असशील तर काहीच म्हणू नकोस!

मीडिया वॉच दिवाळी अंक -२०१८

– सोनाली नवांगुळ

“पाचशेच्या वर पानं आहेत… ती सांगेल ती सूचना ऐकून मी पुन्हा कामाला लागते. कधी नाही म्हणत नाही. सगळं बाजूला ठेवून ताबडतोब ती सांगेल ते व तसंच करते. माझा आवाज तिच्याबाबतीत आज्ञाधारकचए, मग ती कधीच का नाही मला बरं वाटेल असं काही म्हणत? मी लहान आहे तिच्याहून, तिला कळत नसेल का की तिचा अ‍ॅट लिस्ट ताई म्हणून तरी एखादा कौतुकाचा शब्द मला चिक्कार ताकद देईल. बरं वाटवेल स्वत:बद्दल? असं का वागते ही? मी किती मानते तिला हे कळत नाहीये का तिला? एक गोड शब्द इत्त्त्तका महागंय?  मला खूप राग येतोय तिचा.”, मी अगदी निराश होऊन आसुसून बोलायचे पाटकरकाकांशी, उदयकाकांशी. दोघंही वडिलांसारखे. खरं ताईही आईसारखीच. पण राग आल्यावर करणार काय? ते दोघंही म्हणायचे, तुला ठाऊक नाही का कविता कशीय? तिला प्रचंड कौतुक आहे तुझ्या कष्टाचं, चिकाटीचं. आमच्याकडं ती ते करतेही. तू बिघडू नयेस म्हणून तुला सांगत नसेल. सांगेल, सांगेल. वाट बघ थोडी. कवितानं कौतुक करणं खायचं काम नाही!

माझी तगमग होत राहायची ‘मध्यरात्रीनंतरचे तास’च्या काळात आणि एक दिवस फेसबुकवर तिची पोस्ट दिली यासंदर्भात. संपादक या नात्यानं. त्यात तिनं मोकळेपणानं कौतुक केलं तेव्हा कळलं की ‘भारतीय लेखिका’ अनुवाद प्रकल्पामधलं सगळ्यात मोठं व अवघड काम ‘हे’ होतं नि आधीच्या तीन अनुवादकांनी ती कादंबरी परत पाठवली होती! बाकी कौतुक ठीकंच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जगदंबेनं मला मनातून घट्ट मिठी मारलीय, त्यावेळी माझे श्‍वास जाणवले असंही तिनं लिहिलं होतं. मी लगेच पाटकरकाकांना नि उदयकाकांना फोन केला व वेड लागल्यासारखं ओरडत त्यांना कविताताईची पोस्ट सांगितली. ते चेष्टेखोर आवाजात म्हणाले होते, आम्ही कितीही कंठशोष करत सांगितलं तरी तुला पटलं नाही, पण आज कवितानं कौतुक काय केलं सगळा राग गायब! तुमचं नातंच गंमतीचं आहे…

खरंतर जिच्या कौतुकासाठी माझी तडफड व्हायची तीच मी लिहित नव्हते तेव्हा आपणहून आली होती हुरूप घेऊन.

