अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील शीत युद्ध अनेक शोध -तंत्रज्ञानाला – अचाट अशा कल्पनांना जन्म देऊन गेलं. यापैकीच एक चमत्कार म्हणजे टायफून वर्गाच्या अणू पाणबुड्या. . या वर्गातील पाणबुड्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या पाणबुड्या ठरल्या आहेत.
टायफून हे अमेरिकेने दिलेले नाव. रशियाने दिलेले नाव Akula – शार्क. पण जगात ही अणू पाणबुडी Typhoon नावानेच ओळखली जाते. अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र पाणबुडीत असावे यासाठी या typhoon अणू पाणबुडीची निर्मिती १९७० – ८० च्या दशकांत करण्यात आली.
क्षेपणास्त्र कोणते तर R – 39. याची क्षमता सुमारे ८ हजार किमी लांब मारा करण्याची. या क्षेपणास्त्राचे वजन तब्बल ८४ टन. एवढंच नाही तर या क्षेपणास्त्रात तब्बल १० छोटे अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता होती. प्रत्येक अणुबॉम्बची क्षमता होती 100 KT ( १०० किलो टन पेक्षा जास्त ). हिरोशिमा वर टाकलेल्या अणुबॉम्बची क्षमता होती सुमारे 15 KT. म्हणजे एका क्षेपणास्त्राची ताकद किती होती बघा. असे 20 क्षेपणास्त्र वाहून नेण्याची typhoon ची क्षमता होती. म्हणजे एका टायफून पाणबुडीमध्ये किती विध्वंसक क्षमता होती हे लक्षात येईल.
असो….तर असे हे बलाढ्य – विध्वंसक क्षेपणास्त्र पाण्याखालून गुपचूप डागता यावे यासाठी सोव्हिएत रशियाने टायफूनला जन्माला घाललं.
आता एवढं अवाढव्य, वजनदार क्षेपणास्त्र वाहून न्यायचं तर पाणबुडीही तेवढी मोठी हवी, सुरक्षित हवी. म्हणून ही पाणबुडी double hull pressure ची करण्यात आली. ( double hull pressure हे एक वेगळं प्रकरण आहे ). यामुळे अणू पाणबुडीचा आकार आणखी वाढला.
आता अणू पाणबुडीबद्दल….
ही पाणबुडी जेव्हा पाण्याच्या पृष्ठभागावर असते तेव्हा तिचे कमीतकमी वजन असते २३ हजार टन असते, जेव्हा पाणी पोटात घेऊन ही पाणबुडी पाण्याखाली जाते तेव्हा या पाणबुडीचे वजन भरते जास्तीत जास्त ४८ हजार टन.
( आयएनएस ‘अरिहंत’ या स्वदेशी अणू पाणबुडीचे वजन आहे ६ हजार टन. संपूर्ण शस्त्रसज्ज आयएनएस विराटचे वजन होते सुमारे २७ हजार टन. यावरून या वजनदार पाणबुडीची कल्पना आपल्याला येईल )
ह्या पाणबुडीची लांबी आहे तब्बल १७५ मीटर. एवढी पाणबुडी ताकदीने चालवण्यासाठी तेवढयाच ताकदीच्या तब्बल दोन अणुभट्ट्या या पाणबुडीत बसवण्यात आल्या होत्या. प्रत्येक अणुभट्टीची क्षमता होती १९० मेगावॅट. म्हणजे एका typhoon पाणबुडीतील दोन अणुभट्ट्या या नागपूर शहराची अर्धी वीजेची गरज सहज भागवू शकतात.
ही पाणबुडी गरज लागल्यास समुद्रात ६०० मीटर खोलवर जाऊ शकते.
Typhoon पाणबुडी चालवण्यासाठी सुमारे १५० पेक्षा नौसैनिक आणि अधिकारी यांची आवश्यकता लागते.
अन्नधान्याचा पुरेसा साठा करून एकदा या पाणबुडीने पाण्याखाली बुडी मारली की सलग तीन महिने पाण्याखाली संचार करण्याची या पाणबुडीची क्षमता आहे.
अशा अवाढव्य सहा अणू पाणबुड्या सोव्हिएत रशियाच्या अभियंत्यांनी १९७६ ते १९८९ या काळांत बांधल्या, त्याच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आणि नौदलाच्या सेवेत दाखलही केल्या.
तेव्हाचा शत्रुपक्ष अमेरिकाही या पाणबुडीच्या बांधणीने आश्चर्यचकित झाली होती.
१९९०-९१ ला सोव्हिएत रशियाचे विघटन झाले आणि आर्थिक संकटाला नव्या रशियाला जावे लागले. तेव्हा संरक्षण दलावरचा खर्च निम्म्यापेक्षा कितीतरी कमी करण्यात आला. आर्थिक ताकद नसल्याने आणि शीत युद्ध संपल्याने अवाढव्य टायफून पाणबुडीची उपयुक्तताच संपली, यापेक्षा या पाणबुड्यांना पोसणे रशियाच्या हाताबाहेर गेले होते. तेव्हा सर्वच्या सर्व सहा पाणबुड्यांना सेवेतून बाजूला काढण्यात आले आणि टप्प्याटप्प्याने एक वगळता सर्वांना भंगारात काढण्यात आले. आता उरलेली एकमेव पाणबुडी ही पाण्याखालून डागता येणाऱ्या नव्या क्षेपणास्त्राच्या चाचण्यां करता वापरली जाते.
Typhoon पाणबुडीवर आधारित यु ट्यूब वर असलेल्या documentary किंवा काही व्हिडियो जरूर बघा आणि तोंडात बोटं घाला.