एका न संपणाऱ्या प्रवासाची 75 वर्षे!

-डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या जयंतीनिमित्त

-विनोद शिरसाठ

1 नोव्हेंबर 1945 हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिवस, आज ते हयात असते तर त्यांनी 75 व्या वर्षात पदार्पण केले असते. सहा वर्षांपूर्वी त्यांची हत्त्या झाली, तेव्हा त्यांचे 68 वे वर्ष संपत आले होते. त्याच्या पाच-सहा महिने आधी झालेल्या अनौपचारिक संवादात दोन-तीन वेळा ते म्हणाले होते, ‘भारतातील माणसांचे सध्याचे सरासरी आयुर्मान 67 वर्षे आहे, मी ती सरासरी गाठली आहे, यापुढचे दिवस बोनस समजायचे.’ त्याच दरम्यान ते असेही म्हणत की, ‘अगदीच एखादा अपघात किंवा असाध्य आजार झाला नाही तर वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत मी आताच्याच क्षमतेने काम करीन.’ सध्याच्या काळात असाध्य आजारावर येणाऱ्या खर्चाचा विषय अधून-मधून निघायचा तेव्हा ते म्हणायचे, ‘माझ्या घरात व नात्यात खूप डॉक्टर आहेत, त्यामुळे मला असाध्य आजारपण आले तर ते उपचारात कसलीही कमी पडू देणार नाहीत, पण सर्वसामान्य माणसांना मिळतात त्यापेक्षा अधिक सुविधा मिळवून आपण जगावे अशी माझी इच्छा नाही.’

इच्छामरणाचा अधिकार/ कायदा असावा की नसावा, असा विषय निघायचा तेव्हा ते त्याचे समर्थक असायचे. अनेक नामवंत माणसांची शेवटच्या आजारपणात झालेली अवस्था ते पाहायचे तेव्हा तो विचार बोलून दाखवायचे. पण भारतासारख्या देशात त्याचा गैरवापर खूप होऊ शकतो, याची जाणीव त्यांना ते स्वतः डॉक्टर असल्याने कदाचित जास्तच होती. म्हणून त्या अधिकाराच्या मागणीचा जोरदार पुरस्कार करायला ते कमी उत्सुक असायचे. वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान, साहित्य यांच्या निकषांवर त्याबाबत त्यांच्या मनात काही विचार घोळत आहेत, असे त्या-त्या चर्चेच्या वेळी जाणवायचे.

ते रोज पहाटे चार वाजता उठत, असतील तिथे व्यायाम करीत. मग स्वतःच्या वा इतरांच्या घरी असोत वा कार्यकर्त्यांच्या शिबिरात. हॉटेलात राहण्याचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात कमी आले, पण तिथेही व्यायाम चुकवायचे नाहीत. एसटी वा ट्रॅव्हल्स गाड्याने प्रवास करत असतील तर, पहाटे गाडी थांबल्यावर आणि रेल्वेत असतील तर धावत्या गाडीतही. व्यायाम करायला त्यांना फारच थोडी जागा पुरत असे. व्यायाम झाला की, चहा घेऊन फिरायला जाणे हाही त्यांचा नित्यक्रम. त्यामुळे सामान्यतः सहा वाजता ते पूर्ण तयार असायचे, आपला कामाचा दिवस सुरू करायला. रात्री उशिरा प्रवासातून आले असतील तर मात्र कामाचा दिवस सुरू व्हायला सात वाजत असत. त्यांचा दिवस सामान्यतः रात्री दहा वाजता संपत असे. या सोळा तासांच्या कामाच्या दिवसात दुपारी एक आणि रात्री आठ या जेवणाच्या वेळा, प्रवासामुळेच काय तो त्यात पुढे-मागे असा फरक व्हायचा. जेवणाच्या आवडीनिवडी साध्याच. तेलकट, तिखट, गोड अशी काही खास आवड नाही. क्वचित कधीतरी नॉनव्हेज किंवा मासे. चहा साधारणतः तीन वेळा व्हायचा. कसलेही व्यसन नाही.

फोन, भेटीगाठी, बैठका, भाषणे, लेखन, संपादन, वेगवेगळ्या आघाड्यांवर नियोजन असा त्यांचा दिवस जायचा. दिलेल्या वेळा कटाक्षाने पाळायचा प्रयत्न असायचा. पुढच्या एक-दोन आठवड्यांत किंवा महिनाभरात त्यांच्या उलट सुलट प्रवासाचे व भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन ते सांगायचे तेव्हा, मधल्या वेळेत काही बैठका ठरवायचे आणि बहुतेक वेळा त्या बैठका ठरल्याप्रमाणे व्हायच्या. त्यामुळे एकदा गमतीने विचारले होते, ‘तुम्ही दिलेल्या वेळा पाळता यात आश्चर्य वाटावे असे काही नाही, पण तुम्ही ज्या बस गाड्यांनी प्रवास करता त्या कशा काय वेळा पाळतात?’ मुख्य किंवा नेहमीचे वास्तव्य कुठे अशा अर्थाने काही लोक, ‘तुम्ही कुठे असता/ राहता’ असा प्रश्न पूर्वी त्यांना विचारायचे. तेव्हा डॉक्टर गमतीने उत्तर द्यायचे, ‘एसटीत असतो/राहतो.’

