एक सज्जन खलनायक

https://mail-attachment.googleusercontent.com/attachment/u/0/?ui=2&ik=006cbc5c1c&view=att&th=13ff18729a402048&attid=0.1&disp=inline&realattid=f_hj9vhasa0&safe=1&zw&saduie=AG9B_P8to6WPV9e9YktG6uahFeIJ&sadet=1374146765122&sads=5muBBcUbgtLPTRbg55pmiLyngX4&sadssc=1

भारतीय चित्रपटसृष्टीतील कलावंत व सिनेरसिक यांच्यातील नातं मोठं मनोवेधक आहे. त्या कलावंतांचं जग आणि जगणं तसेच सामान्य रसिकांचं जग यात अगदी जमीन-अस्मानाएवढा फरक असला तरी चित्रपटप्रेमींना मात्र कलावंत हे आपल्या घरच्यांपैकीच एक वाटत असतात. देव, चित्रपट कलावंत आणि क्रिकेटर हे भारतीय माणसाचे प्रेम आणि श्रद्धेचा विषय आहेत. यांच्यापैकी एकही जण प्रत्यक्ष हाती लागत नसला तरी माणसं यांची पूजा करतात, यांच्यावर जिवापाड प्रेम करतात आणि अगदी आपुलकीने एकेरी नावाने त्यांचा उल्लेख करतात. तब्बल सात दशकं सिनेसृष्टीवर आपली अमीट छाप सोडणार्‍या प्राण या कलावंतावरही रसिकांनी असंच भरभरून प्रेम उधळलं होतं. त्यामुळे त्याच्या जाण्याने प्रत्येक सिनेप्रेमी घर हळहळलं. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात दिलीपकुमार, राजकपूर, देवानंद या नायकांचं जेवढं अमूल्य योगदान तेवढंच महत्त्वपूर्ण योगदान बहुतांश काळ खलनायकी साकारणार्‍या प्राण ऊर्फ प्राणकिशन सिकंद यांचं आहे. ज्या चित्रपटसृष्टीत एका रात्रीत माणसं स्टार होतात आणि काही दिवसांतच होत्याचे नव्हते होतात अशा निसरड्या आणि मोहमयी जगात त्याने अढळस्थान प्राप्त केलं होतं. खलनायक म्हटलं की गेल्या तीन पिढय़ांतील कुठल्याही चित्रपट रसिकाच्या डोळ्यासमोर पहिलं नाव प्राणचंच यावं, एवढं त्याचं स्थान महत्त्वाचं होतं. सतत खलनायकाच्या भूमिका पडद्यावर साकारायच्या आणि तरीही लोकप्रियता संपादन करायची, ही किमया त्याला साधली होती. म्हणूनच त्याच्या निधनानंतर ‘चित्रपटसृष्टीचा पाया निखळला,’ अशी बोलकी प्रतिक्रिया अमिताभ बच्चनने दिली.

१९४0 मध्ये ‘यामला जाट’ या पंजाबी चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार्‍या प्राणने जवळपास ३५0 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. २00७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मृत्युदाता’ हा त्याचा शेवटचा सिनेमा होता. सिनेसृष्टीत त्याच्याएवढं प्रदीर्घ काम दुसरं कोणीच केलं नाही. (अगदी दिलीपकुमारने सुद्धा नाही. दिलीपकुमारचा पहिला चित्रपट ‘ज्वारभाटा’ १९४४ मध्ये आला होता.) प्राणचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश अगदी योगायोगाने झाला. फोटोग्राफीच्या आवडीमुळे ए. के. दास अँण्ड कंपनीत प्रशिक्षणार्थी छायाचित्रकार म्हणून लाहोरला काम करत असताना एका रात्री तेथील सुप्रसिद्ध हिरामंडी या भागात पानठेल्यावर पान खात असताना वली मोहम्मद वली या चित्रपट लेखकाला तो दिसला. हे वली त्यावेळचे प्रख्यात चित्रपट निर्माते दलसुखराम पांचोली यांच्याकडे काम करत होते. त्यांना त्यांच्या नवीन चित्रपटासाठी एक देखणा चेहरा हवा होता. प्राणला पाहताच आपल्याला हवा आहे, तो हाच चेहरा आहे, असे त्यांना वाटले आणि त्यांनी त्यांना दुसर्‍या दिवशी स्टुडिओत यायला सांगितले. मात्र या वेळी वली हे दारूच्या नशेत असल्याने प्राणचा त्यांच्यावर विश्‍वास बसला नाही. अखेर आठ दिवसानंतर प्लाझा थिएटरमध्ये सिनेमा पाहत असताना प्राण पुन्हा त्यांच्या तावडीत सापडला. ते त्याला पांचोलींकडे घेऊन गेले. त्यांनी त्याला थेट खलनायकाची भूमिका ऑफर केली. पगार देऊ केला ५0 रुपये महिना. त्या वेळी फोटोग्राफर म्हणून प्राणला २00 रुपये महिना पगार मिळत होता. काहीशा संभ्रमित अवस्थेत त्याने करारपत्रावर सही केली. मात्र तेथून त्याचं जीवनच बदललं. ‘यामला जाट’ नंतर पांचोलींनी त्याला ‘चौधरी’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका दिली. त्यानंतर लगेच ‘खजांची’ या हिंदी चित्रपटात छोटी भूमिका दिली. गुलाम हैदरच्या स्वर्गीय संगीताने ‘खजांची’ सुपरहिट झाला. यामुळे खूष झालेल्या पांचोलींनी पुढील ‘खानदान’ या चित्रपटात प्राणला एकदम रोमँटिक नायकाची भूमिका दिली. नायिका होती नूरजहाँ.ही तीच नूरजहाँ जी पुढे ‘मल्लिका ए तरन्नूम’ या नावाने नामवंत गायिका म्हणून गाजली.

