ज्या काळात, माझ्या वयाची मुलं-मुली “आम्ही समग्र पुलं किंवा समग्र वपु वाचलंय,” असं म्हणतांना कॉलर ताठ करायची, तेव्हाही मी जीए, चिंत्र्यं, पुरू शिव असे लेखक, कवी वाचत होते.. त्यांच्या कविता कंठस्थ करत होते. या यादीत यथावकाश ग्रेस, महेश एलकुंचवार, इंदिरा संत आणि इतर समकालीन कवी-लेखकांचा समावेश झाला. अर्थात ‘समग्र पुलं’ मीही वाचलंय. हिंदी-भाषक असल्यामुळे हिंदी-उर्दू वाचनही भरपूर होतंच. पण ‘अभिजात’ किंवा ‘क्लासिक्स’मधे मी तेव्हाही अडकून पडले नाही. या वाचनासोबत वयानुरूप गुलशन नंदा, चंद्रकांत काकोडकर आणि या दोघांचे जे कुणी समकक्ष होते, तेही वाचत होते. त्यामुळे ‘अभिजात’ म्हणजे, ‘माझ्या टोपीतले रंगीत पीस’ किंवा ‘खांद्यावरची किनखापी झूल’ आहे असं मला कधीच वाटलं नाही.
मालिका म्हणजे त्या-त्या काळाचा आरसा असतो. त्या काळातल्या सार्वजनिक अभिरुचीचं प्रतीक असतं. अतिशय जबाबदारीने हे विधान केलंय मी. लेख वाचल्यावर ते वाचकांच्या लक्षात येईलच. ही अभिरुची कसकशी बदलत गेली आणि तशीच का बदलली हा आजचा विषय नव्हे. आता मी माझ्या मालिका-लेखनाकडे येते.
मालिकांचे विश्व बदलले आहे, हे मलाही मान्य आहे. खाजगी वाहिन्या अस्तित्वात आल्यावर, त्यांचा हेतू व्यवसाय करणे हा होता. तोपर्यंत आपल्याला ‘प्रबोधन’ करणारी एकुलतीएक सरकारी वाहिनी माहीत होती. सरकारी वाहिन्यांच्या पाठीशी ‘सरकार’ असतं. पण खाजगी वाहिन्यांना त्याच व्यवसायातून पैसा कमावून, तोच पुन्हा त्या व्यवसायात घालायचा असतो. जेव्हा व्यवसाय म्हणून एखादा उपक्रम सुरु केला जातो तेव्हा प्रेक्षकांना काय हवंय, हे पाहणं सक्तीचं होऊन जातं. सोपं करून सांगायचं तर, गिऱ्हाईक मागेल त्या वस्तूची’च’ पुडी बांधून द्यावी लागते. “तुम्ही हे खाऊ नका, हे तुमच्या प्रकृतीला हानिकारक आहे,” असं सांगण्याचं काम दुकानदाराचं नसतं. डॉक्टरचं असतं. दुकानदार हे सांगायला लागला तर तो बुडेल. त्यामुळे मालिकांच्या विश्वात जे बदल झालेत ते प्रेक्षकांना जे हवे तेच आहेत, तेच असतात. त्यांना जे हवे तेच मालिका देत आहेत. मालिकांचे टीआरपी बघून त्यांना जाहिराती मिळतात. जाहिरातदार या वाहिन्यांच्या ‘पाठीशी’ असतात. त्यामुळे मालिकांचा चेहरामोहरा बदलला याचं श्रेय वाहिनीपासून संवाद लेखकापर्यंत सगळ्यांचे मिळून असले तरी…. तो चेहरा जर तुमच्यापैकी काहीजणांना आवडत नसेल तर तो दोष यापैकी एकाचाही नाही. कारण प्रेक्षकांना जे हवंय, तेच दिलं जातंय. त्यामागचे कष्ट, त्यात ओतला जाणारा पैसा, त्यातून पोसली जाणारी कुटुंबं आणि त्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या वाहिन्यांचे व्यवहार कुणालाच माहीत नसतात. जुन्या मालिकांची उदाहरणं दिली जातात. त्या मालिका ‘टीआरपी’ नाही म्हणून बंद झाल्या हे कोणाला माहित नसतं. ‘अमुक मालिका बंद करा,’ हे सांगणं सोपं असतं. पण ती मालिका बंद झाली तर किती लोकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळेल याची कल्पना सामान्य प्रेक्षकाला नसते.
फार कळीचा प्रश्न आहे हा. पण त्यालाही उत्तर आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. हल्ली तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की, कुठल्या मालिकेतला कुठला सीन, किती लोकांनी, किती वेळ पाहिला याचा रोजचा पूर्ण लेखाजोखा वाहिनीकडे येतो. हाच ‘टीआरपी चार्ट!’ प्रत्येक मालिकेचं काम पाहण्यासाठी वाहिनीने त्या-त्या मालिकेला आपल्याकडून एक ‘कार्यकारी निर्माता’ दिलेला असतो. वाहिनीचा हा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, निर्मिती-संस्थेच्या क्रिएटिव्ह हेडबरोबर सतत संपर्कात असतो. हीच मंडळी टीआरपी चार्टचा अभ्यास करून त्यानुसार आपल्या मालिकेत बदल करण्याविषयी निर्मात्याला सुचवतात आणि एक्झिक्युशन लेवल’वर ते बदल होताहेत की नाही यावर लक्ष ठेवतात. हे अतिशय कौशल्याचं काम असतं. आणि ते करणारी वाहिनीतली सगळी माणसं त्यात तज्ज्ञ असतात, प्रशिक्षित आणि अनुभवी असतात. त्यांना लहर आली म्हणून ते कुठल्याही मालिकेत बदल करत नसतात. ते फार जबाबदारीचं काम असतं. टीआरपी बघून त्यांना प्रेक्षकांचा ‘कल’ कळतो आणि त्यानुसार मालिका बनवल्या किंवा बदलल्या जातात. फक्त मराठी मालिकांबद्दल बोलायचं झालं तर, सगळ्या मराठी वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या मालिकांचे, सोमवार ते शनिवार प्रसारित झालेली सगळ्या भागातली सगळी दृश्यं, किती प्रेक्षकांनी किती वेळ सतत बघितली, कुठल्या सीनच्या वेळी चॅनल बदललं गेलं, त्यावेळी सदर मालिकेतलं कुठलं दृश्य सुरु होतं, त्यात कोण काय बोलत होतं, त्याचवेळी स्पर्धक वाहिनीवर असं काय सुरु होतं ज्यामुळे चॅनल बदललं गेलं, या हिशोबाचा तक्ता नुसता कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर बघून माझ्यासारख्या माणसाचे डोळे फिरतात. आणि वाहिन्यांमध्ये बसलेली तज्ज्ञ मंडळी त्याचा ताबडतोब अभ्यास करून त्यातून निष्कर्ष काढत असतात. ‘उद्या करू’ हा शब्दप्रयोग तिथे चालत नाही. कारण आलेल्या नंबर्सनुसार पुढचे निर्णय घ्यायचे असतात. स्पर्धेत टिकायचं असतं. आणि हे सगळं कोणासाठी? कुणामुळे? आणि कोण ‘करवून’ घेत असतं?? मायबाप प्रेक्षक..!!