‘तुम्ही इतका प्रवास आनंदाने करता, पण भविष्यात तब्ब्येत चांगली राहिली तरी तुमच्या फिरण्यावर मर्यादा येणार, मग काय करणार?’ असा प्रश्न एकदा विचारला. त्यावर त्यांचे उत्तर होते, ‘तसे झाले तर मी साताऱ्यात कब्बडी अकादमी सुरू करणार, शास्त्रशुद्ध कब्बडी कसे खेळावे हे लहान मुलांना शिकवणार.’

डॉक्टर दाभोलकर वयाच्या नवव्या वर्षांपासून ते पंचविशी उलटेपर्यंत कब्बडी खेळत होते. म्हणजे तब्बल पंधरा वर्षे. या काळात त्यांनी घर, शाळा- कॉलेज आणि कब्बडीचे मैदान या तीन ठिकाणी दिवसाचे प्रत्येकी सात-आठ तास वाटून दिलेले होते. कब्बडीमध्ये स्वतः खेळणे, नव्या लोकांना खेळायला प्रवृत्त करणे व शिकवणे हे काम तर त्यांनी केलेच. पण मैदानावर पाणी मारणे, ग्राउंड आखणे, कॉमेन्ट्री करणे, गरज पडली तर पंचाची भुमिका निभावणे, वृत्तपत्रांतून कब्बडी सामन्यांवर लिहिणे,  स्पर्धा आयोजित करणे इत्यादी कामे ते करीत होते. त्यांना दोन वेळा राज्य सरकारचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला, त्यातील एकदा खेळाडू म्हणून तर दुसऱ्यांदा कब्बडीच्या खेळातील अन्य योगदानासाठी. श्रीनिवास पाटील, शरद पवार व अन्य काही लोकांच्या मनात कब्बडी खेळाडू नरेंद्र दाभोलकर ही प्रतिमा अजूनही आहे. ‘शास्त्रशुद्ध कबड्डी कसे खेळावे’ या विषयावरील मराठीतील पहिले पुस्तक नरेंद्र दाभोलकर यांच्या नावावर आहे, ते पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केले होते आणि त्याला त्यावेळचे क्रीडा राज्यमंत्री शरद पवार यांनी प्रस्तावना लिहिली होती.

आंतरराष्ट्रीय कब्बडीच्या स्पर्धा बहुदा नव्यानेच सुरू झाल्या होत्या तेव्हा, बांगलादेशच्या दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय कब्बडी संघात नरेंद्र दाभोलकर हा एक खेळाडू होता. पण 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत तो दौरा रद्द झाला. आणि त्यानंतर वर्षभराने त्यांनी कब्बडी खेळणे थांबवले. तेव्हा त्यांच्या वयाची पंचविशी उलटली होती. आता जर-तरला अर्थ नाही, पण कल्पना करा: डॉ. दाभोलकर आज हयात असते आणि पंचाहत्तरी नंतर त्यांचे फिरणे/ प्रवास करणे थांबले असते आणि म्हणून त्यांनी खरोखरच कब्बडी अकादमी सुरू केली असती तर? तर राष्ट्रीय नव्हे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या अकादमीतून तयार झाले पाहिजेत अशीच आकांक्षा बाळगून त्यांनी साताऱ्यातील त्या कब्बडी अकादमीतून काम केले असते..! म्हणजे वयाची 25 ते 75 ही पन्नास वर्षे सार्वजनिक काम आणि त्याआधी व त्यानंतर शास्त्रशुद्ध कब्बडी असे त्यांचे जीवन राहिले असते.

डॉक्टरांचे सार्वजनिक म्हणावे असे आयुष्य चाळीस वर्षांहून अधिक आहे. त्यातील शेवटची जवळपास तीस वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन आणि त्याचबरोबर शेवटची पंधरा वर्षे साधना साप्ताहिक, अशी त्यांची ठळक कारकीर्द आहे. दरम्यानच्या काळात इतर लहान मोठ्या आघाड्या वा प्रयोग, हा स्वतंत्र विषय मानला व नीट समजून घेतला तर कदाचित, अंधश्रध्दा निर्मूलन व साधना साप्ताहिक या दोन क्षेत्रांतील त्यांचे काम अधिक चांगले कळू शकेल. ‘डॉ दाभोलकरांनी साधना कशी वाढवली?’ या शीर्षकाचा दीर्घ लेख त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी साधनात लिहिला आहे, पण त्याबाबत एक पुस्तक लिहून होईल इतका ऐवज बाकी आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे तर काय, त्यांनी स्वतःच बारा पुस्तके लिहून ठेवली आहेत आणि तरीही आणखी कितीतरी खंड लिहून/ संपादन करून होतील इतके काम बाकी आहे.

