– किशोर देशपांडे
१९६८ साली तो एकवीस वर्षांचा उच्च-मध्यमवर्गीय व देखणा पारशी नवयुवक मुंबईहून सनदी लेखापाल होण्यासाठी लंडनला निघाला. त्यावेळी त्याच्या डोळ्यांत वडिलांप्रमाणेच कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च-अधिकारपद भूषविण्याचे स्वप्न होते. सुमारे चाळीस वर्षांनंतर वयाच्या बासष्टाव्या वर्षी हीच व्यक्ती अनेक गंभीर आजारांना तोंड देत दिल्लीच्या एका बस-थांब्यावर उभी असताना अचानक एक SUV मोटार समोर येऊन थांबली. त्यातून धडाधड सहा राकट पोलीस साध्या वेशात उतरले व या व्यक्तीला ताब्यात घेऊन क्षणार्धात ते निघून गेले . ही घटना १७ सप्टेंबर २००९ रोजी घडली. त्यानंतर, दहा वर्षांहून अधिक काळ या व्यक्तीला देशातल्या सहा राज्यांमधल्या वेगवेगळ्या तुरुंगात शंभराहून अधिक खटल्यांना तोंड देत फिरविण्यात आले. परंतु, ‘बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्या’खाली त्यांना झालेली अटक बहुसंख्य न्यायालयांनी बेकायदेशीर ठरविली आणि त्यांना ‘नक्षलवादी’ असल्याच्या आरोपातून दोषमुक्त केले. फक्त खोट्या नावाने वावरणे या गुन्ह्याखाली दोषी आढळून किरकोळ शिक्षा झाली, जी त्यांनी ‘अंडर-ट्रायल’ कैदी म्हणून तशीच भोगली होती. मात्र अजूनही काही थोड्या प्रकरणांची सुनावणी बाकी असून हे गृहस्थ दिनांक १६ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रथमच जमानतीवर बाहेर येऊ शकले. आपली विचारसरणी, तुरुंगातील अनुभव व मुक्त चिंतन यावर आधारित “Fractured Freedom: A Prison Memoir” या शीर्षकाचे एक अत्यंत वाचनीय पुस्तक त्यांनी लिहिले आहे.
ही व्यक्ती म्हणजे देशातील ‘माओवादी’ (ज्यांना सामान्यतः ‘नक्षलवादी’ म्हटले जाते) चळवळीच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जाणारे “कोबाड गांधी” होत. त्यांचे वडील ‘GLAXO’ कंपनीचे वित्तीय संचालक होते. वरळी सी-फेसवर मुंबईला त्यांची प्रशस्त सदनिका होती. महाबळेश्वरला बंगला होता. देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘डून स्कूल’मध्ये कोबाडचे शालेय शिक्षण झाले. त्यावेळी संजय गांधी, कमलनाथ व नवीन पटनाईक हे त्यांचे वर्गबंधू होते. पुढे मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवी घेतल्यानंतर सनदी लेखापाल होण्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यास ते लंडनला गेले.
लंडनच्या वास्तव्यात कोबाड यांना तेथील गोऱ्या लोकांचा वंशवाद जाचू लागला. भारतीय, आशियाई व आफ्रिकी लोकांशी स्थानिक इंग्रजाची वागणूक उपेक्षेची, हेटाळणीची व स्वतःला उच्चभ्रू मानणारी आढळल्यामुळे व्यथित होऊन कोबाड यांनी वंशवादावर संशोधन करण्याचे ठरविले. तासंतास ब्रिटिश संग्रहालय व अन्य वाचनालयांत बसून त्यांनी या प्रश्नाचा अभ्यास केला. आपले सनदी लेखापालाचे शिक्षण देखील सोबतच चालू ठेवले व त्यात उत्तम प्रकारे यशदेखील मिळविले. वंशवाद आणि वसाहतवाद हे हातात हात घालूनच वावरतात असा कोबाड यांचा निष्कर्ष दिसतो. ब्रिटिश वसाहतवादामुळे दोनशे वर्षांत भारताचे अतिशय नुकसान झाले. इ.स. १७०० मध्ये जगातील सकल घरगुती उत्पन्नापैकी पंचवीस टक्के वाटा भारताचा होता तर फक्त दोन टक्के वाटा ब्रिटनचा होता. परंतु, १९४७ साली मात्र याच जागतिक सकल घरगुती उत्पन्नामध्ये भारताचा वाटा केवळ तीन टक्के उरला होता तर ब्रिटनचा मात्र दहा टक्केपर्यंत चढला होता. भारतातल्या अत्यंत जोमात असलेल्या वस्त्रोद्योग व जहाज-बांधणी सारख्या उद्योगांना व जलमार्ग व्यापाराला ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक उद्ध्वस्त केले, हे तथ्य कोबाड यांना अभ्यासांती स्पष्ट झाले.