त्यानंतर प्राणने मागे वळून पाहिले नाही. एकापाठोपाठ एक चित्रपट त्याला मिळत गेले आणि तो चित्रपटरसिकांच्या गळ्यातील ताईत झाला. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी अमृतसर, रावळपिंडी व दूरदूरच्या शहरातून त्याचे चाहते लाहोरला येत असत. लोक त्याचा देखणेपणा व स्टाईलने प्रभावित होते. प्रख्यात उर्दू लेखक सादत हसन मंटोने ‘स्टार्स फ्रॉम अनदर स्काय द बॉम्बे फिल्म वर्ल्ड ऑफ १९४0’ या पुस्तकामध्ये तेव्हाचा प्राण कसा दिसत होता, याचं वर्णन लिहून ठेवलंय. ‘तो राजबिंडा होता. लाहोरमधील तो एक लोकप्रिय तरुण होता. त्याचे कपडे राजस होते. सायंकाळी त्याच्या टांग्यातून तो शहरात फेरफटका मारे, तेव्हा माणसं वेडावून त्याच्याकडे पाहत राहत. He is a man without up his sleeve. ‘खानदान’ नंतर लाहोरमध्ये त्याने ‘सहारा’, ‘दासी’, ‘कैसे कहू?’, ‘रागिणी’, ‘परदेशी बालम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये नायकाच्या भूमिका केल्या. त्याची कारकीर्द चांगलीच बहरत असताना १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. फाळणीच्या शोकांतिकेमुळे लाखो भारतीयांच्या आयुष्यात उलथापालथ झाली, तशीच ती प्राणच्याही आयुष्यात झाली. लाहोरमधील रक्तरंजित दंगलींमुळे त्याला लाहोर सोडावे लागले. तो बायको व लहान मुलाला घेऊन मुंबईला आला. गेट वे ऑफ इंडियासमोरील ताज हॉटेलमध्ये त्याने मुक्काम ठोकला. तेव्हा पंचावन्न रुपयात ताजमध्ये दोनवेळचं जेवण, नाश्ता व चहापाण्यासह रूम मिळत होती. मात्र जवळपास आठ-दहा महिने काहीच काम न मिळाल्याने प्राणची फरपट झाली. पंचतारांकित हॉटेलपासून सर्वसामान्य लॉजमध्ये राहण्याची पाळी त्याच्यावर आली. शेवटी तर बायको-पोराला नातेवाईकांकडे पाठवून तो एकटाच तेथे राहायला लागला. संपूर्ण आयुष्य सुखात घालविलेल्या प्राणसाठी हा मोठा झटका होता. मात्र परिस्थिती थोडी शांत झाल्यानंतर १९४८ च्या प्रारंभापासून त्याला पुन्हा काम मिळायला लागलीत. काही काळ का होईना वाईट दिवस वाट्याला आलेल्या प्राणने त्यानंतर कुठल्याही कामाला नकार दिला नाही. जे काम मिळेल ते तो स्वीकारत गेला.