डॉ. दाभोलकरांची तीन पुस्तके इंग्रजीत आणि सहा पुस्तके हिंदीत मागील वर्षी आली आहेत. पुढील दोन-तीन वर्षांत उर्वरित पुस्तकेही हिंदी व इंग्रजीत प्रकाशित होतील. या प्रकारची पुस्तके भारतातील अन्य कोणत्याही भाषांमध्ये नाहीत, कारण डॉक्टरांचे लेखन चळवळीतून आकाराला आलेले आहे आणि अशा प्रकारची चळवळ अन्य कोणत्याही राज्यामध्ये एवढ्या सखोल व  व्यापक प्रमाणात झालेली नाही. पण अन्य राज्यांमध्येही जुनाट रुढी परंपरा आहेत,  अज्ञानातून वा बुवाबजीतून येणाऱ्या अंधश्रद्धा आहेत, धर्माला ग्लानी आलेली आहे. त्यातून आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण होतेच आहे. तिथेही वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याची गरज जाणवते आहे. त्यासाठी या ना त्या प्रकारे काम होणे आवश्यक आहे. म्हणजे आज ना उद्या तशा व्यक्ती, संस्था, संघटना यांचा उदय होणारच आहे. मग त्या सर्वांना आपल्या पूर्वसुरींचा शोध घ्यावा लागेल. त्या शोधातून त्यांना नरेंद्र दाभोलकर यांच्यापर्यंत यावे लागेल. त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद आपापल्या भाषांमध्ये करावे लागतील, त्यांची भाषणे आपापल्या भाषांमध्ये डब करावी लागतील.

कोणी सांगावे पुढील काही वर्षांत असे तंत्रज्ञान आकाराला येईल ज्यामुळे डॉ दाभोलकर यांचे भाषण त्यांच्याच आवाजात पण गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, बंगाली, मल्याळम, आसामी आणि नामशेष होत चाललेल्या बारक्या-बारक्या भाषांमधूनही सहजासहजी ऐकता येतील. हे सर्व घडून यायला आणखी कदाचित पाव शतक लागेल, तेव्हा डॉ. दाभोलकरांची जन्मशताब्दी आलेली असेल.

त्यानंतर काय होईल? जगात पिछाडीवर असलेले अनेक देश असे आहेत जे भारताच्या मानाने पंचवीस ते पन्नास वर्षे पिछाडीवर आहेत. त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान वेगाने पोहचत आहे, तिथल्या समाजातही खूप मोठी घुसळण चालू आहे, तिथेही एकाकी लढणारे समाजयोद्धे पुढे येत आहेत. त्या सर्व ठिकाणे सर्व प्रकारच्या अंधश्रध्दा आहेत,  त्यातून येणारे शोषण मोठ्या प्रमाणात आहेच. आणि तिथेही धर्म व विज्ञान यांना समाजसन्मुख करणे बाकी आहे. त्यामुळे, तिथले लोकही जगातील अन्य समविचारी लढवय्यांचा शोध घेणारच आहेत. आणि मग तंत्रज्ञानाच्या झपाट्यामुळे ते योद्धे व त्या संघटना डॉ. दाभोलकर व अंधश्रध्दा निर्मूलन समिती यांच्या कमापर्यंत येणारच आहेत. हे घडून यायला कदाचित आणखी पन्नास किंवा पाऊणशे वर्षे लागतील. तेव्हा डॉ दाभोलकरांची सव्वाशेवी किंवा दिडशेवी जयंती साजरी होईल. तेव्हाही ‘एक न संपणारा प्रवास’ या डॉक्टरांच्या लेखाचा उल्लेख होईल आणि त्यातील “मी ज्या क्षेत्रात आहे तिथे कामाचा विचार दशकांच्या नव्हे तर शतकांच्या कालावधीत करावयास हवा, याची मला जाणीव आहे.” हे विधान दर्शनी भागात ठळक अक्षरांत लावलेले असेल… आणि हे सर्व पाहायला आज पंचविशीत असलेले अनेक महाराष्ट्रीय युवक जिवंत असतील.

सारांश, डॉ. दाभोलकरांना मारणारे कधीच मेले, डॉ. दाभोलकर जिवंत आहेत!

(साभार: कर्तव्य साधना डिजिटल पोर्टल)

Previous articleजनमताचा अनादर करणारा पोरखेळ !
Next articleविरुबाई : आंदणी ते मातुश्रीसाहेब
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.