१९७०च्या त्या दशकात जगभर तरुणाईमध्ये साम्यवादाचे अपार आकर्षण होते. बलाढ्य अमेरिकेला चिमुकला व्हिएतनाम देत असलेली टक्कर स्फूर्तीदायक होती. चीनमध्ये माओने सुरु केलेल्या ‘सांस्कृतिक क्रांती’संबंधी अनेक बातम्या येत होत्या. कोबाडसुद्धा वैचारिकदृष्ट्या साम्यवादाकडे वळले आणि माओची कार्यपद्धती त्यांना अधिक योग्य वाटली. १९७२ मध्ये वंशवादाविरुद्ध लंडनच्या एका कामगार-वस्तीत सभा घेत असताना काही माथेफिरू गोऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. आधी तर पोलिसांनी नुसती बघ्याची भूमिका घेतली व नंतर कोबाड आणि त्यांच्या दोन साथीदारांनाच ‘प्रक्षोभक’ भाषणासाठी अटक केली. त्या ‘गुन्ह्याबद्दल’ कोबाड यांना तीन महिन्यांची शिक्षा झाली.
कॉर्पोरेट क्षेत्रात करियर करण्याचे स्वप्न कोबाड यांनी सोडून दिले आणि साम्यवादी जगाच्या निर्मितीसाठी पूर्णवेळ झटण्याचा संकल्प केला. मुख्य म्हणजे वडिलांशी पत्रव्यवहार करून आपल्या या संकल्पास त्यांची मान्यताही मिळविली. त्यामुळे ‘सी.ए.’ चे शिक्षण पूर्ण न करताच कोबाड भारतात परतले व मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये त्यांनी काम सुरु केले. मुख्यतः झोपडपट्टी दादांच्या अन्यायाविरुद्ध स्थानिक तरुणांना संघटीत करणे, पाणी व वीज यांचा नियमित पुरवठा होण्यासाठी संघर्ष करणे, हे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. शिवाय, दलित तरूणांमध्ये उठबस वाढल्यामुळे कोबाड यांना प्रथमच हिंदू धर्मातील जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांचेही आकलन होत गेले. डॉ. आंबेडकरांच्या जीवनाचा व ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला आणि भारतीय संदर्भात मार्क्स व आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय करून क्रांतीची व्यूहरचना आखावी लागेल असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. भारतातील साम्यवादी पक्षांनी जातीवादाच्या व अस्पृश्यतेच्या समस्येकडे कधीही गांभीर्याने पाहिले नाही व त्या समस्येचे त्यांना नीट आकलनही झाले नाही असे कोबाड यांना वाटले.
१९७५ च्या आणीबाणी नंतर कोबाड यांनी नागरी-हक्क संरक्षणाच्या चळवळीची बांधणी करण्यात पुढाकार घेतला. त्यातच त्यांची अनुराधा शानबाग सोबत ओळख झाली व पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात व विवाहात झाले. नंतर ऐंशीच्या दशकात ते दोघेही मुंबई सोडून नागपूरला राहावयास आले. तेथे अनुराधा गांधी यांना नागपूर विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. सुरुवातीला काही काळ लक्ष्मी-नगरमध्ये एक भाड्याची खोली घेऊन राहिल्यानंतर ते ‘इंदोरा’ या बहुसंख्य दलित रहिवासी असलेल्या वस्तीत भाड्याचे घर घेऊन राहू लागले. घरकाम व लेखन हे कोबाड यांचे तर अध्यापन व संघटन हे अनुराधा यांचे मुख्य कार्यक्षेत्र राहिले. उच्च-मध्यमवर्गीय राहणीमानाची दोघांनाही जन्मापासून सवय होती. स्वेच्छेने सर्व सुखसोयी सोडून त्यांनी अतिशय साधे व असुरक्षित जीवन स्वीकारले. कोबाड यांनी तर पुढे त्यांना वारशात मिळालेली संपत्ती देखील क्रांतिकारी चळवळीला अर्पण केली. ऐंशी व नव्वदच्या दशकातील अनेक दलित चळवळीमध्ये अनुराधा गांधी यांनी सक्रीय पुढाकार घेतला.
