असमंजस आणि पिसाटलेली माध्यमे…  

-प्रवीण बर्दापूरकर

 शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या चिंताजनक घटना अशात राज्यात सातत्याने घडत आहेत ; त्या कोण घडवून आणत आहे , त्यामागचे हेतू काय  आहेत हे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट होईल आणि राजकीयदृष्ट्या सोयीचं  असेल तरच जाहीर होईल पण , तरी ते सर्वविदित आहे .

एकेकाळी राज्यात पुतळा विटंबनाच्या घटना वाढल्या होत्या आणि त्यातील अनेक घटनांनी हिंसक स्वरुप प्राप्त केलेलं होतं . त्यावेळची एक आठवण आहे- ‘लोकसत्ता’चा नागपूरचा ज्येष्ठ वार्ताहर ( Senior correspondent ) म्हणून मी काम करत होतो . गडचिरोलीला अशीच पुतळ्याच्या विटंबनेची घटना घडली आणि बऱ्यापैकी गाजली . मी कांही बातमी दिली नाही . आमचे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांचा फोन आला आणि ती बातमी का दिली नाही , अशी विचारणा त्यांनी जरा रागातच केली .

गडकरीसाहेब रागावले म्हणजे कांही खरं नसे . मी क्षणभर गांगरलो पण , त्यांना सांगितलं , बातमी न दिल्याबद्दल सॉरी पण , लोकसत्ता महाराष्ट्रात सर्वदूर गांव-खेड्यातही वाचला जातो . ( तेव्हा लोकसत्ता हे मराठीतील सर्वाधिक खपाचं दैनिक होतं ! ) ही बातमी तिचे वाचून पडसाद जर राज्यात सर्वत्र उमटले तर चांगलं होणार नाही म्हणून दिली नाही मी बातमी . तुमचा  आदेश असेल तर बातमी पाठवतो .

एक पॉज घेतल्यावर माधव गडकरी म्हणाले , तुझं म्हणणं एकदम योग्य आहे पण , असे महत्वाचे निर्णय घेताना संपादकाला सांगशील की नाही ? आणि मग त्यांनी त्यांच्या आवडत्या ( गाढवा ) शब्दात माझी संभावना केली .  तेव्हाची पत्रकारिता कशी समंजस होती हे सांगण्यासाठी ही आठवण मुद्दाम येथे दिली .

कायदेशीर पातळीवर अजून नामांतर न झालेलं औरंगाबाद , अकोला , धुळे , संगमनेर , कोल्हापूर अशा एकापाठोपाठ एक घडणाऱ्या घटनांनी महाराष्ट्रात अवस्थता निर्माण केली जात असतांना माध्यमे समंजस भूमिका निभावत आहेत का पिसाटल्यासारखी वागत आहेत असा प्रश्न साहजिकच  पडतो . प्रकाश वृत्त वाहिन्या तर तारतम्य पूर्णपणे विसरल्यासारखी ‘लाईव्ह’ दृश्य दाखवत सुटतात…त्याचा काय परिणाम होऊ शकतो यांचा अंदाज प्रकाश वृत्त वाहिन्या आणि भडक बातम्या प्रकाशित करणाऱ्या एकाही मुद्रीत माध्यमांना का नाही ? औरंगजेबाची छायाचित्रे फडकावणारे  आणि नथुरामचे समर्थक एकाचा वर्गात मोडतात हे माध्यमांना समजत नाही का , टीआरपीसाठी वाट्टेल ते सुरु आहे ?

बरं भाषाही किती चूक वापरावी याचं कांही तारतम्य आहे किंवा नाही ? एका प्रकाश वृत्त वाहिनीच्या बातमीचे ठळक शीर्षक होतं – “सामाजिक शांतता कोण नासवतंय ?”

फळं पिकवतात , शेतात पीक घेतलं जातं आणि कारखान्यात वस्तू निर्माण केली जाते , शांतता बिघडवतात नासवत नाहीत , इतकंही मूलभूत प्राथमिक भाषा ज्ञान यांना नसावं ? शांतता म्हणजे काय , पनीर तयार करण्यासाठी नासवण्या/फाटवण्यासाठी भांड्यात गॅसवर तापवायला ठेवलेलं लिंबाचा रस किंवा सायत्रीक अॅसिड घातलेलं दूध आहे ?

पत्रकारितेचा संकोच म्हणा की हुकुमशाही , पण लोकांची माथी आणखी न भडकण्यासाठी असं वाटतं , समाजातील शांतता बिघडवणाऱ्या प्रसंगांचं ‘लाईव्ह’ प्रक्षेपण करायला माध्यमांवर बंदी घातली पाहिजे .

बाय द वे , ‘लोकसत्ता’चा आधी निवासी संपादक आणि नंतर संपादक झाल्यावर , पुतळा विटंबनासारख्या संवेदनशील घटनांचे वृत्त शक्यतो टाळण्याच्या आणि द्यावेच लागणार असेल तर अतिशय थोडक्यात , आतल्या पानावर प्रकाशित करण्याचा कटाक्ष मी बाळगला .

माधव गडकरी यांच्या कांही भूमिकांबद्दल मतभेद असणारच पण , ते आणि त्यांच्या पिढीच्या बहुसंख्य पत्रकार व संपादकांकडे असणारा समंजसपणा  एकाही विद्यमान संपादक पत्रकाराकडे नसावा याचं वैषम्य वाटतं…

( वर नमूद  केलेली घटनामाझ्यासाठी कायमच ज्येष्ठ असलेले ‘लोकसत्ता’चे तेव्हाचे वृत्तसंपादक रमेश झंवरसाहेब आणि दोस्त धनंजय गोडबोले यांना स्मरत असण्याची शक्यता आहे . )

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleख्रिस्ती समाजातील जाती आणि जमातीच्या कथा  
Next articleखरेखुरे मटणजीवी…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.