१९५१ ते ६0 या दशकात त्याने तब्बल ७३ चित्रपटांत कामे केली. त्यापैकी बहुतांश सिनेमे हिट झालेत. त्यापैकी ‘अफसाना’, ‘मालकीण’, ‘बिराजबहू’, ‘मधुमती’, ‘अदालत’, ‘हलाकू’, ‘चोरी-चोरी’ असे अनेक चित्रपट प्रचंड गाजले. या चित्रपटांनंतर नायकांएवढीच प्रशंसा प्राणच्या वाट्याला यायला लागली. ‘अदालत’मधील प्राणची भूमिका अतिशय भाव खाऊन गेली होती. ‘अनेक वर्षांत पाहायला मिळाला नाही, असा ‘खलनायकांचा खलनायक’ असा दुर्मिळ अभिनय करून प्राणने हा चित्रपट खाऊन टाकला,’ असा अभिप्राय तेव्हा ‘फिल्मफेअर’ने दिला होता. ‘हलाकू’ या चित्रपटातील अभिनयाने प्राणला वेगळ्या उंचीवर नेले. क्रूर मंगोल शासक चंगीचखानच्या नातवाची भूमिका त्याने या चित्रपटात साकारली होती. हा ऐतिहासिक पोशाखी चित्रपट होता. खलनायकाचं नाव चित्रपटाला देण्याची ती पहिली वेळ होती. त्यानंतर प्राणची जी चढती कमान सुरू झाली ती कारकिर्दीच्या शेवटपर्यंत कायम राहिली. प्राणने पुढे खलनायकी सोडून चरित्र अभिनेत्याच्या भूमिका स्वीकारणे सुरू केले, पण त्यातही त्याने आपली जबरदस्त छाप सोडली. प्रत्येक चित्रपटातील आपला अभिनय वेगळा असेल, ही काळजी त्याने घेतली. अभिनयातील हे वेगळेपण वेगवेगळ्या लोकांच्या निरीक्षणातून येतं, असं तो सांगायचा. याशिवाय आपल्या दिसण्यावर आणि शब्दोच्चारावरही तो भरपूर लक्ष देत असे. अमिताभसोबतच्या गाजलेल्या ‘जंजीर’ सिनेमात पठाण दिसावं यासाठी त्याने दाढी आणि विग तर वापरलाच, सोबतच आवाजही पठाणासारखा यावा, यासाठी खूप मेहनत घेतली. खुद्द अमिताभने अभिनेता म्हणून व्यावसायिक असणं हे आपण प्राणपासून शिकलो, असं लिहून ठेवलं आहे. रात्री झोपायला कितीही उशीर हो. प्राण एकही दिवस शूटिंगला उशिरा यायचा नाही. पाऊस आहे, थंडी आहे, ट्रॅफिकमध्ये फसलो, असे सांगून त्यांनी कधीही शूटिंग रद्द केले नाही. पत्रकार बनी रुबेन यांनी प्राणवर लिहिलेल्या ‘…..आणि प्राण’ या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत अमिताभने एक प्रसंग नमूद केला आहे. ”एके दिवशी सेटवर ते अगदी शांत बसून होते. चित्रपट दिग्दर्शकाने त्यांच्याजवळ येऊन विचारलं, तुमचं आज काही बिनसलंय का? तेव्हा प्राण अगदी शांतपणे म्हणाले, माझ्या बंधूंचं अगदी थोड्याच वेळापूर्वी निधन झालं, पण शूटिंग रद्द होऊ नये अशी माझी इच्छा होती. अखेर जीवनरहाटी चालू राहिलीच पाहिजे.”

कामावर अशी प्रचंड निष्ठा असणार्‍या प्राणवर लिहिण्यासारखं खूप काही आहे. पडद्यावर आयुष्यभर खलनायकी करणारा हा माणूस प्रत्यक्ष आयुष्यात अतिशय सज्जन होता. त्यांच्या चित्रपटात अभिनेत्री असलेल्या अनेकांनी प्राणबाबतचे आपले अनुभव सांगितले आहेत. ‘त्याच्या सहवासात आम्हाला जेवढं सुरक्षित वाटायचं, तेवढं कुठेच वाटायचं नाही,’ असे त्या म्हणतात. त्यांच्या स्वभावातील चांगुलपणामुळेच चित्रपटसृष्टीत त्याचे खूप मित्र होते. दिलीपकुमार, राजकुमार, देवानंद हे तिघेही त्याचे अतिशय जवळचे मित्र होते. हे सारे ऐन भरात होते तेव्हा आठवड्यातील किमान दोन दिवस त्यांच्या पाटर्य़ा चालत. त्यांचे कौटुंबिक संबंधही होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे या तिघांसोबतही प्राणने प्रत्येकी नऊ चित्रपटांत काम केले आहे. प्राणला उर्दू साहित्य व शेरोशायरीची खूप आवड होती. वाचनही त्याच्या आवडीचा विषय होता. त्याच्या संग्रहात अनेक उत्तमोत्तम पुस्तकं होती. वेगवेगळ्या प्रकारच्या मोटारी बाळगणं हासुद्धा त्याचा छंद होता. राजकीय घडामोडींकडेही त्यांचे लक्ष असे. १९७७ च्या आणीबाणीच्या काळात त्याने एका वर्तमानपत्रात लेख लिहून आणीबाणीला आपला विरोध दर्शविला होता. तो लेख वाचून जॉर्ज फर्नांडिसांनी त्यांना कौतुकपर पत्र लिहिलं होतं. असे हे जिंदादिल प्राण. आयुष्यावर त्यांनी मनापासून प्रेम केलं. प्रत्येक क्षण भरभरून जगले. जातानाही ते म्हणाले असतील.

गुजरे हुए जमाने का अब तजकारा ही क्या

अच्छा गुजर गया, बहुत अच्छा गुजर गया

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे

कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Previous articleआमदार प्रवीण पोटेंची ‘मुकुट संस्कृती’
Next articleडॉक्टरांनो, तुम्ही सहानुभूती गमावून बसला आहात!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here