फॅशिझमची वेगवेगळी रूपं

मूळ लेखक -उंबेर्टो एको

(अनुवाद आणि टिप्पणी मुग्धा कर्णिक)

दुसऱ्या जागतिक महायुद्धात जर्मनी-इटलीच्या दारूण पराभवासोबत फॅशिझम संपला असे काहीसे अनेक लोकांना वाटते. पण फॅशिझमची वैशिष्ट्ये त्या तेवढ्याच कालखंडापुरती होती असे वाटणेच चूक आहे. आपल्याला फॅशिझमची वैशिष्ट्ये काय याबाबतच संभ्रम असतो. त्यामुळे हिटलर-मुसोलिनी तेवढे फॅशिस्ट होते असे अनेकांना वाटले तर नवल नाही.
पण एक विचारसरणी म्हणून फॅशिझमची मुळे तशी फार पूर्वीपासून आहेत आणि रहातील. म्हणून त्याचा विचार आपण मूळ फॅशिझम किंवा शाश्वत फॅशिझम म्हणून करायला हवा. उंबेर्टो एको या जगद्विख्यात विचारवंत, लेखकाने फॅशिझम कसा विविध रुपांत, विविध संगतींमध्ये सापडत आला होता आणि सापडत राहील याचे एक फार मनोज्ञ विश्लेषण त्याच्या एका लेखात केले आहे. नाझीवाद हा फॅशिझमचे एकमेव रूप नव्हे. तो एक. टोकाच्या असलेल्या अनेक वर्चस्ववादी विचारसरणींना नाझीवाद म्हणता येत नाही पण त्यात फॅशिझमचे रंग सापडतात अशी मांडणी त्याने केली आहे.
आज भारतातील हिंदुत्ववाद्यांना, इस्लामवाद्यांना फॅशिस्ट संबोधले की राग येतो. आम्ही कुठे तसे आहोत असे ते सात्विक संतापाने म्हणतात. पण उंबेर्टो एकोने स्पष्टच म्हटले आहे की फॅशिझमचा खेळ वेगवेगळ्या रुपांत खेळला जाऊ शकतो आणि त्यामुळे त्या खेळाचे नाव बदलत नाही. तो फॅशिझमच रहातो. त्याने चौदा मुद्द्यांची मांडणी केली आहे. संपूर्ण लेखात त्याचे स्वतःचे अनुभव, फॅशिस्ट इटलीतील काही घटना, मुसोलिनी आणि त्याच्या टोळीची वैशिष्ट्ये असे बरेच काही आहे. पण त्यातील चौदा मुद्दे महत्त्वाचे आहेत. फॅशिझमच्या राजकीय वैशिष्ट्यांच्या विविधतेमध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये काहीकाही समान छटा असतात. त्यामुळे वेगवेगळे गट काही बाबतींत अगदी सारखे आहेत असं आपण म्हणतो. या समान छटा कधी जास्त असतात कधी कमी. पण त्यातल्या काही छटा असल्या तरीही फॅशिझम ओळखता येतोच. फॅशिझमच्या आलटूनपालटून बदलणाऱ्या रंगछटांमुळे फॅशिझमचे रूप बदललेले वाटले तरीही त्याची सर्व वैशिष्ट्ये लक्षात ठेवली तर त्याचा गाभा ओळखू येतो असे फॅशिझमच्या शाश्वततेची मांडणी करणारे हे चौदा मुद्दे अनुवाद करून देते आहे.
—————
फॅशिझम ही संज्ञा सर्रास वापरली जाऊ लागली कारण कोणत्याही फॅशिस्ट राजवटीतून एक किंवा दोन वैशिष्ट्ये उणे झाली तरीही तिची फॅशिस्ट छाप छपत नाही. कमी-अधिक तीव्रतेच्या फॅशिस्ट राजवटींचे निरिक्षण करून मी ज्याला फॅशिस्ट मूलतत्व किंवा शाश्वत फॅशिझम म्हणतो त्याच्या वैशिष्ट्यांची यादी करणे शक्य आहे असे मला वाटते. या यादीत दिलेली ही वैशिष्ट्ये एकाच व्यवस्थेची ठाशीव अंगे असतातच असे नाही. त्यातील अनेक एकमेकांशी विसंगतही वाटतील आणि त्याचवेळी इतर वेगळ्या हुकूमशाही किंवा कट्टर विचारसरणीचीही ती वैशिष्ट्ये असू शकतील. पण त्यातले एक वैशिष्ट्य जरी हजर असेल तर त्या भोवती फॅशिझमचा चिकटा जमू शकतोच.