सुमारे पंधरा वर्षे नागपूरला काढल्यानंतर अनुराधा यांना त्यांची नोकरी त्यांच्या कार्यामुळे गमवावी लागली. त्यानंतर, या जोडप्याने आदिवासी क्षेत्रात सुरु असलेल्या माओवादी चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे ठरविले. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्राचा काही भाग, तेलंगणा व आंध्र-प्रदेश या राज्यांमध्ये माओवाद्यांच्या वेगवेगळ्या गटांनी मूळ धरले होते. वनजमिनी व खनिजांच्या खाणी मोठमोठ्या कंत्राटदारांना दिल्या जात होत्या. यात राज्ये व केंद्र सरकारातील उच्चपदस्थ लोकप्रतिनिधी व अधिकारी आपलाही फायदा पाहत होते. आदिवासींना शेकडो वर्षांच्या निवास-स्थानातून जबरीने बेदखल केल्या जात होते. अनेक राज्यांतील सरकारांनी आपापल्या राज्यांतील नक्षलवादी चळवळ निष्ठूरपणे चिरडूनही टाकली होती. कोबाड यांनी अनेक विखुरलेल्या गटांचे विलीनीकरण घडवून सी.पी.आय.(माओवादी) या पक्षाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. २०००च्या दशकात त्यांनी प्रत्यक्षात कोणकोणती कामे केली याचा उल्लेख पुस्तकात टाळला आहे. काही केसेस त्यांचेविरुद्ध अद्यापही प्रलंबित असल्यामुळे तसा उल्लेख टाळणे स्वाभाविकही आहे. परंतु, अनुराधा यांनी बस्तरच्या भागात सशस्त्र माओवादी टोळ्यांसोबत राहून विशेषतः आदिवासी स्त्रियांचे फार मोठे संघटन बांधण्यात पुढाकार घेतला. “क्रांतिकारी आदिवासी महिला संगठन” नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संघटनेत अंदाजे नव्वद हजार महिला सदस्य होत्या. एकीकडे भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध भांडत असतानाच, माओवादी कार्यकर्त्यांमधील पुरुष-वर्चस्वाची भावना नष्ट व्हावी यासाठी देखील अनुराधा यांनी विशेष प्रयत्न केले. जंगलातील वणवण व दगदगीमुळे अनुराधा यांची प्रकृती खालावत गेली आणि वयाच्या चौपन्नाव्या वर्षीच २००८ साली सेरेब्रल मलेरिया व इतर व्याधींमुळे त्यांचे निधन झाले. भूमिगत अवस्थेत काम करताना त्यांनी अनेक नावे घेतली. त्यांपैकी ‘जानकी’ या नावाने त्यांचे स्मारक छत्तीसगडच्या बस्तरमधील अबुजमाड येथे आदिवासींनी बांधले.
अनुराधा यांच्याबाबतीत लिहिताना कोबाड खूपच हळवे होतात. भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींचे विचार आदरपूर्वक ऐकून घेणे, अभ्यासांती ठरलेल्या आपल्या विचारांवर ठाम राहणे, इतरांच्या स्वातंत्र्याची जपणूक करणे, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे व सतत चळवळीसाठी हसतमुखाने कष्ट उपसत राहणे हे अनुराधा यांचे गुण स्वतःमध्ये तेवढ्या प्रमाणात नसल्याची प्रामाणिक कबुली कोबाड देतात. अनुराधा हे कार्यकर्त्यांसाठी ‘मॉडेल’ आहे असे ते आग्रहपूर्वक सांगतात.
