-अमित जोशी
पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे सर्वात उंच शिखर म्हणून एव्हरेस्ट शिखर हे ओळखलं जातं. याची उंची ही 8,848 मीटर किंवा 29,029फूट.
मात्र या सूर्यमालेत असे काही डोंगर /पर्वत आहेत की ज्यापुढे एव्हरेस्ट किस झाड की पत्ती… वगैरे असं वाटेल.
Vesta नावाचा लघुग्रह आहे. मंगळ आणि गुरू ग्रहांच्या मध्ये लघुग्रहांच्या पट्टातुन हा सूर्याभोवती फिरत असतो. सूर्यमालेतील हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा लघुग्रह समजला जातो, ज्याचा व्यास 569 किमी आहे. या लघुग्रहावर सुर्यमालेतील सर्वात मोठं विवर आहे ज्याचा व्यासच 529 किमी आहे. म्हणजे या विवराने लघुग्रहाचा मोठा भाग व्यापला आहे. या विवरामध्येच Rheasilvia नावाचा डोंगर आहे त्याची उंचीचा ही तब्बल 22.5 किमी म्हणजेच 73,818 फूट एवढी आहे. 1997 ला Vesta चे निरीक्षण करतांना ‘हबल टेलिस्कोप’ ने हा शोध लावला.
तर दुसऱ्या क्रमांकाचा उंच पर्वत हा मंगळ ग्रहावर आहे. Olympus Mons. खरं तर हा पर्वत पेक्षा एक मृतवत असा ज्वालामुखी आहे. Olympus Mons च्या छायाचित्रावरून याचे स्वरूप सहज कळून येईल. याची उंची ही Vest वरील उंच पर्वतापेक्षा कमी आहे. Olympus Mons ची उंची ही 21.287 किमी एवढी म्हणजेच 69,841 फूट आहे. नासाच्या मरीनर 9 या उपग्रहाने 1971 – 72 च्या सुमारास घेतलेल्या छायाचित्रांवरून Olympus Mons बद्दलची माहिती पुढे आली. या पर्वताचा पसारा एवढा मोठा आहे की फ्रान्स देशाचा 70 टक्क्यांपेक्षा जास्त भाग सहज व्यापेल. मंगळ ग्रहावर वातावरण आहे, अर्थात पृथ्वीच्या तुलनेत विरळ आहे. असं असलं तरी या Olympus Mons चे शिखर हे वातावरणाच्या जणू बाहेरच डोकवायचा प्रयत्न करते असं म्हंटलं तर चुकीचे होणार नाही.
जेव्हा मंगळ ग्रहावर मानवी होईल तेव्हा Olympus Mons चे शिखर सर करण्याचे एक आगळेवेगळे आव्हान तिथे असलेल्या गिर्यारोहकांपुढे असेल यात शंका नाही.
आता या लेखाच्या सुरुवातीला पृथ्वीच्या ‘पृष्ठभागावरील’ उंच पर्वत असा एव्हरेस्टचा उल्लेख केला. कारण असा एक पर्वत पृथ्वीवर आहे जो खरंतर पृष्ठभागावर नाहीये पण एव्हरेस्टपेक्षा उंच आहे. अशा Mauna Kea पर्वताबद्दल नंतर कधीतरी…..
……………………………………….
‘पॉईंट निमो- समुद्रातील ध्रुव
पृथ्वीचे 71 टक्के क्षेत्र हे पाण्याने तर 29 टक्के भाग हा जमिनीने व्यापला आहे. थोडक्यात पृथ्वीचा अथांग असा भाग पाण्याने खरं तर समुद्राने व्यापला आहे. या समुद्रात हजारो निर्मनुष्य बेटं आजही आहेत जिथे मानवाने अजून पाऊल टाकलेलं नाही. यापैकी अनेक बेटं एवढी खोल समुद्रात आहेत की या बेटांपासून दुसरी जमीन / बेट ही कित्येक हजार किमी अंतरावर आहेत.
यापैकी एक आगळंवेगळं बेट म्हणजे पॉईंट निमो. Nemo हा लॅटिन शब्द आहे, याचा अर्थ no one – कोणीच नाही.
( खंडाच्या किंवा एखाद्या बेटाच्या ) समुद्र किनाऱ्यापासून सर्वात दूरवरचं ठिकाण / बेट म्हणजे पॉईंट निमो अशी याची ओळख आहे.
हे बेट आधीपासून ज्ञात होते, या बेटाचा कधी शोध लागला याची माहिती उपलब्ध नाही. पण 1992 च्या सुमारास सर्व्ह इंजिनियर Hrvoje Lukatela ला संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून या बेटाबद्दलची एक वेगळीच माहिती मिळाली. हे बेट इतर बेटांपासून सर्वात दूर असल्याचं स्पष्ट झालं.
पॅसिफिक महासागराच्या दक्षिण भागात पॉईंट निमो नावाचे साधारण 3 किमी लांबीचे ( अर्थात ) निर्मनुष्य असलेले बेट आहे.
या बेटावर तुम्ही उभे राहिलात तर सर्वात जवळची जमिनीवरची मनुष्य वस्ती किंवा मनुष्याचा वावर हा किती जवळ असेल तर तरी सरासरी 2680 किमी अंतरावर.
जमिनीवर का म्हणालो तर या बेटावर उभे राहिल्यास अवकाशातील मनुष्य वस्ती सर्वात जवळची आहे.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे पृथ्वीपासून सुमारे 420 किमी अंतरावरून पृथ्वीभोवती फिरत असते. तेव्हा यामध्ये वास्तव्य करणारे अंतराळवीर हे बेटासाठी सर्वात जवळची मनुष्याचे वास्तव असणारे ठिकाण ठरत आहे.
या बेटापासून Duice Island, अंटार्क्टिकामधील Maher Island, जगप्रसिद्ध Easter Island ही सर्व बेटं सरासरी 2,680 किमी अंतरावर आहेत.
गंमत म्हणजे या बेटावर अजूनही कोणी पाऊल टाकलेलं नाही. मात्र काही शास्त्रज्ञ हे या बेटापासून काही किमी अंतरावर पोहचले होते. समुद्रात प्लास्टिकचे प्रदूषण हे सर्वात जास्त आहे. तेव्हा मनुष्यवस्तीपासून ,मनुष्याच्या वावरापासून एवढ्या दूर इथे समुद्रात प्लास्टिकचा अंश आहे का याची चाचपणी केली गेली.
Point Nimo चे हे भौगोलिक स्थान लक्षात घेता या बेटाला ‘समुद्रातील ध्रुव’ म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
या बेटाचे अशांश रेखांश आहेत -45.868333,-123.385000
(लेखक ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीत कार्यरत आहेत)
9833224281