-विजय चोरमारे
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे अनेकांना धक्का बसला. राजकीय आणि त्यातही राष्ट्रवादीच्या वर्तुळात वावरणाऱ्या लोकांना हे अपेक्षित होते आणि गेले दोन-तीन आठवडे त्यादृष्टीने वातावरणनिर्मिती करण्यात येत होती. परंतु या राजकीय वर्तुळापलीकडे जे लाखो लोक आहेत, ज्यांनी भाजपविरोधात शरद पवार यांच्या लढाईला पाठबळ दिले त्यांच्यासाठी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणे धक्कादायक होते. निवडणुकीआधीच्या प्रतिकूल परिस्थितीपासून ते मध्यंतरीच्या विचलित करणा-या घडामोडींपर्यंत शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून परिस्थिती हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या जयंत पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचीही व्यापक भावना आहे.
अर्थात शरद पवार यांना या परिस्थितीची, लोकभावनेची जाणीव नसेल असे तरी कसे म्हणायचे? तरीसुद्धा त्यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले. पक्षाच्या बहुसंख्य आमदारांची आणि कार्यकर्त्यांची तशी मागणी असल्याचे सांगण्यात येते. अजित पवार कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावतात. त्यांचा कामाचा झपाटा दांडगा आहे. त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. सरकारबरोबरच पक्ष चालवण्याचं काम अजित पवारच करू शकतात अशी अनेक कारणे सांगितली जातात. ती खरीही आहेत. परंतु अजित पवार यांच्याकडून जो प्रमाद घडला तो एवढ्या तत्काळ विसरण्याजोगा होता का आणि आमदारकीच्या राजीनाम्यापासून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी शरद पवार यांनी पोटात घातल्या का? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतो. मराठीतील ख्यातनाम कवी गणेश विसपुते यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे. ते म्हणतात, `शरद पवार यांनी विषवृक्ष न्यायाची पत्रास बाळगण्याचे कारण नव्हते.` ही महाराष्ट्राची प्रातिनिधिक भावना आहे. गेल्या दोन दिवसांत सोशल मीडियावर नजर टाकली तरी अजित पवार यांच्यासंदर्भात भावना कळून येतात. कारण राष्ट्रवादीच्या पेड सोशल कार्यकर्त्यांच्या पलीकडे एक मोठा पवारसमर्थक वर्ग सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि त्याला ही गोष्ट पसंत पडलेली नाही. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसशीही देणेघेणे नाही. आजच्या घडीला भाजपशी कोण टक्कर देऊ शकतो त्याला समर्थन देण्याची त्याची भूमिका आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपप्रेम कमी झाले नाही तर हा वर्ग काँग्रेस आणि शिवसेनेकडेही शिफ्ट होऊ शकतो. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने ही गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन परत राष्ट्रवादीच्या गोटात आले तेव्हापासून इतिहासाचा खोटा दाखला देऊन त्यांच्या कृत्याचं समर्थन केले जातेय. अमोल कोल्हे यांनी `स्वराज्यरक्षक संभाजी` मालिकेमध्ये संभाजी महाराज दिलेरखानाकडे गेल्याच्या घटनेला काल्पनिक रंग देऊन उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. संभाजी महाराजांना दिलेरखानाकडे छत्रपती शिवाजी महाराजांनीच पाठवले होते, अशा आशयाचे हे चित्रण आहे. दूरचित्रवाणी मालिकेची गरज म्हणून आणि मालिकेच्या नायकाच्या उदात्तीकरणासाठी त्यांनी ते स्वातंत्र्य घेतले असेल. वास्तवात संभाजी महाराजांची दिलेरखानाकडे जाण्याची ती चूकच होती, हे अनेक इतिहासकारांनी नोंदवले आहे. आणि ती चूक मान्य करूनही संभाजी महाराजांचे कर्तृत्व, शौर्य आणि त्याग अतुलनीय होता याबाबत कुणाच्या मनात शंका नाही. परंतु अजित पवार यांनी भाजपच्या गोटात जाण्याच्या कृतीच्या समर्थनासाठी अनेक अजित पवार समर्थकांनी काल्पनिक ऐतिहासिक गोष्टीचा आधार घेऊन प्रचार केला. त्यामुळे शरद पवार यांच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण होते, हे संबंधितांनी लक्षात घेतले नाही.
