ऑपरेशन…सायबर सेक्स मार्केट!

  -प्रमोद मुनघाटे

विदेशी मॉडेल्सला वेश्याव्यवसायाच्या संशयावरून नाट्यपूर्ण अटक झाल्याच्या बातम्या अधूनमधून नागपूरच्या प्रसारमाध्यमात झळकतात. दोन-तीन दिवस मग त्यावर खमंग चर्चा होते. मुळात कोणतीही प्रसारमाध्यमे अशा नाट्यपूर्ण घटनांची वाटच पाहत असतात, यात नवल नाही. पण वेश्या व्यवसाय इतक्या हायफाय लेव्हलवरूनही चालत असतो का? अशा भावनेने लोकांच्या भुवया उंचावल्या जातात. खरेतर त्यातही फारसे काही नवीन नाही, हेही सगळ्यांनाच माहीत असते. ‘मृच्छकटिक’ नाटकातील वसंतसेना असो की पुराणातील रंभा-अप्सरा असोत, ह्यासुद्धा तत्कालीन ‘हायफाय’ गणिकाच होत्या. इंद्राच्या सभेत नृत्यगायन करून देवांना व कुलीन पुरुषांना शृंगारसुख देणे हे त्यांचे कार्य असे. मध्ययुगातील मुस्लिम राजवटीत तर सामान्य गणिका बादशहाच्या कृपेने बेगम बनत असत. गणिका सरकारी कृपेने प्रथम ‘खवासी दासी’ म्हणून बादशहाच्या नृत्यशाळेत दाखल होत. पुढे कौशल्य दाखविल्यास ‘परी’ या पदावर बढती होई. नंतर तिचे सौंदर्य व वागणूक यामुळे राजा आकर्षित झाला तर ‘रखेली’ म्हणून ठेवत. पुढे राजापासून मुलगा झाला तर तिला ‘महल’ म्हणजे राणी असा किताब मिळे. याचा अर्थ हायफाय वेश्यावृत्ती ही खूपच प्राचीन आहे. फक्त इंटरनेटवरील वेबसाईट्सचा वापर करून त्यांची  जाहीरात करण्याचे प्रकार आधुनिक आहेत.

वेश्यांची कधी कधीच अचानक धरपकड का होते? हा खरा प्रश्न आहे. खुलेआम देहव्यापार करायला कायद्याने बंदी असली तरी तो चालूच आहे. माणसाच्या शरीराचा एखादा दुखरा अवयव असतो, तो अपरिहार्यपणे सांभाळावाच लागतो, तसा हा व्यापार समाजरूपी देहाचा भागच झाला आहे. देहव्यापारावर बंदी आणण्याचे कायदेही खूप गुतांगुतीचे व क्लिष्ट आहेत. त्यामुळे नेमकी बंदी कशावर आहे आणि कशावर नाही ते समजणेही सोपे नसते. (त्यासाठीच तर वकील असतात.) मुद्दा असा की कायद्याने बंदी असली आणि खुलेआम नसला तरी लपूनछपून हा व्यवसाय करायला समाजाची मान्यता आहे, असा त्याचा अर्थ होतो. थोडक्यात वेश्याव्यवसाय ही एक सामाजिक समस्या आहे. या क्षेत्रात संशोधन करणार्यांना मात्र वेश्याव्यवसाय हे अन्य सामाजिक प्रश्नांचे एक उत्तर वाटते.

मुंबई विद्यापीठात १९८५ च्या सुमारास डॉ.  सुनंदा जोशी यांनी १९७० ते १९७८ या कालखंडातील महिला गुन्हेगारीवर  संशोधन केले होते. त्यांचा निष्कर्ष असा की ‘‘वेश्या व्यवसाय नसता तर देशातील गुन्हेगारीचे प्रमाण व पुरुषांमधील विकृतीचे प्रमाण वाढले असते. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया अतिशय अशिक्षित आणि आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या असतात. त्यांना दुसरा पर्यायच नसतो. डॉ. जोशी यांच्या मते, ‘‘पोटापाण्यासाठी जर त्या स्वतःच्या इच्छेने हा व्यवसाय पत्करीत आहेत, तर त्यात सरकारने लक्ष घालण्याचे कारणच काय? या धंद्याला आर्थिक भांडवल लागत नाही. शिक्षण लागत नाही. परंतु वेश्या व्यवसायच नसता तर त्यांनी दुसरे कोणते काम केले असते? पैशासाठी त्यांना चोऱ्या,  घरफोड्या कराव्या लागल्या असत्या. त्यामुळे गुन्हेगारीत वाढच झाली असती. त्यामुळे वेश्या व्यवसायामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळाच बसला आहे.’’

