-भारत पाटणकर
मृगाच्या प्रेमचिंब बरसाती प्रमाणं तिनं माझ्या जीवनात हळूवारपणे पाऊल टाकलं.मी जणू दख्खनची काळी माती…माझा कणन् कण त्या बरसातीनं संपृक्त झाला. आमची जीवनं अशी बिलगली की कुणाला वेगळं काढणं आणि कोण कुणाला बिलगलंय हे समजणं केवळ अशक्य. तरीही आम्ही वेगळे ,स्वतंत्र, स्वायत्त असणे या बिलगण्यात होते अंगचेच. हे सारं अजब, आगळं आणि अफलातून!
दर वर्षीची मृगाचीच बरसात पण ती नवीच असते . दरवर्षीची काळी माती, तीच असूनही नवीच असते. तसे आम्ही अनित्य . नित्य नव्या प्रेमाच्या बरसातीत बिलगून जास्त जास्त मानुष बनण्याचे नवनिर्माण करीत राहिलो.
आम्ही पहिल्यांदाच भेटलो तेव्हा या भेटीला निळ्या रंगाची पाखर होती.आकाष निरभ्र निळे,समुद्र निळाशार आणि सखी होऊ घातलेल्या गेलचे डोळे निळे. आणि मी पावसाळ्यातल्या घनांसारखा काळा. का ते अजून गवसले नाही , पण काळ्या रंगाला निळा म्हणण्याची मराठीतली जुनी, साहित्यातली,पद्धत आहे. त्यामुळे मीहि घननीळ!तसा निळा रंग हा माझा आवडता रंग. गेलच्या डोळ्यांत बघताना तिच्या डोळ्यांच्या निळाईमुळे मी जास्तच गुंतलो. पण निळाई बरोबरच तिच्या डोळ्यांतून भिडणाय्रा निरागसतेत जास्त गुंतलो. आम्ही एकमेकांची इतर चौकशी फारशी केल्याचं आठवतं नाही. आम्ही बोललो आपापल्या स्वप्नांबद्दल. आमच्या व्यक्तिगत , सांसारिक स्वप्नांबद्दल त्यात काहीही नव्हतं. ज्या समाजात आम्ही जगत होतो तो आम्हाला नको होता. त्याजागी कसा समाज आणला पाहिजे, त्यासाठी कशी चळवळ,कशी संघटना झाली पाहिजे याविषयी बोलत राहिलो. स्वप्नाळू माणसं अशीच बोलणार! अमेरिकेतली चळवळ , भारतातली चळवळ ; मार्क्स, फुले, आंबेडकर, शाहू असे बोलतच गेलो. समुद्राबद्दल, आकाशाबद्दल आणि निळ्या डोळ्यांसह काळ्या रंगाबद्दलही बोललो.
आम्ही एकमेकांना आवडलो होतो . भेटण्याच्या आधी आम्हाला एकमेकांची काही माहिती होतीच. गेल भारतातच राहून , भारतीय म्हणून राहू इच्छित असल्याचे सुद्धा मला स्पष्ट होते. पहिल्या भेटीतच आमची, एकमेकांचे सखे होण्याची प्राथमिक मानसिकता तयार झाली. आम्ही भेटत राहायचं ठरवलं. निरागस आणि स्वप्नाळू माणसं. असंच करणार! आमच्या पिढितली (१९६७-१९७५ या काळात कोवळे तरूण असलेली) तरूण-तरुणी बऱ्यापैकी येडी होती. त्यातली जी पूर्णच चौखूर उधळलेली होती ती तर पक्कीच येडी होती. आम्ही त्यातलेच होतो. आम्हाला परिवर्तनाच्या चळवळी पड्याल कशाचंच भान नसायचं. त्यासाठी जनतेत जायचं, जन चळवळ उभी करायची,रात्र रात्रभर जागून पछाडल्या सारखं वाचन करायचं, दाढी-केस वाढल्याची पर्वा करायची नाही, झिंगल्यासारखे वादविवाद करायचे वगैरे. आम्ही एकप्रकारचे हिप्पी होतो असेही म्हणता येईल! गेल अमेरिकेत असताना लोकशाही हक्क चळवळीत सक्रिय होती. व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळीत सक्रीय होती. वंशवाद विरोधी चळवळीचा भाग होती. आंदोलन करणारी होती. मी इथे मागोवा ग्रुपचा पुढाकार असलेल्या आदिवासी, शेतमजूर, कामगार, स्त्रिया यांच्या जनचळवळींमधे पूर्ण वेळ राबत होतो. कविता, लेख लिहित होतो. गेल तर माझ्यापेक्षाही जास्त लिहित होती.
