने स्वतः मजूर लावून काम केले. कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. त्यामुळे निधीची बचत झाली. सभागृह पूर्ण होऊन उरलेल्या पैशातून संडास-बाथरूम व तीन छोट्या कुट्यांचे काम पूर्ण झाले.

सेवालयाच्या साडेसहा एकर जमिनीवर आणखी बरीच कामे करावयाची होती. महत्त्वाचे म्हणजे वृक्षारोपण आवश्यक होतं. मात्र गावातील व तांड्यावरील लोक मजुरीने यायला तयार नव्हते. त्यामुळे  १ मे ते ५मे २००८ या कालावधीत ‘आम्ही सेवक’ ने पहिले श्रमसेवा शिबीर घेतले. यात विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेे. रवी बापटले यांनी झाडे लावण्यासाठी जेसीबीने खड्डे तयार करून घेतलेे. तळ्यामधली २०० ट्रॅक्टर काळी मातीही येऊन पडली. शिबिरार्थ्यांकडूनही माती खड्ड्यामध्ये टाकण्याचे काम करून घेण्यात आले.जु लैमध्ये ‘केशर’ आंब्याची लागवड करण्यात आली.यातून सेवालयासाठी निश्‍चित उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा, हाही हेतू होताच. सेवालयात येण्यासाठी रस्ता करून घेण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली. पाण्यासाठी एक विंधन विहीर घेतली. मात्र तिला फारसं पाणी लागलं नाही. या काळात संग्रामप्पा मुक्तांनी त्यांच्या शेतातील पाणी पाईपलाईनने दिले. त्यामुळेच बांधकामाची व वृक्षारोपणाची कामे होऊ शकली.

शिक्षणासाठीची लढाई

आता खर्‍या अर्थाने सेवालय राहण्यायोग्य बनले. किमान सुविधा तयार झाल्या.रवी बापटले यांनी शाळाबाह्य एचआयव्ही संक्रमित मुलांसाठी सिव्हील हॉस्पिटलमधील एआरटी सेंटरशी संपर्क साधला. त्यातून मुलांचे पत्ते मिळाले. शहाजी हा पहिला मुलगा मार्च २००९ मध्ये सेवालयात राहण्यासाठी आला.प्रथमेश असं त्याचं टोपण नाव पडलं. लवकरच आणखी ११ मुलं आली. या मुलांना शिक्षण देणंही गरजेचं होतं.लातूर जिल्हा परिषदेचे तेव्हाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण गेडाम यांनी सेतू शाळेला परवानगी दिली.याच काळात बाबुशा जाधव व कृष्णा राठोड हे दोन सामाजिक जाणिव असलेले हुन्नरी कार्यकर्ते सेवालयात आले. बाबुशाने ९० दिवसात सगळ्या मुलांना अक्षरांची तोंडओळख करून दिली. मुलं अक्षर गिरवू लागली. मात्र एवढं पुरेसं नव्हतं. या मुलांना रितसर शाळेत प्रवेश देऊन शिक्षण देणं गरजेचं होतं. जुलै २००९ मध्ये रवी बापटले यांनी हासेगाव जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक भिसे यांना भेटून सेवालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत विचारणा केली. त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून प्रवेश दिला. मुलं हासेगाव येथ्लृील जिल्हा परिषदेच्या शाळेत जावू लागली. सेवालयात आनंदी वातावरण तयार झालं. मुलांच्या संगोपनामध्ये शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आठवडाभर सुरळीत सुरू होतं. सेवालयातील मुलं शाळेतील इतर मुलांसोबत शाळेत शिकत असल्याची बाब हितशत्रूंच्या लक्षात आली. ग्रामसभा भरवण्यात आली. या सभेतग्रामस्थांनीएचआयव्हीबाबत विविध प्रश्‍न, शंका उपस्थित  केल्या. या सभेला उपस्थ्लिृत डॉक्टर, शिक्षणाधिकारी व ‘नारी’ या स्वयंसेवीसंस्थेच्या कार्यकर्त्यांनी सगळ्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे दिली.खरंतर ग्रामस्थांनी  विरोध करण्याचं कुठलंच कारण उरलं नव्हतं. तरीही सेवालयातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्यायचा नाही, असा बेकायदेशीर ठराव ग्रामसभेने केला. सेवालयाने आपल्या मुलांना नियमित शाळेत पाठवणे सुरुच ठेवले. मात्र ग्रामस्थांनी शाळेत मुलं पाठविणं बंद केलं. एकूण २३४ संख्या असताना २०-२५  विद्यार्थीच शाळेत येऊ लागले. या विषयाची प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियात चर्चा सुरू झाली. सुरुवातीला प्रशासन सेवालयाच्या बाजूने होते. सेवालयाची भूमिका न्याय व कायदेशीर होती. मात्र ग्रामस्थांचा आक्रमक विरोध बघून प्रशासन गुळगुळीत भूमिका घेऊ लागले. मताच्या राजकारणामुळे लोकप्रतिनिधीही सेवालयाच्या विरोधात मत नोंदवू लागले. सेवालयातील मुलांसाठी वेगळी शाळा देण्याची भूमिका मांडली. या विषयांवर माध्यमांमध्ये वातावरण तापले.हा विषय देशभरातील माध्यमांमध्ये चर्चिला गेला. सेवालयाची मुलं शाळेत ठेवायची की नाही, या विषयावर हासेगावमध्ये मतदान ठेवण्यात आले.महाराष्ट्र एड्स सोसायटीचे प्रमुख रमेश देवकर,इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधी स्वाती खेर,फोटोग्राफर महेंद्र पारीख यांच्यासह इतर काही पत्रकारही यावेळी उपस्थित होते.