मी अनुवाद करू शकेन असंही तिनं मला सरळ सांगितलं नव्हतं. तिरके, वाकडे प्रश्‍न कडक सूर लावून विचारले होते. पहिल्या पुस्तकाआधीची ही गोष्ट. मी तिला फोनवर बोलता बोलता म्हटलं, “ताई, ऑस्कर पिस्टोरिअस ऑलिम्पिकला जाण्याची तयारी करतोय. कसलं भारीय हे. दोन्ही पाय नसताना पॅरालिम्पिकमध्ये विक्रम केलेतच यानं, पण बघकी आता त्याला नॉर्मल माणसांबरोबर धावायचंय. त्यानुसार वेळेची पात्रता साधायचीय. मी त्याचं आत्मकथन वाचलंय. असं वाटतंय की अपंगत्त्वाबाबतीत त्याचे नि माझे विचार जुळताहेत. मी एकदम इंप्रेस झालेय. कुणीतरी करायला पाहिजे त्याचं पुस्तक मराठीत.” – मी असं म्हटल्यावर म्हणाली, “कुणीतरी म्हणजे? तू का नाही करतेस?” – “पण अगं, मी अनुवाद कसा करणार? मी तर शाळेत गेलेच नाही, तर मग कच्चंच असणार माझं इंग्रजी. आणि परत ते परवानगी वगैरे, प्रकाशक वगैरे ते काय माहिती नाही गं.” हे बोलताना मी स्वत: जे जगतेय, बोलतेय त्याच्या बरोबर उलट वागतेय हे माझ्या लक्षातच आलं नाही. पण जागेवर आणून ठेवणार नाही ती कविता महाजन कसली! तिची मुलूखमैदानी तोफ सुरू झाली तिच्या विशिष्ट कडक आवाजात. भावनेचा ओलावा येऊन आपली कानउघाडणीची धार कमी होऊ नये यावर तिची कडक पकड होती, “सोनाली, किती दिवस स्वत:बद्दलचे चुकीचे समज बळकट करत राहायचं? आणि मार्ग कसे काढायचे हे मी तुला शिकवायला पाहिजे? तुला?? कुणी करणार म्हणे अनुवाद? प्रश्‍न सोडवायला सुरूवात केली की सुटतो हे मी नव्यानं सांगण्याची वेळ आणू नको. त्या पुस्तकावरचा प्रकाशकाचा नि लेखकाचा मेल अ‍ॅड्रेस बघ, त्यांना लिही. तोवर स्वत:साठी म्हणून अनुवाद करायला सुरूवात कर. तीन प्रकरणं करून माझ्याकडं पाठव. बघते तरी तू किती वाईट काम करतेस?” माझे डोळे डबडबले होते आणि बोलण्याचा कोटा संपल्यावर खदाखदा हसत विचारते कशी की घाबरलीस की काय? तुम्ही मुली न्यूनगंडात लोळत पडलात की मला त्रास होतो खूप. कामाची शक्ती तुम्ही अशा मूर्खपणात संपवता. माझी दिशा जशी तशीच तू माझ्यासाठी. मी बोलणार तेव्हा ऐकायचं. कळ्ळं?

हो… हो… कळतंच गेलंय मला. तुझंमाझं कसं जमलं हे मी कितीवेळा कितीठिकाणी सांगितलंय. तरी…

मी त्यावेळी ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड’ सारख्या अपंग पुनर्वसनाविषयी काम करणार्‍या संस्थेत सोशल वर्कर म्हणून काम करत होते. बरंच शिकले, आत्मविश्‍वास आला नि जुनी झाले तिथं. संपूर्ण व्हीलचेअरबाऊण्ड असले तरी कामं बरीच होती. ती अकलेची होती. पण शरीर दमतंच होतं. ते अधिक दमत होतं ते मन सतत अपमानित झाल्यामुळं, श्रेय न मिळाल्यामुळं, अधिकार्‍यांच्या कानगोष्टींमुळं, भावनिक व बौद्धिक पोच असणारी मोजकी माणसं संस्थेत असली तरी त्यांनी वेळोवेळी साथ न दिल्यामुळं! पण उपायही नव्हती. आता पाच वर्ष कोल्हापुरात काढल्यावर मी शिराळ्याच्या मानानं स्वतंत्र झाले असले तरी इथून कुठं जाणार? करणार काय? आणखी बरेच पेच होते. कोल्हापुरातले ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी त्यावेळी ओळखीचे झाले होते. त्यांना का कोण जाणे असं वाटलं की हिला काहीतरी खाद्य पुरवलं पाहिजे. त्यांनी मला पुस्तकं द्यायला सुरुवात केली. त्यात ‘ब्र’ होतं. मी असलं काही यापूर्वी वाचलंच नव्हतं. एरवीही वाचनबिचन करण्याच्या मर्यादा वेगळ्या होत्या. ‘ब्र’ वाचल्यावर मी हादरून गेले. त्यातले काही प्रसंग जणू काही माझ्याच संस्थात्मक आयुष्यातले लिहिलेत असं वाटलं. मला संस्थात्मक चौकटीत काय दुखतंय याचा पत्ता लागला. दु:खाला नेमकी कारणमीमांसा मिळाली. त्यामुळं मी स्वत:कडे दुर्लक्ष करायच्या स्थितीत राहिले नाही. उदयकाकांकडे हे बोलले तर ती एका कार्यक्रमानिमित्तानं कोल्हापुरात आली असताना ते तिला घेऊन आले मी राहात होते त्या हॉस्टेलमध्ये. मी घाबरले होते की बापरे, मोठ्ठी लेखिका येणार. मी आधी कुठल्या लेखकाला, कवीला भेटलेच नाहीये तर कसं बोलणार वगैरे. ती समोर आली तर पटकन व्हीलचेअरच्या उंचीची होत, खांद्यावर डोकं ठेवत मला सहज भेटली. अशी अंगभेट झालेली आजवर आठवत नव्हती. मी दचकून आजूबाजूला पाहिलं की कुणी बघितलं नाही ना… दडपणंच तशी होती त्या जागेची. ती ठेंगणी, अपर्‍या नाकाशी, सावळी, लहान केसांची मस्त वाटली मला. डामडौल नव्हता काही. बोलण्यात कितीही प्रेमळपणा आणला तरी अधिकारवाणी होतीच. मग आम्ही ब्रेकफास्ट घेतला एकत्र. त्यानंतर म्हणाले, “कविताताई, चल तुला संस्था दाखवते फिरवून…” – म्हणाली, “मी संस्था चिक्कार अनुभवल्यात. कामं उदंड पाहिलीत. तू तुझ्याबद्दल बोल. तुझं ऐकायला आलेय मी. सांग, तुला काय आवडतं? पुढे काय करणार आहेस?” – मला समजेचना की काय उत्तर द्यायचं. कारण लोक येतात, त्यांना संस्था दाखवायची इतकंच डोक्यात ठरून गेलं होतं कोलूका बैल सारखं. स्वत:बद्दल काय बोलायचं? स्वत:ला काय वाटतं? काय आवडतं? काय नावडतं? – काहीच सांगता येत नव्हतं. ‘ब्र’ नंतर जाणीव पुन्हा लख्ख झाली. तिला माझ्याबद्दल उत्सुकता वाटतेय यानं मला स्वत:बद्दल भान आलं. आपण कुणीतरी स्वतंत्र माणूस आहोत, बॅनर नाही अशी नोंद माझी मी ही घेण्यासाठी तिची भेट खूप महत्त्वाची ठरली. उदयकाकांचाही तोच हेतू असावा की मला गदागदा हलवून जागं करावं. त्यानंतर जवळपास वर्षभरात मनाची, कुटुंबाची, मित्रमंडळींची तयारी करत त्यांच्या मदतीनं मी संस्थेबाहेर पडले… जर ब्र, कविता महाजन, उदय कुलकर्णी ही मंडळी भेटली नसती तर हे घडलं असतं का? असतंही कदाचित, पण जो वेग नि हुरूप आला तो उमेदीच्या काळात आला, तिच्यामुळं!

