अधुरी एक कहाणी…!

Medha Parrikar (Manohar Parrikar’s Wife)

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने अवघा देश हळहळला .  स्वादुपिंडाच्या कॅन्सरसोबत गेली काही वर्ष ते झगडत होते . त्यांची पत्नी मेधा यांचेही काही वर्षापूर्वी कॅन्सरनेच निधन झाले होते . त्या गेल्यानंतर दोन मुलांना आई वडिलांची माया देतानाच पर्रिकर यांनी राजकारणातही उंच भरारी घेतली . मात्र पत्नी मेधाची उणीव त्यांना कायम भासत राहिली . गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदा निवड झाल्यानंतर शपथविधीच्या कार्यक्रमात मनात काय भावना दाटून आल्या होत्या  याबाबत त्यांनी ‘ऋतुरंग’ जवळ दोन वर्षापूर्वी आपलं मन मोकळं केलं होतं .

-(पूर्वप्रसिद्धी: ऋतुरंग दिवाळी अंक २०१७)_

राजभवनाचा हॉल कार्यकर्त्यांनी पूर्ण भरून गेला होता. गोव्यात भाजप पहिल्यांदाच सत्तेत येत आहे हे बघून सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. माझ्या जवळचे मित्र, गोव्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले असंख्य कार्यकर्ते शपथविधी समारंभाच्या कार्यक्रमात दिसत होते.
या साऱ्यांनी एकत्र येण्यास निमित्त होतं ते मी मुख्यमंत्री बनण्याचं, शपथविधी सोहळ्याचं. ज्यांच्याबरोबर मी राजकारणात प्रवेश केला ते माझे सहकारी, माझे हितचिंतक, पक्षातील कार्यकर्ते यांच्याबरोबर मला त्या गर्दीत माझी दोन मुलं, बहीण-भावंडं दिसत होती. तरीही ते समोर दिसणारं चित्र अपुरं होतं.
माझी पत्नी आणि माझे आई-वडील यांच्यापैकी कोणीही त्यात नव्हते. त्यांची तीव्रतेनं आठवण येत होती. ज्याची
मी देखील कधी कल्पना केली नव्हती ते सत्यात उतरताना आनंद तर झालाच होता पण त्या आनंदाला
दुःखाची किनार होती.
नियतीचा खेळ किती अजब! एका वर्षात टप्प्याटप्प्यानं माझ्या जवळची ही माणसं माझ्यापासून कायमची दूर गेली. ज्यांच्या असण्यानं मला बळ मिळत होतं, प्रेरणा मिळत होती अशा या माझ्या ‘आप्त स्वकीयांची’ उणीव कोणीच भरून काढू शकत नव्हतं.
एकीकडे ‘भारतीय जनता पक्ष’ गोव्यात प्रथमच सत्तास्थानी येत असल्याचा आनंद, तर दुसरीकडे या आनंदात माझ्याबरोबर सहभागी होणारे माझे आई-वडील, माझी बायको माझ्यासोबतच नव्हे तर या जगात नसण्याचं अतीव दुःख होत होतं.
आजच्या दिवशी सर्वाधिक आनंद या तिघांना झाला असता. समोर जमलेल्या गर्दीत मला या तिघांची उणीव भासत होती. इतके दिवस माझ्या संघ जबाबदारीच्या काळात हे तिघे कायम माझ्याबरोबर होते. राजकारणात अचानक प्रवेश झाला. नव्याने आलेल्या जबाबदाऱ्या मी समर्थपाने पार पडू शकलो कारण यासर्वांची सोबत होती.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना आज ते इथे हवे होते असं वाटत होतं. आता कुठे खऱ्या अर्थाने माझा राजकीय प्रवास सुरु झाला होता. या महत्वाच्या काळात माझ्याजवळ जे माझ्यासोबत असायला हवेत तेच नव्हते.