बर्कलीला कॅलिफोर्निया विद्यापीठात असताना भारताच्या एका महात्म्याशी गेलची वैचारिक भेट झाली. महात्मा जोतिबा फुले. पण त्या आधी व्हिएतनाम युद्ध विरोधी चळवळीत भाग घेत असताना ‘तिसरे जग’ या सदरात येणाऱ्या देशांचे वास्तव, तिथल्या एकंदर तरुणाई बरोबर गेललाही समजले होते. भारत देश तिस-या जगातला. तिथे भारतातले काही पुरोगामी विद्यार्थी सुद्धा शिकत होते. या सर्व साखळीतून ती महात्म्याचे बोट धरून भारतात आली. सत्यशोधक, ब्राह्मणेतर चळवळीवर संशोधन करायला.तिला त्यावेळी माहीत नव्हते की ती फुल्यांच्या महाराष्ट्राच्या आणि महाष्ट्रातल्या एका , फुले परंपरेत जन्मलेल्या माणसाच्या प्रेमात पडणार आहे. अमेरिकेतील व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळीत एक मागणी पुढे आली. अमेरिकन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ‘तिसरे’ जग म्हणजे काय आहे ते समजले पाहिजे. या परिणामी तिसय्रा जगाचा अभ्यास करण्यासाठी खास विभाग सुरू करावे लागले. भांडवली जगाच्या अंतर्गत सर्वात शोषित देशांचा अभ्यास.
गेलचा जन्म मिनिआपोलिस शहरात झालेला. हे शहर मिनिसोटा राज्यात आहे.हे राज्य प्रामुख्याने शेती उत्पादन करणारं राज्य.त्यांचं कुटुंब आणि त्यांच्या सारखीच हजारो कुटुंबं युरोप खंडातल्या स्कॅन्डिनेव्हियन देशांमधून अमेरिकेत आलेली. तसं अमेरिकेत आल्यावर गेलचं कुटुंब टू हार्बर या शहरात राहून वाढलं. आजोबा अॉगष्ट ऑम्टव्हेट हे डेमॉक्रॅटिक फार्मर लेबर पार्टीचे होते. ते चार वेळा राज्य प्रतिनिधी (आमदार ) म्हणून निवडले गेले होते आणि दोन वेळा टू हार्बर शहराचे मेअर.त्यावेळी आणि आजही हा पक्ष मिनिसोटा राज्यापुरताच राहिला आहे. देश पातळीवर तो डेमॉक्रॅटिक पक्षाचा भाग राहात आला आहे. गेलचे आई-वडील सुद्धा याच पक्षांचं काम करीत. या राज्यात वंशवादी विचार-व्यवहार तुलनेने कमी राहिला आहे.गेलच्या कुटुंबाची परंपरा कामगार-कष्टकरी जनतेच्या बाजूने राहिली आहे. ही परंपरा नव्या सामाजिक अवस्थेत आणि नव्या प्रकारे पुढे नेणारी गेल मला भेटली.