मी संस्थेबाहेर पडल्यावर माझ्या शिवाजी पेठेतल्या घरी पुन्हा आली ती. धीर द्यायला, नवे प्लॅन्स विचारायला. असं नुसतं येऊन जाणं माझ्या मनाच्या भांबावल्या स्थितीत किती महत्वाचं हे तिला ठाऊक होतं. मी केलेली कच्चीपक्की पहिलीवहिली वांग्याची भाजी तिनं मोठ्या चवीनं खाल्ली. त्यावेळी मऊ होऊन ऐकत होती सगळं. मी संस्थेतल्या अनुभवानं दुखावून आपली रडतंच होते सारखी. दोष देत होते. प्रश्‍न विचारत होते. ती म्हणाली, आत्ताचं तुझं दुखावून घेणं खरंच आहे, पण हे थांबेल. मागे टाकशील सगळं, पण विसरू नकोस. झालं त्याचा अनुभव पुढचं शिकवेल. लागलं काही तर कधीही हाक मार. मी आहेच.

ही हाक मारण्याची मुभा तिनं मला दिली. (तशी तिनं खूप जणांना दिली होती.) असं आश्‍वस्त होणं माझी त्यावेळची, खरंतर आताचीही गरज आहे. तिचं लक्ष होतं माझ्यावर. तीच फोन करायची अध्येमध्ये. मी लिहायला लागले कुठंकुठं, बोलायलाही जायला लागले. ती वाचायची, पण बोलायची नाही त्यावर. फक्त एक सांगायची, पैसे घे. फुकटात राबू नको. मी तिला म्हणालेही होते, तू नि अपर्णा वेलणकर यांनी मला केलेल्या श्रमाचे न लाजता पैसे घ्यायला शिकवलं. कारण नसताना पैशासाठी कानकोंडं व्हायचं नाही हे शिकवलं. तिच्या संपर्कातल्या लिहिणार्‍या किंवा लेखनव्यवहारात असणार्‍या खूप लोकांना तिनं माझ्याशी जोडून दिलं. कुणी कोल्हापुरात आलं की त्यांनी मला भेटावं यासाठी आग्रही राहिली.