खूपदा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला गृहीत धरत असतो. ती आता आपलीच आहे तर ती आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. कायम आपल्या सोबतच राहणार. पण तसं घडत नाही. इतक्या अचानक गोष्टी घडू लागतात की तुम्हाला काय करावं ते कळतंच नाही किंबहुना काही करण्यासारखं आपल्या हातात उरत नाही.
मेधाच्या बाबतीत हेच घडलं. अतिशय वेगवानपणे तिचा आजार बळावत गेला. कोणताही पुरेसा वेळ न देता तो आजार तिला आमच्यापासून कायमचं दूर घेऊन गेला. सगळं कसं सुरळीत सुरु होतं. असं काही घडू शकेल हे कधी चुकूनही मनात आलं नाही.
*
मला ते दिवस आजही आठवतायत… आमच्या लग्नाला १५ वर्ष होऊन गेली होती. एकीकडे फॅक्टरीचं वाढणारं काम तर दुसरीकडे राजकारणात नव्याने आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे अतिशय व्यस्त दिनक्रम झाला होता. सत्तेत येण्याचा मार्ग जवळ दिसत होता त्यामुळे मी त्या धामधुमीत होतो.
यातच मेधाला काही दिवसांपासूनअधून मधून ताप येत होता. बरेच दिवस ती हे दुखणं अंगावर काढत होती. यासगळ्या गडबडीत तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणं मला जमत नव्हतं. घरातल्या कोणालातरी बरोबर घेऊन डॉक्टरांकडे जाऊन ये असं आमचं बोलणं झालं आणि तशी ती डॉक्टरांकडे जाऊन आली होती. तिचे रिपोर्ट येणं बाकी होतं.
अतिशय महत्वाच्या मिटिंगसाठी आम्ही सगळे पक्ष कार्यालयात जमलो होतो. मिटिंग सुरु असतानाच डॉक्टर शेखर साळकर याचा मला सतत फोन येत होता. मी गडबडीत फोन घेतला. मेधाचे रिपोर्ट चांगले आले नव्हते. पुढच्या चेकअपसाठी मेधाला तातडीने मुंबईला न्यायला हवं असं तो सांगत होता.
त्याक्षणी काही सुचेनासं झालं. दुसऱ्याच दिवशी तातडीनं तिला आम्ही मुंबईला नेलं. अभिजात लहान होता. त्याला समजत नव्हतं आईला का घेऊन चाललेत ते. मुंबईत गेल्यावर *तिला ब्लड कॅन्सर आहे हे स्पष्ट झालं.*
पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय असतं ते मला त्याक्षणी समजलं. मेधाच्या बाबतीत ती कायम आपल्या बरोबरच असणार, तिला काही होणार नाही असं गृहीत धरून टाकलं होतं आणि अचानक आता ती पुढचे काही महिने, काही दिवसच सोबत असेल अशी स्थिती निर्माण झाली. तिला तिथेच लगेच उपचार सुरु केले. पण जेमतेम महिन्याभरात तिचं निधन झालं.
आहे आहे म्हणता अचानक ती नाहीशी झाली. ती होती म्हणून मला मुलांची कधीच काळजी वाटली नाही पण एकाएकी मला मुलांच्या काळजीने घेरलं. उत्पल तरी थोडा कळण्याच्या वयाचा होता पण अभिजात त्याला कसं सांगायचं हे समजत नव्हतं. त्याला मेधाची खूप सवय होती. मेधाच्या जाण्याचा सर्वात जास्त धक्का त्याला बसला. आईला उपचारासाठी विमानातून जाताना त्याने बघितलं होतं आणि परत आला ते तिचं शव!
याचा परिणाम अभिजातवर असा झाला की तो मला त्यावेळी विमान प्रवास करू देत नसे. विमानाने गेलेला माणूस जिवंत परत येत नाही असं काहीसं त्याला वाटू लागलं. त्याला सांभाळणं खूप अवघड गेलं. त्याकाळात तिची मला सर्वाधिक गरज होती त्या काळात अचानकपणे तिचं जाणं झालं. वरवर कणखर वाटणारा मी आतून पुरता मोडून गेलो. पण त्याच काळात आलेल्या राजकीय जबाबदाऱ्यांमुळे मी खूपच व्यस्त झालो आणि काही प्रमाणात स्वतःला व्यस्त ठेवू लागलो.
