अक्षय इंडिकरचा ‘त्रिज्या’ इस्टोनियातील ‘ब्लॅक नाइटस्’मध्ये

इस्टोनिया या देशात होणाऱ्या ‘ब्लॅक नाइटस्’ या अतिशय मानाच्या फिल्म फेस्टिवलसाठी अक्षय इंडिकर यांच्या  ‘त्रिज्या’ या सिनेमाची निवड झाली आहे. जगात फक्त १४ ‘अ’ दर्जाचे फिल्म फेस्टिवल आहेत त्यापैकी ‘ब्लॅक नाइटस्’ हा एक अतिशय महत्त्वाचा फिल्म फेस्टिवल मानला जातो . या सोहळ्यात जगभरातल्या ७८ देशांमधून येणाऱ्या विविध सिनेमांपैकी २५० सिनेमे दाखवले जातात. थोडेथोडके नाहीत, तर साधारण ८०,००० सिनेरसिक जगभरातून या फेस्टिवलला हजेरी लावतात. दोन महिन्यापूर्वीच अक्षयच्या ‘त्रिज्या’ वर शांघायच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जागतिक स्तरावरील नामंकित दिग्दर्शकांनी पसंतीची मोहोर उमटविली . लवकरच स्पेन, इंग्लंड, अमेरिका आदी देशातही ‘त्रिज्या’ दाखवला जाणार आहे, मराठमोळ्या, मध्यमवर्गीय घरातील अक्षयचे हे यश डोळे मराठी माणसांना अभिमान वाटावे असे आहे . एका छोट्या शहरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतलेल्या अक्षयची यशोगाथा ‘मीडिया वॉच’ च्या यावर्षीच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. अक्षयचा थक्क करणारा हा प्रवास वाचायलाच हवा – संपादक

………………………………………………………………………..

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१९)

-सानिया भालेराव

मराठी चित्रपटाची ‘त्रिज्या’ विस्तारणारा अक्षय

सोलापूरात अकलूजमध्ये राहणारा एक मुलगा.  दहावीनंतर आपलं गाव सोडून पुण्यातल्या एस पी कॉलेजमध्ये सायन्सला ऍडमिशन घेतो.  ११ वीत काही विषय राहिल्याने हा सायन्स सोडतो, घरी परततो. पुन्हा मास कम्युनिकेशन करता पुढे पुण्यात येतो . त्याची नाटकांशी, रंगमंचाशी ओळख होते. सिनेमाचं वेड तर लहानपणापासूनच. सुरवातीला त्याला ऍक्टर बनावसं वाटतं. काही महिन्यातचं हे वेड ओसरतं आणि याला आपण दिग्दर्शकच बनावं असं वाटायला लागतं. FTII मधलं शिक्षण सुद्धा हा अर्धवट सोडतो पण ती वर्ष त्याला घडवतात. आपण काहीतरी वेगळं करायचं हे सतत याच्या डोक्यात चालू राहतं. मग हा मुलगा महाराष्ट्रातल्या अतिशय नावाजलेल्या लेखकावर एक चित्रपट काढायचा ठरवतो.  अखंड अडथळे पार करून हा चित्रपट येतो. तो आवडतो देखील सगळ्यांना. मग हा मुलगा अजून एक चित्रपट बनवतो. त्या चित्रपटाची एशियन न्यू टॅलेंट अॅवार्ड’साठी निवड होते.  भारताबाहेर या चित्रपटाचं नाव होतं.  अकुलजमधल्या त्या लहान पोराचा लघुपट ते आतंरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रपट दिग्दर्शक हा प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे. आहे कोण हा मुलगा? तर हे आहेत ‘अक्षय इंडीकर’!

‘डोह’ या लघुपटाने चर्चेत आलेले इंडीकर, वयाच्या पंचविशीत असताना आपल्या एका चित्रपटासाठी भालचंद्र नेमाडे यांची कविता घेण्याची परवानगी मिळवण्यासाठी त्यांना भेटायला गेले असता, नेमाडेंवर एक चित्रपट काढावा असा मानस असल्याचं त्यांना बोलून दाखवतात आणि नेमाडे सुद्धा त्याला होकार देतात आणि मग तयार होतो मराठीतला पहिला डॉक्यु फिक्शन “उदाहरणार्थ नेमाडे”.  पहिल्या भेटीत इतक्या मोठ्या लेखकांसमोर काही विशेष फायनेन्शियल बॅकिंग नसताना अक्षय यांनी चित्रपट करण्याचा प्रस्ताव मांडावा आणि तीन दिवसात आपण शूटिंग पूर्ण करू यावर होकार नेमाडेंनी द्यावा हे नक्कीच आश्चर्यचकित करणारं आहे.  मला वाटतं २४ वर्षांचा अक्षय जेंव्हा ७५ वर्षांच्या नेमाडेंना भेटला तेंव्हा अक्षयला नेमाड्यांमध्ये तरुण पांडुरंग दिसला असावा आणि नेमाडेंना अक्षय मध्ये त्यांचा  पांडुरंग! नेमेडेंबद्दल अक्षय सांगतात की या माणसाला भेटायला गेलो आणि वाटलं की याच्यावर चित्रपट बनवावा. आणि म्हणूनच ही डॉक्यु फिक्शन पाहिल्यावर सगळ्यात पाहिले जर काही जाणवलं असेल तर ती म्हणजे आत्मीयता.. या दोघांना एकमेकांबद्दल वाटणारी!