एवढे सगळे घडूनसुद्धा शरद पवार यांनी अजित पवार यांना मोठी संधी दिली आहे. अजित पवार यांनाच बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे आणि त्यांना उपमुख्यमंत्री केले नाही तर सरकारला स्थैर्य लाभले नसते, असाही एक युक्तिवाद करण्यात येत आहे. याचा दुसरा अर्थ असा निघतो की शरद पवार यांच्यापेक्षा पक्षात अजित पवारांना आमदारांचे समर्थन अधिक आहे. अर्थात मंडळी आपापल्या नंदनवनात जरूर वावरू शकतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, यावेळची विधानसभेची बहुतांश तिकीटे शरद पवार यांनी वाटली होती आणि बहुतेक लोक निवडूनसुद्धा शरद पवारांच्या जिवावरच आले आहेत. अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस सत्तेच्या बळावर जी काही जोड-तोड करतात त्यावरून त्यांना मुरब्बी राजकारणी वगैरे मानले जाते. उद्या अभिजित बिचुकले मुख्यंत्री किंवा उपमुख्यमंत्री झाले तरीसुद्धा ते तेवढीच कौशल्यपूर्वक जोडतोड करू शकतील, कारण ती सत्तेची किमया असते. सत्तेची किमया म्हणजे आपली ताकद अशा भ्रमात वावरले की त्याचा देवेंद्र फडणवीस होतो हे महाराष्ट्राने पाहिले आहे. याउलट हातात काहीच नसताना राजकारण कसे करायचे असते ते शरद पवार यांनी देशाला दाखवून दिले आहे. त्यांना भविष्यातील दिशा कळते, राजकारणाची गरज कळते. अजित पवार यांच्या मर्यादांबरोबरच त्यांच्या क्षमताही त्यांना माहीत आहेत. म्हणूनच त्यांनी मोठ्या प्रमादानंतरही त्यांना पुन्हा मोठी संधी दिली आहे. ती पक्षविस्तारासाठी आहे. पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी आहे. महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आहे. अर्थातच त्यांच्यासाठी ही अखेरची संधी असू शकते. भाजपसोबत सोयरीक करण्यासाठी उत्सुक असलेले प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासारखे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. अलीकडच्या काळात सुनील तटकरे यांनी दिशा बदलली असल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु अशा लोकांच्या प्रभावाखाली किंवा त्यांच्या कलाने किती राजकारण करायचे हे अजित पवार यांना ठरवावे लागेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, महाविकास आघाडीच्या सरकारचे भवितव्यही अजित पवार यांच्या हातात आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेऊन, त्यांना उपद्रव होणार नाही अशा रितीने त्यांना काम करावे लागेल. नीट समन्वय राहिला तर सरकार दीर्घकाळ चालू शकते. आणि हे सरकार चालायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस सरकारने अनेक क्षेत्रात जो गोंधळ घालून ठेवला आहे, तो दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी बराचसा वेळ लागणार आहे. शिक्षण-साहित्य-कला-संस्कृतीच्या क्षेत्रातला गोंधळ गंभीर स्वरुपाचा आहे. त्याचे आकलन करून घेण्याची क्षमता आजघडीला शरद पवार यांच्यानंतर जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या चार-दोन नेत्यांकडेच आहे.
काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत राजकारण कसे करावे हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु तरीसुद्धा एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली तेव्हा शरद पवार यांनी सरासरी ४०-४२ वर्षे वय असलेल्या नेत्यांना मंत्रिपदे दिली होती. शंकरराव कोल्हे, अभयसिंहराजे भोसले यांच्यासारख्या दिग्गजांना तेव्हा कट्ट्यावर बसवले होते. मधे वीस वर्षे गेली आहेत आणि राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळ सरासरी साठीचे बनले आहे. याच नेत्यांनी पंधरा वर्षे सत्ता उपभोगून पक्ष बुडवला. अजित पवार, छगन भुजबळ त्यात आघाडीवर होते. बुडालेला पक्ष वर काढण्यासाठी गेल्या पाच वर्षांत या मंडळींनी काही केले नाही. शेवटी शरद पवार यांच्या करिश्म्यावर मिळालेल्या सत्तेत तीच मंडळी पुन्हा मंत्रिपदांवर विराजमान झाली. भाकरी फिरवण्याची भाषा शरद पवार जाहीर सभांमधून नेहमी करत असतात. परंतु प्रत्यक्ष भाकरी फिरवण्याची वेळ येते तेव्हा कच खातात. यावेळीही तेच दिसून आले आहे. अर्थात तो त्यांचा पक्षांतर्गत मामला आहे. सत्तेत सरावलेल्या, मुरलेल्या त्यांच्या मंत्र्यांनी अधिक लोकाभिमुख आणि लोकहिताची कामे केली तर त्यांच्यासंदर्भातील मत बदलू शकते !
अजित पवार आता सरकारचे नेते आहेत. लहान मुलासारखे रुसवे-फुगवे त्यांना शोभणार नाहीत. याचा अर्थ आधी शोभत होते असा नव्हे. यापुढे अगदी काकांनासुद्धा रुसवे फुगवे सहन होणार नाहीत आणि कुठल्या आत्या, काकीसुद्धा त्यांची समजूत काढायला जाणार नाहीत. `पवार-पवार` खेळ टीव्हीवाल्यांना आवडत असला तरी महाराष्ट्राला तो आवडत नाही. आणि एखादी गोष्ट महाराष्ट्राला आवडली नाही, तर त्याचे काय होते, हे वेगळे सांगायला नको !
– (लेखक महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)
9594999456