या मतदानात सेवालयाला जमीन दान करणारे मन्मथ्लृअप्पा मुक्ता यांचे चिरंजीव संग्रामप्पा यांचे एकमेव मतदान सेवालयाच्या बाजूने झाले.लातूरचे तत्कालीन विधानपरिषद सदस्य यांनी हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना नेवून दिला. मात्र त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रीया दिली नाही.नाज फाऊंडेशन,दिल्ली यांनी एचआयव्ही/एड्स क्षेत्रात काम करणार्‍या देशभरातील २२ नामवंत संस्थांना एकत्र करून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.‘मुलांना शिकू द्या’असे फलक हातात घेतलेल्या मोर्चेकर्‍यांनी जिल्हाधिकारी यांना गुलाबाची फुलं देण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी यांनी फुलं, तर स्वीकारली नाहीतच उलट मोर्चेकर्‍यांना हाकालण्याचा प्रयत्न केला. मोर्चेकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मोर्चा संपवला. विविध चॅनल्सनी हा कार्यक्रम लाईव्ह केला.आयबीएन लोकमत, एबीपी माझा, झी २४ तास या वाहिन्यांनी रवी बापटले यांची या विषयावर मुलाखत घेतली. बीबीसी टीव्ही व रेडीओच्या पत्रकार रहेजा मॅडम यांनी बापटले यांची खास मुलाखत घेऊन हा विषय जागतिक पातळीवर नेला. जवळपास ४० वृत्तवाहिन्यांनी या बातमीची दखल घेतली.महिना दीड महिना हा विषय चर्चिला जावूनही प्रश्‍न मिटला नाही. त्यानंतर हासेगाव ग्रामस्थ  पालकमंत्र्यांना भेटले. ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी,आदिवासी मुलांप्रमाणे वेगळी निवासी शाळा देता येईल अशी भूमिका मांडली.वृत्तपत्रांतून त्यांनी एचआयव्हीग्रस्त विद्यार्थ्यांच्या मागणीवर टीका केली.माणसा-माणसांत भेद करणार्‍या या त्यांच्या भूमिकेवर माध्यमात मोठ्या प्रमाणावर टिकाटिप्पणी झाली. औसाच्या तत्कालिन आमदारांनी शाळा गावच्या मुलांसाठी आहे, सेवालय बंद पाडा असे चिथावणीखोर वक्तव्य दिले.मात्र महाराष्ट्र राज्याचे तेव्हाचे शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आरोग्य राज्यमंत्री वर्षा गायकवाड यांनी सेवालयातली मुलं जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकली पाहिजेत, अशी रास्त भूमिका घेतली.हासेगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी अडेलतट्टूपणाची भूमका घेऊन विरोध कायम ठेवला. सेवालयावर बहिष्कार टाकण्याचा ठराव हासेगाव ग्रामपंचायतीने घेऊनजिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी बालकल्याण विभागामार्फत सेवालयाची चौकशी लावली. या समितीच्या चौकशी अधिकार्‍याला सेवालयाबाबत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. तरीही संस्थेत निवासी डॉक्टर आहे का? नियमाप्रमाणे सगळे चालते का? असे तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले . मात्र  सेवालय हे लोकसहभागातून चालत असल्याने त्यांना फारसं काही करता आलं नाही.