आमच्या कुटुंबाची परंपरा ही स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाची आणि स्वातंत्र्यानंतर जनतेच्या खय्राखुय्रा स्वातंत्र्यासाठी बिनतोड संघर्ष करण्याची. आणि परंपरा मोडणारी नवीन परंपरा सुरू करणाची.स्त्रि मुक्ती, जाती अंत आणि वर्ग अंत करण्यासाठी लढण्याची.सत्यशोधक, समाजवादी,मार्क्सवादी , वारकरी अशा परंपरा संयुक्त करून व्यवहार करण्याची.आमचे मेतकूट जुळायला आणखी काही आवश्यक नव्हते. आम्ही भेटत गेलो . एकमेकांना फुले देत गेलो. एकमेकांच्या कविता ऐकत गेलो. गेल गिटारवर गाणी म्हणत गेली. बॉब डिलन , एल्वीस प्रिसले, जॉनी कॅश, जून कार्टर , इत्यादींची क्रांतिकारी प्रेमगीतं मला आवडू लागली. जीवनाचा भाग बनली.मी आमच्या जुन्या, नव्या चळवळींच्या परिसरातली गाणी म्हणून तिला त्या संस्कृतीचा परिचय करून देऊ लागलो.लोकसंस्कृतीमधील जे सण मानव- निसर्ग संबंधित नवनिर्माण करण्याशी जोडलेले आहेत त्या सणांची ओळख करून देऊ लागलो. टाईम्स दे आर अ चेंजिंग,ॲन्सर इज ब्लोईंग इन द विंड , लिटिल बॉक्सेस .. दे आर ऑल द सेम अशी गाणी माझ्या आवडीचा भाग झाली. जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव, माझी मैना गावावर राहिली, फेक बोजा क्षणाचा भांडवलशाही तत्वांचा, ए दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है, जाने वो कैसे लोग हैं जिनको प्यारसे पर्याय मिला अशी गाणी गेलच्या भावविश्वाचा भाग झाली. आम्ही रंगात रंग मिसळल्यासारखे मिसळून जाऊ लागलो. एकमेकांचे होत गेलो.
आता एकदा माझ्या आईला आमचं मेतकुट जमलेलं सांगायला पाहिजेच होतं. आई प्रतिसरकारच्या चळवळीत उडी घेतलेली बंडखोर.तिने परंपरेविरूद्ध बंड करून सशस्त्र भूमिगत असलेल्या माझ्या वडिलांशी प्रेमविवाह केला. लहानपणापासून माझी मनोभूमिका परिवर्तनाच्या चळवळीकडे नेली. घर तर माझ्या जन्माच्या आधीपासूनच चळवळींतले. आमचा निर्णय होण्याच्या काळात तर आई स्त्रि- मुक्ती चळवळीत पुढाकार घेत होती.गेलचा आणि तिचा परिचय सुद्धा झाला होता. आमच्या निर्णयाने आईला प्रचंड आनंद होणार हे आमच्या दृष्टीने हमखासच होते.पण मी हे सर्व सांगितल्यावर आई रडू लागली! मला काहीच कळेना.त्यावेळी मी , सुहास, स्वाती , विक्रम असे मुलुंडला कम्यून प्रकारे राहात होतो. आई तिथे येईल आणि आम्ही चर्चा करुया असे ठरले.
आईचा एकच मुद्दा होता. ज्यांचे नातेवाईक अमेरिकेत आहेत असे लोक आईच्या माहितीतले होते. त्यांनी तिथल्या संस्कृतीविषयी तिला सांगितले होते की तिथे दररोज घटस्फोट होतात,आई-बाप-मुलं यांच्यात प्रेमाचे नातेच नसते, स्वैर लैंगिक संबंध सर्रासच असतात, वगैरे. ‘मग आपल्या एकुलत्या पोराचं जीवन उध्वस्त होणार’अशी तिची पक्की समजूत झाली होती! आई मुंबईला आली. आम्ही तिच्याबरोबर , भरपूर माहिती सांगून भरपूर चर्चा केली. पण मी तिला म्हणालो की तुझ्या तरूण पणात तू स्वतः निर्णय घेऊन माझ्या वडिलांशी प्रेमविवाह केलास. कुणाचीही पर्वा केली नाहीस. आता तर तुला आनंद व्हायला पाहिजे कारण मीसुद्धा तुझ्याच पावलावर पाऊल टाकत आहे. आणि समजा पुढे आमच्यात प्रेम राहिलेच नाही तर आम्ही सहचर म्हणून कसे राहू शकतो? सहचारिका तर प्रेमाच्या पायावरच असू शकते. पण हे सर्व तिच्या बुद्धीला पटले तरी तिच्या भावनेला भावत नव्हते.
