मंगळवारी दुपारच्या रणरणत्या उन्हात वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पुण्याच्या गोलंदाजांसोबत जे काही केलं त्याला ‘कत्त्लेआम’ याशिवाय दुसरा शब्द नाही. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये चंगेजखान, तैमूरलंग, महम्मद गझनी अशा क्रूरकम्र्यांनी केलेल्या कत्तलीबाबत वाचलं होतं. मात्र कत्तल नेमकी कशी असते, हे मंगळवारी संपूर्ण देशातील क्रिकेटप्रेमींना पाहता आलं. तलवारीप्रमाणेच बॅटने केलेली कत्तलसुद्धा हादरवून टाकते, हे पुण्याच्या गोलंदाजांचे चेहरे पाहिले की लक्षात येत होतं.
ख्रिस गेलने जेव्हा पंधरावा षटकार मारला तेव्हा कॉमेन्ट्रेटरच्या तोंडातूनही निघालं This is Brutal (हे क्रूर आहे.) इतिहासातील कत्तली आणि गेलने बॅटने केलेल्या कत्तलीत फरक मात्र मोठा आहे. त्या कत्तलींचे स्मरण वेदना देऊन जाते. ख्रिस गेलची कत्तल मात्र टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा पुन्हा पहावीशी वाटते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत क्रिकेटचे चाहते वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर गेलच्या बॅटने जो धुमाकूळ घातला त्याचे हायलाईट्स पाहत होते. बुधवारी दिवसभर ‘यू ट्यूब’वर त्याच्या षटकारांना लाखो हिट्स मिळत होत्या. ख्रिस गेलची मंगळवारी खेळी होतीच तशी गजब. क्रीडा जगतातील सार्या दिग्गजांनी त्या खेळीचं वर्णन न भुतो…..असंच केलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कॉमेन्ट्स मजेशीर होती. तो म्हणतो..’गेलची बॅटिंग पाहिल्यानंतर गोलंदाज न होता विकेटकिपर होण्याचा मी जो निर्णय घेतला तो योग्यच होता, अशी माझी खात्री पटली आहे.’ धोनीची विनोदबुद्धी येथेच थांबत नाही. पुढे तो म्हणतो, ‘जेव्हा केव्हा गेल बंगलोरमध्ये खेळतो तेव्हा हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आपल्या नवीन ‘तेजस’ विमानाचे चाचणी उड्डाणं रद्द करतात. कारण त्यांना माहीत आहे, गेलचा बॅटचा स्पीड आपल्या विमानांपेक्षा अधिक आहे.’ ब्रायन लाराने आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, ‘जेव्हा गेल खेळत असतो तेव्हा क्षेत्ररक्षक प्रेक्षक होतात आणि प्रेक्षक क्षेत्ररक्षक. अशी अद्भुत बॅटिंग मी पाहिली नाही’. हरभजनसिंगचीही कॉमेन्ट्स छान आहे. ‘गेलने शतक केल्यानंतर पुण्याच्या संघाने बॉलिंग डिक्लेरेशन करून टाकायला पाहिजे होतं आणि दयेची याचना करायला हवी होती.’ युवराज सिंगने तर गेलची इनिंग संपल्यावर गमतीने त्याची बॅटच त्याला मागून घेतली. टी-२0 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम नावावर असलेल्या युवराज सिंगलाही गेलच्या बॅटींगचे एवढे अप्रूप वाटले. युवराजसह क्रिकेट जगतातील व्हिव रिचर्डस, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, शाहिद आफ्रिदी, अँन्डू सायमंड्स, सनथ जयसूर्या हे सारे आजी-माजी फटकेबाज चक्क ‘माणूस’ वाटावेत, असा गेलचा परवाचा पराक्रम होता.