कायदेशीरदृष्ट्या सेवालयातील मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेण्यापासून रोखणे कोणालाच शक्य नव्हते. त्यामुळे या प्रश्‍नाची कोंडी निर्माण झाली होती. कायद्याने हा प्रश्‍न सुटणार नाही, हे रवी बापटले यांच्या लक्षात आले.सेवालयातील मुलांमुळे हा प्रश्‍न निर्माण झाला असल्यामुळे, तो मिटवण्यासाठी पुढाकारही आपणच घ्यावा असे बापटले यांनी ठरवले.त्यांनी गावातील राजकीय पुढारी सोडून इतर लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद सुरू केला. आम्हाला सेवालयातील मुलांइतकीच, गावातील मुलेही महत्त्वाची आहेत. आमच्या मुलांमुळे गावातील मुले शिक्षणापासून वंचित राहावीत, हे आम्हाला मान्य नाही. सेवालयातील मुलांच्या गावात तीन पदयात्राही काढण्यात आल्या. या सततच्या सकारात्मक मोहिमांमुळे गावातील वातावरण निवळले. रवी बापटले यांनी पुढाकार घेऊन गावातील प्रमुख लोकांची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी‘सेवालयातील मुलांमुळे इतर कोणा विद्यार्थ्याला एचआयव्हीची लागण झाली तर आम्हाला गावात फाशी द्या, अशी जाहीर भूमिका मांडली. गावातील काही हितसंबंधियांनी सेवालयाबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरविले होते.सेवालयाला खूप पैसा येतो, विद्यार्थी सांभाळणं नाटक आहे…वगैरे अनेकखोट्या बाबी ग्रामस्थांना सांगितल्या गेल्या होत्या.रवी बापटले यांनीग्रामस्थांसमोरसमोर सगळ्या बाबींचा खुलासा केला. आम्ही सेवक ही ९ लोकांची संस्था आहे. तुम्ही ९ लोकांची नावे द्या. ही संस्था मी तुमच्या ताब्यात देतो. सेवालय तुम्ही चालवा. आम्ही स्वयंसेवक म्हणून काम करू. अशी जाहीर भूमिका घेतली. तेव्हा आपला गैरसमज केला गेला असल्याचे लोकांच्या लक्षात आले. संस्थेच्या  कार्यकारिणीवर येण्याची कोणाही ग्रामस्थाने तयारी दाखवली नाही. या सर्व प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक भिसे यांनी सेवालयाला मोलाची साथ्लृ दिली. त्यांच्यावर दबाव,दडपण आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली. ग्रामस्थांचा मुख्याध्यापकांवर विश्‍वास होता. त्याचाही फायदा हे प्रकरण निवळण्यासाठी झाला. हळुहळू मुलं शाळेत जाऊ लागली. काही दिवसातच जवळपास सगळी मुलं शाळेत येऊ लागली. सेवालयाने ही महत्त्वाची लढाई जिंकली. या लढ्यामुळे सगळ्या देशाला ‘सेवालय’ हे नाव माहीत झाले. २०१०मध्ये संसदेत या विषयावर चर्चा झाली. एचआयव्हीबाबत प्रबोधन करणार्‍या जाहिराती माध्यमांतून सुरू झाल्या. एचआयव्हीग्रस्त मुलांना मुलभूत हक्कांपासून दूर करता येणार नाही,असा कायदा संसदेने पास केला. एचआयव्ही-ग्रस्तांच्या एका महत्त्वाच्या प्रश्‍नाकडे देशाचे लक्ष वेधण्यास सेवालय कारणीभूत ठरले.