डॉक्युफिक्शनचा हा मराठीमध्ये पहिलाच प्रयोग असल्याने उदाहरणार्थ नेमाडे अधिकच स्पेशल वाटतो. नेमाडेंना आपण सगळेच एक लेखक म्हणून जाणतो. ‘नेमाडपंथी’ असं स्वतःला आनंदाने म्हणवून घेणारे असंख्य चाहते,वाचक या लेखकाच्या पुस्तकांची पारायणं करतात. त्यांच्यासाठी या चित्रपटातून आपल्या आवडत्या लेखकामध्ये दडलेला माणूस बघणं ही केवळ ट्रीट आहे. नेमाडेंच्या पुस्तकांची खास अशी जागा कायमच माझ्या मनात असल्याने, नेमाडेंना अक्षयने विचारलेल्या छोट्या छोट्या प्रश्नांतून, त्यांच्या गावी जाऊन तिथल्या लोकांबरोबर त्यांच्या सध्या सोप्या इंटरॅक्शनमधून, प्रवास करताना तुम्ही मिशी कधी पासून ठेवली सारख्या गंमतीशीर प्रश्नांमधून पुस्तकाबाहेरचे नेमाडे आपल्या समोर उलगडत जातात आणि अक्षय इंडीकर आपल्या समोर फार बखुबीनें संपूर्ण चित्र रंगवतात. नेमाडेंच्या कविता, पुस्तकातले प्रसंग, रोड मुव्हीचा थोडासा फील आणणारी ट्रीटमेंट, लेखकासोबतचा प्रवास, त्यांच्या गावाची दही हंडी याच्या फ्रेम्स अधून मधून मिक्स होत जातात आणि म्हणून डॉक्यु फिक्शन हा प्रकार जो इंडिकरांनी या चित्रपटासाठी निवडला आहे तो ते परफेक्टली कॅप्चर करतात. नेमाडपंथी तर हा चित्रपट पाहून मंत्रमुग्ध होतीलच पण ज्यांना नेमाडे माहित नाहीये, ज्यांनी त्यांची पुस्तक विशेष वाचली नाहीये त्यांच्यासाठी हा डॉक्युफिक्शन फार महत्वाचा ठरेल. एका ठिकाणी अक्षय असं म्हणाले होते की ‘जे वाचतात त्यांच्यासाठी वाचणं हा प्लॅटफॉर्म उत्तमच पण जे वाचत नाहीत, ज्यांना बघायला जास्त आवडतं त्यांच्यासाठी व्हिडीओज हा प्लॅटफॉर्म सुद्धा महत्वाचा. एका उत्तम लेखकांचं लिखाण इंडिकरांच्या या चित्रपटामुळे न वाचणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचतं आहे.. याहून आनंदाची गोष्ट काय असू शकते?’

