– मधुकर भावे
आता भाजपाच्या बाकावर बसलेले आमदार आशिष शेलार यांनी सभागृहातच प्रश्न विचारला आहे की, ‘अध्यक्ष महाराज, हे काय चालले आहे…?’ याच प्रश्नाच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या सरकारला असा प्रश्न विचारता येईल की,…‘ महाराष्ट्राचे आजचे सरकार नेमके काय करीत आहे…. आणि या सरकारचे काय चालले आहे? सरकार चालवत असताना पक्षपात समजू शकतो… पण, विधान सभागृहाच्या सदस्यांमध्ये निधी वाटप करताना ४० कोटी रुपयांचा विशेष निधी मतदारसंघवार फक्त सत्ताधारी बाकावरील आमदारांना देणे आणि विरोधी पक्षाच्या बाकावरील आमदारांना हा निधी न देणे, असा पक्षपात खुद्द नागपूर अधिवेशनात चालला आहे. पुरवणी मागण्यांत चाललेला आहे… त्यामुळे अध्यक्ष महाराजांना महाराष्ट्रातील लोकं प्रश्न विचारू शकतील… की, ‘हे काय चालले आहे’. आणि त्याचे उत्तर सरकारजवळ आहे का? विधानसभागृहात विशेष अधिकार सर्वच आमदारांना आहेत आणि ते समान आहेत. सभागृहात आमदारांच्या बाबतीत पक्षीय भेदाभेद करता येत नाही. कोणत्याही निधीचे वाटप ‘अ’आमदाराला ला करणार आणि ‘ब’आमदाराला करणार नाही, अशी भूमिका राज्याच्या अर्थमंत्र्याला घेता येणार नाही. पण, सध्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सर्रासपणे ७ डिसेंबर रोजी ५५ हजार ५२० कोटी रुपयांच्या ज्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत त्यामध्ये फक्त सरकारी बाकावरील आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघाकरिता विशेष तरतूद म्हणून प्रत्येकी ४० कोटी रुपये वाटप झालेले आहे. विधानसभेत २८८ आमदार आहेत… त्यामध्ये सरकारी बाकावर जवळपास २१३ आमदार आहेत. जे अजितदादा फुटले त्यांच्यासोबत नेमके किती आमदार, याचा आकडा स्पष्ट झालेला नाही. पण, तो आकडा महत्त्वाचा नाही. जे सरकारच्या बाजूने हात वर करतील त्यांच्या मतदारसंघासाठी विशेष पॅकेज म्हणून ४० कोटी मिळणार आणि जे विरोधी बाकावर आहेत त्यांना यातील एक छदामही मिळणार नाही. पूर्वी असे कधीही नव्हते. समान निधी वाटप होते. अलिकडे दोन-चार वर्षांत हा पक्षपात महाराष्ट्रात उघडपणे सुरू आहे.आणि याबद्दल सत्ताधारी बाकावरून प्रश्न विचारणारे ‘अध्यक्ष महाराज, हे काय चालले आहे….’? हा प्रश्न विचारणे शक्य नाही… पण, विरोधी बाकावरील गटनेत्यांना, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या विरोधी बाकावरील गटनेत्यांनी सभागृह दणाणून टाकायला हवे होते… की हे काय चालले आहे…?