लोकसहभागातून ऍम्ब्युलन्स

एका बाजूला एचआयव्हीग्रस्तांच्या हक्काबाबतच्या या लढाया चालू होत्या तर दुसर्‍या बाजूला सेवालयात दाखल होणार्‍या मुलांची संख्या वाढत होती. सेवालयात लावलेली सगळी झाडं व्यवस्थ्लिृत वाढू लागल्याने माळरानावर एक हिरवं बेट तयार झालं होतं. मुलांच्या संख्येबरोबर सुविधाही वाढणे गरजेचे होते. २०१० पर्यंत रवी बापटले यांची स्वतःची मोटरसायकल हेच एकमेव संस्थेचे वाहन होते. मुलांची संख्या वाढल्याने त्यांना शाळेत व रुग्णालयात येण्यासाठी एका वाहनाची गरज तीव्रतेने जाणवू लागली. संस्थेसाठी एक छोटी ऍम्ब्युलन्स घ्यावी असा प्रस्ताव पुढे आला. ऋत्विक राजेश व उमा व्यास या विद्यार्थ्यांने वाढदिवसानिमित्त ५०० रुपये ऍम्ब्युलन्ससाठी दिले. निधी संकलनाची सुरुवात झाली. दै.एकमतचे तेव्हाचे  संपादक शरद कारखानीस यांनी वृत्तपत्रांतून याला चांगली प्रसिद्धी दिली. संतोष सुभाषअप्पा मुक्ता यांनी ७० हजार रुपयाची देणगी दिली.हजार-पाचशे रुपयांची देणगी देणारे अनेकजण पुढे आले. सेवालयाला ऍम्ब्युलन्स हवी म्हटल्याने कंपनीने ८ हजाराची सूट दिली. २लाख ७२ हजार रुपयांची मारुती ओमीनी ही नवीन गाडी सेवालयाच्या सेवेत आली.वाहन आल्याने अनेक कामांना गती आली. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१० या कालावधीत सेवालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध शाळा-कॉलेजात जावून एचआयव्हीबाबत जनजागरण केले व त्यांच्या खावूचे पैसे देणगी म्हणून मिळवले. सेवालयाची तातडीची गरज अशी लोकसहभागातून पूर्ण करण्यात आली. एका बाजूला मुलांच्या शिक्षणाची ही लढाई चालू असताना दुसर्‍या बाजूला सेवालयातील वृक्ष लागवडीचे व विकासाचे काम सुरूच होते.

हासेगावची अनेक मुलं लातूरातील शाळा, कॉलेजात शिकतात.अनेक मजूरही कामासाठी लातूरला येतात. बहुतेकजण १५ किलोमीटरचे अंतर पायी,रिक्षाने वा टमटमने पार करत. लातूर-हासेगाव बसगाडी सुरू करावी अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ग्रामस्थांनी दोन वर्षांपासून निवेदने देऊन प्रयत्नही केले होते. मात्र एसटी महामंडळ या मागणीकडे दुर्लक्ष करीत होते. या प्रश्‍नाबाबत ग्रामस्थांनी रवी बापटले यांची भेट घेऊन या संदर्भात सहकार्य करण्याची विनंती केली. केवळ निवेदनाने हा प्रश्‍न सुटणारा नाही हे लक्षात आल्याने रवी बापटले यांनी हासेगाव ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला.रवी बापटले यांच्यासोबत उपसरपंच बालाजी बावगे, माजी सरपंच संग्रामप्पा मुक्ता, ग्रामपंचायत कर्मचारी राजू बोयने असे लोक उपोषणास बसले.या उपोषणाला माध्यमांमधून मोठी प्रसिद्धी मिळाली.एसटी महामंडळाने चौथ्या दिवशी हासेगावला एसटी पाठवली. हासेगाव ग्रामस्थांचा प्रश्‍न रवी बापटले यांनी पुढाकार घेतल्याने सुटला. यामुळे ग्रामस्थांची सेवालयाशी जवळीक निर्माण झाली.सेवालय केवळ एचआयव्ही संक्रमित बालकांसाठीच कार्यरत नाही, तर आपल्याही मदतीला येते याची जाणीव लोकांना झाली.

सेवालयाला कुंपण

गावातील हितशत्रूंचा विरोध संपलाय असं वाटत असतानाच ५ मार्च २०१३ रोजी सेवालयाच्या जवळ ३ ठिकाणी अज्ञात इसमांनी आग लावली. यात आंब्याची ३०० झाडे जळाली. या संबंधातील बातम्या विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून लोकांनी सेवालयाला खंबीर पाठींबा व्यक्त केला. आगीच्या या घटनांमुळे सेवालयाला कुंपणाची गरज असल्याचे लक्षात आले. इतरही झाडांना समाजकंटकांपासून धोका होता. सेवालयाने कुंपणासाठी आर्थिक मदत करण्याचे जनतेला आवाहन केले. या आवाहनाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महिनाभरात साडेचार लाख रुपयांचा निधी मिळाला. कुंपणाचे काम पूर्ण झाले. सेवालय अधिक सुरक्षित झाले.