*
मेधाचा आणि माझा प्रेमविवाह झाला होता. मेधा माझ्या बहिणीची नणंद होती. त्यामुळे बहिणीचं लग्न झाल्यापासून मी तिला ओळखत होतो. आय.आय.टीच्या शिक्षणासाठी मी मुंबईला गेलो. शिक्षणासाठी पुढची काही वर्षे मुंबईमध्येच मुक्काम होता.
बहीण मुंबईमध्येच होती. आय.आय.टी मध्ये आठवडा कसा जायचा ते कळायचं नाही पण रविवारी मात्र घरच्या जेवणाची आठवण यायची. मग बरेचदा बहिणीकडे जाणं व्हायचं. मी येणार म्हणून ती देखील माझ्या आवडीचा स्वयंपाक करायची. कधी जेवायच्या निमित्ताने तर कधी आठवडाभराचे कपडे धुण्याच्या निमित्ताने बहिणीकडे होणाऱ्या फेऱ्या वाढल्या.
याच काळात साधीसुधी, लांबसडक केसांची वेणी घालणारी, अत्यंत बोलक्या डोळ्यांची मेधा माझ्या लक्षात राहू लागली. ती भरपूर वाचन करायची त्यामुळे सुरुवातीला वाचनाच्या संदर्भात आमचं बोलणं व्हायचं. हळूहळू आमच्यात छान मैत्री झाली. एव्हाना कदाचित आजूबाजूच्या सर्वाना _‘आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलोय’_ याचा सुगावा लागला. माझ्या जवळच्या मित्रांना तर मोठा आश्चर्याचा धक्काच बसला. _”मनोहर तूही कुणाच्या प्रेमात पडू शकतोस!! खरंच वाटत नाहीये.”_ असंही एकाने बोलून दाखवलं. नात्यातलीच असल्यामुळे घरी विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता.
मुंबईत आय.आय.टीमधून शिक्षण पूर्ण केल्यावर मी थोडे दिवस मुंबईमध्येच नोकरी करत होतो. ती नोकरी सोडत असतानाच मी मेधाबरोबर लग्न करायचा निर्णय घेतला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं ते याचं, की साधारणपणे नोकरी मिळाली, की थोडं स्थिर झालं  की लग्नाचा विचार केला जातो आणि मी नोकरी सोडल्यावर लग्न करायला निघालो होतो.
आईचा पाठिंबा होता. _‘तू निर्णय घेतला आहेस म्हणजे नक्कीच काही न काही विचार केला असशील’_ असं म्हणून ती माझ्या पाठीशी उभी राहिली. आमचं लग्न मुंबईमध्येच साधेपणानं झालं. गोव्यात जाऊन मी स्वतःची फॅक्टरी सुरु करायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी मुंबईमधली नोकरी सोडली होती. या निर्णयाला मेधाचाही पाठिंबा होता. तिच्यामुळे मी हे पाऊल उचलू शकलो.
मुंबईतल्या वेगवान वातावरणाची सवय असलेली मेधा शांत, थोडंसं संथ वातावरण असलेल्या आमच्या म्हापशाच्या घरात छान रमली. हळूहळू म्हापशातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ लागली. उत्पल आणि अभिजातची शाळा सुरु होती. आमच्या एकत्र कुटुंबात तिचा वेळ कसा जायचा ते कळायचं नाही. इतर दाम्पत्यांसारखं आमचं सहजीवन कधीच नव्हतं. सिनेमाला किंवा कुठे फिरायला मुद्दाम वेळ काढून जाणं कधी झालं नाही.
आय.आय.टी मधील शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर म्हापशाजवळ मी स्वतःची फॅक्टरी सुरु केली होती. त्याचाही जम बसत होता. सकाळचे आणि संध्याकाळचे काही तास फॅक्टरीला द्यावे लागायचे.
