ज्या देशाला भूमीपुत्र गोतम बुद्ध, राजा बळी, छत्रपती शिवराय यांचा वारसा लाभला आहे त्याच देशातील शेतकरी मात्र मायबाप सरकारच्या क्रूर नीतीमुळे भयभीत झाला आहे. शेती व्यवस्थेतून तो आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल असे वातावरण दिसत नाही. लोकांचे लोकांसाठी असलेले सरकार मात्र लोकांसाठी कामच करत नाही हे शेतकऱ्यांच्या एकंदर अवनती वरून आता सिद्ध झाले आहे. बळी तोच आहे फक्त वामनाने आपले रूप बदलले आहे. इंग्रजी राजवटीतही तो लुटला जात होता आणि आता काळ्या इंग्रजांकडूनही त्याची लूट कायमच आहे.सरकार कोणाचेही असो ते कायम या पोशिंद्याच्या विरोधातच असते हे सांगायला आता कुण्या कृषी अर्थतज्ञांची गरज नाही .शेतकऱ्यांनी रात्रंदिवस घाम गाळावा अन शेती न करणाऱ्यांना जगवाव यालाच म्हणतात का हरितक्रांती? मन सुन्न करणारा हा प्रश्न आहे.निवडणुकीपूर्वी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देऊ, सातबारा कोरा करू, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू अशा घोषणा करायच्यात अन् सत्ताप्राप्तीनंतर मात्र चुनावी जुमल्याची भाषा करायची हा क्रूरपणा आहे.