सेवालयातील आहार व औषधोपचारामुळे मुलं प्रकृतीने ठणठणीत बनली.सामान्य मुलांप्रमाणे ही छान जगू लागली.हासेगावच्या शाळेत दहावीपर्यंत पोचली. २०१० साली पहिल्यांदा सेवालयातील एक मुलगी दहावी पास झाली. तिला लातूरच्या बसवेश्‍वर महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला.मात्र तिच्या राहण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. सेवालयातली मुलगी म्हटले की,भाड्याने खोली मिळेनासी झाले. त्यावेळी हा विषय माध्यमांत चर्चेला गेला. तेव्हाचे समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दाणे यांनी त्यांच्या अधिकारात शासकीय वसतिगृहात त्या मुलीला प्रवेश मिळवून दिला. मात्र हा विषय एका वर्षापुरता नव्हता. दरवर्षी हा प्रश्‍न निर्माण होणार होता. हे लक्षात घेऊन सेवालयातील मुलांना वसतिगृहात राखीव जागा ठेवाव्यात,अशी मागणी करणारा प्रस्ताव रवी बापटले यांनी सहाय्यक आयुक्तांकडे दिला.त्यांनी तो प्रस्ताव उपायुक्त पुणे यांच्याकडे पाठवला.त्यांनी तो प्रस्ताव योग्य त्या शिफारसींसह समाजकल्याण सचिवांकडे पाठविला. दोन वर्षे सेवालयातील मुलांना लातूरच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळत गेला. मात्र २०१४ साली सर्व प्रवेश गुणवत्तेवर ऑनलाईन झाल्याचे सांगून प्रवेश नाकारण्यात आला.या निकषात सेवालयाच्या मुलांना संधी मिळणे अशक्य होते. या प्रश्नाला चालना मिळावी म्हणून रवी बापटले यांनी १४ नोव्हेंबर २०१४ या बालदिनी जिल्हाधिकारी यांना या प्रश्‍नावर १ डिसेंबरपासून बेमुदत सत्याग्रह करण्याबाबतचे निवेदन दिले. तोपर्यंत या प्रश्‍नावर काहीही निर्णय न झाल्याने लातूरच्या गांधी चौकात रवी बापटले यांनी बेमुदत सत्याग्रह सुरू केला. लातूरातील विविध संस्था, संघटना व व्यक्तींनी या सत्याग्रहाला सक्रीय पाठींबा दिला.तरीही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. या आंदोलनाची तीव्रता वाढावी म्हणून १४ डिसेंबरपासून रवी बापटले यांनी आमरण उपोषण सुरू केले. आठवडाभरानंतर खा.रवी गायकवाड व भाजप जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांच्या मध्यस्थीने हे उपोषण मागे घेण्यात आले. सहाय्यक आयुक्त दाणे, जिल्हाधिकारी पोले यांनी हा प्रश्‍न शासकीय पातळीवर मांडण्याचे आश्‍वासन दिले. मात्र ही लढाई अद्याप संपलेली नाही. तो प्रश्‍न तसाच कायम आहे.

देशसेवक चाचा बगिचासिंह

चाचा बगिचासिंह. हरियाणातील पानीपतचे. बालपणापासून खेळाडू. धावण्याच्या स्पर्धेत हमखास पहिला क्रमांक पटकवायचे. या गुणावर सैन्यात भरती झाले. १८ वर्षे सेवा बजावून, व्यसन मुक्तीसाठी घराबाहेर पडले. तरूणांचं प्रबोधन करीत सगळा देश फिरले. २५ वर्षांपासून पाठीवर दोन तिरंगा झेंडा घेऊन ६ लाखांपेक्षा जास्त पायी प्रवास केला आहे.

रवी ‘संचार’मध्ये काम करीत असताना ते भेटले. दोघेही देशभक्तीने भारलेले. एकमेकांच्या संपर्कात राहिले. रवीनी सेवालयाची सुरुवात केल्याचे कळल्यानंतर चाचा बगिचासिंह हासेगावला आले. पुन्हा पुन्हा येत राहिले. सेवालयात रमू लागले. गेल्या तीन वर्षात ते जास्तीत जास्त काळ सेवालयात घालवत आहेत. सेवालयाला चाचांची गरज होतीच . यावर्षी आंब्याची बाग त्यांनी सांभाळली. ८४ वर्षीय चाचा रवीवर पित्यासारखं प्रेम करतात. प्रत्येक आंदोलनात, संकटात ते रवीच्या पाठिशी ठाम उभे असतात. आयुष्यभर कसल्याच मोहात न अडकलेले चाचा रवीच्या प्रेमात गुंतले. आता सेवालय हाच त्यांचा पत्ता आहे.