अक्षय यांचा दुसरा चित्रपट ‘त्रिज्या’.. जो वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला आहे. ‘एशियन न्यू टॅलेंट अवॉर्ड’ मध्ये बेस्ट डायरेक्टर, बेस्ट फिल्म,बेस्ट सिनेमॅटोग्राफी असे नॉमिनेशन्स या चित्रपटाला मिळाले आहेत. हा चित्रपट अजून प्रदर्शित झाला नसल्याने याच्या कथेबद्दल फारसं लिहिता येणार नाही पण एकूणच जो चित्रपटाचा फील आहे तो वेगळाच.  ‘त्रिज्या’ हे नाव काय दर्शवतं? तर वर्तुळ.. मला फार इंटरेस्टिंग वाटलं हे. वर्तुळाची गंमत अशी की कोणत्याही बिंदूपासून आपण चालणं सुरु केलं तरीही जिथून ते सुरू केलं आहे तिथे आपण पुन्हा पोहोचतोच. तसंच वर्तुळाला पक्की अशी सुरवातही नसते आणि शेवट सुद्धा.  दुसरी बाजू अशी की वर्तुळ आपल्याला सीमित सुद्धा करतं कधी कधी. एकदा का आपण आपल्याच वर्तुळात अडकलो की मग स्वतःचा विस्तार करणं तसं अवघड होऊन जातं. आणि म्हणून ‘त्रिज्या’ महत्वाची. कारण त्रिज्येच्या लांबी नुसार वर्तुळाची पोहोच वाढत जाते. आपण आपल्या वर्तुळाच्या सीमा वाढवू शकतो जर आपण त्याची त्रिज्या वाढवली तर!  मग वाटलं अक्षय यांनाच विचारावं.. त्यांनी त्रिज्या हे नाव का निवडलं? त्यावर ते म्हणाले.. ‘त्रिज्या एका मध्यबिंदूपासून अनंतापर्यंत जाऊ शकणारी रेषा.. म्हटलं तर तिला स्वतःच अस्तित्व आहे आणि म्हटलं तर नाही. त्रिज्या वाढत गेली की वर्तुळ वाढतं. हा असा एक रस्ता आहे की जो आपण वाढवत जातो आणि क्षितिज विस्तारत जातं’… ‘मग परीघ त्रिज्येपासून वेगळा कसा?’ असं त्यांना मी विचारल्यावर ते म्हणाले की ‘वर्तुळाचा आसमंत मोजणारा परीघ.. पण त्रिज्या म्हणजे ती छोटीशी रेषा जी वर्तुळाची व्याप्ती ठरवते’. इंडीकरांशी  बोलताना लक्षात आलं की फार छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून त्यांनी हा चित्रपट बनवला आहे. विचारांमध्ये असलेली स्पष्टता म्हणूनच पडद्यावर उमटते.

Rainer Maria Rilke या जर्मन कवीचा फार सुंदर कोट आहे “I live my life in widening circles that reach out across the world.” त्रिज्या च्या निमित्ताने हा कोट आठवला. अवधूत नावाच्या  साधारण पंचविशीतल्या मुलाचा हा प्रवास. काहीसा सेमी ऑटोबायोग्राफीकल असा हा चित्रपट. जेंव्हा शहर अंगावर येऊन कोसळतं, आयुष्यात जेंव्हा वेगवेगळ्या घटना घडतात आणि आयुष्याला नवीन वळणं मिळतात, वास्तवामुळे जेंव्हा अस्वथता येते, आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे नक्की जेंव्हा याचा शोध सुरु होतो.. तेंव्हा आपल्या वर्तुळाची त्रिज्या वाढत जाते.. आणि अवधूत सोबत आपणही मग हा प्रवास करायला लागतो.  इंडीकरांनी अतिशय उत्तम कथा तर लिहिलीच आहे पण चित्रपटाची एक दिग्दर्शक म्हणून हाताळणी सुद्धा सुरेख केली आहे. कुठेही उपदेशात्मक न वाटता, वास्तववादी पात्रांमधून, घटनांमधून ते आपल्यापर्यंत बऱ्याच गोष्टी पोहोचवतात.

‘मराठी भाषेत चित्रपट बनवावासा वाटणं, लिमिटेड ऑडियन्स असूनही.. असं का?’ असं विचारल्यावर अक्षय म्हणतात ” ‘सगळ्यात आधी तर मराठीसाठी ऑडियन्स लिमिटेड आहे असं मला वाटत नाही. आज कित्येक नावाजलेले दिग्दर्शक स्वतःच्या मातृभाषेत चित्रपट करत आहेत आणि ते जगभरात प्रेक्षकांपर्यंत पोहोचत सुद्धा आहेत. आपण ज्या भाषेत विचार करतो, स्वप्न बघतो, ज्या भाषेत आपल्याला क्रिएटिव्हली व्यक्त होता येतं त्या भाषेत चित्रपट बनवावा असं मला वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या परिसराविषयी तुम्हाला जाण आहे, तुमचं आकलन आहे त्याच परिसराविषयी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. माझी पात्र ही मराठी अवकाशात वारणारी होती..त्यामुळे भाषा आपसूकच मराठी हीच असणार.  माझ्या पर्यंत जसे  इराणी, स्पॅनिश, जपानी भाषेतले चित्रपट पोहोचतात तसेच जगभरातील लोकांपर्यंत मराठी भाषेतला चित्रपट सुद्धा पोहोचेल. ‘