आजच्या घडीला तो क्रिकेट विश्वातील सर्वांत Sensational खेळाडू आहे. ख्रिस्टोफर हेन्री गेल असं संपूर्ण नाव असलेला हा खेळाडू वेस्ट इंडिजच्या जमैका बेटाचा आहे. जमैकाने मायकेल होल्डिंग, कर्टनी वॉल्श, जेफ डुजा असे अनेक महान क्रिकेटपटू वेस्ट इंडिजला दिले आहेत. २१ सप्टेंबर १९७९ ला किंग्जस्टनमध्ये जन्मलेल्या गेलच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात किंग्सस्टनच्या ल्युकास क्रिकेट क्लबसोबत झाली. गेल या क्लबचे ऋण कृतज्ञपणे नमूद करतो. ‘हा क्लब नसता, तर मी रस्त्यावर बेकारासारखा हिंडत दिसलो असतो’, असे तो म्हणतो. १९ व्या वर्षी तो पहिला प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला. त्याचं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील पदार्पण भारताविरुद्ध ११ सप्टेंबर १९९९ ला झालं. पुढच्याच वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध त्याने पहिला कसोटी सामना खेळला. पहिली दोन वर्ष तो काही खास चमक दाखवू शकला नाही. मात्र २00२ मध्ये भारताविरुद्ध एकाच मालिकेत तीन शतकं झळकावून त्याने आपल्यातील ‘पाणी’ दाखवून दिलं. तेव्हापासून त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर आपल्या तडाखेबाज खेळीने तो जगभराचे मैदान गाजवायला लागला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत २0 शतकं झळकावली आहेत. सामना एक दिवसाचा असो, टी-२0 वा कसोटी क्रिकेट, गेल आपल्या पद्धतीनेच खेळतो. त्यामुळेच तो विक्रमासाठी खेळत नसला तरी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतक नोंदविणार्या मोजक्या चार खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. (डॉन ब्रॅडमन, ब्रॉयन लारा आणि आपला वीरेंद्र सेहवाग हे अन्य तिघे आहेत.) कसोटी क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर १५ शतकं आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. गेल कुठल्याही पद्धतीच्या क्रिकेटमध्ये सहज खेळत असला तरी टी-२0 च्या प्रकारामध्ये तो विशेष बहरतो. जणू हा प्रकारच त्याच्यासाठी जन्माला आला असावा, इतक्या सहज तो टी-२0 मध्ये खेळतो. बुधवारी त्याने या प्रकारातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. एका सामन्यात सर्वाधिक षटकारांचा नवा विक्रमही केला आणि सोबतच टी-२0 तील सर्वात जलद शतक झळकावले. टी-२0 मधील पहिलं आंतरराष्ट्रीय शतकही त्याच्याच नावावर आहे. २00७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ११७ धावा काढून या प्रकारच्या क्रिकेटमध्ये पहिलं शतक काढण्याचा मान मिळविला होता. त्या खेळीमुळे कसोटी, एकदिवसीय व टी-२0 अशा तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकविण्याचा विक्रमही त्याच्या नावावर चढला होता. टी-२0 मध्ये तो रॉयल चॅलेंजर बंगलोरसोबतच ‘सिडनी थंडर्स’, ‘बार्सियल बर्नर्स’, ‘ढाका ग्लॅडिएटर्स’, ‘स्टॅणफोर्ड सुपरस्टार्स’ अशा जगभरातील अनेक संघाकडून खेळतो. या संघाकडून खेळताना त्याने आतापर्यंत १0 शतकं झळकावली आहेत. आयपीलमध्ये तर त्याचाच बोलबाला असतो. २0११ मध्ये त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढून ऑरेंज कॅप मिळविली होती. २0१२ च्या आयपीएलमध्येही त्याचाच धमाका होता. गेल्यावर्षी त्याने सर्वाधिक ५९ षटकार मारले. यावर्षीही हे रेकॉर्ड त्याच्याच नावावर राहील, असे दिसत आहे.
असा हा जबरदस्त खेळाडू मैदानाबाहेरही आपल्याच मस्तीत असतो. त्यामुळे अनेक वाद त्याला चिपकलेले असतात. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासोबतही त्याचं बर्याचदा वाजतं. २00९ मध्ये बोर्ड आपल्यावर सतत दडपण आणत असेल, तर आपल्याला कर्णधारपदात कवडीचाही इंटरेस्ट नाही, असे त्याने बोर्डाला सुनावले होते. एप्रिल २0११ मध्ये त्याने वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक ओटिस गिब्जन आणि बोर्डाच्या अधिकार्यांवर टीकाटिपणी केल्याने त्याला जवळपास वर्षभर संघाच्या बाहेर करण्यात आले होते. मात्र या गड्याने त्याची अजिबात फिकीर केली नाही. हा जगभर वेगवेगळ्या संघाकडून टी-२0 खेळण्यात आणि जगभरातील गोलंदाजांना बदडण्यात व्यस्त होता. शेवटी २0१२ मध्ये वेस्ट इंडिज बोर्ड आणि त्याच्यात सलोखा होऊन तो संघात वापस आला. कुठल्याही वेस्ट इंडिज खेळाडूंप्रमाणे पाटर्य़ा, दारू आणि मुली ख्रिस गेलला आवडतात. श्रीलंकेत झालेल्या टी-२0 क्रिकेट विश्वचषकादरम्यान कोलंबोच्या सिनॅमन ग्रॅण्ड या पंचतारांकित हॉटेलमधील गेलच्या रूममध्ये तीन ब्रिटिश तरुणी सापडल्या होत्या. गेलसोबत आंद्रे रसेल, फिडेल एडवर्ड, डे्वन स्मिथ हे त्याचे संघातील सहकारी त्या तरुणींसोबत मजा मारत होते. श्रीलंकन पोलिसांनी त्या तरुणींना अटक केली होती. या खेळाडूंना मात्र समज देऊन मोकळं सोडलं होतं. अर्थात गेलवर त्याचा काही परिणाम झाला नाही. तो जिथे जाईल तिथे सुंदर तरुणींचा गराडा त्याच्याभोवती कायम असतो. मैदानात दणकेबाज खेळ करायचा आणि मैदानाबाहेर मौजमजा करायची, हे वेस्ट इंडिजच्या इतर खेळाडूंप्रमाणे त्याचंही कल्चर आहे. खेळ आणि जीवन दोन्हींचा मनसोक्त आनंद घेणं गेलला आवडतं. जे काही करायचं ते झोकून देऊन करायचं हा त्याचा पिंड आहे. त्याच्या या वृत्तीमुळेच तो असे भन्नाट पराक्रम करू शकतो.
(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६ |