ही कोंडी खरे तर गेलनेच फोडली! तिने स्वतःच , तिचे माझ्यावर जीवापाड प्रेम असल्याचे अत्यंत प्रेमाने सांगितले.’प्रेम हीच गोष्ट आमच्या दोघांमधले अतूट बंधन आहे. तसेच असू शकते.मी औपचारिक पद्धतीने नागरिक होण्याआधीच भारतीय झाले आहे. मला इथल्या माणसांत राहायचे आहे. फुल्यांचं आणि चळवळींचं बोट धरून मी खेड्यापाड्यात फिरत आले आहे. असेल त्या परिस्थितीत चालले-राहिले आहे. मी आताच भारतीय आहे. आमचं प्रेम शोषणमुक्त समाज निर्माण करण्याच्या वाटेवर सहचारिका करणारे म्हणून आहे. आम्ही एकमेकांना जीव लावला आहे’. असे हृदयाच्या तळापासून सांगितले. ते आईला पोहोचले.
आई तशी गेलला आमच्या भागातील वाळवे गावी स्त्रि-मुक्ती शिबिरात भेटली होती. तिच्यामध्ये असलेल्या चळवळीच्या ओढीबद्दल तिला प्रत्यक्ष अनुभव आला होता.शिकलेल्या भारतीय तरुणी तिच्याप्रकारे चळवळीला जीव लावताना तिला दिसत नव्हत्या.हे ती कौतुकाने माझ्याबरोबर बोलली होती. पण त्यावेळी, गेल माझी सहचारिणी होणार अशी आईला काहीच कल्पना नव्हती. आता नव्या परिस्थितीत गेलच्या भावविश्वातून आलेल्या अंतरीच्या जिव्हाळ्यामुळे आईला गेलची वेगळी ओळख झाली. तिला तरूण इंदु आठवली. अशीच भारावलेली, निरागस, चळवळीवर जीव कुरवंडून टाकणारी,सख्याच्या प्रेमात न्हालेली. ती इंदू , गेलच्या संवादातून तिला भेटली. आईचा निर्णय गेलच्या बाजूनेच होणे मग ओघानेच घडले. गेल आजही अशीच आहे. निरागस, पारदर्शक, प्रेमाने आकंठ भारलेली,हृदय उघड करुन संवाद साधणारी. आज आई नाही. पण माझी आई होणारी आणि त्याचवेळी प्रियतमा असू शकणारी गेल आहे. या प्रसंगानंतर गेलने आईला ईंदुताई म्हणून कधीच हाक मारली नाही. “आय” म्हणूनच हाक मारली.
आमचे लग्न व्हायचे ( कायदेशीर) तर गेल अमेरिकेला जाऊन येण्यासाठी निघणार त्यापूर्वी होणे आवश्यक होते. मी तर आणिबाणी मुळे भूमिगत होतो.लग्नाचा कार्यक्रम केला तर मी पकडला जाऊ शकत होतो. त्यामुळे फारच मोजक्या लोकांच्या साक्षीने बाकी कुणाला माहीत न होता लग्न होणे आवश्यक होते. तसे नियोजन केले. लाल निशाण पक्षाचा ,आणिबाणीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आणिबाणीला पाठिंबा होता. शेवटी, शेवटी त्यांनी भूमिका बदलली. गेलचे पहिले पुस्तक लाल निशाणच्या ‘शास्त्रीय समाजवादी ट्रष्ट’ने प्रकाशित केले होते. गेल लाल निशाण पक्ष परिवारात राहणारी होती. पुण्याला ती कॉ. ए.डी. भोसले आणि लिलाताई भोसले यांच्याकडे बय्राच वेळा थांबायची. गेलवर त्यांची माया होती. त्यांच्या घराच्या एका खोलीत लग्न उरकायचं ठरलं. १७-१८ लोकांच्या साक्षीने ! ए.डी.-लिलाताईंसह; मागोवा ग्रुपचे सुधीर बेडेकर, त्याची सहचारिणी चित्रा, पुरूषोत्तम पानसे, अर्थातच माझी आई,मामी-मामा, आमचे वाटेगावचे डॉ. बने मामा,गेलची एक सफाई कामगार मैत्रिण ताराबाई, गेलची एक तरूण आणि सत्यशोधक परंपरेतली मैत्रिण पवार, लाल निशाण पक्षाचे नेते कॉ. यशवंत चव्हाण,माझा मिरज मेडिकल कॉलेजमध्ये असतानाचा मित्र आणि रुममेट डॉ. श्रीकांत खैर असे सर्वजण होतो. खर्चाचा कांहीं प्रश्नच नव्हता. लग्न छान झाले. खरे म्हणजे गेलच्या दृष्टीने हे एक प्रचंड धाडसाचे काम होते.