इंडीकरांशी  संवाद साधताना त्यांचा  स्पष्टवक्तेपणा जाणवला. स्वतःच्या कामावरचा विश्वास सुद्धा दिसून आला. ते म्हणाले ‘हिंदी सिनेमा म्हणजे फार वरचा आहे असं मला अजिबात वाटत नाही..त्यामुळे हिंदीच मला अवास्तव कौतुक सुद्धा नाहीये. आता मराठी सिमेना केला, मग पुढची पायरी म्हणजे हिंदी सिनेमा करावा अशी उतरंड मला मान्य नाही’.   जेंव्हा शांघाई मध्ये त्रिज्याचं स्क्रीनिंग होतं तेंव्हाचा एक अनुभव अक्षय सांगतात. ‘शांघाई मध्ये त्रिज्या बद्दल बोलताना, प्रेझेन्टेशन देताना मी मुद्दामून मराठीमध्ये बोलत होतो. त्यांना मँडरिन भाषेत माझं बोलणं ट्रान्स्लेटर समजावून सांगत होता. मला वाटलं माझ्या भाषेचा नाद त्यांच्या पर्यंत पोहोचावा तो जरी त्यांच्यासाठी अपरिचित असला तरीही ऐकू देत त्यांना. त्या त्या भाषेचा एक गोडवा आहे, तो पोहोचायला हवा.’ त्यांच्याशी बोलल्यावर वाटलं स्वतःच्या क्राफ्टवर  प्रेम करणारी अशी प्रामाणिक माणसं पाहिजेत. सिनेमाला कोणत्याही भाषेच्या चौकटीत न अडकवणारी.  सिनेमाची स्वतःचीच अशी एक भाषा असते असं अक्षय गप्पांमध्ये म्हणाले होते.. ते पटलं.

‘मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला एक मुलगा.. चित्रपट बनवू इच्छितो.. हे काहीसं अशक्य वाटणारं स्वप्न… आधी एक शॉर्ट फिल्म, मग डॉक्यु फिक्शन, मग चित्रपट.. हा प्रवास कसा होता?’ असं विचारल्यावर किंचितसं हसून अक्षय म्हणाले, ” मराठी घरांमध्ये साधारण सिनेमाच्या बाबतीत काय विचार केल्या जातो हे तुम्ही जाणताच. सिनेमा म्हणजे वाया गेलेल्या लोकांसाठी.. किंवा सिनेमाच्या नादी लागला वगैरे असं म्हटलं जातं आणि तसंच घरामध्ये होतं. पण मला वाचनाची आवड लहानपणापासून होती. आम्ही मूळचे लोक कलावंत म्हणून कलेबद्दल प्रेम घरात होतंच. कर्नाटकातून स्थलांतरित होत होत, जेंव्हा आम्ही सोलापुरात स्थिरावलो, त्याच्या नंतरही आमची लोककला, तो वारसा आमच्या सोबत आहे. पुण्यात आल्यावर आपण जास्त वाचलं पाहिजे असं शिक्षण आवडेनासं झाल्यामुळे वाटायला लागलं. चित्रपट मग इथेच भेटला. पुण्यासारख्या मोठ्या शहरात जुळवून घेताना आपला इथे टिकाव कसा लागेल  लागेल अशी काळजी होतीच.  मग हळूहळू आपण आपला कम्फर्ट झोन, आपली वाटेल अशी जागा शोधत राहतो. मग यातून सिनेमातला अंधार मला खूप आपलासा वाटायला लागला आणि मग ठरवलं की सिनेमा आपण करूयात. आजचा काळ मला महत्वाचा वाटतो की आता सिनेमावर कोणाचीही मक्तेदारी राहिली नाहीये. तुम्ही अगदी डी. एस.  एल. आर वर स्वतःच म्हणणं मांडू शकता. स्वतःची गोष्ट सांगू शकता. सिनेमा सगळ्यांच्या हातात आला पाहिजे आणि सगळ्यांना आपली गोष्ट मांडता आली पाहिजे.”

