महाभारतातल्या स्त्रिया: भाग दोन
**********
-मिथिला सुभाष
बाईचं तेज पुरुषप्रधान समाजाला सहन होत नाही. पूर्वीही होत नव्हतं, आजही होत नाही. त्यातून तिच्या जवळच्या सगळ्यांनी तिला ‘टाकलेलं’ असेल तर तिच्या दुर्दशेला पारावार नसतो. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत जी आपलं तेज झाकोळू देत नाही, ती बाई शरीररुपाने संपली तरी जनमानसातून ‘व्यतीत’ होत नाही. तिची दुर्दम्य प्राणउर्जा तिच्या तेजात विलीन होऊन मंद तेवत राहते. तिच्या उजेडात रस्ते दिसतात.. अनेक शतके…!! ती स्मरणरुपाने अमर होते. अंबा तशी होती.
अंबेच्या दुर्दैवाचे दशावतार पूर्ण बारा वर्ष सुरु होते. त्याचे तपशील माहीत असले तरी ते सारे इथे लिहिणं शक्य नाही. त्यांचे ओझरते उल्लेख करून तिच्या कथेचा गाभा फक्त लिहिते..!! दुसरं, महाभारत कथा जशी आहे तशीच ठेऊन त्यातल्या पात्रांबद्दल मला काय वाटलं ते मी लिहिणार. मूळ कथेवर प्रश्नचिह्न लावण्याची माझी लायकी नाही, तो माझा अधिकारही नाही आणि उद्देशही नाही. महर्षी व्यासांनी आपल्याला एक महाकाव्य दिलं. मला त्याचा जो अर्थ लागला तो Unconventional – अपारंपरिक आहे आणि तो मी तुमच्याशी शेअर करतेय.
प्रत्येक कुटुंबात एखादा अति-आगाऊ माणूस असतो. आपल्यामुळे दळ हलतंय, आपण नसलो तर या घराचं काही खरं नाही, असं त्याला वाटत असतं. कुरुकुलात महाशय भीष्म असे होते. ऐन तरुणपणात व्यक्तिगत सुखाचा त्याग करणारी माणसं जन्मभर उपकाराची ओझी सगळ्यांच्या डोस्क्यावर आदळत असतात, त्यातला नमुना. (या माणसाने अंबा आणि नंतर गांधारीच्या आयुष्याची वाट लावली म्हणून मी थोडी जास्त कडवट झालेय.)
तर… दिलफेक राजा शंतनूचा ‘विचित्रवीर्य’ नावाचा मुलगा लग्नाचा झाला होता. भीष्म याच शंतनूला गंगेपासून झालेला मुलगा. विचित्रवीर्याची आई ‘योजनगंधा’ सत्यवती. आपल्या धाकट्या सावत्र भावासाठी वधूसंशोधन करत असतांना भीष्माला कळलं की काशीनरेशच्या तीन मुलींचं स्वयंवर मांडलं जातंय. झालं..!! ‘सगळीकडे मी पुढे’ या धोरणाने भीष्मराव निघाले भावासाठी बायका आणायला.