माझ्यावर आणिबाणीचे वाॅरंट होते. यामुळे तिला प्रचंड धोका होता. माझ्यापेक्षा कितीतरी जास्त. प्रेमाची ओढ आणि बांधिलकी इतकी जबरदस्त की तिने याची पर्वा केली नाही. गेल ही अशीच आहे. एकदा एक गोष्ट करायची ठरली की मग मागे हटणे नाही. जे काही व्हायचे ते होवो! आमच्या मधे हा समान झपाटलेपणा आहे.म्हणूनच आमचे जीवनच झपाटलेले आहे.”वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड ” या पुस्तकात प्रकाशित झालेला प्रबंध लिहिण्यासाठी गेल अशीच झपाटल्यागत फिरली होती. एसटीने ,चालत , उन्हा-पावसाची पर्वा न करता ती महाराष्ट्राच्या; सत्यशोधक परंपरा असलेल्या खेड्यापाड्यात फिरली होती. तिने नोटस् काढलेल्या डायऱ्या वाचल्या तरी हे लक्षात येते.तिच्या सर्वच पुस्तकांच्या बाबतीत हे खरे आहे. तिची सर्व पुस्तके त्या विषयाच्या संशोधनावर आधारित आहेत. सैद्धांतिक मांडणी करून त्या आधारावरच एकूण विषयाची मांडणी तिने केली आहे.चळवळींवरची पुस्तके तर चळवळीत सहभाग करुन संशोधन साकार केलेली आहेत. यामुळे संशोधनाचा विषय मांडताना ती चळवळीची कार्यकर्ती आणि संशोधक अशा दोन्ही भूमिका पार पाडत आली आहे! असे दुसरे उदाहरण मला तरी माहित नाही.
आमचं लग्न झाल्याचं गेलनं अमेरिकेला निघण्याआधी तीन चार दिवस , तिच्या आई-वडिलांना फोनवर सांगितलं! ते खुश झाले. माझ्या बरोबर सुद्धा बोलणं झालं आणि आणिबाणी वगैरे निवळल्यावर मी अमेरिकेला जायचं प्रेमाचं निमंत्रण सुद्धा मिळालं. गेलला निरोप देण्यासाठीच मी तिच्याबरोबर दिल्लीला गेलो होतो. जाताना कलकत्त्याच्या मित्रांना भेटून मग दिल्ली अशी आमची “हनिमून” ट्रिपच होती ती. विमान तळावर सिक्यूरिटी चेकसाठी जाण्यापूर्वी आम्ही एकमेकांना आलिंगन दिलं आणि तिनं अमेरिकन पद्धतीनं माझे ओठावर चुंबन घेतले.असे अचानक आवेगाने , सार्वजनिक जागेत ,मी क्षणभर गडबडलो पण मीही अखेरीस भारतातल्या”येड्या”जनरेशनचाच आणि परंपरा मोडणारा होतो ना!
आणीबाणी उठली , निवडणूक झाली. देशात एक नवे पर्व सुरू झाले. जनतेमधे काहीही स्थान नसलेले लोक “पवित्र”करून घेतले गेले. नव्या संदर्भात चळवळ सुरू करण्याची परिस्थिती तयार झाली. मंथन सुरू झाले. या संधी काळात मी ठरल्याप्रमाणे अमेरिकेला निघालो. तीन महिने राहण्याच्या तयारीने. परत येताना गेल , अमेरिकेतली नोकरी आणि अमेरिका सोडून, कायमची भारतीय होण्यासाठी येणार असं आधी ठरलेलंच होतं. आईने केलेल्या सेव्हींगमधून तिकिट काढायचं आणि गेल ते पैसे परत आईला देणार असा मार्ग काढला होता.मी तर मुंबईलाच होतो. आई आणि माझा मित्र विलास तिकिटाचे पैसे घेऊन मुंबईला सर्व श्रमिक संघाच्या ऑफिसवर आले. पासपोर्ट ,व्हिसा वगैरे कामे आधीच झाली होती. अशा प्रकारे शेवटी एअरपोर्टवर गेलो. मनात एक छुपी भीती होती. एअरपोर्टमधे आत गेल्यावर ती आणखीनच वाढली. कसाबसा शेवटी एक शेतकरी कुटुंबात वाढलेला ,फक्त चळवळी पुरताच मुंबई सारख्या शहरात धीट असलेला भारत अमेरिकेला जाणाऱ्या विमानात जाऊन बसला!