दहा वर्षांच्या तुरुंगवासातील कोबाड यांनी लिहिलेले अनुभव थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येतील:-
-
उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतातील पोलीस तुरुंग-प्रशासन व न्याय-व्यवस्था अधिक चांगली आहे.
-
सर्वांत वाईट अनुभव दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आला, जिथे त्यांना सुमारे सात वर्षे काढावी लागली.
-
अफझल गुरु या काश्मिरी फाशीच्या कैद्याकडून त्यांना तुर्की सुफी संत “रुमी” यांचे तत्वज्ञान शिकायला मिळाले. अफझल गुरु यांनी फासावर जाताजाता जेलच्या अधिकाऱ्यांना “स्टाफची काळजी घ्या व त्यांना चांगले राहणीमान द्या” असे सांगितले व ते शांतपणे मृत्यूला सामोरे गेले.
-
उत्तरेकडील मोठे डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कैद्यांकडून कोबाड यांना आदराची वागणूक व मदतीचा हात मिळाला. बहुदा ते नक्षलवाद्यांना आपल्यासारखेच ‘रॉबिनहूड’ समजत असावेत, अशी टिप्पणी ते करतात.
-
प्रत्येक ठिकाणचे न्यायालयीन प्रकरण हाताळण्यात वरिष्ठ वकिलांचे ‘विनामूल्य’ सहकार्य कोबाड यांना मिळाले. पतियाळा येथील एका वरिष्ठ वकिलांना फी घेण्याबाबत आग्रह केला असता ते म्हणाले की, “मी अत्यंत श्रद्धाळू शीख आहे. तुम्ही आमच्या गुरूंचेच काम करीत आहात. त्यामुळे मी फी घेणार नाही.” वकीलांप्रमाणेच बहुतेक न्यायाधीशांनी देखील कोबाड यांना सौजन्यपूर्ण वागणूक दिली व प्रत्येक वेळी त्यांच्या प्रकृतीची दखल घेऊन उपचारांसाठी योग्य ते निर्देश पोलीस प्रशासनास दिले.
-
परंतु त्यांना प्रदीर्घ काळ तुरुंगात काढावा लागला यामागे सरकारी योजना आणि एकूण न्याय-व्यवस्थेतील दिरंगाई कारणीभूत असावी. वास्तविक, एका ठिकाणी फौजदारी केस चालू असताना दुसऱ्या ठिकाणच्या केससाठी “Production Warrant” काढता येतो. परंतु, कोबाड तिहार जेलमध्ये असताना दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिल्लीची केस पूर्ण होईपर्यंत त्यांना कुठेही बाहेर पाठविण्यास मनाई केली आणि त्यामुळे इतर राज्यांच्या प्रकरणांमध्ये विलंब झाला. पण दिल्लीची केसच सहा वर्षांहून अधिक काळ चालली.
या प्रदीर्घ तुरुंगवासात कोबाड गांधी यांना क्रांतीविषयक तत्वज्ञान, मानवजातीचे भविष्य, साम्यवादी चळवळीची पीछेहाट व माओवाद्यांची कार्यपद्धती या सर्व विषयांवर चिंतन-आत्मचिंतन करण्यास भरपूर वेळ मिळाला. भांडवलशाही व्यवस्था ही हृदयशून्य, परात्मभावी नि अधिकाधिक लोकांना दारिद्र्य-रेषेखाली लोटणारी असल्यामुळे ही व्यवस्थाच नको याबद्दल कोबाड ठाम आहेत. जागतिक नि विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती देशाची आर्थिक सूत्रे गेली असून या कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतातून पैसा ओरबाडून नेत आहेत. सर्वपक्षीय सरकारे याकामी त्यांना केवळ सहाय्य करीत आहेत. त्यामुळेच, सर्वंकष अर्थक्रांती व राज्यक्रांती अत्यावश्यक आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे उच्चाटन, पर्यावरणाचा समतोल साधत स्वदेशी उद्योगांचा विस्तार, सर्वांना मोफत शिक्षण व स्वास्थ्यसेवा अशी आर्थिक उद्दिष्टे ठेवण्याची ते सूचना करतात. स्वदेशीच्या बाबतीत राजीव दीक्षित यांनी घेतलेल्या परिश्रमांचे कोबाड कौतुक करतात. तसेच दिवसेंदिवस अधिकाधिक केंद्रीकृत होत चाललेल्या भारतीय राज्यसंस्थेने थोडी लवचिकता ठेऊन खरोखर संघराज्य पद्धतीचा अवलंब केला तर काश्मीर, पंजाब व पूर्वोत्तर भारतातील समस्या लवकर संपुष्टात येऊ शकतात आणि आपल्याच जनतेचे ‘दमन’ करण्यासाठी लष्करावर होत असलेला प्रचंड खर्च शिक्षण नि स्वास्थ्यसेवेकडे वळविता येऊ शकेल असाही त्यांना विश्वास वाटतो.