अक्षय पुढे म्हणाले, ‘मदत म्हणाल तर खूप लोकांची झाली. स्पंदन सिनेमा चळवळीचा सुरवातीच्या फेज मध्ये खूप फायदा झाला.  चित्रकथी निर्मिती आणि बॉम्बे बर्लिन प्रोडक्शन यांचा हा चित्रपट उभारण्यामध्ये फार मोठा हात आहे. मला हवा तसा चित्रपट करण्यासाठी त्यांनी मला कधी रोखलं नाही. मला हे फार महत्वाचं वाटतं”. आज आपल्याकडे असे किती सजग, संवेदनशील मुलं, मुली आहेत, ज्यांना वेगळ्या वाटा धुडाळायच्या आहेत, वेगळी स्वप्न पाहायची आहेत. अक्षय अशा तरुणांसाठी नक्कीच एक प्रेरणादायक उदाहरण आहे.  प्रामाणिकपणे काम केलं तर नक्कीच मदतीचे हात मिळतात हे अक्षय यांच्याशी बोलताना जाणवलं. २०१८ सालच्या ‘भुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये त्रिज्या हा चित्रपट निवडला गेला आणि भारतातील केवळ तीन दिग्दर्शक भुसान प्लॅटफॉर्मसाठी निवडल्या जातात त्यात अक्षय इंडीकर यांचा समावेश होता ही नक्कीच अभिमानाची बाब. तसंच  ‘फिरता सिनेमा’  या माध्यमातून गावो- गावी वेगवेगळे चित्रपट दाखवून इंडीकर प्रेक्षकांमध्ये सिनेसाक्षरता रुजवू पाहत आहेत. यामुळे त्यांच्या टीमचं कौतुक वाटतं. ‘त्रिज्या’ला शांघाय फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला. इंडीकरांचे आवडते दिग्दर्शक नुरी बिल्गे जेला (Nuri Bilge Celyan) यांची सुद्धा त्यांना तिथे भेट घेता आली आणि त्यांना देखील त्रिज्या आवडला. फेस्टिव्हलला प्रेक्षकांच्या पसंतीस त्रिज्या पडला ही नक्कीच आनंदाची गोष्ट.’त्रिज्या’ हा चित्रपट प्रेक्षकांना कधी बघता येईल? यावर अक्षय म्हणतात.. ‘त्रिज्या सारखे चित्रपट केवळ फेस्टिव्हलचे सिनेमे न राहता ते लोकांपर्यंत पोहोचावेत असं मला वाटतं. माध्यम मग भले पडद्यावरचं असो, ऑनलाईन असो. मला माझा चित्रपट मोठ्या पडद्यावर आला केवळ या दिखावेबाजीत स्वारस्य नाही. जगभरातील लोकांपर्यंत तो पोहोचावा असं मला वाटतं. त्यानुसार आमचे प्रयत्न चालू आहेत. ‘स्थलपुराण’ ही पोस्ट प्रोडक्शन मध्ये असेलली फिल्म, अजून एका  चित्रपटाची कथा एव्हाना इंडिकारानी लिहून पूर्ण केली आहे. अक्षय यांच्या वर्तुळाची त्रिज्या विस्तारायला सुरवात झाली आहे असं या गप्पा संपल्यावर वाटलं. त्रिज्यातला ‘अवधूत’ इंडीकरांशी  बोलताना मला दिसत राहिला आणि माझ्यामध्ये दडलेला अवधूत सुद्धा या निमित्ताने दिसला.

‘त्रिज्या’ हा चित्रपट पहायला हवाय. त्यानिमित्ताने कदाचित काही प्रश्न पडतील आणि उत्तर देखील सापडतील. आपण वाढवू इच्छित आहोत का स्वतःच्या वर्तुळाच्या त्रिज्या? की जगायचं आहे आपल्याला त्याच त्याच वर्तुळात? शेवटी हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. पण अक्षय सारख्या तरुण दिग्दर्शकाला मनापासून शुभेच्छा द्यावाश्या वाटतात. आज आपल्या भाषेत हा मुलगा प्रामाणिकपणे आपलं काम करून बदल घडवू इच्छित आहे. आपल्या मुळांशी प्रामाणिक राहून आपलं क्षितिज विस्तारू पाहत आहे. अशा चित्रपटांना आपण एक प्रेक्षक म्हणून नक्कीच अनुभवलं पाहिजे. आजच्या धावपळीच्या जगात या चित्रपटाच्या  निमित्ताने आपल्या वर्तुळाची, त्याच्या त्रिज्येची निदान जाणीव जरी आपल्याला झाली तरी खूप आहे. त्रिज्या वाढत जावो, फोफावत जावो.. बहरत जावो….

(लेखिका अभ्यासपूर्ण चित्रपट समीक्षणासाठी ओळखल्या जातात)

8408886126

 

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंकासाठी संपर्क https://www.amazon.in/gp/product/8193782364?pf_rd_p=649eac15-05ce-45c0-86ac-3e413b8ba3d4&pf_rd_r=Z0J6XQJ3JV6TJS149VM1

पुणे – अक्षरधारा बुक गॅलरी, बाजीराव रोड

प्रदीप पाटील -9860831776/9623191923

 

 

Previous articleसत्तेच्या साठमारीत जनहित ही अफवा !
Next articleमैत्री कुणासारखी असावी?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.