एका कुठल्याश्या आठवडी सदरातल्या माझ्या लेखांना खूप प्रतिसाद मिळाला. कौतुकानं आपलं विमान थोडं तरी वर चढतंच, पण त्याचा पत्ता कविताताईला कसा लागायचा कुणास ठाऊक. त्यातल्या एका लेखाचा संदर्भ देऊन ती म्हणाली, लिहिलंस चांगलं, पण शेवटी ती भावूक शेरोशायरी देऊन माती केलीस. एखाद्या माणसाविषयी लिहितेस तर तिला इतक्या देव्हार्‍यात बसवायचं कारण काय? तिचं कर्तृत्त्व आहे भक्कम, त्यामुळं आपल्या लेखनाची चांगली जोड दिली की ते उजळेलच, पण हे असलं घाण करत जाऊ नको. आणि लेख ललित नसेल नि कुठल्यातरी वास्तवातल्या घडामोडींबद्दल कुणीतरी म्हटलेलं कोट करत असशील तर त्यांना दादा, काका, ताई वगैरे म्हणू नको. पूर्ण उल्लेख कर. असले लाडिकपणे करून लेखक म्हणून आपण वाढत नसतो. कळ्ळं? – कळत तर जात होतंच. तिच्या सूचना हव्याहव्याशा असायच्या पण ती जरा प्रेमळ बोलायला काय घेईल असं वाटायचं मला. तिचं प्रेम त्यातच दडलेलं आहे ही समजूत प्रत्येक वेळी नसायची. त्यामुळं बराच वेळ तिच्या सूचनांमध्ये सतत येणारं च च च च आठवत राहायचं. हे सगळे प्रसंग लिहिता येणं निव्वळ अशक्य आहे.

2009 च्या दरम्यान एकदा भेटलो होतो तेव्हा मला तिनं फेसबुकबद्दल सांगितलं. रजिस्टर कसं करायचं, मी तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेन वगैरे बोलली. मी आज्ञाधारक गटात मोडणारी असल्यामुळं तिनं सांगितलं तसं केलं. मजा यायला लागली. आधीची काही वर्ष फक्त वाचक होते मी. एरवीही कमीच लिहायचे. तिनं काही लिहिलं की आवर्जून वाचायचे. ती जे म्हणेल तो शब्द उमटवून टाकायचे स्मरणशक्तीत. खूप लिहायची ती. माझ्यासाठी ते जग नवं होतं. तिच्या मित्रांचे, त्यांच्या बायकांचे, स्त्रीलिंग नि पुरूषलिंगाबद्दल वापरले जाणारे शब्द नि त्यावरून रचल्या गेलेल्या शिव्या असं कायकाय! असं वाटायचं, बापरे, किती उघडपणा हा, किती मोकळेपणा हा… आपल्याला कधीच नाही जमू शकणार इतकी मोकळी नि निखळ अभिव्यक्ती व त्याबद्दलची भूमिका मांडणं. पण प्रभाव पडत असतो, आपण आपल्याकडे नाही ते इतरांकडे बघत शिकत असतोच.

मध्येच कधीतरी तिचा गडहिंग्लजला कार्यक्रम होता तेव्हा आमची भेट झाली. तिनं संयोजकांना सुचवलं होतं की भाषणापेक्षा तिची मुलाखत घ्यावी नि मुलाखत माझी मैत्रीण सोनाली घेईल. मला भयंकर टेन्शन आलेलं. मी उदयकाकांच्या मदतीनं सिन्सिअरली तिचं तोवरचं जे मिळालं ते सगळं वाचून मुलाखतीचे मोठाले प्रश्‍न लिहून काढले. तिनं सांगितलेलं की काही टेन्शन घेऊ नको, पण मला जाम धडधडत होतं. ती घरी आली. मी तिच्याकडं प्रश्‍नांची प्रिंट आऊट दिली. माझ्याकडं न बघताच म्हणाली, झालं आता. हे इथंच ठेवायचं. तुला माझं लेखन ठाऊक आहे, मी ही बर्‍यापैकी ठाऊक आहे. तर तुला आवडलेल्या एखाद्या लेखापासून, कादंबरीपासून किंवा कवितेपासून सुरूवात करू नि शेवट तू म्हणतेस तसं मी एक-दोन कविता वाचेन. बाकी मधल्या वेळेत मस्त गप्पा मारू. गोष्टीतून गोष्ट सुचत जाते. बिनधास्त राहायचं. माझं धाबं दणाणलं होतं, पण तिच्यावर विलक्षण श्रद्धा, त्यामुळं नंतर तिनं ड्रेस कुठला घालणारेस? हा नको, तो घाल वगैरे सूचना देत मला हलकं केलं. मुलाखत रंगली, माझा आत्मविश्‍वास उजळला आणि महत्त्वाचं म्हणजे, ‘चांगली घेतलीस की मुलाखत!’ असं कविताताई लग्गेच म्हणाली. माझं घोडं गंगेत न्हालं.

