(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)
-मिथिला सुभाष
*******
‘साहिर’ म्हणजे जादू! युसूफ़ जमालचा एक शे’र आहे,
मैं साँसों को ज़हर समझ के पीता हूं लेकिन,
कौन है आखिर वो साहिर, जो ज़हर को शहद बनाता है..
हा शेर आपल्या साहिरसाठीच लिहिलाय की काय असं वाटावं, एवढी मोठी शब्दांची कीमिया-जादू तो करत असतो. त्याने अनेकांच्या आयुष्याचे जहर मधात तब्दील केलंय, बदललंय!
साहिर पहिल्यांदा भेटला शाळकरी वयात. राष्ट्रभाषा प्रबोध परीक्षेत त्याची एक नज़्म होती-
मेरी मेहबूब कहीं और मिलाकर मुझसे!
एक शहंशाह ने दौलत का सहारा लेकर
हम गरीबों की मोहब्बत का उडाया है मज़ाक़..!
त्या पंधरा-सोळाच्या वयात एकदम खाडकन तोंडात मारल्यासारखी ही कविता आली. ती इतकी असरदार होती की डोक्यात रोमांसचा जन्म होत असतांनाच, ‘ताजमहाल’ नावाचं रोमांसचं प्रतीक ध्वस्त झालं. ‘तल्खियां’ वाचण्यासाठी वडलांकडे उर्दूचे धडे गिरवायला लागले आणि त्याच सुमारास साहिर पुन्हा एकदा भेटला.
अभी ना जाओ छोडके, के दिल अभी भरा नहीं..
आह.. माझ्या भावविश्वात पुन्हा एकदा बहार आई.. आणि साहिरचं वेडच लागलं.
जादू म्हणजे भ्रम! साहिर एखाद्या भ्रमासारखाच दिलक़श आणि लुभावना होता. ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ किंवा ‘जिन्हें नाज़ है हिन्द पे वो कहां हैं’सारखी आधुनिक उर्दू अदबच्या भाषेत ज्याला ‘तरक्कीपसंद’ कविता म्हणतात, तशी गाणी लिहून तो जमिनीवर आणायचा. पण ‘आज सजन मुझे अंग लगा ले’ किंवा ‘हम आपकी आंखों में’ पण तोच लिहित होता.
पण खरा साहिर हा नव्हेच. या सगळ्याच्या पलीकडे,
‘कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, बात निकाली तो हर इक बात पे रोना आया’
किंवा
‘गम और ख़ुशी में फ़र्क न महसूस हो जहां, मैं दिल को उस मक़ाम पे लाता चला गया’
लिहिणारा साहिर, खरा साहिर. प्रेम आणि अध्यात्म-रुहानियत, हे दोन जज़बात त्याने कुठल्या कुठे नेऊन ठेवले. तो नेहमीची प्रेमगीतं लिहित होता तेव्हाच,
‘वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन,
उसे एक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा’
लिहित होता. प्रेमभंगाचा याहून जास्त ग्रेसफुल स्वीकार असू शकतो? नाही!
‘ज़ुर्मे उलफ़त पे हमें लोग सज़ा देते हैं’ …
ओह्ह… उफ़्फ़..!! निहायत मासूम कैफ़ियत! मी प्रेम केलं त्याची शिक्षा लोक मला देतायत! तुकडाच पडतो काळजाचा.
साहिरच्या प्रेमाला समंजसपणाची गहराई होती, जी त्याला सुधा मल्होत्राने दिली होती. विरहाचं अस्तर होतं, जे त्याला अमृता प्रीतमकडून मिळालं होतं. या वस्त्राला बेहतरीन संकल्पनांचे किनारे होते, बेशक़ीमती शब्दांच्या बुट्ट्या होत्या, ज्या त्याच्या अफ़लातून ज़हानतने, विलक्षण बुद्धिमत्तेने त्याला दिल्या होत्या. साहिरची गाणी त्याच्या फूलकोमल संकल्पनांमुळे डोळ्यांसमोर जगमगाता कहकशां-झगमगती आकाशगंगा साकार करायची. इश्क़बद्दल साहिरने लिहिलेलं एकच गाणं ऐका.