डॉ. जोशींचा आणखी एक निष्कर्ष असा की, ‘‘जसजशा स्त्रिया शिकू लागल्या, तसतशा त्या पुरुषांच्या दास्यातून मुक्त होऊ लागल्या. आर्थिक मानसिक स्वातंत्र्य आले, समानतेची कल्पना मूळ धरू लागली आणि नोकरी, शिक्षण इ. अनेक क्षेत्रात पुरुषांची जागा स्त्रियांनी घेतली. पण स्त्री स्वातंत्र्यामुळे ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारी वाढली. कर चुकविणे, भ्रष्टाचार, धंद्यात फसवेगिरी, कायद्यातील पळवाटा शोधून सरकारला फसविणे, या गोष्टी स्त्रियांना सहज जमू लागल्या. स्त्री स्वातंत्र्यामुळे उच्चस्तरीय वेश्या व्यवसायतही वाढ झाली. चांगल्या व उच्च घराण्यातल्या अनेक स्त्रिया केवळ पैशासाठी, छानछौकीसाठी खुद्द आपल्या पतीच्या संमतीनेच हा व्यवसाय पत्करू लागल्या आहेत. मुंबईसह अनेक मोठ्या शहरात राहणाऱ्या घरंदाज बायका 2 ते 5 हजार रुपये नाईट घेऊन आपली हौस भागवत आहेत.’’ थोडक्यात, डॉ. जोशींनी स्त्री-शिक्षण, समानता आणि स्वातंत्र्याचा संबंध भ्रष्टाचार, स्वैराचार व अनैतिकतेशी जोडला आहे, तो खरा आहे का?

समाजातील उच्चभ्रू वेश्यावृत्ती या समस्येचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. पहिला कायद्याच्या संदर्भातला. कायद्याचा भंग करणाऱ्या वेश्यांना पकडले जाते. तोंड झाकलेल्या वेश्यांना पोलीसचैकीत घेऊन जातानाचे दृश्य नेहमी दिसते. (मात्र त्यांच्यासह सापडलेल्या गिर्हाईकांचे काय होते, ते पुढे कळत नाही.) म्हणजे एवीतेवी सामाजात वेश्यावृत्ती वाढते आहे. अधिक उच्च स्वरूप धारण करते आहे, हे कटू असेल पण सत्य आहे मग या व्यवसायाला कायदेशीर मान्यता का देऊ नये? असा प्रश्न निर्माण होतो. नेमका हाच प्रश्न तीन वर्षापूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल महंमद फजल यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रातून विचारला होता. त्यावर महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला होता. पण त्याहीपूर्वी सुप्रसिद्ध विदुषी व समाजशास्त्रज्ञ दुर्गा भागवत यांनाही वेश्याव्यवसाय हा सरकारमान्य व्यवसाय व्हावा असे वाटत होते. १९५६ मध्ये दुर्गाबाई तमाशा परिषदेच्या अध्यक्ष असताना पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटने केलेल्या तमासगिरांच्या जीवनाचा सव्र्हेच्या निमित्ताने त्यांनी वेश्यांचा अभ्यास केला होता. पुढे मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायंसेसनेही मुंबईतील वेश्याव्यवसायाचा अभ्यास करताना दुर्गाबाईंचे मत मागितले तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘युरोपातील जेन काय किंवा आमची जनी काय, दोघी मुळात एकच. त्यांचा अभ्यास करायचा झाला तर, वेश्यांकडे जाणाऱ्या पुरुषांचाही सर्वे करायला हवा. कारण पुरुष वेश्यांकडे जातात, ते केवळ सेक्ससाठीच असे नाही.’’ अर्थात दुर्गाबाईंची सूचना टाटा इन्स्टिट्यूटच्या पचनी पडली नाही. दुर्गाबाईंच्या मते, ‘‘आपल्या समाजातील सेक्शुअल प्रश्न फार जटील आहेत. म्हणून त्या प्रश्नांची तड लागत नाही. लागणारही नाही. कोणत्या बायका वेश्या होतात? का होतात? त्या जगतात कशा? या प्रश्नांची उत्तरे शोधणे अशक्य नाही. पण ते धाडस करण्याची मानसिकता कधीच निर्माण होत नाही.’’ दुर्गाबाईंचे निरीक्षण लक्षात घेता, स्त्री स्वातंत्र्यामुळे उच्चस्तरीय वेश्या व्यवसायतही वाढ झाली, वेश्या व्यवसाय नसता तर देशातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असते, किंवा पुरुषांमधील विकृतीचे प्रमाण वाढले असते, हे डाॅ. सुनंदा जोशी यांचे निष्कर्ष एकांगी वाटतात.