१- शाश्वत फॅशिझमचे आद्य वैशिष्ट्य म्हणजे परंपरावादाचा उदोउदो. परंपारिकतावाद हा अर्थातच फॅशिझमपेक्षा बराच जुना आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर प्रतिक्रांतीवादी कॅथलिक विचार, ग्रीक विवेकवादाविरुद्ध आलेली प्रतिक्रिया हे त्याचेच नमुने. भूमध्यसागराच्या पट्टीत विविध धर्मांचे लोक रोमनांच्या धारणांत मिसळून गेलेले असताना त्यांना प्राचीन परंपरांत सांगितलेल्या साक्षात्कारांची स्वप्ने पडू लागली- ते साक्षात्कार म्हणे इजिप्शियन चित्रलिपींत दडवलेले होते, सेल्टिक मंत्राक्षरांत होते आणि आशियाच्या काही धर्मांच्या पुरातन लेखांत होते. हे नवीन सांस्कृतिक मिश्रण वेगवेगळ्या श्रद्धांचे, कर्मकांडांचे मिश्रण होते- आणि त्यामुळे काही प्रमाणात विरोधाभास, विसंगतींनी भरलेलेही होते. प्रत्येक प्राचीन उपदेशांत शहाणीवेचा किंचितसा अंश नक्कीच असे आणि जर त्यांच्यात काही फरक असतील तर ते सारे रुपकात्मकरित्या त्याच एका अंतिम सत्याकडे जाणारे वगैरे असत. परिणामी, ज्ञानसाधनेत फारशी प्रगती होत नव्हती. सत्य आधीच कुणीतरी सांगूनच ठेवलेले होते- एकदाच आणि सर्वांसाठी. आता सर्वांचे काम एकच- त्या धूसर उपदेशांचा अर्थ लावत बसणे. प्रत्येक फॅशिस्ट राजवटीचे सिलॅबस पाहिल्यास हेच दिसते की त्यांत कुणी ना कुणी परंपरावादी विचारक होते. नाझी ज्ञानमार्गाचे भरणपोषण परंपरावादी, समरसतावादी, आणि पारलौकिकावर श्रद्धा असणारांनी केले. होली ग्रेलवरचा विश्वास, अल्केमी, प्राचीन रोमन साम्राज्य, जर्मेनिक साम्राज्य यांच्यातून प्रेरणा घेत इटलीचे उजवे पंथ वाढत होते. समरसता दर्शवण्यासाठी ते तोंडी लावण्यासाठी काही इतर विचारवंतांनाही महत्त्व देत. सेन्ट ऑगस्टीन हा काही फॅशिस्ट नव्हता- अमेरिकन न्यू एज पुस्तकांत तोही सापडतो. पण सेन्ट ऑगस्टीन आणि स्टोनहेन्ज एकत्र आणले की लक्षण मिळते ते फॅशिस्ट मूलतत्वाचे.

२- परंपरावादात आधुनिकतेचा अस्वीकार अध्याहृत आहे. परंपरावादी विचारवंत तंत्रज्ञानाला पारंपारिक आध्यात्मिक मूल्यांच्या विरुद्ध मानतात पण फॅशिस्ट्स आणि नाझी दोघेही आधुनिक तंत्रज्ञानाचे पूजकच होते. पण नाझीवादाला आपल्या औद्योगिक यशाचा अभिमान होता तरीही त्यांनी आधुनिकतेची, विकासाची केलेली भलामण म्हणजे केवळ ‘ब्लट उंड बोडेन’ या त्यांच्या जर्मन राष्ट्राच्या तत्वज्ञानाच्या पृष्ठभागावरची चकाकी होती. आधुनिकतेला नकार देणे हे भांडवलदारी जीवनमार्गाच्या धिक्काराच्या अवगुंठनाखाली केले जात होते. शिवाय फ्रेंच राज्यक्रांतीचे किंवा अमेरिकन राज्यक्रांतीचे व्यक्ती स्वातंत्र्याचे विचार त्यात मुख्यतः नाकारले जात होते. प्रबोधनाचे युग, विवेकाचे युग म्हणजे आधुनिक काळातील सडका काळ असेच त्यात मानले जात होते. या दृष्टीने फॅशिस्ट मूलतत्वाची दुसरी व्याख्या होते अविवेकवाद.

