एक खामोशी है सुनती है कहा करती है..!!!

नीलांबरी जोशी

ती. तरुण, देखणी, आत्मविश्वास खच्चून भरलेली.. “ग्लोबल व्हिलेज” या संकल्पनेतल्या एका वैश्विक कंपनीतली उच्चपदस्थ अधिकारी. ती ग्रीसमध्ये येते ते तिच्या कंपनीच्या तिथल्या शाखेतल्या लोकांना काढून टाकून ती शाखा profit मध्ये आणण्यासाठी. दरम्यान ती एका ग्रीक माणसाच्या प्रेमात पडते..

“शब्देविण संवादु” अशा या प्रेमात “संभ्रम, स्वप्नं, तळमळ, सांत्वन किती किती तऱ्हा असतात.. साऱ्यांच्या सारख्याच जीवघेण्या आणि खोल जिव्हारी ठसतात..” या दिशेनं त्यांच्यातला प्रवास सुरु होतो.. पण मग एक अपरिहार्य वळण येतंच..

तो जिथे काम करतो आहे त्याच कंपनीतल्या माणसांना काढून टाकायचं काम तिच्याकडे आहे.. आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं तर डिपार्टमेंटच बरखास्त करायची वरुन आॉर्डर आहे.. आता ती काय करेल?

**********

“Worlds Apart” या ग्रीक चित्रपटात समोर येणाऱ्या तीन प्रेमकथांमधली ही एक..! ग्रीसमध्ये २०१५ साली युरोपियन युनियनच्या कर्जापायी भीषण आर्थिक संकट ओढवलं होतं त्या पार्श्वभूमीवर या कथा घडतात. अत्यंत वेगळ्या धाटणीच्या, वेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या वयांच्या प्रेमिकांमध्ये घडणाऱ्या या तीनही प्रेमकथांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे तीनही कथांमधल्या प्रेमिकांचे देश आणि भाषा वेगवेगळ्या आहेत..

इरॉस आणि सोलची प्रेमकथा हा यातल्या कथांना गुंफणारा एक धागा आहे.. इरॉस म्हणजे क्युपिड. “Swipe left – swipe right” च्या जमान्यातही हृदयाचा वेध घेऊन आपल्या प्रेमात त्यांना घायाळ करण्यासाठी हातात चिमुकलं धनुष्यबाण घेऊन सज्ज असलेला क्युपिड अजूनही लोकप्रिय आहे. क्युपिड या लॅटिन नावाचा मूळ ग्रीक देव म्हणजे इरॉस. सायकी ही सुंदर युवती. तिचं मूळ ग्रीक नाव सोल. प्रेमात पडल्यानंतर चिकाटीनं आपल्या प्रेयसीची आराधना करणारा इरॉस आणि चिरंतन प्रेमासाठी सगळे अडथळे पार करणारी सोल यांची इरॉस आणि सोल यांची प्रेमकथा अजरामर आहे.

Worlds Apart चित्रपट सुरु होतो तेव्हा याच इरॉस आणि सोलची कथा असलेलं “सेकंड चान्स” हे पुस्तक घेऊन ग्रंथालयात येऊन थबकलेला एका साठीतला माणूस दिसतो.. अचानक रात्रीच्या वेळी एका अंधारलेल्या कोपर््या त एका तरुणीवर जबरदस्ती करु पहाणार््याr टोळक्याला उधळून लावणारा एक बेघर तरुण दिसतो… पुढच्या दृश्यात कर्ज चुकवण्यासाठी आपली गाडी विकणारा एक मध्यमवयीन गृहस्थ दिसतो.. अशा विखुरलेल्या दृश्यांमधून तुकड्यातुकड्यात आर्थिक मंदीनं वाताहत झालेलं, स्थलांतरितांनी भरलेलं, संशयग्रस्त माणसांचं अथेन्स समोर येत रहातं.

*********

यातल्या पहिल्या कथेत डॅफ्ने ही ग्रीक तरुणी आणि फारिस हा सीरीयन तरुण यांच्यातलं बेधुंद प्रेम आहे. दुसऱ्या कथेत गिआॉर्जिओस हा ग्रीक मनुष्य आणि एलिसे ही स्वीडनमधल्या कंपनीतली अधिकारी या दोघांमधलं समजूतदार प्रेम दिसतं. तिसर््या आणि शेवटच्या कथेत सेबॅस्टियन नावाचा साठीतला जर्मन इतिहासकार आणि मध्यमवयीन दोन मुलांची आई, सून, नातू असलेली मारिया दिसते.

“बेबेल” किंवा “शिप आॉफ थिसियस” या चित्रपटांचा format इथेही आहे.. तीन समांतर भासणाऱ्या कथा शेवटी एका धाग्यात एकत्र येतात. कशा येतात ते पहायला हवं..

Worlds Apart पहाताना दोन गोष्टी प्रामुख्यानं जाणवल्या. एक म्हणजे ज्या लोकांना कंपनीतून काढून टाकतात त्यांना आणि त्यांना तसं सांगणाऱ्या अधिकाऱ्याला काय मानसिकतेला सामोरं जावं लागत असेल. चित्रपटातला एकजण तर नोकरी गेल्यावर आत्महत्या करतो. हे चित्रपटापुरतं मर्यादित अर्थातच राहिलेलं नाही. कोरोनानंतरच्या जगात बेरोजगारी आणि त्यामुळे आत्महत्या यांचं प्रमाण वाढलं आहेच. “अप इन द एअर” या चित्रपटातल्या जॉर्ज क्लूनीकडे लोकांना तुम्हाला कंपनीतून काढून टाकलं आहे असं सांगायचं काम असतं. त्याची इथे किंचितशी आठवण होते.

******

दुसरं म्हणजे जे के सिमन्स या अभिनेत्यानं रंगवलेला सेबॅस्टियन. आपल्या drum player विद्यार्थ्याला अक्षरश: torture करणारा टेरेन्स फ्लेचर “व्हिपलॅश” या २०१४ सालच्या चित्रपटात जे के सिमन्सनं रंगवला होता. अॅंड्र्यू या आपल्या विद्यार्थ्याचा छळ करताना त्याच्या चेहर््या वरची बेपर्वा आणि मुजोर expressions आपल्याला कायम आठवतात. त्याला या भूमिकेसाठी आॉस्कर मिळालं होतं.

मात्र Worlds Apart मधला त्याचा हळुवार, मारियाचा अनुनय करणारा सेबॅस्टियन हा एक सुखद आश्चर्याचा धक्का देणारं प्रकरण आहे.. इतकं गाभा हलवून टाकणारं प्रेम आपण यापूर्वी कधीच केलं नाही याची जाणीव आणि कबुली त्याच्या चेहर््या वर दिसते.. त्याच्यातले आणि मारियामधले प्रेमप्रसंग आणि वैफल्य आपल्यालाच उन्मळायला लावतात..

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे,

प्यार कोई बोल नाही, प्यार आवाज नहीं

एक खामोशी है सुनती है कहा करती हैं

ना यह बुझती है, ना रुकती है, ना ठहरी है कही

नूर की बूंद है सदियों से बहा करती है..

या गुलजारच्या शब्दांवरचा विश्वास Worlds Apart दृढ करतो..

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

………………………………………………………………………………………….

नीलांबरी जोशी यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –नीलांबरी जोशी type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleसुली, दत्त्या, राम्या आणि काशिनाथ
Next article‘मॅग्नेटिक’ अटलबहादूर सिंग , नागपूरकर !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.