‘कप’ने केली सुटका, कापड आणि पॅडने छळले होते…

-नम्रता भिंगार्डे

गेले २ वर्षे मेन्स्ट्रुअल कप विषयी वाचत होते, युट्यूबवर पाहत होते पण प्रत्यक्ष वापरण्याचा धीर झाला नाही. यंदा लॉकडाऊनमध्ये अगदी ठरवून मी मीडीयम साईजचा Menstrual Cup मागवला आणि पाळीच्या पहिल्या दिवशी युट्यूबवर दाखवतात तसा फोल्ड करून योनीत सरकवला. त्या ५ दिवसांमध्ये मी कप हा पर्याय निवडायला इतका उशीर का लावला? हाच विचार केला.

पाळी आली की दिवसभर मांड्यांच्यामध्ये काहीतरी घातलंय त्याने चालता येत नाही ही अस्वस्थता, रात्री झोपल्यामुळे कपडे आणि बेडशीट यांच्यावर डाग लागेल ही भिती, पॅड्स वापरल्याने योनीच्या बाहेरच्या त्वचेवर उठणारी खाज, रक्ताचा क्लॉट कापसात विरेपर्यंत होणारी ओलसर जाणीव या सगळ्या त्रासांपासून एका क्षणात मुक्ती देणारा जादूचा दिवा सापडला…. मेन्स्ट्रुअल कप!

थोडं मागे जाऊयात…

नववीत होते…पी.टीचा तास त्यामुळे सगळेच ग्राऊंडवर होतो. सर काहीतरी इंस्ट्रक्शन्स देत होते म्हणून आम्ही मातीत लाईनीत बसलो होतो. बऱ्याच वेळाने उठलो तर माझ्या मागची मुलगी एकदम ओरडलीच. माझ्या युनिफॉर्मला मोठ्ठा डाग लागला होता आणि त्यावर माती चिकटली होती. लगोलग ती मैत्रिण मला घेऊन बाथरूममध्ये आली. (अर्थात सरांना न विचारता.)

बाथरुममध्ये पाहिलं… माझी चड्डी पूर्ण रक्तबंबाळ झालेली. चिकट ओलं वाटत होतं… युनिफॉर्म जमेल तेवढा धुतला. तोवर मैत्रिण बॅग घेऊन आलीच. रिक्षा करून मी घरी आले…

आईला सांगितलं…. पोटात दुखतंय आणि रक्त पण येतंय… काहीच न बोलता आईने आंघोळीला पाणी काढलं. डोक्यावरून ओतलेल्या प्रत्येक तांब्याभर पाण्यासोबत रक्ताचे लालेलाल ओघळ जाळीदार वर्तुळात गुडूप होत राहिले…

बाहेर आले तर आईने कापडाची व्यवस्थित घडी घालून ठेवली होती. तिनेच ती कशी घ्यायची हे दाखवलं. तिच्या कपाटातली एक चोरटी जागा तिने दाखवली. तिथे बरेच सूती कापडाची फडकी एकावर एक ठेवली होती. चौकोनी कापडाची जाडसर घडी कशी घालायची हे ही शिकवलं.

मांड्यांच्या मध्ये, चड्डीच्या आत कापडाची घडी वागवत वावरायचा संघर्ष फारच त्रासदायक होता. कितीही नीट घडी घातली तरी बसता उठता ती घडी एका बाजूला सरकायची. कधी भिजलेल्या कापडाच्या घडीचा वरचाच पदर अस्ताव्यस्त पसरायचा. दिवसभर पोट आणि कंबर दुखायची, पोटऱ्या भरून यायच्या, डोकं दुखायचं. झोपून रहावं वाटायचं. पण झोपलं की कापडाच्या घडीची सेटींग बिघडलीच म्हणून समजा. दररोज माझ्या कपड्यांना डाग लागायचाच.

घेतलेली घडी भिजली की दुसऱ्या कापडाची घडी ठेवायची आणि भिजलेलं कापड धुवायचं आणि ते वाळल्यावर पुन्हा वापरायचं. असं मी नववी आणि दहावी दोन वर्ष केलं.

मुंबईसारख्या शहरात राहत होते तरीही ९० च्या दशकात पॅड वापरण्याची सवय सर्रास सगळ्यांना नव्हती. अनेक घरांमध्ये कापडाची घडीच वापरली जायची. माझ्या वर्गातली ती मैत्रिण जिने प्रसंगावधान राखून मला ‘त्या’ दिवशी घरी पाठवलं होतं. तिने तर ती कशी घडी घेते हे मला प्रत्यक्षच दाखवलं होतं. तिने कमरेभोवती करदोडा टाईप नाडी लावली होती. आणि लंगोट घ्यावं तसं करदोड्यातून आरपार पुढून मागे असं तिने एक आवरण तयार केलं होतं. त्यात व्यवस्थित घडी बसवून मग चड्डी घालायची. ही पद्धत मला तरी जमली नाही.