३- अविवेकवादाचा आधार असतो कर्मकांडाचा पंथ. ते अमुक एक कर्मकांडच इतके सुंदर मानले जात असते की त्याचा काहीही विचार, पुनर्विचार न करता ते तसेच्या तसे पार पाडायचे असते. विचार करणे म्हणजे एक प्रकारे नामर्दपणाचीच क्रिया समजली जाते. त्यामुळे संस्कृतीबद्दल चिकित्सक दृष्टीकोन घेणे संशयास्पदच मानले जाते. बुद्धिवंतांच्या जगाबद्दलचा अविश्वास हे तर फॅशिस्ट मूलतत्वाचे चिरंतन वैशिष्ट्य आहे- गोअरिंगने म्हणे म्हटले होते- संस्कृतीची चर्चा कानावर पडली की माझा हात बंदुकीवरच जातो. याशिवाय बुद्धिवंतांना धिक्कारणारे बाकीचे प्रसिद्ध शब्दप्रयोग आहेतच- सडके बुद्धिवंत, अतीशहाणे लोक, बायले पोषाखी लोक, विद्यापीठांत लालभाई भरलेले असतात* (*हेच शब्दप्रयोग सध्या भारतात जरा वेगळे पण तेच ध्वनित करणारे आहेत आपल्याला कल्पना आहेच). फॅशिस्टांचे अधिकृत बुद्धिवंत मुख्यतः आधुनिक संस्कृती आणि उदारमतवादी बुद्धिवंतांवर परंपरागत मूल्यांशी गद्दारी केल्याबद्दल हल्ला चढवण्याचे काम करत असतात.

४- कुठल्याही समरसतावादी श्रद्धेला विश्लेषक चिकित्सा,टीका सहन होत नसते. चिकित्सा करण्याचे भान असले की विश्लेषण होते, मतभिन्नता येते आणि हे तर आधुनिकतेचे लक्षण आहे. आधुनिक विचारांत वैज्ञानिक जगात वाद घालणे, मतभिन्नता दर्शवणे हे ज्ञानात भर पाडण्याचे साधन मानले जाते. फॅशिझममध्ये मनभिन्नता म्हणजे द्रोहच.

५- मतभिन्नता हे वैविध्याचेही लक्षण ठरते. शाश्वत-फॅशिझमची वाढच या तत्वाविरुद्ध आहे. भिन्नतेबद्दल मानवी मनात असलेली नैसर्गिक भयाची भावनाच वाढवत नेऊन आणि वापरून फॅशिझम बळावतो. कोणत्याही फॅशिस्ट किंवा शिशु-फॅशिस्ट चळवळीचे पहिले आवाहन असते ते कोणत्याही नवागतांविरुद्ध, कोणत्याही वेगळ्या लोकांविरुद्ध. त्या दृष्टीने फॅशिस्ट मूलतत्व हे मूलतःच वर्णभेदी किंवा वर्णद्वेषी आहे.