पुढच्या वर्षी ती कोंडुराच्या अपघातात मरता मरता वाचली. म्हणायची, हे मिळालेलं आयुष्य म्हणजे बोनस आहे. त्यावेळी मी घाबरून वेड्यासारखी तिला फोन करत सुटले होते. फोन आधी बंद होता नि नंतर फक्त रिंग वाजत राहिली. मग मी मेसेजिस करून ठेवले. कधीतरी पंधरावीस दिवसांनी तिचा मिनीटभरासाठी फोन आला. एरवी बोलायला लागली की किमान पाऊणएक तास बोलणार्‍या कविताताईनं ‘मी ठीकाय. काळजी करू नको. स्वत:ची काळजी घे. बरं वाटलं की पुन्हा बोलेन.’ अशी मोजकी वाक्यं बोलून अच्छा म्हटलं. पण किमान मी तिचा आवाज ऐकला. नंतर तिच्या शारीरिक तक्रारी बर्‍याच वाढत गेल्या. मी माझ्या त्रासांविषयी, अँटिबायोटिक्सच्या परिणामांविषयी, कॅथेटरच्या टेन्शनविषयी बोलायला लागले की ती नवे नवे उपाय सुचवायची. तिच्याही अडचणी सांगायची. कितीतरी काळ तिला खिचडीसाठी डाळतांदुळ धुवायलाही भयंकर त्रास व्हायचा. पातेली, भांडी यांचा एकमेकांवर आदळून आवाज झाला की तो सहन व्हायचा नाही. कंप सुटायचा. पातेलं चिमट्यात धरणंही भयंकर कष्टप्रद काम वाटायचं. तेव्हा ती मला वेगवेगळी तयार सूप्स पी, अमुक प्रकारच्या मुद्रा कर वगैरे सांगायची. फेसबुकवर लिहीत राहायची भरपूर. मला कमाल वाटायची. आपण सतत हिच्याकडे आधारासाठी बघतो पण हिला रडायला येत असेल तेव्हा कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवत असेल असं वाटायचं. तिचं आजारपण, कित्येक महिने बिल्डिंगच्या पायर्‍या उतरून खाली जाता न येणं, कानातून विचित्रसे आवाज येणं हे ती गंमत केल्यासारखं सांगायची. वर मलाच हजार सूचना द्यायची की क्रिएटिव्ह काम, सेमी क्रिएटिव्ह काम नि पैसे मिळवण्याचं काम याचे कसे कप्पे करत यायला हवेत वगैरे.

तिचं वर्तुळ मोठंच होतं, पण फेसबुकमुळं ती अधिक अ‍ॅप्रोचेबल आणि बर्‍याच लोकांत विभागली गेली. नंतर नंतर ती इतकं लिहायची की मला वाचायलाच नको व्हायचं. लहान होते, त्यामुळं वाटायचं की मी ही तर एकटीच आहे, मग एकटेपणातून हे इतकं तिरकं, त्रासिक, वैतागवाणं मी का लिहित नाही? सगळ्या जगावर माझा प्रचंड राग का नाही? – हळूहळू कळत गेलं, की आपलं नि समोरच्याचं एकटेपण नि त्याचे रागरंग एकसारखे नसतात… माणसं कुठल्याकुठल्या अनुभवांनी भळभळती राहातात आयुष्यभर. कुठंतरी श्‍वासाची जागा मिळवत राहातात. कुणाला कशानं बरं वाटतं किंवा वाटावं हे कुणी तिसराच नाही ठरवू शकत.