न्यूयॉर्कला केनेडी विमानतळातून बाहेर पडलो ते , ‘आता पुढे गेलच्या नोकरीच्या ठिकाणी , सॅनदिएगोला जाणारं विमान चुकलं तर माझं कसं’ या भीती खालीच.कसंबसं सगळं जमलं. सॅनदिएगोला उतरलो. बाहेर पडल्या पडल्या डोळे गेलला शोधू लागले. ती दिसली , मला आतुरतेनं धुंडताना आणि आम्ही कधी आलिंगन दिलं ते आमचं आम्हालाच कळलं नाही. म्हणाली, किती हडकुळा झालायस, हाड-कातडं एक झालंय आणि डोळ्यात पाणी. त्या निळ्या डोळ्यांत त्यावेळी मला दिसली एक व्याकूळ विरहिणी, प्रियतमा आणि आई सुद्धा. अगदी माझ्या आईसारखीच! तिच्या गाडीतून आम्ही राहण्याच्या ठिकाणी गेलो. माझं मन गेलच्या खांद्यावर निर्धास्त विसावलं. तिनं जाहीर केलं की परत जाईपर्यंत ती मला एकदम गुटगुटीत करणार!ही अशी गेल. अमेरिकन? भारतीय? की या जगातली एकमेव, अद्वितीय गेल. माझी सखी. मग आम्ही गप्पा मारत मारत,छानपैकी ब्लॅक काॉफी पीत मधला काळ भरून काढू लागलो.
अडीच तीन महिने अमेरिकेची आणि गेलच्या अमेरिकेची ओळख करून घ्यायची भटकंती सुरू झाली. गेलच्या मित्र -मैत्रिणींकडे , विद्यापीठांतील विभागांमध्ये, राष्ट्रीय उद्यानांमध्ये, म्युझियमस् मधे,प्रेक्षणीय ठिकाणांकडेआणि मुख्यतः मुक्काम मिनीआपोलीस मधे गेलच्या आई-वडिलांच्या घरी. साम्राज्यवादी देशांचा शिरोमणी देश आणि भारतातल्या बुद्धिवादी दुधाच्या साईतल्या अनेकांच्या स्वप्नातला स्वर्ग! पण इथंही दिसलं शोषण, वंशवाद, रंगवाद, स्त्रियांचं शोषण करण्याच्या आधुनिक पद्धती,पैशानं मानवी संबंध तोलणारी नाती.आणि त्याचबरोबर मानुष संबंधांची सुद्धा आस असलेली माणसं. गेलच्या मित्र-मैत्रिणी आणि त्यांच्या सारखे लाखो स्त्री- पुरुष अशा मानुष नात्यांच्या शोधात निघालेले,पर्यावरणवादी, हरित पृथ्वी साठी आसुसलेले. या दोन्ही अमेरिकांचं दर्शन गेलनं घडवलं. आईच्या मनातल्या भीतीला अमेरिकेच्या या मानुष अंगानं उत्तर दिलेलं मी अनुभवलं.