शाळेत असताना फारच वैताग यायचा. पाळी आल्यावर एक कापडाची घडी घ्यायची आणि दुसरी घडी नीट दप्तरात ठेवून शाळेत जायचे. शाळेत भिजलेली घडी काढून त्या जागी कोरडी घडी ठेवायची आणि भिजलेली घडी प्लास्टिक पिशवीत घालून परत दप्तरात. (कारण शाळेत असताना फडकं धुता यायचं नाही.) घरी येईपर्यंत ती पिशवीतली रक्ताळलेली घडी सुकून जायची आणि ती धूताना वासही यायचा.

कॉलेजला जायला लागल्यावर मैत्रिणींमुळे पहिल्यांदा पॅड्सबरोबर ओळख झाली. तेव्हापासून Stayfree पॅड्स वापरायला सुरूवात केली आणि त्याचे वेगळे परिणाम भोगले.

मी पहिल्यापासूनच प्रचंड फिरणारी, ट्रेकिंग करणारी मुलगी… एकदा रायगडला जायचा प्लॅन केला आणि आदल्या दिवशीच पाळी आली. सगळा रायगड चढेपर्यंत पॅडच्या कडा घासत राहल्यामुळे माझ्या दोन्ही मांड्यांना जखमा झाल्या. पावडर लावून लावून तो ट्रेक पूर्ण केला. २०१० मध्ये बाजारात मिळणारे पॅड्स आतासारखे विंग्स वाले नव्हते. (जे होते ते महाग होते.) त्यामुळे त्याच्या कडा टोचायच्याच. कॉटन पॅड्समधल्या कापसाचे गोळे एकत्र व्हायचे. मुंबईच्या घामट वातावरणात कॉटन पॅड्सही उपयोगाचे नव्हते. बसता उठता चिकटायचे. अनेकदा तर पॅडचा वरचा लेअर फाटून आतला भिजलेला कापूस पण बाहेर यायचा.

मग whisper वापरायची सुरूवात केली. spunlace fabric आणि polyethylene वापरून बनवलेले विंग्सवाले पॅड्स! यात रक्ताच्या गुठळ्या शोषल्या जायच्या. त्यामुळे चिकट अनुभवापासून सुटका झाली पण polyethylene मुळे वेगळीच समस्या उद्भवली. पाळी येऊन गेली की योनीला प्रचंड खाज सुटायची. अगदी लालेलाल व्हायची त्वचा… Allergy!

गायनॅकोलॉजिस्टने ब्रॅण्ड बदलायला सांगितला. तरीही पहिले पाढे पंच्चावन्न. फिल्ड रिपोर्टींग करत असताना कधी कधी एक पॅड ५ तासांपेक्षा जास्त वेळ रहायचा. मग घाम, चालणं, आणि polyethylene ची रिएक्शन यांच्यामुळे दरवेळी पाळी येऊन गेली की हाच त्रास व्हायचा.

पाळी आल्यानंतर सुरूवातीची २ वर्ष सोडली तर गेले १६ वर्षे मी सॅनिटरी पॅड्स वापरतेय. या वर्षांमध्ये दर महिन्याची पाळी ही कटकटीची आणि बाह्य त्रास वाढवणारीच राहिली आहे. (पोटात दुखणं, अंगदुखी, पाय वळणं ही नेहमीची लक्षण होतीच सोबतीला.)

Cut to २०२० चा सप्टेंबर

ऑनलाईन मागवलेला मेन्स्ट्रुअल कप पाण्यात उकळून sterilize करून घेतला आणि पाळी आलेल्या दिवशी युट्यूबवर दाखवल्याप्रमाणे C fold करून योनीत सरकवला. पहिल्यांदा वर सरकवताना थोडा स्ट्रगल करावा लागला पण आत गेल्यावर सक्शनने तो उघडला गेला आणि डन…. नंतर एक थेंबही रक्त खाली आलं नाही. पहिल्या दिवशी मी सारखं सारखं बाथरूममध्ये जाऊन चेक करत होते. पण दुसऱ्या दिवशी त्याचीही गरज पडली नाही. तिसऱ्या दिवशी तर मी विसरूनच गेले होते की कप आत ठेवला आहे म्हणून…

आज पाच महिने मी हा कप वापरते आहे त्यामुळे मी नोंदवलेली काही निरीक्षणं…

१) सप्टेंबर ते जानेवारी मध्ये जर मी सॅनिटरी पॅड्स वापरले असते तर प्रत्येक पाळीत दिवसाला २ याप्रमाणे ५० सॅनिटरी पॅड्स मी वापरून फेकून दिले असते. याच हिशोबाने गेले १६ वर्षे मी १९२० सॅनिटरी पॅड्स वापरून फेकून दिले आहेत.😦