तिच्याशी फोनवर बोलणं व्हायचं तेव्हा मी खूप कमी वेळा एखाद्या गोष्टीवर मत द्यायचे. ऐकायचे जास्त. मधल्या काळात तिचा प्रवास खूप कमी झाला होता. हळूहळू तब्येत सुधारायला लागल्यावर तिनं जे कारने येण्याजाण्याचा खर्च व मानधन व्यवस्थित करू शकतील अशांसाठी कार्यक्रम घ्यायला सुरूवात केली. ते अनुभव ती सांगायची. मित्र म्हणून येणारे काही जण किती आत घुसायचा प्रयत्न करतात याचे काही किस्से सांगितले होते तिनं व अशांच्या तिनं मुसक्या कशा आवळल्या हे सांगितलं होतं.

एकदा तिला एका समीक्षेच्या आणि लेखांच्या पुस्तकाबद्दल सांगितलं की वाचायला इतकं जड जातंय, बोअर होतंय खूप तर म्हणाली, सारखं कथात्म वाचून शिस्त ढासळते. वेगवेगळं वाचत राहायला हवं. या वाचनाची म्हणून शिस्त लागायला हवी. तर आकलन वाढतं. मी ही आधी कविता वाचत राहायचे भरपूर, पण नंतर समीक्षा वाचताना कवितेबद्दलचा दृष्टीकोन खोल झाला, विस्तारला. – त्यानंतर माझी तक्रार अर्थातच मावळली.

ती चिडेल म्हणून एक-दोन कामं तिला न विचारता हाती घेतली. घाबरायचेच मी सांगायला. पण कुठूनतरी तिला कळणारच होतं. माझी आर्थिक स्थिती ढासळू नये व मला स्वत:च्या कष्टाचा सन्मान करता यावा, मैत्रीण-मुलगी-बहिण म्हणत कुणी माझ्या बुद्धीचा फुकट वेळ घेऊ नये अशासाठी तिची करडी नजर असायची. मध्ये मध्ये या भीतीमुळे मग माझे फोन कमी होत गेले. तीच करायची अध्येमध्ये, पण त्यात मी विशिष्ट काम करायला हवंय याचा तगादा असायचा. माझ्याच्यानं ते होत नव्हतं. दरम्यान माझी विश्राम गुप्तेंशी, सतीश तांबेंशी ओळख झाली होती. मला हे लोक जाम आवडलेत असं मी तिला सांगितलं होतं. गुप्ते सर किती वाचतात, ते मला किती छान सांगतात, प्रत्येक लेखनावर माझा विचार कसा तयार करतात हे ही मी तिला सांगितलं होतं. त्याचदरम्यान ‘मध्यरात्रीनंतरचे तास’चं काम चालू होतं. ती सतत फक्त सूचना सांगण्याचा तो काळ होता. ती त्यानंतर लेखनासाठी म्हणून गोव्यात गेली तेव्हा त्यांच्याकडे राहायलाही गेली होती. विश्राम गुप्ते खूप गांभीर्यानं माझं ऐकतात हे कळल्यामुळं कदाचित ती पुन्हा माझ्याकडे प्रेमानं बघायला लागली की काय असं मला सतत वाटायचं. पण धैर्य नव्हतं तिला विचारायचं. शिवाय त्यावेळी मी लोकप्रभात लिहिलेली लहानमुलांसाठीची गोष्ट तिला आवडली नव्हती. त्या मुलीच्या आजोबांच्या मृत्यूविषयीचं काही त्यात होतं. ती म्हणाली होती, लहान मुलांसाठीच्या गोष्टी चैतन्यानं रसरसलेल्या हव्यात. माझं म्हणणं होतं की मृत्यू कुठंतरी येतोच मुलांच्या आयुष्यात. मी ही बघितला होता शेजारच्या आजोबांचा मृत्यू. त्यावेळी कुणीतरी बोलण्याची गरज होती मला. त्यातून ही गोष्ट आली असणार… पण मी फार स्पष्टीकरण दिलं नाही. कॅथेटरबाबतीतल्या लेखावरही तिचा आक्षेप होता की खूप खूप तपशील लिहिले आहेस वेदनांचे, ते अंगावर येतात. इतकं अतिरेकी लोकांना नको असतं. – मला भांडावं वाटायचं की तू का गं मग इतकं इतकं अतिरेकी चिडतेस, तुझ्या विरूद्ध वागणार्‍यांचे वाभाडे काढतेस? आपल्या सगळ्यांच्यातच दोष आहेत ना, मग तू उलगडून सांग ना गं थोडं… की मी काय चुकते… बोल तरी समजुतीनं. ती बोलली असतीच जर मी तिला हे असं विचारलं असतं. पण कधी तिच्या आजारपणाची वेळ तर कधी माझ्या यात ते हुकून गेलं.