गेलनं एकेदिवशी नोकरीचा दिला राजीनामा. पुस्तकं वगैरे सामान आधीच पार्सल केलेलं. आमच्या प्रवासी बागा कारमध्ये टाकून आम्ही निघालो फिरत फिरत मिनिआपोलिस शहराकडं. गेलच्या आई-वडिलांकडे. पहिला खरा मुक्काम बर्कलीला. इथंच गेलची डॉक्टरेट झाली, कॅलिफोर्निया विद्यापीठात. तरूणांच्या चळवळींचं हे एक मोठं केंद्रच. इथंच तिनं महात्मा फुलेंचं बोट धरून भारतात जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या एका नातेवाईकांच्या विस्तीर्ण मोकळ्या घरात आम्ही विनंतीवरून राहिलो. इथून निघण्याआधी गेलनं कार विकली.आणि आम्ही कॅनडातील व्हॅंकूवर शहराकडे रेल्वेने गेलो. तिथे गेलला सिनियर पण तिची मैत्रीण असलेल्या ॲकॅडमिशीयन कॅथलीन गॉग राहात ,त्यांच्याकडे आम्ही राहिलो.त्याही भारताच्या अभ्यासक होत्या. व्हॅंकूवर मधेही गेलचे काही काळ वास्तव्य होते. एका अर्थाने मिनिआपोलिसला जाताना गेलने निवडलेला मार्ग हा तिच्या जीवनात आजपर्यंत पडलेल्या तिच्या पावलांना पुन्हा स्पर्श करीत जाणारा होता.
यानंतर मधेच आम्ही एका सुंदर नॅशनल पार्क मधे राहिलो. पूर्ण एकांत. पर्वत रांगांनी घेरलेल्या सरोवराच्या काठी. माणसांची वर्दळ जवळ जवळ शून्य. आम्ही दोघे आणि निसर्ग एवढंच अस्तित्व. सरोवरात जिला कनू म्हणतात अशा छोट्या नावेला दोघांनीच वल्हवत विहार करायचा, ट्रेकींग करायचं. एकमेकांना समजून घेणारं हितगूज करायचं.गेलनं अशा प्रकारे एक हळूवार परिसर निवडला की आम्ही आमची हृदयं एकमेकांत मिसळून द्यावीत. ही अशीही अबोल बोलकी गेल मी अनुभवली. आणि तिनं मला ज्या नव्या नात्याच्या विश्वात नेलं त्या विश्वात मी कायमचाच नवा झालो.
आता बफलो , जिनी (व्हर्जिनिया) आणि जीन या जोडीच्या घरी.हे दोघेही विद्यार्थी चळवळीतले. गेले अगदी जिवलग सवंगडी. घरच्यासारखं स्वागत आणि आनंदाला उधाण.इथूनच आम्ही नायगारा फाॅल्स वगैरे ठिकाणी भटकून आलो. गेलने आणि त्या दोघांनी मला बंद पडलेले , कारस् उत्पादन करणाऱ्या कारखान्याचं शहर दाखवायला नेलं. त्यांची मैत्रीण एका इंजिनिअरिंग कारखान्यात शाॅप फ्लोअरवर काम करत होती ती फॅक्टरीही दाखवली.
भारतात अजूनही स्त्रीया अशा प्रकारच्या कामांसाठी स्विकारल्या जात नाहीत. स्त्री मुक्ती चळवळ आणि अमेरिकन भांडवलशाहीचं पुढारलेपण मला दिसलं. जागतिक स्पर्धेत अमेरिकन इंडस्ट्री कशी कोलमडत गेली त्याचं सॅंपलही दिसलं. मला खास लेक्चर न मारता गेलनं अमेरिकेची वेगवेगळी अंगं मला उलगडून दाखवली! यातूनच माझी सखी मला जास्ती जास्त आकळू लागली. ती अशा अनेक पद्धतींनी माझं ज्ञान वाढवत गेली , मला जास्ती जास्त प्रमाणात समष्टीशी जोडत गेली मला न जाणवू देता! गेलने अशाप्रकारे मला हळूवारपणे ,अलगदपणे सिद्धांताच्या क्षेत्रात जास्ती जास्त प्रमाणात नेले.त्यामुळे माझा दृष्टिकोन जास्त व्यापक आणि सखोल झाला. मागोवा ग्रुपच्या पार्श्र्वभूमीवर ,” मार्क्सला सुद्धा मायक्रोस्कोप खाली ठेऊ”अशी जी दिशा मिळाली, प्रत्येक बाबतीत मुळात जाऊन समजून घेण्याची वृत्ती तयार झाली. तिला गेलमुळे पुढची झेप घेता आली.