६- फॅशिस्ट मूलतत्वाचे जनन एखाद्या व्यक्तीकडून होते किंवा सामाजिक नैराश्यातून प्रसवते. त्यामुळे ऐतिहासिक फॅशिझमचे एवंगुणवैशिष्ट्य हे नेहमीच निराश झालेल्या मध्यमवर्गाला आवाहन करणे हेच होते. हा वर्ग नेहमीच आर्थिक संकटांनी ग्रस्त असतो किंवा राजकीय फसवणूक झाल्याने त्रस्त असतो- शिवाय तो आपल्यापेक्षा खालच्या स्तरातील समाजाच्या वाढत्या दबावामुळे भयाकुल झालेला असतो. आपल्या या काळात- आता जुना सर्वहारा वर्ग निम्न मध्यमवर्गीय बनत जातो आहे, आणि त्यातील दिशाहीनांना कसलाच राजकीय वाव नाही… अशा वेळी उद्याच्या फॅशिस्टांना या नव्या बहुसंख्येत आपला समर्थक सापडणार आहे.

७- ज्या लोकांना आपली सामाजिक ओळख हरवल्याची भावना येते त्यांच्यासाठी फॅशिझम एकच विशेष ओळख देतो- आपण एकाच देशात जन्मल्याची ओळख. राष्ट्रवादाचे मूळ यातच आहे. ही राष्ट्रीय ओळख देण्यासाठी अर्थातच शत्रूची गरज असते. मग शत्रू आणि शत्रूचे कारस्थान, जमल्यास आंतरराष्ट्रीय कारस्थान याची गरज निर्माण होते. सर्व अनुयायांना आपण संकटात आहोत अशी भावना येणे आवश्यक होते. आणि मग या कारस्थानाचा उलगडा करण्यासाठी शत्रूराष्ट्रातील लोकांचा निस्सीम द्वेष आवश्यक होतो. पण अखेर या कारस्थानाची मुळे अंतर्गत असायला लागतात.- जे शत्रू बाहेर आहेत त्यांच्यातलेच आतही असल्यास सोपे लक्ष्य मिळते.

८- यांच्या विचारांच्या अनुयायांना आपल्या शत्रूकडची संपत्ती आणि शक्ती यामुळे अधिक्षेप झाल्याची भावना आलीच पाहिजे. मी लहान होतो तेव्हा मला सांगण्यात आले होते की इंग्लिश लोक हे दिवसातून पाच वेळा जेवणारे लोक आहेत. गरीब आणि साध्यासुध्या इटालियनांपेक्षा ते फार जास्तवेळा खातात. ज्यू लोक श्रीमंत असतात आणि एकमेकांना मदत करण्याचे त्यांचे गुप्त असे जाळे असते. पण असल्या समजांबरोबरच फॅशिस्ट विचारांच्या अनुयायांना आपण शत्रूला नामोहरम करून शकतो असा आत्मविश्वास असावा लागतो. सततच्या भाषणबाजीतून एकदा शत्रूला दुबळे ठरवायचे एकदा फार धोकादायक, शिरजोर ठरवायचे असे अलटपलटवार केले जातात. शत्रूचे पाणी जोखण्यात फॅशिस्ट सरकारांना अपयश येणार हे ठरलेलेच आहे, कारण त्यांना शत्रूचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे कधीही शक्य होत नसते.
फॅशिस्टांसाठी जीवनासाठी संघर्ष नसतोच, तर, जीवन हे संघर्षासाठीच व्यतीत करायचे असते. त्यामुळे शांतीवादी भूमिका म्हणजे शत्रूशी हातमिळवणी ठरवली जाते. शांतता वाईट कारण जीवन हे सततचे युद्ध आहे हीच भूमिका आत्मसात् केलेली असते. त्यामुळे या सर्वांनाच युद्धगंड तयार होतो. युद्धाशिवाय काहीही खरं नाही असंच त्यांना वाटू लागतं. कारण अंतिम युद्धात शत्रूचा पराभव करून, चळवळीचा विजय होईल आणि साऱ्या जगावर आपली सत्ता चालेलं अशी त्यांची स्वप्ने असतात. पण अशा प्रकारचं ‘अंतिम उत्तर’ मिळवल्यानंतर येणार असतो तो शांतीचा काळ किंवा सुवर्णयुग… पण हे विसंगत असते कारण मग निरंतर युद्धाच्या तत्वाचा बोजवारा उडतो. कुठल्याही फॅशिस्ट नेत्याला या प्रश्नाचे उत्तर देता आलेले नाही.