संघाची संघचालक म्हणून जबाबदारीही माझ्याकडे होती. या सगळ्यातून वजा जात स्वतःसाठी विशेष असा वेळ उरत नसे. मुलांचा अभ्यास, त्यांच्या शाळेतील संपर्क, त्यांचं आजारपण सारं काही मेधाच करायची.
संजय वालावलकर, श्रीपाद नाईक, सतीश धोंड, संजीव देसाई या मित्रांबरोबर सहकुटुंब-सहपरिवार अशा काही सहली त्याकाळात आम्ही केल्या होत्या. आयुष्य थोडं स्थिरस्थावर झाल्यासारखं झालं होतं.
गोव्यात आल्यानंतर थोड्याच दिवसात माझ्याकडे ‘संघचालक’ म्हणून जबाबदारी देण्यात आली. घरातले सर्वजण ‘संघ’ कामात सक्रिय होतेच. पण मी राजकारणात जाईन असं मात्र कोणालाही वाटलं नव्हतं.
१९९४… निवडणुकांसाठी भाजपकडून उमेदवार उभे करण्यासाठी शोध मोहीम सुरु होती. त्यात माझ्याकडे उमेदवार शोधण्याचं काम देण्यात आलं होतं. अनेकांच्या भेटीगाठी घेऊन काहीजणांची नावं मी काढली. पण ज्यांची नावं मी काढली होती त्यांनी सगळ्यांनी मिळून माझंच नाव उमेदवार म्हणून पुढे केलं.
माझ्यासाठी हे अजिबातच अपेक्षित नव्हतं. राजकारणात सक्रिय व्हावं याचा गांभीर्यानं विचार केला नव्हता. १९९४ साली मी पहिल्यांदा निवडणूक लढवली. माझ्यासाठी पणजी मतदारसंघ निवडण्यात आला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाबरोबर भाजपची युती होती. मगोपने पणजी मतदारसंघात कधी खातं उघडलं नसल्यामुळे पणजी हा ‘हारणारा’ मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध होता. अशा मतदारसंघात मला उमेदवारी देण्यात आली होती.
आई-वडील आणि मेधा घरातले सगळेजण माझ्या प्रचारासाठी झटले. हे सगळे माझ्याबरोबर असणं हीच माझी मोठी बाजू होती. राज्याच्या राजधानी शहराचा मी लोकप्रतिनिधी झालो. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मेधा, आई-वडील यांनी माझ्यासाठी प्रचार केला अशी ही पहिलीच आणि शेवटची निवडणूक होती. एकीकडे माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. तर दुसरीकडे माझं वैयक्तिक आयुष्य वेगळ्याच टप्प्यावर उभं होतं.
मी राजकारणात काहीसा ओढला गेलो होतो. सगळं खूप झटपट घडत गेलं की मला विचार करायलाही वेळ मिळाला नाही. राजकारणातील माझ्या प्रवेशाबद्दल मी मेधाशी बोलत होतो. ती देखील या निर्णयामुळे थोडी अस्वस्थ झाली होती. फॅक्टरी सुरु करायची, व्यायवसायिक दृष्ट्या यशस्वी व्हायचं याची मी काही स्वप्न बघितली होती आणि त्या स्वप्नात मेधादेखील तितकीच सहभागी होती.
फॅक्टरी सुरु झाली होती पण आता राजकारणात सक्रिय झाल्यावर त्याला मी न्याय कसा देणार याबाबत तिला काळजी लागून राहिली. मलाही पूर्णवेळ राजकारण करायचं नव्हतं. शेवटी विचारांती _’मी फक्त दोन टर्मच म्हणजे पुढची दहा वर्षचं राजकारणात राहीन’_ असं मेधाला वचन दिलं. _’त्यानंतर मी राजकारण सोडून आपल्या फॅक्टरीवर लक्ष केंद्रित करेन’_ असंही तिला सांगितलं.