आजींचा स्नेह

प्रमिला आष्टेकर ७३ वर्षांच्या तर निर्मला आष्टेकर ६५ वर्षांच्या. दोघी सख्ख्या बहिणी. शासकीय नोकरीतून निवृत्त झालेल्या.दोघी बहिणी आयुष्यभर एकत्र राहिल्या. लग्न केलं नाही. मूळच्या अहमदनगरच्या. मात्र वडिलांच्या नोकरीमुळे अकोला येथ्लृे स्थायिक झाल्या. दोघी आजी चार वर्षांपूर्वी सेवालय पाहण्यासाठी म्हणून आल्या. दिवसभर थांबल्या. सगळी माहिती घेतली.पुन्हा येतो म्हणून त्या गेल्या. दुसर्‍यांदा त्या सेवालयात आल्या तेव्हा सेवालयात कायमस्वरुपी राहण्याची इच्छा त्यांनी रवीजवळ बोलून दाखवली. वर्षभरापूर्वी या दोघी बहिणी सेवालयात कायमस्वरुपी राहायला आल्या असून मुलांच्या देखभालीत त्या सहभागी आहेत. आजी नातवांप्रमाणे त्या  मुलांचे काळजी घेत आहेत. रवीसाठी आईस्वरुप असलेल्या आजी सेवालयासाठी मोठा आधार बनल्या आहेत. रवीने स्वतःचं वारस निर्माण केला आहे. पण आजींनी रवीला स्वतःचं वारस बनवलंय. रवी बापटले यांच्या सुरक्षिततेचा विचार करून या आजींनी रवी बापटले यांना सहा महिन्यापूर्वी एक गाडी विकत घेण्यासाठी पूर्ण मदत केली आहे.

हॅप्पी इंडियन व्हिलेज

सुरुवातीच्या काळात ‘एचआयव्ही’ची लागण म्हटली की, चार-पाच वर्षांत मृत्यू असं चित्रं होतं.मात्र अत्याधुनिक औषधोपचार, पौष्टिक आहार, उत्तम दर्जाचं जीवनमान यामुळे, एचआयव्ही संक्रमित मुलं-मुलीही सामान्य माणसांप्रमाणे जीवन जगत असल्याचा अनुभव सेवालयात येतोय. पाचवी-सातवीत येथे आलेली मुलं-मुली महाविद्यालयात शिकत आहेत. वयाचा १८ वर्षांचा टप्पा ओलांडून तारुण्यात पदार्पण करीत आहेत.

सेवालयात १८ वर्षांच्या पुढील मुलांना कायद्याप्रमाणे ठेवता येत नाही. या तरुणांना पाठवायचं कुठं? समाजात यांना कोण सामावून घेणार? यांनी जगायचं कसं? असे अनेक प्रश्‍न रवी बापटले यांच्यासमोर उभे राहिले.या प्रश्‍नांच्या उत्तरातूनच रवी बापटले यांनी, हॅपी इंडियन व्हिलेज (एचआयव्ही) ची कल्पना मांडली. त्यादृष्टीने प्रत्यक्ष काम सुरु केले.दरम्यान लातूरची नृत्यकलाकार स्नेहा शिंदेंच्या पुढाकारातून सेवालयातील मुलांचाच एक सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेल्या निधीतून   सेवालयापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर १४ एकर टेकडीवजा पडिक माळरान घेण्यात आले.एका छोट्याशा दुमजली इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले. डिसेंबर २०१५ मध्ये ‘हॅपी इंडियन व्हिलेज’ची रितसर सुरूवात झाली.नंतर मुलांना राहण्यासाठी पक्क्या खोल्यांचे बांधकामही पूर्ण झाले. या सहा खोल्या विविध संस्था व व्यक्तींच्या मदतीतून बांधण्यात आल्या. १८ वर्षांपुढील एचआयव्ही संक्रमित मुलं-मुली येथे राहत आहेत.यातील बहुतांश मुलं लातूरला विविध व्यावसायिक शिक्षण घेत आहेत.त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून आनंददायी जगण्याचा प्रयोग सुरु आहे.या जागेवर लोकसहभागातून वृक्षाराेपणाचा कार्यक्रमही सातत्याने राबवला जातोय. या उजाड माळरानावरही विविध झाडांच्या पालव्या लक्ष वेधून घेत आहेत.मुलांसाठी एका मोठ्या स्वयंपाकघराचे बांधकामही येथे सुरु आहे. या प्रकल्पाची व्याप्ती खूप मोठी आहे. येथे  अनेक गोष्टी व्हायच्या आहेत. त्यासाठी खूप मोठ्या निधीची आवश्यकता आहे. निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे इतर कामे मार्गी लागतील.अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला पहिलाच प्रकल्प आहे.