२) मेन्स्ट्रुअल कप काढून व्यवस्थित धुवून पुन्हा वापरता येतो. हा कप मला पुढची ५ वर्षे वापरता येणार आहे. म्हणजेच रक्ताळलेले सॅनिटरी पॅड्स कचऱ्यात टाकून कचरा उचलणाऱ्यांच्या हायजीनचे आणि त्या पॅड्सच्या विघटनाचे प्रश्न वाढवण्यापेक्षा मी पर्यावरण पुरक असा पर्याय वापरायला सुरूवात केली आहे.

४) रोज सकाळी आंघोळ करताना मी कप काढते. साठलेलं रक्त ओतून देते. कप व्यवस्थित गरम पाण्याने धुते आणि पुन्हा योनीत सरकवते. कप घालताना आणि काढताना कोणत्याही वेदना होत नाहीत.

५) पोटाचे स्नायू वापरून कप खाली ढकलला की त्याची शेंडी आपोआप हातात येते आणि कप अलगद बाहेर काढता येतो.

६) संडासला बसल्यानंतरी आपण पोटाचे स्नायू वापरतो. मग तेव्हा कप आपोआप बाहेर पडेल का? मलाही हा प्रश्न पडायचा. पण आपण स्वतःहून बाहेर काढल्याशिवाय कप बाहेर येत नाही.

७) मेन्स्ट्रुअल कप आत घातलेला असताना मी ट्रेकिंग केलेलं आहे. फिरायला गेले आहे. भरपूर प्रवासही केला आहे. पॅडपेक्षा कप मुळे मला ट्रेकिंग आणि फिरताना पाळी आलेली असूनही अजिबात अस्वस्थ वाटलं नाही.

८) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीची झोप… कोणत्याही कुशीवर झोपले तरी डाग लागण्याची काळजी किंवा पॅडमुळे वाटतं तसं अस्वस्थ वाटण्याचीही भावना नसते. रात्रभर शांतपणे झोप लागते.

(लेखिका मुक्त पत्रकार व पाणी फाउंडेशनच्या सोशल मीडिया प्रमुख आहेत)

………………………………………………………

कोणत्या साईजचा कप निवडावा?

कप कसा घालावा?

पहिल्यादा कप घालताना काय पथ्य पाळावीत?

कप योनीत एकदम आत जातो का?

ऑफीसच्या टॉयलेटमध्ये रिकामा करणे सोपे असते का?

कप घातल्यावर त्याची स्टेम म्हणजेच शेंडी बाहेर टोचते का?

आदी प्रश्नांच्या उत्तरासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/100002327735616/videos/3662415250512697/

Previous articleस्त्रीचे मन आणि तिची कामेच्छा…
Next articleगज़ल-फळांनी लगडलेली फांदी…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

6 COMMENTS

  1. अत्यंत महत्वपूर्ण विषयावर आपण लेख शेअर केलात मनःपूर्वक आभार.. गेली अनेक वर्षे मासिक पाळी व्यवस्थापन विषयी प्रशिक्षण मी देत आहे. अजूनही या विषयावर बोलायला, ऐकायला स्रिया सहज तयार होत नाही. अमरावती जिल्ह्य़ातील 96541विद्यार्थीनींपर्यंत व शिक्षकांपर्यंत मी हा विषय पोहचवला आहे. या विषयावर लिहते आहे. म्हणून हा लेख मला फार आवडला.

    • नमस्कार ताई, तुमच्या कामाविषयी जाणून घ्यायला आवडेल मला. – नम्रता भिंगार्डे

  2. अत्यंत महत्त्वाचा लेख .मुलींपर्यंत ही माहिती पोचवतांना उपयोग होईल मी माझ्या काॅलेजमधे सांगत असतांना अशा स्पष्ट सरळ व साध्या सोप्या भाषेतील लेखामुळे मदत होईल लेखिकेचे आभार.अजुनही ऐपत नसल्याने पॅड न वापरता कापड वापरणारा मुलींची संख्या आहे मग या दिवसात शाळा काॅलेजमधे न जाता त्या घरी रहाणे पसंत करतात. कपामुळे हायजिन, पर्यावरण विषयक आणि आर्थिक मदत होईल कारण एक कप बरेच दिवस वापरु शकतो.

    • कापड वापरणाऱ्या मुलींनी तर आवर्जुन कपचा वापर करावा असं मला मनापासून वाटतं. तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

  3. न बोलल्या जाणाऱ्या विषयाला वाचा फोडली ,छान !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here