समस्या काही सांगून येत नाहीत हेच खरं. राजकीय जीवनात प्रवेश केला आणि त्यानंतर काही दिवसातच अचानक वडिलांचं हृदयविकारानं निधन झालं. आमच्या घराचा पहिला कान निखळला. घरातला एक समंजस आधार तुटला. त्यापाठोपाठ आईही गेली.
पाठोपाठ दोघांच्याही झालेल्या निधनाने हादरून गेलो. या दुःखातून बाहेर पडतो न पडतो तोच मेधाचा आजार समजला होता. एकामागे एक संकटांची मालिका सुरु होती. राजकीय जीवनात यशाची एकेक पायरी चढत होतो आणि माझ्याबरोबर असणारे *‘माझे’* सगळे माझ्यापासून दूर जात होते.
आज मेधा असती तर कदाचित मी तिला वचन दिलं त्याप्रमाणे राजकारण सोडून दिलं असतं. कदाचित आज माझं आयुष्य काही निराळंच असतं. ती नसल्यामुळे मी राजकारणात स्वतःला झोकून दिलं.
अनेकजण मला तुम्ही दिवसातले २४ तास कार्यरत असता त्यामागचं कारण विचारतात. जिच्यासाठी मी राजकारण सोडून देणार होतो तीच राहिली नाही. पण यामध्ये मी फॅक्टरीकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही. एक वेळापत्रक आखून दिवसातील काही तास मी फॅक्टरीसाठी देऊ लागलो.
आजही मी कितीही व्यस्त असलो तरी फॅक्टरीचं काम मी स्वतःच बघत असतो. मी राजकारणात नसतो तर फॅक्टरीसाठी मला अनेक गोष्टी  करता आल्या असत्या. मेधा आज माझ्याबरोबर असती तर नक्कीच मी ते सगळं करू शकलो असतो.
मेधाची मला किंमत नव्हती असं अजिबात नव्हतं पण माणूस परतून कधी येणार नाही इतकं दूर निघून गेल्यावर त्याची खरी किंमत कळते. खूपच उणंपुरं सहजीवन आम्हाला लाभलं. मला, मुलांना तिची गरज होती.
अगदीच अलीकडे संरक्षणमंत्री झाल्यानंतर माझ्या
षष्ट्यब्दिपूर्ती वाढदिवसानिमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी पणजीमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात केंद्रीय स्तरावरील अनेक कार्यकर्तेही आले होते. त्यातील एकांना माहित नव्हतं कि मेधा या जगात नाहीये. ते आपल्या शुभेच्छापर भाषणात म्हणाले,
_”पर्रीकरजी आपनेभी कभी ये गाना गुनगुनाया होगा – हम जब होंगे साठ साल के और तुम होगी पचपन कि……..”_
हे शब्द ऐकताच मन थोडंसं दुखावलं गेलं. त्या बिचाऱ्याला मेधा या जगात नाही हे माहीतच नव्हतं. पुढचे क्षण मेधाचा चेहरा डोळ्यासमोर येत गेला. मी तर झालो साठ वर्षांचा पण जी पचपनची व्हायला हवी होती ती मात्र त्याच्या आधीच संपून गेली. या विचारानेच मी व्याकुळ झालो.
बोलायला उठल्यावर मी याचा उल्लेख केला पण मला पुढचे काही क्षण बोलताच येईना. आयुष्यातील या टप्प्यावरही जी माझ्यासोबत तेवढ्याच ताकदीने उभी राहिली असती. एक छान आयुष्य जिने जगायला हवं होतं तीच नव्हती. माझ्याजवळ आज सगळं आहे पण जिची सोबत हवी होती तीच नाहीये!
~ मनोहर पर्रीकर,
   _मुख्यमंत्री, गोवा_
_’राजकारणापलिकडचे पर्रीकर’_
_(पूर्वप्रसिद्धी: ऋतुरंग दिवाळी अंक २०१७)_
Previous articleव्यक्तिनिष्ठ राजकारणाची शोकांतिका!
Next articleकाँग्रेसला चंद्रपूर जिकांयचेच नाही!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.