९- एलिटिझम म्हणजे भद्रवाद हे कुठल्याही प्रतिगामी विचारसरणीचे वैशिष्ट्य असते, जे मूलतः सरंजामी किंवा युद्धवादी भद्रवादात तर दुबळ्यांचा तिरस्कार फार क्रूरतेने केला जातो. फॅशिस्ट मूलतत्वामध्ये भद्रवादात लोकांनाही सामील करून घेतले जाते. जगातली सर्वोत्तम लोक या देशाचे नागरिक असतात, पक्षाचे सदस्य या नागरिकांतले सर्वोत्तम लोक असतात, आणि प्रत्येक नागरिक हा पक्षाचा सदस्य असावाच लागतो. पण अखेर सर्वसामान्यांचे अस्तित्व असेल तरच असामान्य भद्रलोकांचे अस्तित्व असेल. पक्षाच्या नेत्याला हेही माहीत असते की आपण सत्तेपर्यंत पोहोचलो आहोत ते काही लोकशाही मार्गाने नसून बळाचा वापर करून- त्याला हेही कळते की त्याचे बळ हे सामान्यजनांच्या दुबळेपणावर आधारित आहे, कारण ते इतके दुबळे आहेत की त्यांना त्याच्यासारख्या नेत्याची गरज भासते. हा संपूर्ण पक्षगट एका उतरंडीवर- सैनिकी मॉडेलवर- रचलेला असल्याने प्रत्येक दुय्यम नेत्याला त्याच्या हाताखालच्यांबद्दल तुच्छता वाटते. प्रत्येकालाच खालच्या थराबद्दल तिरस्कार वाटतो. त्यातून एक सार्वत्रिक भद्रवाद आकाराला येतो.

१०- अशा प्रकारच्या परिप्रेक्ष्यात प्रत्येकासमोर नायक बनण्याच्या आदर्शाचे धडे ठेवले जातात. प्रत्येक दंतकथेत नायक म्हणजे अपवादात्मक शक्ती असलेला माणूस असतो, पण फॅशिस्ट मूलतत्वामध्ये नायकत्वाची अपेक्षा ही सर्वसामान्य असते. लोक मरायलाही तयार होतात. बिगर-फॅशिस्ट समाजांमध्ये साध्यासुध्या लोकांनाही हेच शिकवलेले असते की मरण कितीही नकोसे असले तरीही त्याला धीराने सामोरे जायला हवे, श्रद्धाळूंना शिकवले जाते की पारलौकिक आनंदाच्या प्राप्तीसाठी मरणयातना सोसाव्याच लागतात. याविरुद्ध, उर-फॅशिस्ट नायकाला वीरमरणाची आस असते, वीरमरण हेच पारितोषिक हे त्याच्या मनावर ठसलेले असते. फॅशिस्ट नायक मरणातुर असतो. आणि या आतुरतेपोटी तो इतर अनेक लोकांनाही मरणाच्या दारात पाठवतो.

११- सततचे युद्ध आणि नायकगिरीचे खेळ खेळायला जरा अवघडच असतात त्यामुळे उर-फॅशिस्ट आपली सत्तेची आस लैंगिकतेकडे वळवतो. ‘मर्दपणाचे’ अवडंबर यातच दडलेले आहे- यातून स्त्रियांकडे बघण्याचा तुच्छतेचा दृष्टीकोन, वेगळ्या लैंगिकतेबद्दल तिरस्कार, घृणा व्यक्त करणे, ब्रह्मचर्य किंवा समलैंगिकता यांबद्दलही तिटकारा व्यक्त करणे या गोष्टी मर्दानगीतच मोडतात. लैंगिक जीवनही साधेसोपे नसते, त्यामुले फॅशिस्ट वीर शस्त्रांशी खेळणे पसंत करतो, शस्त्रांशी खेळणे हा एक छद्मलैंगिक उपचार बनतो.