काशीनरेशच्या तीन मुली म्हणजे अंबा, अंबिका आणि अंबालिका. पैकी मोठ्या अंबेचं प्रेम सुबलराज शाल्व याच्यावर होतं. तिने त्याला वचन दिलं होतं की मी स्वयंवरात तुझ्याच गळ्यात वरमाला घालेन. पण महाप्रतापी भीष्म तिथे पोचला आणि त्याने सगळ्यांचा पाडाव करून तिन्ही पोरी रथात घालून हस्तिनापुरी आणल्या. बावरलेल्या मुलींना लढाईच्या धामधुमीत भीष्माची भेट घेणं शक्यच नव्हतं..! हस्तिनापुरात पोचल्यावर मात्र अंबेनं भीष्माला सांगितलं की तिचं शाल्वावर प्रेम आहे, तिने त्याला मनाने पती मानलंय, म्हणून भीष्माने तिला जाऊ द्यावं. भीष्माने तिला ‘सुबल’राज्यात पोचवण्याची व्यवस्था केली. तिथे गेल्यावर शाल्वच्या ‘खानदान की इज्जत’ आड आली. तो म्हणाला, तुला भीष्माने जिंकलंय.. शिवाय मधले काही दिवस तू त्याच्याबरोबर होतीस, त्यामुळे मी तुझा स्वीकार करणार नाही. (प्रेम-बिम गेलं गाढवाच्या तोंडात!) … अंबा तिथून निघाली आणि पुन्हा हस्तिनापुरला आली. तिने भीष्माला सांगितलं की तू माझ्याशी लग्न कर, मला तू जिंकून आणलंयस. पण भीष्मबाबाने ‘आमरण ब्रम्हचारी’ राहण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याने तिला नकार दिला. … आणि अंबाचं दुर्दैव सुरु झालं. “मी तुझ्या मृत्यूला कारण होईन,” असं भीष्माला सांगून ती हस्तिनापुरातून बाहेर पडली.
अंबा त्यानंतर आर्यावर्तातल्या प्रत्येक राजाकडे गेली. पण लग्नाआधी एका राजावर प्रेम करणाऱ्या आणि भीष्मासारख्या ‘बिग बॉस’ला उलटून उत्तर देणाऱ्या या पोरीला सगळ्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. खुद्द तिच्या माहेरच्या लोकांनीही, ‘तू आमच्यासाठी मेलीस,’ छापाची भूमिका घेतली. अंबेची कथा ऐकून परशुरामाने भीष्माला धडा शिकवण्याचे ठरवले, पण एकवीस दिवस युद्ध करूनही तो भीष्माला मारू शकला नाही कारण भीष्माला ‘इच्छामृत्यू’चे वरदान होते. त्यानंतर अंबा अन्न-पाण्याचा त्याग करून तपश्चर्येला बसली.. म्हणजे थोडक्यात खंगून मेली. (यातले मधले सगळे तपशील मला माहीत आहेत. विस्तारभयाने ते लिहिले नाहीएत.)
याच अंबेनं पुढचा जन्म ‘शिखंडी’चा घेतला आणि त्याला समोर ठेऊन अर्जुनाने भीष्मावर शरसंधान केलं..!! शरपंजरी पडून राहण्याचे वगैरे सोपस्कार झाल्यावर भीष्म स्वर्लोकी रवाना झाले.
यावर मला जे म्हणायचं आहे ते माझ्या शीर्षकाने आणि ‘शैली’ने स्पष्ट केलेलं आहे. मी महाभारत पहिल्यांदा वाचलं तेव्हाच मला अंबेचं प्रेम, तिचा स्पष्टवक्तेपणा, तिची धडाडी, चिकाटी, आणि तिचं तेज.. या सगळ्या गुणांची भुरळ पडली होती. “मी भीष्माच्या मृत्यूचं कारण होणार,” या गोष्टीचा तिला इतका ध्यास लागला की ती त्याच भावनेसह पुन्हा जन्माला आली. तिची पूर्ण कथा वाचल्यावर हे लक्षात येतं की ती मुलगी ‘पुरुषप्रधान समाजाचा बळी’ ठरली. आणि मग पुन्हा हेच म्हणावंसं वाटतं की…
बाईचं तेज पुरुषप्रधान समाजाला सहन होत नाही. पूर्वीही होत नव्हतं, आजही होत नाही. पण मला आणि माझ्यासारख्या अनेकींना अंबेचं तेज आजही आपल्याभोवती जाणवतं. तिला जवळच्या सगळ्यांनी टाकलं, पण तिने आपलं तेज झाकोळू दिलं नाही, अंबा शरीररुपाने संपली तरी जनमानसातून ‘व्यतीत’ झाली नाही. तिची दुर्दम्य प्राणउर्जा तिच्या तेजात विलीन होऊन मंद तेवते आहे. तिच्या उजेडात अनेकींना मार्ग सापडले, पुढेही सापडतील..!!
[email protected]
–