माझ्या कामाचे योग्य पैसे मिळावेत यासाठी ती दक्ष होती. मी व्यायाम करावेत, नीट खावंप्यावं यावर तिचं लक्ष होतं, त्यामुळं कितीही राग आला तरी माझ्या तोंडून विरोधाचा स्वर उमटायचा नाही. खरंतर तो उमटला असता तर तिनं कदाचित मैत्रीच्या पातळीवर नेलं असतं मला, सजग पालकाची जागा सोडून. एका मेलमध्ये तिनं मला लिहिलं होतं, “तुझ्यासाठी काहीतरी निश्‍चित आर्थिक तरतूद करवून द्यावी असं खूप मनात आहे. त्यामुळं तुझा वेळ महिन्याचा खर्च भागवण्यात खर्ची पडण्यापेक्षा काही वर्ष तू सलग क्रिएटिव्ह कामं करू शकशील. त्यासाठी तू कुणाशी बोलायची गरज नाही. आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलून हे सगळं मी करेन. यात कमीपणा किंवा ओशाळेपणा वाटून घेऊ नको. तुझी परवानगी असेल तरच हे करू. कळव.” – इतकी काळजी कोण करतं?

कुठलीही महत्त्वाची घटना घडली की फेसबुकवर तिची पोस्ट नाही असं व्हायचंच नाही. किती आरोपप्रत्यारोप झाले तरी ती अभेद्य राहिली. आम्ही खूप खाजगी बोललो नाही, पण तिनं गमावलेल्या काही महत्त्वाच्या जागांचा कधी ती पुसटसा उल्लेख करे. तिची गुंतवणुक कळे. नव्यानं लिहित्या झालेल्या अनेकांना शिस्त यावी, त्यांचं पुस्तकरूपानं काही काम व्हावं म्हणून ती खूप आटापिटा करे. दुखावून घेई. तरी पुन्हा नव्या जोमानं नव्या लोकांना लिहितं करे, कानउघाडणी करे. तिचा हा सगळा व्यवहारच मुलखाचा अजब. डोळे गरगरवून टाकणारा. किती पुस्तकं वाचली, कुठली वाचायची आहेत, कुठली संपादनं संपली, कुठल्या नोट्स काढतेय, कुठल्या पुस्तकांचं काम हाताशी आलं असे असंख्य तपशील ती फेसबुकवर टाकायची, अनेक ठिकाणी कॉलम्स लिहायची, लोकांशी सततचा संवाद असायचा, फेसबुकवर स्वत:च्या पोस्टवर लोकांनी विचारलेल्या गोष्टींवर उत्तरं तर द्यायचीच, पण अनेकांच्या पोस्ट्स वाचून कौतुक किंवा जोरकस आक्षेप नोंदवायची… हे सगळं एकाचवेळी कुठल्या ताकदीवर करायची कोण जाणे? मेंदूचे व शरीराचे इतके गुंते कसे काय पेलत असतील तिला कोण जाणे? तिच्या अनेक शिक्षकांशी, लेखनात गुरूस्थानी असणार्‍यांशी, समवयीन मित्रमैत्रिणींशी व नव्या लोकांशी ती एकाच वेळी जोडली जाऊ शकणारी सहस्त्र हातांची व मेंदूची कोटी केंद्र चालू असणारी राक्षसीणच असणार ती! तिच्याबद्दलचं खूप कुतूहल, आदर, भीती, आश्‍चर्य, त्रास, वैताग, आकर्षण सगळं अजून तसंच ताजं आहे… तिच्याशीच ते बोलता येणार आहे.

वसईचं घर बघणं मला शक्य नव्हतं तेव्हा तिनं ते चित्रमय पद्धतीनं समजावलं होतं. “पुण्याला येतेय गं राहायला, या घरी तू केव्हाही येऊ शकशील. आता खूप काम देणारे तुला. नव्या प्रकाशकांशी बोललेय तुझ्या लेखनाविषयी असं म्हणाली होती. तुझ्या आत्मकथात्मक पुस्तकाचं संपादन करायचंय मला. तेवढं जरा मनावर घे…. खूप वर्ष सांगून पाहतेय. आता काम संपवण्याची वेळ ठरव. त्यात लिंक लागत नसली तर मोकळेपणानं बोल, मी मार्ग सुचवेन, पण ते लेखन आता येणं आवश्यक आहे. मी पुण्यात येतेय तर आता तुला कामाला लावतेच! फटके लावावे लागणारेत तुला.” असंही झालं होतं तासभर बोलून, अगदी परवा परवा. आवाजातला तो उत्साह अजून ताजा आहे माझ्या मनात. ‘जॉयस्टिक’ पोहोचल्यावर, ‘सवडीनं वाचून कळवते गं!’ असं जे फेसबुकवर लिहिलंस ते ही तुझ्या आवाजात ऐकू आलं मला.