१२- फॅशिस्ट मूलतत्व हे निवडकांत लोकप्रिय होण्यावर किंवा गुणवैशिष्ट्यपूर्ण लोकप्रियतावादावर आधारलेला आहे असे म्हणता येईल. लोकशाहीत व्यक्तीला हक्क असतात, पण नागरिकांचा राजकीय प्रभाव फक्त संख्येतूनच व्यक्त होत असतो आणि बहुसंख्येचा निर्णय कुणालाही मान्य करावा लागतो. पण फॅशिस्ट मूलतत्वामध्ये व्यक्तीला व्यक्ती म्हणून काहीही हक्क नसतात आणि ‘लोक’ ही संज्ञा म्हणजे जणू एक गुणविशेषच असतो. सर्वेच्छा व्यक्त करणारे एक एकसंध अस्तित्व. कुणाही एका भल्या मोठ्या मानवी गटाला सामायिक इच्छा असूच शकत नसते, त्यामुळे त्यांचा नेता या इच्छेला उद्गार देत असल्याचे नाटक वठवतो. आपली निर्णयक्षमता, नियुक्तीक्षमता हरवून बसलेला लोकसमूह काहीही कृती करत नाही. ते केवळ आपण ‘लोक’ असल्याची भूमिका वठवत रहातात. त्यामुळे ‘लोक’ किंवा जनता हे एक खोटेखोटे नाटक उरते. यासाठी ना रोममधल्या चौकाची गरज उरते, ना न्युरेम्बर्ग स्टेडियमची. आपल्यासाठी भविष्यात टीव्ही किंवा इंटरनेट आवाजी पुरेशी आहे, यात नागरिकांच्या लहानशा गटाचा भावनिक प्रतिसाद हा लोकांचा आवाज म्हणून सादर केला जाऊ शकतो, आणि मान्यही केला जाऊ शकतो.

१३- निवडक वेचकांत लोकप्रिय होण्यासाठी फॅशिस्ट मूलतत्वाला ‘सडक्या संसदीय शासनव्यवस्थेविरुद्ध’ असावेच लागते. मुसोलिनी संसदेत जे बोलला त्यातलं पहिलं वाक्य होतं. ‘ही कोंदट, बहिरी जागा मला माझ्या सैन्याचं निवासस्थान म्हणून बदलून टाकायला आवडेल’. आणि खरोखरच त्याने त्याच्या सेनाधिकाऱ्यांना चांगली निवासस्थाने देवववी आणि लवकरच संसद बरखास्तही करून टाकली. जेव्हाजेव्हा कुणीही राजकारणी संसदेच्या अस्तित्वावर, तिच्या कायदेशीरपणाबद्दल संशय व्यक्त करतो, ती जनतेचे प्रतिनिधीत्व करत नाही म्हणतो, तेव्हातेव्हा आपल्याला फॅशिस्ट मूलतत्वाचा दुर्गंध जाणवायला हवा.

१४- फॅशिस्ट मूलतत्व न्यूस्पीकची भाषा बोलते. १९८४ या आपल्या कादंबरीत ऑर्वेलने इंगस़ॉकची, इंग्लिश सोशलिझमची अधिकृत भाषा म्हणून न्यूस्पीकची ओळख करून दिली. पण फॅशिस्ट मूलतत्वाचे घटक हे विविध प्रकारच्या हुकूमशाहींतून दिसून येतात. सर्व नाझी किंवा फॅशिस्ट पाठ्यपुस्तकांतून अगदीच दळभद्री शब्दयोजना दिसून येते, आणि भाषा अगदी सोपी, प्राथमिक दर्जाची असतो. गुंतागुंतीचा किंवा विश्लेषणात्मक विचार करणे शक्य होईल अशी साधनेच विद्यार्थ्यांहाती दिली जात नाहीत. न्यूस्पीकचे वेगवेगळे अवतार ओळखण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे, अगदी ते लोकप्रिय टॉक-शोच्या निरागस अवतारात आले तरीही आपण ते ओळखून घेतले पाहिजेत.

(मुग्धा कर्णिक या अभ्यासिका असून रोखठोक मते व लेखनासाठी त्या ओळखल्या जातात)

[email protected]

Previous article१९ मार्च: शेतकऱ्यांच्या चिरवेदनेचे स्मरण करावयाचा दिवस
Next articleकिसानपुत्रांची अनोखी लढाई
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.