तेरा इश्क़ है मेरी आरज़ू, तेरा इश्क़ है मेरी आबरू
दिल इश्क़, जिस्म इश्क़ है और जान इश्क़ है
ईमान की जो पूछो तो ईमान इश्क़ है
तेरा इश्क़ मैं कैसे छोड दूँ, मेरी उम्रभर की तलाश है
ये इश्क़ इश्क़ तेरा इश्क़ इश्क़
ये इश्क़ इश्क़ इश्क़ है, इश्क़ इश्क़
पूर्ण क़व्वाली देणं शक्य नाही. पण आणखी चार ओळी दिल्याशिवाय दिल मानता नहीं..
नाज-ओ-अंदाज से कहते हैं कि जीना होगा
जहर भी देते हैं तो कहते हैं कि पीना होगा
जब मैं पीता हूं तो कहते हैं कि मरता भी नहीं
जब मैं मरता हूं तो कहते हैं कि जीना होगा
कारण??
ये इश्क़ इश्क़ है इश्क़ इश्क़, ये इश्क़ इश्क़ है इश्क़ इश्क़
वल्लाह..! आफ़रीन..!! मरहबा..!!!
प्रेमाबद्दल याहून जास्त, याहून वेगळं, याहून चांगलं कुणी काय लिहेल राव! सब तो उस जादूगर ने, साहिर ने लिख दिया!!
प्रत्येक कवी, शायरला कधीतरी एखादं सेन्श्युअस, मादक पण पटकन उमगणार नाही असं कोडं घालण्याचा मोह होतो. मजरूहने जसं, ‘आंचल में क्या जी, अजब-सी हलचल’ लिहिलं, शक़ील बदायुनीने तर ‘ढ़ूँढ़ो ढ़ूँढ़ो रे साजना’ हे मधुरात्रीचं साग्रसंगीत वर्णन करणारं पूर्ण गाणंच लिहिलं, तशीच एक अतिशय इंटेन्स लाईन साहिरने चित्रलेखाच्या ‘ए री जाने न दूंगी’ या गाण्यात लिहिलीये. ‘आज सखी पी डालूंगी मैं दर्शनजल की बूंद-बूंद!’ अय्योsss…!!
साहिरची spirituality-रुहानियत किंवा अध्यात्माकडे जाण्याआधी त्यानं लिहिलेल्या आणखी दोन गाण्यांचा ज़िक्र केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तशी तर त्याची शेकडो गाणी राहून गेलीयेत, जी कुठल्याही उल्लेखाची मोहताज़ नाहीत. पण मला ‘दिल ही तो है’मधे शिरायचंय, म्हणून त्यातली एक ही क़व्वाली!
‘निगाहें मिलाने को जी चाहता है!’
यातली एक शरारत लाजवाब है.
‘किसीके मनाने में लज़्ज़त वो पाई कि फिर रूठ जाने को जी चाहता है!’
मी रुसल्यावर ‘कुणीतरी’ मला अस्सा मस्का मारलाय ना, की मला पुन्हा रुसून बसावंसं वाटतंय! कसली जालीम शोख असेल ही छोरी! याच फिल्ममधलं दुसरं गाणं,
‘तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्क़िल होगी’ हे गाणं म्हणजे, प्रेमातल्या पझेसिव्हनेसचा कळस आहे आहे.
या सिनेमात साहिरने आध्यात्मिक उंची गाठणारं एक गाणं लिहिलंय.
लागा चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे
चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग…
या जगात जगतांना मी खूप चुका केल्या. ‘तिथून’ ‘इथं’ येतांना माझ्या ‘बापानं’ मला जे शिकवलं होतं, जे निरागस पावित्र्य माझ्या ओंजळीत टाकलं होतं, ते सारं मी विसरून गेले. आता जेव्हा पुन्हा ‘तिथं’ जाईन, तेव्हा मी माझ्या त्या ‘बापाशी’ नजर कशी मिळवू?? माझ्या ‘चुनरी’वर चुकांचे डाग लागलेत!
हो गई मैली मोरी चुनरिया
कोरे बदन सी कोरी चुनरिया
जाके बाबुल से नज़रें मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग…
जितका अस्पर्शित देह मी इथे आणला होता, तेवढीच निर्मळ होती माझी चुनरी. आता त्यावर एवढे डाग पडलेत की, मैं बाबुल से नज़रें मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे?? कशी जाऊ परतून??
याच गाण्यात साहिर पुढे लिहितो,