हॅप्पी म्युझिक शो
स्नेहा शिंदे या नृत्यात निपुण असलेल्या महाविद्यालयीन युवतीच्या पुढाकाराने सेवालयातील ४० मुलांमुलींचा ‘हॅपी म्युझीक’ हा सांस्कृतिक कार्यक्रम साकार झाला. १९ सप्टेंबर २०१५ रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘हॅपी म्युझीक’चा पहिला कार्यक्रम झाला. मराठवाडा समन्वयक समितीने आयोजित केलेल्या या शो ला भरभरून प्रतिसाद मिळाला.त्यानंतर लातूर, परभणी, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर,जळगाव,पुणे,मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हॅपी म्युझीकचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.झी मराठीच्या ‘चला हवा येऊ द्या’या कार्यक्रमातही या शोचेसादरीकरण झाले. बालदिनी साम टी.व्ही.वर प्रक्षेपण झाले व पुणे येथील येरवडा जेलमध्येही या शो चे सादरीकरण झाले.माध्यमातून गोळा होणारा निधी ‘हॅपी इंडियन व्हीलेज’ च्या पुनर्वसनासाठी वापरला जात आहे. हॅपी म्युझीक’शोच्या माध्यमातून निधी गोळा होतोय ही बाब महत्त्वाची आहेच पण या शो मुळे एचआयव्ही संंक्रमित मुलांमुलींच्या प्रकृतीत आश्‍चर्यकारक बदल झालाय.
दोन महिन्यांपूर्वी हॅपी म्युझिक शो बंद करून,सेवालय म्युझिक शो ची सुरुवा नवीन व्यावसायिक मार्गदर्शकांमार्फत केली आहे.

सेवालयाचे पालक
डॉ. पवन चांडक हे सायकलिंगसाठी देशभर ख्यातनाम आहेत. परभणी येथे होमिओपॅथ्लृीचा दवाखाना चालवतात.ते डॉक्टर म्हणून जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच समाजसेवेसाठी.एचआयव्हीबाबत समाजात जागृतीचं काम ते गेल्या अनेक वर्षांपासून करतात.त्यामुळं हासेगाव येथील सेवालयाचं काम ते जाणून होते. परभणीत एचआयव्हीग्रस्त बालकांचे संगोपन करणारी एक संस्थाहोती.डॉ. चांडक या संस्थेला सर्वतोपरी मदत करीत.शासकीय मदतीवर चालणारी ही संस्था काही कारणांनी बंद पडली. तेथील बालकांना दुसर्‍या शासकीय संस्थेत हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या.डॉ. पवन चांडक यांनी या मुलांना आग्रहपूर्वक सेवालयात पाठवले. परभणीची १३ मुलं सेवालयात आली.तेव्हापासून डॉक्टरांनी सेवालयाला आपलं घरचं मानलं, बनवलं.सेवालयाला प्रसंगानुरूप आर्थिक मदत करणारे, पालकत्व स्विकारलेले अनेकजण आहेत.पण डॉक्टर खर्‍या अर्थाने संपूर्ण सेवालयाचेच पालक आहेत. सेवालयातील मुलांसाठी पूरक आहार म्हणून शेंगदाणा,राजगिराचे लाडू, चिक्की पाठवतात. डबलबेड कॉट, सायकली, शिलाई मशीन, संगीताची वाद्य, खेळाचं साहित्य, शैक्षणिक साहित्य असं काहीना काही सेवालयाला पाठवणं त्यांचं चालूच असतं.हॅपी म्युझिकच्या सुरूवातीला  ५० हजार रुपये त्यांनी दिले. सेवालयातील आंबे असोत की, गणपतीच्या मूर्ती ,त्याचं परभणीत ते मार्केटिंग करून सेवालयाला पैसे पाठवून देतात. हॅपी म्युझिकचे दोन कार्यक्रम त्यांनी स्वत: आयोजित करून भरीव निधी मिळवून दिला.सेवालयाच्या या सेवाभावात त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.आशा,आई सौ.बसंती, वडील सत्यनारायणजी चांडक सक्रिय आहेत.डॉक्टरांनी त्यांच्या होमिओपॅथिक ऍकॅडमी अँड रिसर्च चॅरिटी ट्रस्ट परभणी या संस्थेच्या  माध्यमातून आतापर्यंत सुमारे दहा लाख रुपयांची मदत केली आहे.
सेवालयाचा प्रकाश
प्रकाश आणि सुमा आडे. तिथल्याच हसेगाव तांड्याचे रहिवासी.पगारी असले तरी, भावनिकदृष्ट्या सेवालयाचाच एक भाग बनलेले. प्रकाश सेवालयात येणार्‍यांचं आगत स्वागत करण्यापासून ते मुलांच्या देखभालीपर्यंत सगळं काही पाहणारा. सेवालयावर,रवी सरांवर मनापासून प्रेम करणारा. सुमा मावशी स्वयंपाकघराच्या मालकीन. सगळ्यांना वेळेवर, पोटभर खाऊ घालण्याची जबाबदारी त्यांची. त्यांच्या हाताला चव आहे. चवीवरून भाजी कोणी बनवली, हे  मी सांगू शकतो.विविध प्रकारचे पदार्थ करण्यात त्यांचा हातखंडा आहे. बेसन आणि कारल्याची भाजी खासच. सेवालयात आलात तर संकोच न करता मावशीच्या हातचं जेवण नक्की घ्या.