एकंदरीत वेश्याव्यवसायास कायदेशीर मान्यता द्यावी की नाही, हा प्रश्न साधासरळ नाही. त्याला पुष्कळ कंगोरे आहेत. १९९७ मध्ये कलकत्त्यात देशभरातल्या दीड हजार वेश्यांचा मेळावा भरला होता, तोही खूप गाजला. कारण इतिहासात घडलेली अशा प्रकारची घटना होती. हा मेळावा कलकत्त्यातील वेश्यांनी बोलाविला होता. त्यांचे म्हणणे असे होते की, सगळîा क्षेत्रातील लोक आपापली संघटना बांधतात. मग आम्हीही आमची संघटना करू, आम्हाला वेश्या न म्हणता लैंगिक कामगार (सेक्स वर्कर) म्हटले जावे. असे झाले तर इतर कामगारांप्रमाणे वेश्यांनाही काही अधिकार मिळतील. बारबाला किंवा मॉडेलिगच्या नावाखाली पोलिसांशी चाललेली लपाछपी बंद होईल. सेक्स वर्कर युनियन झाल्यावर पोलिसांचे हप्ते चुकवणे आणि त्यांची पिळवणूक बंद होईल. अर्थात हा केवळ आशावाद आहे.

आजच्या हायफाय सायबर सेक्स मार्केटिंगचाही विचार करताना स्त्रिया वेश्यावृत्ती का स्वीकारतात या प्रश्नाचे स्वरूप मात्र जुनेच आहे, हे लक्षात घ्यावे लागते. प्रसिद्ध बंडखोर लेखिका गीत साने यांच्या मते स्त्रिया वेश्या व्यवसाय स्वीकारीत नाहीत, तर परिस्थितीमुळे त्या लोटल्या जातात. क्षुल्लक कारणांवरून घटस्फोट दिलेल्या, टाकून दिलेल्या, विधवा व लग्न न होऊ शकलेल्या स्त्रिया केवळ पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमुळे अगतिकतेने वेश्यावृत्ती पत्करत असतात. म्हणजे रेड लाईट एरिया असो की इंटरनेटवरील वेबसाईट असो वेश्यावृत्तीचा उगम स्त्रीपुरुष संबंधातील दुटप्पी नैतिकता हीच आहे. देवदासी, देवांगणा, गणिका, कंचनी, रक्षा, सामान्य वेश्या असोत की सिनेमा-माॅडेलिगंच्या आडून देहव्यापार करणाऱ्या कॉलगर्लस् असोत त्यामागे  कारण विषम नैतिक मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था हेच आहे, हे लक्षात येते.

महानगरांमधील गुंतागुतीची जीवनशैली केवळ व्यापारी-आर्थिक संबधांनी नियंत्रित झालेली आहे. तेथे स्त्रीपुरुषांमधील संबध हे निखळ मानवी भावना, संवेदना व सौंदर्य यावर आधारलेले राहीलेले नाहीत. ते दुषित झाले आहेत. घर-कुटुंब हेही त्यातून सुटलेले नाहीत. तेथे मैत्री, प्रेम, लैंगिक संबंध हे निरपेक्ष उरलेले नाहीत. किंबहुना व्यावसायिक निष्ठेतून प्रेम-शरीरसंबंध आणि वेश्यावृत्ती यांच्यातील सीमारेषाच पुसट होत चाललेल्या आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘मेट्रो’ नावाचा चित्रपट यासंदर्भात बोलका आहे. संगणकप्रणाली आणि उपग्रहसंदेशवहन यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला मेट्रोसिटी आणि लहान शहराच्याही काही सीमा उरलेल्या नाहीत. सगळîांनाच सगळ्या गोष्टी (म्हणजे पुरेसा पैसा असलेल्यांना) घरबसल्या मिळू शकतात. याला देहव्यापारही अपवाद कसा राहणार? आणि या व्यापारातील एजंट इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजीचा वापर कसा सोडणार? सायबरयुगातील अमर्याद वेगाने सुरू असलेल्या प्रगतीचा हाही एक मानवी चेहराच आहे.

(लेखक जेष्ठ समीक्षक आहेत)

७७०९०१२०७८,

[email protected]

Previous articleउठवळ राजकारणाचा धुरळा !
Next articleदेवत्व संपायचा काळ जवळ येतो आहे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.