ती मूडमध्ये असली की म्हणायची की तिला छप्पन प्रियकर आहेत. झेपतील तितके असोत, तितकं प्रेम होतं तिच्याआत. तितक्या एकट्या जागा होत्या तिच्याआत, ज्या तिनं कधीच लपवल्या नाहीत. पण माझा एखादाही प्रियकर मी चवीनं तिला सांगू शकले असते का? – तर नाही! आपण गमतीत काहीतरी नाजूक बोलून बसायचो आणि ही कधीतरी ‘जनहितार्थ’ ते फेसबुकवर लिहून टाकेल अशी भीती असायची. एकदा माझ्या एका लेखात कुठलातरी एक मित्र विनाकारण गमावल्याचा व त्याचं कारणही न कळल्याचा उल्लेख तिनं वाचला तेव्हा फोन करून विचारलं होतं की काय गं, प्रेमाबिमात होतीस काय? दुखावून घेतलंस काय? विचारू का त्याला? तर म्हटलं, अजिबात नाही. ‘ते’ प्रेमबिम नाही. फक्त सल की माणसं सांगून का गायब होत नाहीत. आपण काय त्यांची इच्छा नसताना धरून ठेवणार असतो का? तितकी सभ्यता नि संस्कृती आपल्यात असते हे समजत नाही का लोकांना? – तर ते तितकंच.

तिच्या खाजगी आयुष्यावर चिखलफेक करणारं खूप बोललं गेलं, अजूनही जात असेल. मला त्यानं फरक पडत नव्हता व नाही. ती किती प्यायची, तिच्या भावनिक जगात कुणाला स्थान होतं, ते बिनसल्यावर तिनं कसं उट्टं काढलं वगैरे सुरस कथा अनेक जण सांगतात, सांगतीलही. सांगोत! त्यानं तिच्या प्रचंड करून ठेवलेल्या कामाचं श्रेय तसूभर ढळत नाही. तिचं ढिगानं करून ठेवलेल्या कामाची एक वीटही कुणाला हलवता येणार नाही. हलकी कविता लिहिणारे, चित्रांची कॉपी करणारे, वावदूक बोलणारे कायमच तिला टरकून राहायचे. तिचा नरमपणा नि जहालपणा सगळ्याचीच चर्चा पुरून उरेल. तिच्या शत्रूंनाही तिच्यासारखा तुल्यबळ बुद्धीमान माणूस गमावण्याची खंत असेलच…

एका मेलमध्ये तिनं लिहिलं होतं की सोनाली, जेव्हा आपण आपल्या परीनं करूनही आपलं कुणी राहात नाही तेव्हा एकच उपाय असतो, आपण सगळ्यांचं होणं! लिहिण्यासाठी संघर्ष केला, नाती जोडली राहावीत यासाठी संघर्ष केला. आता अज्ञात धुक्यात विरून जावं वाटतं. ही निराशा नाही, निखळ भावना आहे.

निखळ भावना इतकी की न सांगता, सवरता धुक्यात विरून गेलीस कविताताई!

अजूनही तुझा तो स्वर ऐकू येतोय, दटावणी देणारा, विनोद करून खळखळून हसणारा…

तू असशील तर होय म्हण असं सांगण्यानं काही हाशिल नाही… तेव्हा तू असशील तर काहीच म्हणू नको. कळेल मला, की तू आहेसच…

देह नसणं, त्यासहची झळाळती बुद्धी नि तरलता नसणं, तेजतर्रार शब्दांचे नेमके बाण नसणं हे काही काही केल्या मान्य होत नाही.

तू असशील तर काहीच म्हणू नको

(- सोनाली नवांगुळ या प्रयोगशील लेखिका व अनुवादकार आहेत )

9767951905

[email protected]

#mediawatch #kavitamahajan #mediawatchdiwaliank2018

Previous articleपरंपरा आणि मी
Next articleउद्योगपती आणि कार्यकारी संचालक :- जोतीराव फुले
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.