सेवालयाचे मामा

सेवालयाचे संस्थापक  रवी बापटले यांचे मामा. शिवराज टिमके हे त्यांचं नाव.ते एस.टी. महामंडळातून चालक म्हणून २०१५ ला निवृत्त झाले. रवीमुळे सेवालयाच्या सुरुवाती पासून ते या कामाशी जोडले गेले.  मामा सेवालयात पूर्णवेळ आले आणि सगळ्या जबाबदार्‍या त्यांनी स्वत:हून स्विकारल्या. सकाळी मुलांना उठवण्यापासून ते तयार करण्यापर्यंतची सगळी कामं ते सहजतेने करतात. किचनमध्ये काय हवं,नको ते पाहतात. छोट्या मुलांपासून ते कॉलेजला जाणार्‍या मुलांची ने-आण करतात. मुलांना सरकारी, खाजगी रूग्णालयात घेऊन जातात.त्यांच्या गोळ्या,औषधं घेऊन येतात. रूग्णालयात कोणाला दाखल केले तर  मुलाजवळ बसून रात्र जागून काढतात.लग्नात अक्षता पडेपर्यंत भाचाच्या पाठिमागं टोपी घालून उभं राहणारे मामा पाहिलेत पण हा मामा भाच्याच्या सेवाभावी प्रकल्पात  खंबीरपणे, आनंदात उभा आहे. हे सोपं नाही. यासाठी कामावर निष्ठा लागते, जिगर लागतो. मामा तुमचा अभिमान वाटतो.

सेवालयाचे सोबती

डॉ.मनोजकुमार मोठे, रवीकिरण गळगे, शांतेश्वर मुक्ता, प्रमिला आष्टेकर, निर्मला आष्टेकर,स् नेहा शिंदे, प्रा.छगनराव शिंदे, सौ.मंदोदरी शिंदे, प्रिया दापके, ज्योतिबा बडे, हणमंत गावडे,सूर्यकांत वैद्य,रजनी वैद्य, चाचा बगिचासिंह, संजय चिल्ले,शरद झरे,संगीता झरे, रणजित आचार्य, विद्या आचार्य, किशोर खोबरे, डॉ.निकीता खोबरे, प्रणिल नागूरे, बंडावार काका-काकू, कृष्णा राठोड,बाबूशा जाधव,पूजा आडे, प्रियंका राठोड, प्रकाश आडे, सुमन आडे या सर्वांची सोबत सेवालयाला लाभली आहे.

(रवी बापटले यांचा मोबाईल क्रमांक-९५०३१७७७००)

महारुद्र मंगनाळे

पत्रकार व प्रकाशक, मुक्तरंग प्रकाशन, लातूर

9422469339,9096139666

Previous articleसेवालय – रवी बापटले लेख
Next articleहिमालयाच्या कुशीतून गंगेच्या किनाऱ्यावर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.