बाबांचे कीर्तन पांडित्यप्रधान नव्हते. हे कीर्तन पारंपरिक नव्हते. हे कीर्तन एका वेगळ्याच धाटणीचे होते. या कीर्तनाचा केंद्रबिंदू देव आणि धर्म नव्हता तर केवळ आणि केवळ सामान्य माणूस होता. गेली शेकडो वर्ष ज्या रुढी परंपरांनी माणसे करकचून आवळली गेली होती ते रुढी परंपरेचे दोरखंड कापून टाकून मुक्तीचे एक नवे आकाश बहाल करणारे हे कीर्तन होते.या किर्तनात प्रत्येकाच्या मेंदूला झिणझिण्या आणण्याची ताकद होती. एकेका शब्दात वैचारिक ज्वालामुखी दडला होता. म्हणूनच तर बाबांच्या एका शब्दावर लोकं स्वतः ला झोकून देत होते.हे कीर्तन लोकांना अर्थशास्त्र अन् समाजशास्त्र समजावून सांगत होते. तब्बल पन्नास वर्ष हे दगडी टाळांचे स्वर महाराष्ट्राच्या मनोभूमित गुंजत राहिले. आजच्या या महाराष्ट्राच्या जडणघडणीत संत गाडगेबाबा यांच्या कीर्तनाची भूमिका महत्वाची ठरली आहे.संत नामदेवांना अभिप्रेत असलेला समाज, फुले, शाहू यांना अपेक्षित असलेला समाज घडविण्याचे मोलाचे कार्य बाबांच्या कीर्तनाने केले आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही.आज सर्वत्र अध्यात्माचा बाजार मांडलेला दिसतो आहे, बुलेट प्रुफ बुवा ,बापू , साध्वी,महाराजांचे ऑनलाईन स्तोम माजविले जात आहे.लोकांच्या मेंदूत गुलामगिरीचे व्हायरस पेरल्या जात आहे. अशा वेळी हे व्हायरस स्कॅन करण्यासाठी संत गाडगेबाबा यांनी दिलेलं कीर्तनाचे ” अँटी व्हायरस सॉफ्टवेअर” खूप महत्वाचे वाटते.
” विद्या मोठं धन आहे,जेवणाचं ताट मोडा, बायकोले लुगडं कमी भावाचे द्या , मोडक्या घरात रहा पण मुलाले शिक्षण दिल्याविने सोडू नका.” हा जो विचार आहे तो एका नव्या लढाईचे संघर्ष गीत आहे.अक्षर ओळख नसलेला पण ज्ञानपिपासू असलेल्या या महामानवाने आयुष्यभर कीर्तनातून ज्ञानज्योती पेटविल्या.आज शैक्षणिक क्षेत्रात गाडगे महाराज मिशनने जे वैभव उभे केले आहे त्या वैभवात या देशातील वंचित विद्यार्थी उजळून निघत आहे.कर्मवीर भाऊराव पाटील , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक क्रांतीत संत गाडगेबाबांच्या कीर्तनाने आणि कृतीने मोलाची भर घातली आहे. कीर्तनातून पेटविलेली परिवर्तनाची ज्योत गाव-खेड्यात जावी म्हणूनच बाबांच्या मार्गदर्शनात संत मीराबाई शिरकर, संत गयाबाई मनमाडकर अशा सिद्धहस्त महिला कीर्तनकार निर्माण झाल्यात.