कुतूहल निर्माण करणारा कुंभमेळा

-अविनाश दुधे

कुंभमेळ्यात सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र हे साधूच असतात. वेगवेगळे पंथ, परंपरा व उपासना पद्धती मानणारे हे साधू वेगवेगळ्या आखाड्यांशी जोडले गेलेले असतात. (कपाळावरील गंधामुळे साधू कुठल्या पंथाचे आहेत, हे ओळखता येते.) एकूण १३ मुख्य आखाडे आहेत. यामध्ये १0 शैव पंथांचे तर ३ वैष्णव पंथांचे आहेत. जुना आखाडा, अखंड आव्हान, तपनिधी निरंजन, आनंद, आव्हान, अग्नी, महानिर्वाणी, अटल, उदासीन, निर्मल, निर्वाणी, निर्मोही, दिगंबर अशी आखाड्यांची नावे आहेत. कुंभमेळ्यात या आखाड्यांना वेगवेगळी जागा उपलब्ध करून दिली जाते. प्रयागमध्ये शैवपंथीय व वैष्णवपंथीय साधूंसाठी साधूग्राम वसविण्यात आले आहे. कोणत्या आखाड्यातील साधू कोणत्या क्रमाने स्नानाला जातील हेसुद्धा आधीच निश्‍चित झाले असते. कोण आधी स्नान करायचं यावरून भूतकाळात साधूंमध्ये प्रचंड मारामारी व कत्तलही झाली आहे. २00 वर्षांपूर्वीच्या एका कुंभमेळ्यात निर्मल आखाड्याच्या साधूंना अगोदर स्नान करावयास न मिळाल्याने झालेल्या हाणामारीत जवळपास पाच हजार साधूंचा मृत्यू झाला होता. इंग्रजांच्या राजवटीतही साधूंची स्नानासाठीची चढाओढ त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय होती. बर्‍याच प्रयत्नानंतर इंग्रजांना आखाड्यांच्या स्नानासाठीचा क्रम ठरविण्यात यश आले. २०१५ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात साध्वींनी आम्हाला स्नानासाठी वेगळी जागा तसेच साधूग्राममध्ये निवासासाठी स्वतंत्र जागा मिळावी, अशी मागणी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते . तेव्हा  भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी  साधू-महंत हे साध्वींना स्नानासाठी जागा देण्याचा प्रकार सहन करणार नाही, असे सांगितले होते . प्रयागराजमध्येही तो वाद कायम आहे . एकंदरीत हिंदू धर्ममार्तंड स्त्रियांना दुय्यमच मानतात, हे ते वारंवार दाखवून देतात.  अशा वेगवेगळ्या प्रथा-कुप्रथा कुंभमेळ्यात कसोशीने जपल्या जातात. कर्मकांडांना तर ऊत येतो. प्रयागराजमध्ये आता ४ मार्चपर्यंत वेगवेगळे विधी, पूजा, यज्ञ चालतील. हजारो वर्षांपासून हे प्रकार सुरू आहेत. अनेक चित्रविचित्र प्रथा-परंपरा कुंभमेळ्यादरम्यान पाहावयास मिळतात. हे एक वेगळंच जग आहे. कुंभमेळ्यादरम्यान तुमचंही मत काहीही असलं तरी हे औत्सुक्यपूर्ण जग पाहण्यासाठी कुंभमेळ्याला एकदा अवश्य भेट द्यायला हरकत नाही.

                                                                                                                                        नागा साधूंचं अद्भुत विश्‍व

 

साधूंमध्ये नागा साधूंबद्दल सर्वाधिक औत्सुक्य असते. जवळपास संपूर्ण नग्न राहणारे, संपूर्ण शरीराला राख चोपडणारे आणि हातात शस्त्र बाळगणार्‍या या नागा साधूंबद्दल भक्तांना आदर असण्यासोबतच भीतीही असते. नागा साधूंजवळ तलवार व चिमटा असतोच. आपल्या जटा ते झेंडूची फुलं आणि रुद्राक्षांनी सजवितात. कपाळावर टिळा लावण्याकडे नागा साधूंचे बारीक लक्ष असते. टिळा लावण्याच्या शैलीत ते कधीही फरक पडू देत नाही. यांचा शृंगार पाहण्याजोगा असतो. असं म्हटलं जाते की, स्त्रिया १६ प्रकारचा शृंगार करतात, मात्र हे १७ प्रकाराने स्वत:ला सजवितात. मात्र या नागा साधूंशी पंगा घेण्याचं सारेच टाळतात. कारण हे अतिशय शीघ्रकोपी असतात. क्षुल्लक कारणामुळे ते संतापतात. प्रसंगी शस्त्रांचा वापरही करतात. नागा साधूंना साधू होण्याअगोदर अतिशय कठीण परीक्षा पास करावी लागते. एखाद्या व्यक्तीला साधू व्हायचं असेल, तर एकदम त्याला दीक्षा दिली जात नाही. आधी तो साधू का होऊ इच्छितो, हे तपासले जाते. त्यानंतर त्याच्या ब्रह्मचर्याची तपासणी होते. संबंधित व्यक्ती वासना आणि इच्छांपासून पूर्ण मुक्त झाला अशी आखाडयाची खात्री पटल्यानंतर त्याचं स्वत:च श्राद्ध आणि पिंडदान केलं जातं. त्यानंतर २४ तास त्याला अन्नपाणी दिलं जात नाही. त्यानंतर आखाडयाच्या ध्वजाखाली त्याचं गुप्तांग निष्क्रिय केलं जातं. हे सारं झाल्यानंतर त्याला साधू म्हणून घोषित केलं जातं.
                                                                                                                                   

                                                                                                                             प्रयाग कुंभमेळ्याचे महत्व

हरिद्वार, नाशिक , उज्जैन आणि प्रयाग या चारही ठिकाणच्या कुंभमेळ्याचे वेगवेगळे महत्व आहे . प्रयागला गंगा , यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर हा कुंभ होत असल्याने  येथील कुंभमेळा विशेष महत्वाचा मानला जातो .  प्रयागराजमध्ये  ज्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित होतो तिथे सृष्टीचा प्रारंभ झाला होता आणि पृथ्वीचे केंद्रही तिच जागा आहे , अशी समजूत आहे . (अर्थात वैज्ञानिकदृष्ट्या त्याला काहीही आधार नाही )  ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण करण्याअगोदर याचं ठिकाणी अश्वमेध यज्ञ केला होता , अशीही मान्यता आहे  येथील दश्वमेघ घाट और ब्रम्हेश्वर मंदिर या गोष्टीचे पुरावे असल्याचे धार्मिक मंडळी सांगतात. प्रयागराजचा कुंभमेळा हा अर्धकुंभ म्हणून ओळखला जातो. प्रत्येक १२ वर्षानंतर याचे आयोजन होते . ज्योतिष्यांच्या मते जेव्हा  बृहस्पति कुंभ राशीत आणि  सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा प्रयागमध्ये कुंभचे आयोजन होते . मेष राशीचक्रात बृहस्पति आणि सूर्य आणि चंद्र मकर राशीत  प्रवेश केल्यानंतर अमावस्येच्या दिवशी प्रयागमध्ये कुंभ  पर्व  आयोजित केले जाते , असेही सांगितले जाते .
 

(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

#कुंभमेळा #mediawatch

Previous articleसाहित्यातील हुल्लडबाजी!
Next articleव’संत’ नामदेव !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.