तथापि, पैसा व सत्ता या माणसांना चटकन भ्रष्ट करू शकणाऱ्या शक्ती आहेत. मात्र क्रांतीसाठी संघर्षरत संघटनेला या दोन्ही शक्तींची आवश्यकता देखील आहे. म्हणून पर्यायी व्यवस्थेसाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ‘जाणीवा’ अधिक उंचावणे अत्यंत महत्वाचे आहे असेही कोबाड यांना वाटते. थोडक्यात, पैसा व सत्ता या शक्तींचा वापर स्वतःला भ्रष्ट होऊ न देता व अनासक्त वृत्तीने करूनच असे परिवर्तन साधता येईल. जगातील प्रत्येक व्यक्तीला आपापल्या विशेष क्षमतेचा विकास करण्याचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे असे ते मानतात. त्यामुळेच आनंदी जीवन, स्वातंत्र्य, लोकशाही व मूल्यशिक्षण यांचे बाळकडू परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना मिळण्याची व्यवस्था व्हावी; तसेच, परिवर्तनाच्या एकूण प्रक्रियेतूनच कार्यकर्त्यांस समाधानयुक्त आनंद मिळावा; विषमता–निर्मूलन हे तातडीचे ध्येय न ठेवता आनंदी-जीवन सर्वांना मिळावे हे ध्येय साम्यवादी चळवळीने बाळगावे असेही ते सुचवितात. एक उच्च नैतिक मूल्य म्हणून कोबाड यांना अहिंसेच्या तत्वाबाबत निश्चितच आस्था आहे. परंतु, कुठलीही राज्यसंस्था ही हिंसेच्या आधारावरच टिकून असल्यामुळे तिचा प्रतिकार करताना बचावात्मक हिंसा अपरिहार्य असल्याचे प्रतिपादन ते करतात.
या पुस्तकाचा लेखक एका भयंकर हिंसाचारी मानल्या जाणाऱ्या सशस्त्र चळवळीचा नेता न वाटता एक अत्यंत सहृदय, बुद्धिमान, शांत, विचारी व जणू संतत्वाकडे वाटचाल करणारा ‘तपस्वी’ असावा अशीच छाप वाचकांच्या मनावर उमटते. अवचेतन मनातून उद्भवणारे विकार कसे दूर सारावे हा प्रश्न जागरूक कार्यकर्त्यांनाही असतो. माओवादातील निरंतर क्रांतीची कल्पना कोबाड यांना म्हणूनच भावते. एकेकाळी देशातील दीडदोनशे जिल्ह्यांमध्ये प्रभाव राखून असलेली माओवादी चळवळ आज खूपच रोडावली आहे. अनुराधा किंवा कोबाड गांधींसारख्या स्वच्छ, प्रामाणिक, निर्लोभी, निर्मोही व झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांची तीव्र उणीव सध्या चळवळीत जाणवते आहे. असे असले तरीही प्रामाणिकपणे आत्मचिंतन केल्यास चळवळीचे हे अपयशदेखील मानवजातीच्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणारी एक पायरी ठरू शकेल यात संशय नाही.
(लेखक नामवंत विधीज्ञ व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत)
9881574954