यानंतर आम्ही पोहोचलो मिनिआपोलिसला .गेलच्या आई-वडिलांकडे. जावयाचे अत्यंत प्रेमाने आणि भरभरून स्वागत झाले.अगदी पारदर्शक. त्यांना मी आवडलो. दिसण्याच्या आणि असण्याच्या अशा दोन्ही अंगांनी. माझ्या आईला भारतातल्या काही लोकांनी जे सांगितले होते त्याच्या बरोब्बर उलटा अनुभव मला येऊ लागला! गेलच्या आई-वडिलांना मला कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झालेले दिसले.इतक्यापर्यंत की मला मिरचीचा ठेचा आवडतो असे गेलने सांगितल्यावर जेवणाच्या टेबलावर त्यांच्या न चुकता ‘चिली फ्लेक्स’ची बाटली येऊन बसली! सर्वात अचंब्याची गोष्ट म्हणजे जावयाचा मुक्काम चांगला दोन अडीच महिन्यांचा असूनही जावयाची सरबराई कधीच कमी झाली नाही. शहरात असलेले नातेवाईक; मावशांचे कुटुंबीय ,अत्र्यांचे कुटुंबीय इत्यादी मंडळी सवड काढून भेटायला आली!
हेही नक्की वाचा-दलित-शोषित-उपेक्षित समूहांत सर्वार्थाने समरस झालेल्या डॉ गेल ऑम्व्हेट-https://bit.ly/3zfDqcg
रिसेप्शन पार्टी आयोजित झाली. गेलचे आई-वडील ( डोरोथी आणि जॅक) यांनी मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना निमंत्रित केलं होतं. गेलच्या मावश्या,आत्त्या, वहिनीचे आई -वडील अशा सर्वांची कुटुंबे , गेल आणि आई- वडिलांचे मित्र-मैत्रिणी अशी सर्व कुटुंबे आली होती. गेलच्या चुलते मूळ गाव टू हार्बर्सला राहतात त्यांची कुटुंबे सुद्धा १००-१२५ मैल अंतरावरून आली होती! या पार्टीनं तर,” अमेरिकेत नातेवाईक मंडळीत प्रेमाचे संबंध नसतात “या प्रकारे आईला मिळालेल्या चुकीच्या माहितीला चोखपेक्षा जास्त चांगलं उत्तर दिलं. गेल प्रचंड खुष होती.चक्क लाजत बिजत होती! तिच्या एका मावशीनं म्हटलं” किती देखणा तरूण आहे” आणि गेलला आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या दिसत होत्या! गेलची,”एक प्रेमात पडलेली तरूणी” ही बाजू त्या पार्टीभर उत्साहानं वावरत होती. मला आणखी एक गेल कळली.
असे आम्ही , गेलचे आई-वडील असेपर्यंत सेमिनार वगैरेंच्याही निमित्तानेही अनेकदा गेलो. प्राचीचा जन्म झाल्यावर तिच्यासह गेलो.एकदा आई सुद्धा अमेरिकेत जाऊन धडकली. आम्ही आधीच तिथे असताना. ही होती गेलची कल्पना. आईला गेलमुळे खरी अमेरिका प्रत्यक्षच अनुभवायला मिळाली! गेलच्या मित्र-मैत्रिणींसह सर्व नातेवाईकांचा मानुष गोतावळा भेटला. आईला घेऊन आम्ही गेलच्या शिक्षिका-मैत्रिण आणि आंबेडकरी चळवळ आणि वारकरी संत साहित्याच्या जेष्ठ संशोधक एलिनॉर झेलियट यांच्याही घरी , शेजारच्या शहरी गेलो. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रु उभे करणारा अनुभव तिला मिळाला. ही पण आणखी एका पैलूची गेल.
व्यावहारिक जीवनात सिद्धांत आणि भावनांची सांगड घालणे, सिद्धांताच्या क्षेत्रात समरसून आणि भावनिक जिव्हाळ्याने संशोधन करणे हा गेलचा स्थायी भाव आहे. त्यामुळे दोन्ही क्षेत्रात एखाद्या निर्मळ निर्झरा प्रमाणे ती विहार करीत आली आहे.
(साभार : ‘वसा ‘ दिवाळी अंक – संपादक –संध्या नरे -पवार)
नक्की पाहा -ऐका –Dr.Bharat Patankar & Dr.Gail Omvedt interview by Mahesh Mhatre
मनाला भरवणारा सुंदर लेख…
मनाला भावणारा सुंदर लेख….